हम घास है…

हम घास है…

जीवनशाळांचा पायाच मुळी जगण्यासाठीच्या, हक्कांसाठीच्या, न्यायासाठीच्या संघर्षाचा आहे आणि नुसतंच लढत न राहता त्याच्यासोबत एक भरीव काम उभं करण्याच्या जिद्दीचा, ऊर्मीचा आहे त्यांनी “लड़ाई, पढाई साथ-साथ”चं घोषवाक्य सार्थ नाही केलं तरच नवल!

आसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
जामिया मिलिया व अलिगड मुस्लिम विद्यापीठात पोलिसांची दडपशाही
हिजाब, बुरखा, नकाब आणि किताब

“हम दीप शिक्षा के है, जगमगाएँगे जग में…” जीवननगर जीवनशाळेची मुलं हातातल्या इवल्या इवल्या बॅटऱ्या नाचवत एका तालात पावलं टाकत होती. जीवनशाळांच्या वार्षिक बालमेळ्यात नाच सादर करत होती. त्या बॅटऱ्यांच्या हलत्या प्रकाशात मागचं बॅनर मध्येच उजळत होतं: “जीवनशाला की क्या है बात? लड़ाई, पढाई साथ साथ |” नर्मदेच्या खोऱ्यातल्या या आदिवासी मुलांना हिरीरीने खेळताना, नाटकं, नाच, गाणी सादर करताना, ‘पाहुण्यां’कडे कुतूहलाने बघून त्यांनी काही विचारलं की लाजून हसताना बघून डोक्यात सतत पाशच्या ओळी फेर धरत होत्या, “मैं घास हूँ | मैं आपके हर किए-धरे पर उग आऊँगा |”

नर्मदा नदीच्या खोऱ्यात तिथल्या आदिवासी मुलांसाठी नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे चालवल्या जाणाऱ्या पहिली ते चौथी अशा चार वर्गांच्या या ९ निवासी जीवनशाळा. त्रिशूळ, थुवाणी, डनेल, मणिबेली, भाबरी, जीवननगर आणि सावऱ्यादिगर अशा ७ महाराष्ट्रात आणि खाऱ्याभादल आणि भिताडा अशा दोन २ मध्य प्रदेशात. यातल्या कुठल्याही शाळेला सरकारी अनुदान नाही. अतिशय दुर्गम, पोचायला भलत्याच अवघड अशा बेटांवर, पाड्यांवर, पहाडांवर अभियानाचे धडाडीचे कार्यकर्ते, बहुतेक जीवनशाळेतूनच शिकून पुन्हा तिथेच शिक्षक म्हणून रुजू झालेले, अतिशय मर्यादित मानधनावर हसत हसत काम करणारे शिक्षक, शाळांमधले कामाठी, स्वयंपाक करणाऱ्या मावशी, देशभरातले साथी-समर्थक, त्या त्या गावच्या देखरेख समित्या, गावकरी, विद्यार्थ्यांचे पालक आणि अर्थातच, शिकण्यासाठी आसुसलेले हे छोटे विद्यार्थी यांच्या अथक आणि एकत्र प्रयत्नांनी उभा राहिलेला आणि सातत्याने पुढे जाणारा हा डोलारा.

या भागात सरकारी शाळा आणि त्यातले शिक्षक नुसते कागदावरच होते. जिथे पक्क्या रस्त्यांचा मागमूस नाही, अशाठिकाणी शिक्षणाची गंगा पोचायची तरी कशी? आणि शिक्षणच नाही तर भविष्य कुठून घडणार? या प्रश्नांना आपल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणून ‘जीवनशाळा’ ही कल्पना पुढे आली, पहिली जीवनशाळा चिमलखेडीला सुरू झाली आणि नंतर मणिबेलीला स्थलांतरित झाली. फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर जीवन शिकवणाऱ्या शाळा, म्हणून ‘जीवनशाळा’. आजही इथे पुस्तकाच्या बाहेरचं कितीतरी आवर्जून शिकवलं जातं. खो-खो, कबड्डीपासून ते झाडपाल्याची औषधं आणि शेतीपर्यंत. या जीवनशाळांचा इतिहासही मोठा विशेष आहे. वीसेक वर्षांपूर्वी जेव्हां नर्मदेचं पात्र पावसामुळे आणि धरणामुळे फुगलं तेव्हांची मणिबेली या गावची गोष्ट. शाळेसाठी काहीच पर्यायी व्यवस्था शासनाने केलेली नव्हतीच, त्यामुळे शाळा तिथेच भरत असे. पाणी शाळेत शिरणार असं दिसल्यावर त्यावेळी १०-१२ वर्षाच्या असलेल्या त्या सगळ्या मुलांनी ठरवलं की शाळेला पर्यायी जागा मिळेपर्यंत ती कुणीही शाळेतून उठणार नाहीत. मणिबेलीच्या पहिल्या जीवनशाळेचा पहिला विद्यार्थी असलेला सियाराम दादा त्यांच्या वर्गाने केलेल्या जलसत्याग्रहाची हकीकत मोठी रंगवून सांगतो, “आम्ही म्हटलं, पाणी वाढलं तर वाढू दे, आम्हीही बुडून जाऊ. पण आमची शाळा सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. राहिलो बसून. शेवटी आमच्या गळ्यापर्यंत पाणी आलं तेव्हां पोलीस घुसले शाळेत जबरदस्तीने आणि आम्हांला खांद्यावर घेऊन बाहेर काढलं.” ज्या जीवनशाळांचा पायाच मुळी जगण्यासाठीच्या, हक्कांसाठीच्या, न्यायासाठीच्या संघर्षाचा आहे आणि नुसतंच लढत न राहता त्याच्यासोबत एक भरीव काम उभं करण्याच्या जिद्दीचा, ऊर्मीचा आहे त्यांनी “लड़ाई, पढाई साथ-साथ”चं घोषवाक्य सार्थ नाही केलं तरच नवल!

