नेव्हर लेट मी गो : कझुओ ईशीगुरो यांची कादंबरी

नेव्हर लेट मी गो : कझुओ ईशीगुरो यांची कादंबरी

कझुओ ईशीगुरो यांच्या साऱ्याच कादंबऱ्या आकाराने आणि त्यांच्या विषयाच्या आवाक्याने पर्वतप्राय आहेत. समीक्षकांनी आणि वाचकांनी ‘नेव्हर लेट मी गो' या कादंबरीची सर्वाधिक चर्चा केली आहे. या लेखकाना २०१७चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

आयर्लंड आणि ब्रिटन : दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.
शुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा संबंध काय !
व्हिलेज डायरी भाग ३ – शेतीचं ऑडीट

कझुओ ईशीगुरो यांना २०१७ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ईशीगिरो यांच्या नावामुळे अर्थातच त्यांच्या वाचकांना आनंद झाला मात्र काही प्रमाणात आणि उघडपणे टीकाही झाली. ईशीगुरोला नोबेल पुरस्कार मिळू शकतो तर हारुकि मुराकामीला का नाही? असे प्रश्नही विचारले गेले. ईशीगुरो यांना नोबेल पुरस्कार मिळणे वाचकांच्या दृष्टीतून अनपेक्षित नसले तरी मुराकामीच्या आधी तो ईशीगुरो यांना मिळेल, असे त्यांना खचित वाटत नसावे. मुराकामीची लोकप्रियता त्याच्या आड आली. प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि त्याच्या कादंबऱ्यांच्या अफाट विक्रीमुळे मुराकामी नोबेलपासून दूर राहिला असे म्हटले गेले. वस्तुतः कझुओ ईशीगुरो सुद्धा कमी लोकप्रिय नाहीत. त्यांच्या दोन-तीन कादंबऱ्यांच्या १० लाखांहून अधिक प्रतीची विक्री झालेली आहे.

मुराकामी आणि ईशीगिरो दोघेही जपानी वंशाचे लेखक आहेत. दोघेही एकमेकांचा उल्लेख अत्यंत आदराने करतात. मुराकामी यांना एका मुलाखतीत तुमच्या आवडत्या समकालीन लेखकांची नावे सांगा असे विचारताच त्यांनी ईशीगुरो यांचे नाव सांगितले होते. त्याआधी ईशीगुरो यांनीही मुराकामी यांना अत्यंत महत्त्वाचे समकालीन लेखक म्हटले होते. ईशीगुरो यांना नोबेल मिळाल्यानंतर उठलेल्या वादंगानंतरही त्यांची मैत्री टिकून आहे.

ईशीगुरो यांच्या साऱ्याच कादंबऱ्या आकाराने आणि त्यांच्या विषयाच्या आवाक्याने पर्वतप्राय आहेत. समीक्षकांनी आणि वाचकांनी ‘नेव्हर लेट मी गो’ या कादंबरीची सर्वाधिक चर्चा केली आहे. ‘नेव्हर लेट मी गो’ ही कॅथी, रूथ आणि टॉमी यांच्या प्रेमाची कथा आहे. तितकीच ती हे प्रेम जिथं उमललं त्या हेलशाम स्कूल आणि त्या स्कूलच्या विद्यार्थ्यांची कथा आहे. कादंबरीचं संपूर्ण निवेदन ईशीगुरो यांनी कॅथीच्या माध्यमातून केलं आहे. त्यामुळे कादंबरीच्या अवकाशात घडणाऱ्या घटना वाचकांना कॅथीच्या दृष्टीकोनातून दिसतात. कॅथी कादंबरीच्या सुरवातीलाच सांगते की, तिचे नांव कॅथी आहे आणि ती ३१ वर्षांची आहे. गेली ११ वर्षे ती केअरर (एक प्रकारची नर्स) म्हणून काम करतेय आणि हे तिचं अखेरचं वर्ष आहे. यानंतर तिला केअरर म्हणून काम करावं लागणार नाही. त्यानंतर तिला हेलशाम स्कूलमधील इतर विद्यार्थ्यांसारखे ‘डोनेट’ करावे लागणार आहे.

पण कशाचे डोनेट अथवा दान करावे लागणार आहे? ती कुणाची केअरर आहे? या गोष्टी कॅथी स्पष्ट करत नाही. ती वर्तमानकाळाविषयी सुद्धा काही बोलत नाही. त्याऐवजी ती गतकालच्या स्मृतीत रमणं अधिक पसंत करते.

