मुंबईः महाराष्ट्रात राजधानी मुंबई व अन्य शहरांमध्ये कोरोना-१९ विषाणू व ओमायक्रॉन या कोरोना-१९ विषाणूच्या प्रजातीचा संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांची वा
मुंबईः महाराष्ट्रात राजधानी मुंबई व अन्य शहरांमध्ये कोरोना-१९ विषाणू व ओमायक्रॉन या कोरोना-१९ विषाणूच्या प्रजातीचा संसर्ग झालेल्या नव्या रुग्णांची वाढ होत आहे. गुरुवारी राज्यात कोरोनाचे ५३८८ नवे रुग्ण आढळले तर मुंबईत गुरूवारी ३६१७ कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले. २४ तासात एवढे रुग्ण वाढल्याची ही गेल्या काही दिवसांतील पहिलीच घटना असून ही आकडेवारी ४६ टक्के असल्याचे प्रशासनाने सांगितले. मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या ११,३६० इतकी असून कोरोनाच्या महासाथीत एकूण १६३७५ जणांचे बळी घेतले आहेत. बुधवारी मुंबईत कोरोनाचे २५१० रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गुरुवारीही संख्या वाढल्याने राज्यात सतर्कतेचे इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील कोरोनाचे संकट पाहून बृहन्मुंबई महानगर पालिकेने आपल्या सर्व २४ वॉर्डमध्ये वॉर रुम तयार करण्यास सुरूवात केली आहे. शहरात पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला असून राज्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी नागरिकांनी नववर्षाचे स्वागत घरातच करावे असा आग्रह धरला आहे. कोरोनाचे संकट गेलेले नाही, रुग्ण संख्या वाढल्यास लॉकडाउनशिवाय पर्याय उरणार नाही, असेही वळसे-पाटील म्हणाले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकारने दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, प. बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व झारखंड या ८ राज्यांना कोरोना प्रतिबंधक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे. केंद्र सरकारचे हे निर्देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे आहेत. केंद्राने लसीकरणाच्या वेगावरही भर देण्यास या राज्यांना सांगितले आहे.
केंद्राचे हे निर्देश गेल्या १० दिवसांत कोरोनाचे सरासरी रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आले आहेत. गेल्या आठवड्यात देशात कोरोनाचे ८ हजाराहून रुग्ण आढळत आहेत. २६ डिसेंबरनंतर हा आकडा १० हजारच्या आसपास गेला आहे. महाराष्ट्र व केरळमध्ये १० हजाराहून अधिक रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली आहे. गुरुवारी २४ तासात देशात कोरोनाचे १३,१५४ रुग्ण आढळून आले आहेत. तर २६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
‘जगाच्या आरोग्य व्यवस्थेवर सुनामी येईल’
दरम्यान गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन, डेल्टा या कोरोना-१९च्या विषाणू प्रजातीमुळे जगातल्या अनेक देशांमध्ये हाहाकार माजून तेथील आरोग्य व्यवस्थेवर सुनामी येईल, असा धोका व्यक्त केला आहे. संघटनेचे अध्यक्ष अदनोम घेब्येयियस यांनी डेल्टा व ओमायक्रॉन या दोन कोरोना विषाणू प्रजातीमुळे धोका वाढला असून संसर्ग रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक रुग्ण मरण पावत असून इस्पितळांवर ताण येत असल्याचे सांगितले.
COMMENTS