वैचारिक पोरकेपण!

वैचारिक पोरकेपण!

आदरणीय , प्राचार्य नरहर कुरुंदकर गुरुजी . आज तुमचा जन्मदिवस. तरीही तो आम्हाला आमच्या वैचारिक अनाथपणाचं शल्य विसरु न देणारा. सध्याचा काळ तर रिकाम्या

नाते आवाज अन् अभिव्यक्तीचे…
औंधमध्ये कष्टकऱ्यांचं रक्षाबंधन!
‘विद्याताई ‘साऱ्याजणीं’च्या कायम बरोबर असतील’

आदरणीय ,
प्राचार्य नरहर कुरुंदकर गुरुजी .
आज तुमचा जन्मदिवस. तरीही तो आम्हाला आमच्या वैचारिक अनाथपणाचं शल्य विसरु न देणारा. सध्याचा काळ तर रिकाम्या डेरयात रवी फिरवत बसण्याचा. किती रुपात मी पाहिलं तुम्हाला ? एक विचारवंत, मर्मज्ञ, संपादक, परखड अभ्यासू वक्ता. गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना पगारातला अर्धा हिस्सा वाटून अर्ध्या खिशानेच घरी जाणारा एक प्राचार्य. तरुण लेखकाचे गुण हेरुन त्याची पाठ थोपटणारे वाङमय रक्षक. आणखी काय आणि किती सांगू तुमच्या बद्दल ? खूप काही सांगण्या सारखं असूनही व्याकूळ ढगांनी भरलेल्या मनाला मोकळं करता येत नाही.

आजही तो दिवस मनातून जात नाही, व्याख्यानासाठी तुम्ही स. भु. सभागृहाच्या, व्यासपिठाच्या पायऱ्या चढत होतात व व्यासपीठावर आलात आणि ध्वनी क्षेपकांसमोर ऊभे राहण्यापूर्वी घोटभर पाणी प्यालात आणि त्याच क्षणी मंचावर कोसळलात, ते पुनः न ऊठण्यासाठी! त्याच वेळी आम्ही कित्येक पोरं अनाथ झालोत. ते अनाथपण अजूनही संपलेलं नाही. कारण साहित्य परिषद व नव लेखक समन्वय साधावा तो तुम्हीच. हे वरवरचे दर्शन नव्हते. तो मानवी जीवनाचा चैतन्यदायी अविष्कार होता असे मी मानतो. शेवटच्या श्वासापर्यंत मानित राहीन. तुमचा प्रेमभाव मी अनेकदा अनुभवला. त्याने जगण्याला ऊभारी दिली, आधार दिला. त्या आधाराचे मोल खूप काही होते, आहे हे सांगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. मनात इच्छा असूनही तुमच्या स्मरणाने विव्हळणारं मन तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाच्या पानापानावर मला दिसते. ते दिसतच राहील. कारण तुमचं लेखन आजही विचार परंपरेचा पाया घालण्यासाठी महत्वाचे आहे. आणि हे महत्व कुणालाही संपवता येणार नाही. मग ती समीक्षा असो, कवितेचा आस्वाद असो, किंवा शृंगार कवितेतील भावभावना.  ऐल तीरावरुन पैल तीरावर घेऊन जाणारे एक विचारवंत म्हणून वाचकांना ऊत्कट आनंद देत होतात. देणारे हात व लिहिणारे हात यांच्यातील आखुडता कधीही अनुभवली नाही. काठोकाठ भरलेल्या मानवतेच्या अंतःकरणातून मुक्तपणे देत राहिलात. असे देणे कुणालाही जमले नाही व जमणारही नाही. कितीही खोट्या बिरुदावली लावल्या तरी.