‘हेलशाम’ ही एक स्पेशल जागा आहे. हेलशाम स्कूलमधील मुलं त्याच्या कुंपणाबाहेर असलेल्या जगातील मुलांहून अगदी खास आहेत, स्पेशल आहेत आणि तुम्ही या स्कूलचे विद्यार्थी असल्याने तुम्हाला त्याचा अभिमान असायला हवा. हेलशाम स्कूलच्या विद्यार्थ्यांना नेहमीच असं सांगितलं जातं. मात्र ते खास का आहेत? ते त्यांना कधीही सांगितलं जात नाही. कॅथीलाही ते ठाऊक नाही. स्कूलच्या कुंपणाबाहेर जग कसं आहे हेही त्यांना ठाऊक नाही. त्यांना आईवडील नाहीत. हेलशाम स्कूलचे शिक्षक हेच त्यांचे गार्डीयन अर्थात पालक आहेत. या मुलांना आडनावंही नाहीत. केवळ प्रथम नावं आहेत. त्याच नावाने ती एकमेकांना ओळखतात. बाहेरच्या जगातील मुलांना आईवडील असतात ही गोष्टही त्यांना खरेतर ठाऊक नाही. त्यांचं जग अत्यंत संकुचित आणि मर्यादित आहे.

हेलशाम स्कूलचं कुंपण हेच त्यांचे क्षितिज आहे. त्या क्षितिजाबाहेरील प्रत्येक गोष्ट त्यांना नवी आहे. अनाकलनीय आहे. हेलशाम हेच त्यांचे जग आहे. पण इथेही या मुलांचं स्वतःचं असं एक जग आहे. त्यांच्या बालसुलभ आवडी आहेत. भयं आहेत. स्कूलमधील इतर मुलांशी त्यांनी जोडलेली नाती आहेत. त्यांचे आवडते गार्डीयन आहेत. थोडक्यात ही मुलं हेलशाम बाहेरच्या जगातील इतर मुलांतून अजिबात वेगळी नाहीत. पण त्यांना तसं अजिबात सांगितलं जात नाही. त्यांची अत्यंत काळजी घेतली जाते. विशेषतः त्यांच्या आरोग्याची. सिगारेट ओढणं भयानक आहे, हे त्यांना सांगितलं जातंच. मात्र तसं करणं हे तुमच्यासाठी बाहेरच्या मुलांतून अधिक घातकी आहे असं त्यांच्या मनावर बिंबविलं गेलं आहे. आपण नेमके का स्पेशल आहोत, असा प्रश्न मुलांना अर्थातच पडलेला आहे. पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईल असं कुणीही त्यांना हेलशाममध्ये दिसत नाही. वरच्या वर्गातील मुलांकडून जेवढं समजेल त्यावरच त्यांना समाधान मानावं लागतं. कॅथी, रूथ आणि टॉमी यांनाही हे प्रश्न पडलेले आहेत. मात्र त्यांचं कुतूहल फारसं तीव्र नाही. आपण कोण आहोत? आपण खास का आहोत हे त्यांना पूर्णपणे समजलेलं नसलं तरी त्यांना त्याचा थोडाबहुत अंदाज आहे. त्यांची शिक्षिका एकदा सांगते तसं, तुम्हाला सांगितलं जातंही आणि नाहीही.

खरेतर कादंबरीचा एक चतुर्थांश भाग वाचून संपेपर्यंत वाचकांनाही ते समजत नाही. केवळ त्यांचं खास असणं वारंवार सूचित केलं जातं.

