पीएमओद्वारे पंतप्रधानांचे शब्द ‘सेन्सॉर’

पीएमओद्वारे पंतप्रधानांचे शब्द ‘सेन्सॉर’

मोदी यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय होता याबद्दल पीएमओने भलेमोठे स्पष्टीकरण दिले असले तरी यावर झालेली टीका त्यांच्या टीमपैकी कोणालातरी चांगलीच झोंबली असणार म्हणूनच पीएमओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमधून हे टीकेला आमंत्रण देणारे शब्द वगळूनच टाकायचा निर्णय त्यांनी केला असावा.

पीएम केअर्स फंड : नागपूर खंडपीठाची केंद्राला नोटीस
मोदींच्या विधानावर जाणूनबुजून गैरसमज : पीएमओ
‘मन की बात’च्या महसूलात ९० टक्क्यांनी घसरण

नवी दिल्ली: “आमच्या प्रदेशात कोणीच घुसखोरी केली नाही” या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड टीकेला आमंत्रण देणारे शब्द पंतप्रधान कार्यालयाने आपल्या अधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून वगळून टाकले आहेत.

१९ जून रोजी चीनच्या विषयावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा समारोप करताना मोदी म्हणाले होते- “ना कोई वहाँ हमारी सीमा में घुस आया है, ना कोई घुसा हुआ है, ना ही हमारी कोई पोस्ट किसी दुसरे के कब्जे में है.” (आपल्या हद्दीत कोणी घुसले नव्हते किंवा घुसलेले नाही आणि आपले कोणते ठाणेही कोणाच्या ताब्यात गेलेले नाही). टीव्हीवरील थेट प्रक्षेपणात पंतप्रधानांचे हे विधान होते.

१५ जूनच्या रात्री चीनच्या सैनिकांशी झालेल्या चकमतील भारताचे २० सैनिक शहीद झाल्यानंतर पंतप्रधानांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ६ जून रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सहमती झाल्यानुसार महिनाभराची अनिर्णित अवस्था संपवण्याचा भाग म्हणून चीनने केलेली बांधकामे तोडण्यासाठी भारतीय भूदलाचे पथक गेले होते. चीननेही आपले सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवरील संघर्षात जीवितहानीची घटना गेल्या ४५ वर्षांत प्रथमच  झाली आहे.

पंतप्रधानांच्या समारोपाच्या विधानाचे थेट प्रक्षेपण सर्व टीव्ही वाहिन्यांनी दाखवले होते. त्याचप्रमाणे पंतप्रधानांशी निगडित अशा दोन अधिकृत यूट्यूब वाहिन्यांवरही ते दाखवले गेले.

मोदी यांच्या विधानावरून त्वरित वादंग सुरू झाला. कारण, हे विधान भारताच्या भूमिकेशी विसंगत होते. चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून गलवान खोऱ्यात बांधकाम करण्याचा प्रयत्न केला असा आरोप दोनच दिवस आधी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केला होता. भारताची दावारेषा (क्लेम लाइन) फिंगर एटच्या पलीकडे असताना, चीनचे सैन्य पँगाँग त्सो सरोवराच्या फिंगर फोरपर्यंत होतेच.

चीनच्या सीजीटीएन या सरकारी वृत्तवाहिनी नेटवर्कच्या एका वृत्त निर्मात्याने ‘आपल्या प्रदेशात कोणीही घुसखोरी केलेली नाही’, हे मोदी यांचे विधान चिनी भाषेतील उपशीर्षकांसह त्याच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले.

भारताच्या प्रदेशात कोणीच घुसलेले नाही असे मोदी बोलल्याचे थेट प्रक्षेपणात दिसत असताना, पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात मात्र शब्दांची थोडी फेरफार करून हे वाक्य वर्तमानकाळात लिहिण्यात आले. “सध्या आपल्या हद्दीत कोणीही नाही किंवा कोणीही आपले ठाणे ताब्यात घेतलेले नाही” असे मोदी यांनी म्हटल्याचा दावा या प्रसिद्धी पत्रकात केला आहे. पंतप्रधानांच्या बोलण्याचा “खोडसाळ” विपर्यास झाला असा दावा करत २० जून रोजी पंतप्रधान कार्यालयाने एक लांबलचक स्पष्टीकरण जारी केले. मात्र, यात टीकेला थेट उत्तर नव्हते किंवा ते वाक्यही थेट उद्धृत करण्यात आले नव्हते. मात्र “१५ जून रोजी गलवानमध्ये हिंसाचार झाला कारण, चीनच्या लष्कराला ताबारेषेवर बांधकाम करायचे होते आणि ते ऐकायला तयार नव्हते” असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे. “प्रत्यक्ष ताबारेषेवर (अक्रॉस द एलएसी)” या संदिग्ध शब्दसमूहाचा अर्थ भारताच्या बाजूला असा होतो पण याचा अर्थ फार आतमध्ये असा होत नाही, अशी सारवासारवही सरकारने पत्रकारांपुढे केली.

