राज्यसभेत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन संज्ञा शोधून काढली- ‘आंदोलनजिवी’. विरोध केल्याखेरीज जगूच शकत नाही अशा लोकांचे वर्णन करण्यासाठी
राज्यसभेत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन संज्ञा शोधून काढली- ‘आंदोलनजिवी’. विरोध केल्याखेरीज जगूच शकत नाही अशा लोकांचे वर्णन करण्यासाठी त्यांना ‘आंदोलनजिवी’ हा शब्द राज्यसभेत वापरला. राज्यसभा अध्यक्षांच्या अभिभाषणावर केलेल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात पंतप्रधानांनी हा नवीन शब्द बहाल केला. त्यांनी या आंदोलकांचे वर्णन ‘परोपजिवी’ असेही केले.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील वादग्रस्त धोरणांना भारतभरातून विरोध होत आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि तीन कृषी कायदे यांना होणारे विरोध ही त्याची उदाहरणे आहेत. विरोधांचे रूपांतर अत्यंत स्वाभाविक पद्धतीने आंदोलनांमध्ये होत गेले असले तरीही सरकारने या आंदोलनांना विरोधी पक्षांनी किंवा तथाकथित देशद्रोह्यांनी सरकारविरोधात केलेल्या कटाचे स्वरूप दिले आहे.
“आंदोलनजिवींचा हा समुदाय जेथे कोठे आंदोलन सुरू असते तेथे जातो, मग ते आंदोलन वकिलांचे असो, विद्यार्थ्यांचे असो किंवा कामगारांचे असो. हे कधी आघाडीवर असतात, तर कधी मागून पाठिंबा देतात. हे लोक आंदोलनांशिवाय जगूच शकत नाहीत. आपण अशा लोकांची ओळख पटवली पाहिजे आणि या लोकांपासून देशाचे रक्षण केले पाहिजे.”
बहुतांशी शांततामय पद्धतीने चाललेल्या आंदोलनांची व आंदोलकांची प्रतिमा डागळणारी ही पंतप्रधानांनी टिप्पणी त्यांनी १९७४ साली घेतलेल्या पवित्र्याच्या पारच विरुद्ध आहे. तेव्हा वयाच्या विशीत असलेल्या मोदी यांनी गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन केले होते.
रघु कर्नाड यांनी ‘द वायर’साठी लिहिलेल्या एका लेखात असे नमूद केले होते की, मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटवरील एक पेज या नवनिर्माण आंदोलनाला समर्पित आहे. या आंदोलनाचे वर्णन मोदी यांचा “जनआंदोलनाशी पहिला परिचय” असे करण्यात आले आहे. मोदी यांचा सामाजिक प्रश्नांवरील वैश्विक दृष्टिकोन यांतून व्यापक झाला असे नमूद करण्यात आले आहे. या पेजवर म्हटले आहे:
“या आंदोलनाने नरेंद्र यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला हुद्दा मिळवून दिला. १९७५ मध्ये त्यांची नियुक्ती गुजरातमधील लोकसंघर्ष समितीचे सरचिटणीस म्हणून झाली.”
ही चळवळ डिसेंबर १९७३ मध्ये सुरू झाली. अहमदाबाद येथील एलडी इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कँटिनमधील दरांविरोधातून सुरू केलेल्या निषेधांचे रूपांतर या आंदोलनात झाले. पोलिसांनी विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर केला, तेव्हा १९७४ सालाच्या सुरुवातीला चळवळीचे लोण अन्य महाविद्यालयांमध्ये पोहोचले. यातून राज्यव्यापी संप, जाळपोळ, लुटालुट असे सगळे प्रकार राज्य सरकारला लक्ष्य करून झाले.
‘अहमदाबाद मिरर’ने दिलेल्या बातमीनुसार, नवनिर्माण आंदोलनामुळे गुजरात सरकार पडले आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात “राष्ट्रव्यापी आंदोलन” सुरू झाले.
मोदी यांनी तरुणाईला उद्देशून त्यावेळी लिहिलेला संदेश नंतर ‘संघर्ष मा गुजरात’ (संघर्षाच्या काळातील गुजरात) या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या संदेशात मोदी यांनी तरुणांना रस्त्यावर उतरण्याचे व लोकशाही जिवंत ठेवण्याचे आवाहन केले होते. या संदेशाचे अहमदाबाद मिररने इंग्रजीत भाषांतर केले आहे. हा संदेश आजच्या आंदोलकांना मोलाचा सल्ला तर देतोच, शिवाय, पंतप्रधानांच्या आंदोलनांबाबतच्या मतात झालेला आमूलाग्र बदलही यातून स्पष्ट होतो.