मुलांना ते स्पष्टपणे समजतं तेव्हा त्यांनी आयुष्याचा एक टप्पा पूर्ण केलेला असतो. वयाची १३ वर्षे पूर्ण झालेली असतात. शरीर यांना मनात होणाऱ्या बदलांनी एक निराळच विश्व त्यांच्यापुढे खुलं होतं. तारुण्यात पदार्पण करण्याचं, लैंगिक आकर्षणाचं, पार्टनर शोधण्याचं वय. मागची १३ वर्षे झरझर निघून जातात. मागील १३ वर्षांतील अनेक गोष्टी विस्मृतीत जातात. केवळ एकच गोष्ट या वयातही त्यांना महत्त्वाची वाटत असते. ‘क्रिएटीव्हीटी’. हेलशाम स्कूलमधील मुलांना क्रिएटिव्ह असणं ही फार महत्त्वाची गोष्ट असल्याचं सांगितलं गेलं आहे. मुलांच्या पेंटिंग्जवर गार्डीयन्सचं खास लक्ष आहे. महिन्याच्या अखेरीस एक मॅडम शाळेला भेट देतात आणि काही उत्तम पेंटिंग्ज निवडून त्यांच्या ‘गॅलरी’साठी घेऊन जातात. गॅलरीसाठी पेंटिंग निवडलं जाणं ही मुलांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. पण ते गॅलरी म्हणजे नेमकं काय आहे, ती कुठे आहे हे मुलांना ठावूक नाही. टॉमीला मात्र पेंटिंग्ज करता येत नाहीत. केली तरी त्याची खिल्ली उडवली जाते. आणि टॉमी संतापून आरडाओरडा करू लागतो. मुलं चेकाळून त्याची अजूनच खिल्ली उडवत असतात. हे नेहमीचंच. सिनियर वर्गात गेल्यावर मात्र हे सारं अचानकपणे संपूण जातं. आता कुणाही टॉमीची खिल्ली उडवत नाही. इतर मुलांसारखाच टॉमी सामान्यपणे वावरू लावतो. अर्थात हे एका दिवसात घडत नाही. वाढत्या वयाबरोबर आलेल्या समजुतीने मुलांच्या मनात मोठा बदल घडलेला असतो. मुख्य म्हणजे समोर वाढून ठेवलेल्या भविष्याविषयीच्या शंका-आशंकेपुढे लहान-सहान गोष्टी जणू लुप्त होऊन जातात.

या बदलांना मुख्यतः कारणीभूत ठरतात त्या मिस ल्युसी. एका बेसावध क्षणी त्या मुलांना सांगून टाकतात की,  “तुम्ही फार मोठी स्वप्नं पाहू नयेत. ती तुमच्यासाठी नाहीत. तुमचं पुढील आयुष्य निश्चित झालेलं आहे. एका विशिष्ट कामासाठी तुमची निर्मिती झालेली आहे. तुम्ही स्पेशल आहेत. कारण तुम्ही ‘क्लोन’ आहात. बाहेर ज्यांच्यासाठी तुम्हाला निर्माण केलं गेलं आहे अशा व्यक्ती आहेत. त्यांना एखाद्या अवयवाची गरज पडली तर तो अवयव तुमच्या शरीरातून काढून त्यांना दिला जाईल. त्यालाच डोनेशन म्हणतात अशी दोन फारतर तीन डोनेशन्स तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमचं जीवन पूर्ण होतं. हेच तुमचं भविष्य आहे. याव्यतिरिक्त कुठलंही जीवन तुमच्यासाठी नाही. तसा विचार करणंही हास्यास्पद आहे.”

स्वतःच्या व्यक्तित्वाची अशी भयंकर ओळख घेऊन मुलं १६व्या वर्षी हेलशाममधून बाहेर पडतात. त्यांच्या राहण्याची व्यवस्था कॉटेजेसमध्ये केली जाते. इथे हेलशाम बरोबरच तशाच इतर स्कूलमधील आलेली मुलं असतात. कॉटेजमधील जीवन हेलशाममधील जीवनाहून फार वेगळं असलं तरी हेलशाममधील जीवनाची गडद सावली त्यावर पडलेली आहे. इथं मुलं तुलनेने मुक्त आहेत. आपला सोबती निवडण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. लैंगिक संबंधात खुलेपणा आहे. त्यात कसलीही चिंतेची बाब नाही. कारण या क्लोन मुलांना मुलं होत नाही. त्यांची निर्मितीच तशा प्रकारे केली गेली आहे. रूथ आणि टॉमी हे प्रेमी युगुल कॉटेजमधील इतर सिनियर युगुलांसारखं मजेत जीवन कंठत आहेत. कॅथी एकटी आहे. वस्तुतः कॅथी आणि टॉमी यांचे एकमेकांवर प्रेम आहे. साऱ्यांनाच ते ठाऊक आहे. मात्र रूथच्या प्रभावापुढे दोघेही बुजून जातात. एकटेपण हाच कॅथीच्या जीवनातील मुख्य सोबती आहे. रुथसोबत बिनसल्यानंतर एका क्षणी कॅथी केअरर म्हणून काम करण्यासाठी अर्ज करते. आणि कॉटेजमधून निघून जाते.