या जीवनशाळांमधली सगळी मुलं वर्षातून एकदा एकत्र येऊन चार दिवस अक्षरशः सणासारखा साजरा करतात तो त्यांचा ‘बालमेळा’. आणि यंदा तो पार पडला नंदुरबार जिल्ह्यातल्या तऱ्हावद या पुनर्वसाहतीत. सरदार सरोवर जलाशयामुळे पाण्याखाली गेलेल्या ५-६ आदिवासी गावांची ही पुनर्वसाहत. पाण्याचं दुर्भिक्ष, रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट, सरकारी बसचा पत्ता नाही असं हे गाव. पण बालमेळा घेण्याचं ठरल्यावर इथे उत्साहाचं वारं वाहात होतं. इतकी मुलं येणार, त्यांचे शिक्षक, कार्यकर्ते, इतर गावकरी, समर्थक येणार, बाहेरगावचे पाहुणे येणार. हा एवढा पसारा सांभाळण्यासाठीचं नियोजन कागदावर आणि प्रत्यक्षातही दिसत होतं. एवढ्यांना चार-पाच दिवस जेवू घालण्याचा भार मोजक्या कुटुंबावर पडू नये म्हणून घरटी पाच भाकऱ्या गोळा करणं, मुलांना राहण्यासाठी म्हणून आपल्या घरांची दारं आनंदाने उघडणं, पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून टँकरच्या वेळा तपासणं, रस्त्यांवर दिव्यांची व्यवस्था करणं, मुख्य कार्यक्रमाचा मांडव आणि खेळाच्या सामन्यांची मैदानं आखणं या सगळ्या कामात शिक्षकांच्या बरोबरीने गावकरी सहभागी झालेले होते. आलेल्या सामानाचा, धान्याचा हिशोब ठेवणं, ते नीट लावून ठेवणं हे सगळं अगदी घरचं कार्य असल्याच्या उत्साहाने चाललं होतं.

या सगळ्या मेहनतीला फळ आलं आणि १३ फेब्रुवारीला मोठ्या धूमधडाक्यात बालमेळ्याला सुरुवात झाली. या बालमेळ्यात दोन भाग असतात. पहिला म्हणजे क्रीडास्पर्धा आणि दुसरा, इतर स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम. यात सगळ्यात अवाक करून सोडणारे म्हणजे खो-खो आणि कबड्डीचे सामने. डोक्यावर ऊन मी-मी म्हणत असताना अनवाणी पायांनी ही आदिवासी मुलं मैदानावर जी-जान से खेळत असतात. मुळातच आदिवासी असल्याने दऱ्याडोंगरात सहजपणे फिरणं रक्तातच, त्यामुळे लाभलेलं काटक शरीर आणि मैदानी खेळांमध्ये रोजच्या सरावाने मिळवलेलं कौशल्य पावलोपावली दिसतं. खो-खोत सगळी शक्ती लावून गड्याला पकडण्याचा प्रयत्न करणारा गडी आणि त्याचवेळी सहज आणि खुबीदार हुलकावण्या देत त्याला चुकवणारा गडी हे दृश्य मोठ्या गमतीचं, पण त्याचवेळी बघणाऱ्यांना खुर्चीच्या टोकाशी आणून ठेवणारं! कबड्डीच्या मैदानात बेधडक समोरच्यावर चढाई करून अतिशय सहज एखादा गडी बाद करून परतलेला भिडू आपल्यावर चाल करून येणाऱ्याला धरून ओढायला लगेच सज्ज होतो. तीच गोष्ट धावणं, लंगडी, लिंबू-चमचा, धनुष्यबाण अशा वैयक्तिक खेळांची. तीच चुरस, तीच धमाल. मागे पार्श्वसंगीतासारख्या अखंड सुरू असणाऱ्या ढोल-ताशांच्या तालावर खेळणारी ही मुलं डोळ्यांचं पारणं फेडणारी.