“भारतमातेच्या मुलांनो, विचार करा, आज देश कोणत्या दिशेने ढकलला जात आहे याचा. तुम्ही आज कृती केली नाही, तर उद्या त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याचा विचार क्षणभर करा. तुम्ही भारताच्या भवितव्याचे अग्रदूत आहात. कारण आजचे तरुण हे उद्याचे नेते असतात. राष्ट्राच्या उभारणीची, उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी कोण घेईल? उत्तर स्पष्ट आहे. ही तुमचीच जबाबदारी आहे.” अशा आशयाने मोदी यांच्या संदेशाची सुरुवात झाली होती.
ते म्हणाले होते की, देशावर आज “लबाडांचे व घोटाळाबाजांचे वर्चस्व आहे. तरुणांना भविष्यकाळात दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, अनैतिकता, भ्रष्टाचार व दमनशाहीला तोंड द्यावे लागणार आहे.”
“सध्या देशात ज्या पद्धतीने लोकशाहीचा नाश केला जात आहे आणि हुकूमशाहीची वाट मोकळी होत आहे, ती बघता तुमच्या वाट्याला माना खाली घातलेल्या मेंढरांचे आयुष्य येणार आहे.” केंद्र सरकार २०१४ सालापासून ज्या पद्धतीने आंदोलने दडपत आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहे, त्याकडे मोदी यांच्या या १९७४ मधील संदेशाचा संदर्भ घेऊन बघणे गरजेचे आहे.
“तुम्ही आज स्वातंत्र्याच्या दुसऱ्या चळवळीत आवश्यक ते त्याग केले नाही, तर इतिहास कोणाला प्रश्न विचारेल? तुम्हालाच विचारेल. इतिहासकार जेव्हा भेकडांच्या नावांची यादी करतील तेव्हा त्यात कोणाची नावे असतील? तुमचीच असतील. या देशाचा इतिहास कसा लिहिला गेला पाहिजे? शाई आणि पेनाने? की तरुणाईच्या हृदयातून सांडणाऱ्या रक्ताने? याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे,” असे मोदी म्हणाले होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बिहारमध्ये “अधिक व्यापक उठावाचे” नियोजन करत होती, तेव्हाच नवनिर्माण आंदोलनाने मूळ धरले होते. कर्नाड यांनी द वायरसाठी लिहिलेल्या एका लेखात म्हटले आहे:
“या आंदोलनाने बिहारमध्ये पकड घट्ट केल्यानंतर यात एक नवीन नेता सहभागी झाला- स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण किंवा जेपी. विद्यार्थ्यांनी त्यांना आपले नेतृत्व करण्यासाठी पुन्हा सार्वजनिक पटलावर येण्याचे निमंत्रण दिले.”
इंदिरा गांधी यांच्याविरोधातील जनआंदोलनाची ही सुरुवात होती. या आंदोलनाची लोकप्रियता वाढत गेली, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर केली.
कर्नाड यांनी जून २०१८ मध्ये लिहिलेल्या लेखात असे नमूद केले आहे की, काँग्रेसला कधीच सहन करावा लागला नाही असा विरोध, प्रक्षोभ व विध्वंस मोदी सहन करत आहेत, असा युक्तिवाद भाजप तसेच उजव्या संघटना कायम करतात पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे.
ते म्हणतात: “फक्त कल्पना करून बघा. विद्यार्थी भाजप सरकार पाडण्यासाठी महिनोनमहिने रस्त्यांवर दंगली करत आहेत, केंद्रीय मंत्र्याची हत्या केली जाते, आणि मग एक न्यायाधीश मोदी यांना संसदेतून निलंबित करतात आणि त्यांना पुढील निवडणुकांमध्ये सहभागी होण्यास बंदी करतात. आणीबाणी लादण्यामागे एवढी मोठी चिथावणी होती. याचे कदाचित समर्थन करता येणार नाही. मात्र, आणीबाणीच्या पूर्वी इंदिरा गांधी यांना ज्या प्रमाणात विध्वंसक विरोध झाला, त्याच्या जवळपास जाणारा विरोधही गेल्या चार वर्षांत, काश्मीरचा अपवाद वगळता, मोदी सरकारला सहन करावा लागलेला नाही. त्या काळातील विद्यार्थी आंदोलनांशी तुलना करायची तर जेएनयू व जंतरमंतरमधील चळवळ ही म्युझिकल फ्लॅश-मॉबसारखी आहे.”
COMMENTS