त्यानंतरच्या ११ वर्षांचा काळ कॅथीच्या जीवनातील नीरस आणि एकसुरी जीवनाचा काळ आहे. डोनेटरची काळजी घेणं. एका डोनेटरचं जीवन पूर्ण झालं की दुसऱ्या रिकव्हरी केंद्रावर दुसऱ्या डोनेटरची काळजी घेणं. केअरर म्हणून काम करण्याचं एक चक्र पुन्हा पुन्हा फिरत राहतं. ११ वर्षे. आणि त्यानंतर लवकरच या कामातून कॅथी रिकामी होत असताना या ११ वर्षांत एकदाही न भेटलेली रूथ तिला रिकव्हरी सेंटरमध्ये भेटते. रूथ आधीच डोनेशन फेजमधून गेलेली असते. कॅथी तिची केअरर म्हणून आनंदाने काम करू लागते. हेलशाममधील जुन्या स्मृती पुन्हा जागवल्या जातात. रूथ एकदा कॅथीला सुचविते की आपण ‘किंग्जफिल्ड’ला ट्रीपला जायला हवं आणि टॉमीलाही सोबत घ्यायला हवं.

११ वर्षांच्या दीर्घ काळानंतर किंग्जफिल्डला पुन्हा तिघे एकत्र येतात आणि रूथ कॅथी आणि रूथला सांगते की तुम्ही डेफरलसाठी अर्ज करायला हवा. डेफरल काय आहे हे त्यांना नक्कीच ठाऊक आहे. कॉटेजमध्ये राहत असताना सिनियर मुलांकडून त्यांनी ते ऐकलेलं आहे. एक मुलगा आणि मुलगी जर खरेच एकमेकांवर मनापासून प्रेम करत असतील तर त्यांना काही वर्षे एकत्र राहू दिलं जातं. त्याला डेफरल म्हणतात. या एकत्र राहण्याच्या काळात त्यांना डोनेशन करण्याची सक्ती नसते. मात्र त्यांचं प्रेम खरं असायला हवं. आणि ते खरं आहे की नाही हे ठरवतात ते त्यांनी हेलशाममध्ये असताना केलेल्या पेंटिंग्जवरून. या पेंटिंग्ज त्यांच्या गॅलरीत सुरक्षित आहेत. त्यातून गार्डीयन्स थेट त्यांच्या आत्म्यात पाहतात. अर्ज केलेल्या दोघांच्या पेंटिंग्जवरून त्यांच्या प्रेमाची खात्री पटली की त्यांचा डेफरल मंजूर केला जातो. रूथ डेफरलसाठी अर्ज करू शकत नाही याची तिला खात्री असते. कारण टॉमी आणि तिचं एकमेकांवर कधीच प्रेम नव्हतं. केवळ द्वेषापायी तिने टॉमी आणि कॅथिला एकमेकांपासून दार ठेवलं होतं. मात्र आता तिला तिची चूक सुधारायची असते.

टॉमी आणि कॅथी हरकून जातात. मध्यंतरी टॉमीने केलेली काही पेंटिंग्ज घेऊन ते मॅडमच्या घरी अर्ज करण्यासाठी जातात.

कॅथीची पेंटिंग्ज स्कूलमध्ये असताना गॅलरीमध्ये गेलेली असतातच. टॉमी त्याची पेंटिंग्ज मॅडम पुढे सादर करतो. मॅडम आणि त्यांच्या हेलशाममधील मिस शून्य नजरेने त्यांच्याकडे पाहत राहतात. एका भयावह सत्याची दोघांना जाणीव करून देतात. गॅलरी नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. तसेच डेफरलची पद्धत सुद्धा. कुणालाही कसल्याही प्रकारची सूट मिळत नाही. वेळ येताच प्रत्येकाला डोनेशन करावंच लागतं. त्यातून सुटका नाही. डेफरल ही केवळ एक मिथ आहे. त्यात सत्य नाही. भविष्याच्या स्वप्नांची राख हातात घेऊन टॉमी आणि कॅथ बाहेर पडतात. त्यांच्या अर्थहीन जीवनाच्या अखेरीस फुलू लागलेलं हे आभासी पण हवंहवंसं स्वप्नही निर्दयपणे त्यांच्या हातातून निघून जातं. टॉमीने याआधी दोन डोनेशन्स केलेली असतात. तिसऱ्या डोनेशनची वेळ येते. टॉमीचं जीवन पूर्ण होतं. कॅथीच्या डोनेशनची वेळ येऊन ठेपते. आणि पुढे जाव्या लागणाऱ्या दिव्याच्या आशंकेने व्यथित झालेली कॅथी आपलं निवेदन संपवते. मनाला चटका लावणारी हेलशामच्या विद्यार्थ्यांची कथा अंतःकरण हेलावून टाकते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0