कला आणि मानवता किंवा जीवनवाद आणि साहित्य या विषयाची मांडणी इतकी तार्किक असायची की, तुमचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी समोर बसलेले तुमच्या काटेकोर शैलीमुळे अचंबित व्हायचे. विश्लेषण पूर्ण तार्किकतेच्या प्रामाण्यवादावर तुम्ही जेव्हां तुमची मुद्रा ऊमटवित होतात तेव्हा समोरच्यांच्या चेहरयावरील अस्वादाचे नकारात्मक सौंदर्य बघतांना तुम्ही पूर्ण आनंद मूर्ती व्हायचात . इतिहास असो की राजकलह, किंवा गझल असो की सुगम संगीत या विषयी अभ्यासपूर्ण बोलणारा माणूस तुमच्या सम तुम्हीच!

मला लाभलेला तुमचा सहवास आजही हेच सांगतो, की जीवन विषयक दृष्टीकोन सम्यक दृष्टीतून कसा मांडावा याची सीमारेषाही तुम्हीच होतात. आपले व महात्मा गांधी विचाराचे असलेले नाते हे व्यक्तीगत कधीच नव्हते ते सामुहिक होते. ही सामुहिकताआता उरली नाहीच!
साहित्य परिषदेत एकदा “बी रघुनाथांच्या ” ‘तांबूल’ कवितेवर बोलत असताना त्या कवितेतील अनेक भावगर्भ रुपे तुम्ही नीट ऊलगडून सांगितलीत व ती कविता आग्रहपूर्वक पंडित नाथराव नेरळकर यांना गायलाही लावलीत. त्या वेळचा तुमचा ममत्व भाव इतरांनाही सूचक पध्दतीने सांगून गेला. कृतीतून संदेश देणारा तुमचा गुण साहित्य क्षेत्रातील अनेकांना आत्मपरीक्षण करायला लावणारा. म्हनून मी म्हणतो आम्हाला या वैचारिक अनाथपणाची ‘सल’ अजूनही संपवणारा मिळाला नाही.

होमकुंडावर तुमचा विश्वास नव्हता.अर्घ्य अर्पण करुन माणसांचे प्रश्न कधीही सुटत नसतात. श्रध्देचा भाग म्हणून त्याच्या वैयक्तीक स्वरुपाला तुमची अडचण नव्हती पण समूह जमवून कर्मकांड करणाऱ्या कार्यकर्त्या विषयी अनेकदा प्रश्न विचारुन चळवळीला प्रेरणा दिलीत. त्याला बहुजन समाजाचा पाठींबाही मिळाला. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संगत सभा या संकल्पनेचे तुम्ही समर्थक होतात. पुराव्या अभावी मांडलेल्या इतिहासाची चिकित्सा तुम्हीच करावी.

आजचा काळ गांधी, नेहरुंवर अश्लाघ्य टिका करणारांचा आहे. या काळात खरेच तुम्ही हवे होतात. ज्यांनी तुमचे नेहरुंवरील भाषण ऐकले असेल त्यांना तुमची सडेतोड, अस्सल शैली भावून गेली असेल. त्यांनी स्वीकारलेल्या समाजवादी अर्थव्यवस्थेने लोकशाहीला कशी बळकटी दिली याचे विवेचन त्यांच्याकडूनच कानी पडले पाहिजे असे अधूनमधून वाटत राहते. बरबटलेल्या राजकारणाचे शवविच्छेदन करताना तुम्ही जवळच्याही माणसाला सोडत नव्हतात. भोवती वादळ ऊभं राहिलं तरी. कडकडणारया विजांना थोपवून कसं धरायचं याचा आदर्श पाठ होतात तुम्ही. जिज्ञांसूचे तुम्ही मित्र होतात म्हणूनच तुम्ही तुम्ही होतात.आविष्कार कोणताही असो तो अंगवळणी पडावा म्हणून तुमच्या आनंद मुठी मोकळ्याच सोडलेल्या होत्या. इतकी संवेदन क्षमता यथार्थपणे कृतीतून दाखवत राहिलात. त्यातील सापेक्षपणाचा अनुभव अनेक अर्थाने द्दष्टी व अंतकरण याचे चित्र रेखाटून जायचात. हे चित्र आजही मनात कायम असल्याने आमचे वैचारिक अनाथपण अद्यापी संपलेले नाही.

महावीर जोंधळे, ज्येष्ठ संपादक आणि लेखक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0