मोदी यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय होता याबद्दल पीएमओने भलेमोठे स्पष्टीकरण दिले असले तरी यावर झालेली टीका त्यांच्या टीमपैकी कोणालातरी चांगलीच झोंबली असणार म्हणूनच पीएमओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमधून हे टीकेला आमंत्रण देणारे शब्द वगळूनच टाकायचा निर्णय त्यांनी केला असावा.

मोदी यांच्याशी निगडित दोन यूट्यूब वाहिन्या आहेत- नरेंद्र मोदी आणि पीएमओ इंडिया. या दोन्ही वाहिन्यांवर १९ जूनच्या बैठकीचे थेट स्ट्रीमिंग करण्यात आले व त्याचे व्हिडिओ दोन्ही ठिकाणी उपलब्ध होतेच. मात्र नरेंद्र मोदी वाहिनीवरील व्हिडिओचा कालावधी ९ मिनिटे आणि २० सेकंद आहे, तर पीएमओ इंडिया वाहिनीवरील त्याच व्हिडिओचा कालावधी ७ मिनिटे ३५ सेकंद आहे. योगायोगाने सत्ताधारी पक्षाच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवरही हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे आणि त्याचा कालावधी ९ मिनिटे २० सेकंद आहे. दोन्ही अधिक कालावाधीचे व्हिडिओ एका वाक्याच्या अर्ध्यातून ‘…विचार रखे है जो बहुत महत्त्वपूर्ण है’ या शब्दांपासून सुरू होतात. अधिकृत पीएमओ वाहिनीवरील छोटा व्हिडिओ मात्र त्या वादग्रस्त वाक्याच्या मधून सुरू होतो- “… ना ही कहीं घुसा है, ना ही हमारी कोई पोस्ट किसी दुसरे के कब्जे में है.” “ना कोई वहाँ हमारी सीमा में घुस आया है”  हा या वाक्याचा वादग्रस्त भाग अधिकृत व्हिडिओमध्ये ऐकू येत नाही.

हा व्हिडिओ दोन्ही अधिकृत वाहिन्यांवर थेट स्ट्रीम करण्यात आला असूनही, पीएमओ इंडिया वाहिनीवरील व्हिडिओ कमी कालावधीचा आहे. याचे कारण म्हणजे ही क्लिप नंतर कापण्यात आली असावी. ऑनलाइन ट्रिमिंग तांत्रिकदृष्ट्या तर शक्य आहेच. लाइव्ह इव्हेंट सुरू होण्यापूर्वीच प्रत्यक्ष स्ट्रीमिंगला सुरुवात होते तेव्हा व्हिडिओ संपाद हा ट्रिमिंगचा पर्याय वापरतातच.

पीएमओ इंडियावरील व्हिडिओ कमी कालावधीचा असण्यामागे आणखी एकच स्पष्टीकरण दिले जाऊ शकेल. ते म्हणजे एरवी तंत्रज्ञानाच्या वापरात अत्यंत वाकबगार असलेल्या पीएमओने आपल्या अधिकृत वाहिनीवर लाइव्ह स्ट्रीमिंग करताना गडबड केली आणि पंतप्रधानांनी ना कोई वहाँ हमारी सीमा में घुस आया है’ हे शब्द उच्चारल्यानंतर प्रसारण सुरू केले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग २२ जून रोजी म्हणाले की, ‘आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या तसेच धोरणात्मक व प्रादेशिक हिताच्या संदर्भात घोषणा करताना वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या परिणामाचे भान पंतप्रधानांनी कायम राखले पाहिजे.’

पंतप्रधानांनी वापरलेल्या शब्दांचा वापर करून आपल्या भूमिकेचे समर्थन करणे समोरच्याला शक्य होणार नाही याची काळजी पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे हे संकट हाताळण्यासाठी सरकारच्या सर्व अंगांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, असेही मनमोहन सिंग म्हणाले होते. चीनमधील सरकारी माध्यमे व समालोचकांनी मोदी यांच्या भाषणाची प्रशंसा केली आणि त्याद्वारे घडलेल्या प्रकारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला अशा स्वरूपाची बातमी हिंदू या वृत्तपत्राने २१ जून रोजीच प्रसिद्ध केलेली आहे.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव व चीनसंदर्भातील मुद्दयांचे अभ्यासक श्याम सरन यांनीही ‘मोदी यांच्या विधानामुळे भारताच्या सीमाविषयक भूमिकेबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे आणि त्यामुळे सीमाचर्चेत आपली बाजू कमकुवत ठरू शकते’ असे मत त्यांच्या ‘बिझनेस स्टॅण्डर्ड’मधील सदरात व्यक्त केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0