त्याशिवाय निबंध, चित्रकला, वक्तृत्व अशा स्पर्धा या मुलांमध्ये लपलेले इतर गुण सहज बाहेर आणतात. यांच्या भाषा मराठीपेक्षा खूपच वेगळ्या. भिली, पावरी, निमाडी, कितीतरी. प्रत्येकीचा लहेजा वेगळा, त्यामुळे प्रत्येक शब्द अगदी गोलदार होऊन आपल्या कानांपर्यंत येतो आणि या भाषांचं मजेशीर मिश्रण असलेले निबंध कागदावर उतरतात. यांचं विश्व तसं बघितलं तर चिमुकलंच. आपली जीवनशाळा, आपलं गाव, नद्या, डोंगर, झाडं यापलीकडच्या जगाशी संबंध अगदी विरळा. पण या त्यांच्या जगाचीही इतकी वेगवेगळी आणि सुंदर चित्रं कागदावर उमटतात, की आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.

यांचं विश्व छोटं जरी असलं, तरी त्यात अडचणी मुळीच कमी नाहीयेत. डोक्यावर दरवर्षीची बुडिताची टांगती तलवार, अतिशयच मर्यादित साधनं हा जणू त्यांच्या आयुष्याचा भाग आहे आणि तो त्यांच्या गाण्यांमध्ये, नाचांमध्ये, नाटकांमध्ये लख्ख प्रतिबिंबित होतो. यंदाची चित्र मुळीच वेगळं नव्हतं. शाळेत जाऊन शिकण्याची, मोठं होण्याची तळमळ भरून राहिलेली गाणी, होळीच्या टोलेजंग पारंपरिक वेशभूषेत सादर केलेली लोकनृत्यं आणि शेतकरी आत्महत्या ते आदिवासी क्रांतिवीर असे नाटकांचे विषय. तोंडानेच फटफटीपासून ते घोड्याच्या खिंकाळण्यापर्यंत सगळे आवाज बेमालूम काढणारी, उपलब्ध होतील त्या गोष्टी मोठ्या कल्पकतेने प्रॉपर्टी म्हणून वापरणारी मुलं आणि त्यांच्यातल्या या गुणांना पुरेपूर वाव मिळेल अशी गाणी, नाटकं लिहिणारे, बसवून घेणारे त्यांचे शिक्षक. भाषा कळत नसल्या तरी त्या नाटकांचं मर्म मात्र नक्कीच पोचत होतं आणि अस्वस्थही करत होतं. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या गेल्या तीन दशकांच्या संघर्षाचा इतिहास मांडताना मेधाताई, लतिका ताई, चेतन भाऊ अशी नावं अत्यंत आदराने घेणारी ही मुलं त्यांच्या निरागसतेवर हसणाऱ्यांच्या डोळ्यात नकळत पाणीही आणत होती. “लड़ाई, पढ़ाई साथ साथ” हे ऐकून कौतुकाने भरून आलेल्या मनाला हा प्रश्नही भेडसावत होता की का? यांच्या निष्पाप बालपणाला संघर्षाचा शाप का मिळावा? बिनघोर बागडण्याच्या वयात यांना लढाईचे नारे का द्यावे लागावेत? स्वतःच्याही नकळत आपलं, यांच्यापुढे अगदीच नेभळट वाटणारं बालपण आठवत होतं आणि वाटत होतं, यातलं कुठलं चित्र चांगलं हे ठरवायचं तरी कसं आणि कुणी?

तब्बल चार दिवस चुना-मातीच्या मैदानात कसोशीने खेळणारी, कागदावर कलाकारी दाखवणारी ही मुलं शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभात शाळांनी पटकावलेली बक्षिसं घेताना समाधानाने हसत होती. याच जीवनशाळांमध्ये शिकून पुढे जाऊन आज क्रीडा प्रबोधिनीत शिकणारी, मोठ्या पदांवर पोचलेली, डॉक्टर-इंजीनियर झालेली, यशस्वी झालेली कितीतरी उदाहरणं कानामनात साठवत होती. प्रत्येक बक्षीस जाहीर झाल्यावर वाजणाऱ्या तळ्यांना ढोल-ताशेही साथ देत होते आणि पहिली ते चौथीची ही मुलं बुलंद आवाजात नारे देत होती, “जीवनशाला में सीखेंगे, आगे बढ़ते जाएंगे |” हेच आवाज जिल्हाधिकाऱ्यांसमोर मोर्चा नेतानाही तेवढेच, किंबहुना जास्तच बुलंद असतात.

कुठल्याही प्रकारच्या सरकारी अनुदानाशिवाय, अन्यायाविरुद्धच्या संघर्षाच्या रुपात रुजलेल्या आणि “संघर्ष, निर्माण साथ-साथ” या धारणेच्या सिंचनाने निर्माणाचं मूर्त रूप म्हणून अंकुरलेल्या, फोफावलेल्या या नऊ जीवनशाळा पाशचे शब्द अगदी शब्दशः जगतायत. लढाई अणि पढाईचे नारे देणारी ही सगळी मुलं जणू म्हणतायत: “हम घास है | हम अपना काम करेंगे | हम आपके हर किए-धरे पर उग आएँगे | हम घास है…”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: