स्टॉकहोम: वसाहतवादाच्या खोलवर रुजलेल्या परिणामांचे वास्तववादी आणि अनुकंपायुक्त चित्रण साहित्यातून करणारे टांझानियाचे कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्नाह यां
स्टॉकहोम: वसाहतवादाच्या खोलवर रुजलेल्या परिणामांचे वास्तववादी आणि अनुकंपायुक्त चित्रण साहित्यातून करणारे टांझानियाचे कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्नाह यांना २०२१ सालात साहित्यासाठी दिले जाणारे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. ७३ वर्षीय गुर्नाह यांच्या १० कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी अनेक कथाही लिहिल्या आहेत. त्यापैकी ‘पॅराडाइज’ आणि ‘डेझर्शन’ या कादंबऱ्या लक्षणीय समजल्या जातात.
१९४८ मध्ये हिंदी महासागरातील झांझीबार बेटावर जन्मलेले अब्दुलरझाक गुर्नाह १९६०च्या दशकात निर्वासित म्हणून इंग्लंडमध्ये दाखल झाले. झांझीबार १९६३ मध्ये ब्रिटिशांच्या वसाहतवादी राजवटीतून मुक्त झाला. त्यानंतर झांझीबारमध्ये अरबांना लक्ष्य करून झालेल्या रक्तरंजित क्रांतीचे चटके गुर्नाह यांना भोगावे लागले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना झांझीबार अर्थात नव्याने स्थापन झालेले टांझानिया प्रजासत्ताक सोडून जावे लागले. गुर्नाह इंग्लंडमध्ये आले. त्यानंतर टांझानियामध्ये परत जाण्यासाठी, कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांना १९८४ सालापर्यंत वाट बघावी लागली.
गुर्नाह यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांच्या मूळच्या स्वाहिली भाषेत लेखन सुरू केले. नंतर इंग्रजी ही त्यांच्या अभिव्यक्तीची भाषा झाली. ते अनेक वर्षे केण्ट विद्यापीठामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते.
१९८७ मध्ये गुर्नाह यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. निर्वासितांच्या भावविश्वाचे दर्शन त्यांच्या साहित्यातून अनेक अंगांनी घडत राहिले आहे. भिन्न संस्कृती व खंडांच्या दरीत अडकलेल्या निर्वासितांचे भवितव्य, त्यांचे उद्ध्वस्त अस्तित्व हे सूत्र त्यांच्या साहित्यात अखंडपणे येत राहिले आहे.
नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर लगेचच गुर्नाह यांना त्याबद्दल विचारले असता, हा पुरस्कार म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्का आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “यंदा साहित्यासाठी नोबेल कोणत्या साहित्यिकाला मिळेल याचा विचार मी करत होतो पण ते मलाच जाहीर होईल असे वाटलेच नव्हते. जेव्हा पहिल्यांदा बातमी कळली, तेव्हा माझी चेष्टा केली जात असावी हाच विचार मनात आला,” असे गुर्नाह म्हणाले. या सन्मानाच्या पारितोषिकासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी स्वीडिश अकॅडमीचे आभार मानले. १० दशलक्ष स्वीडिश क्राउन्स असे नोबेल पारितोषिकाचे स्वरूप आहे.
साहित्यासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे गुर्नाह हे दुसरे कृष्णवर्णीय आफ्रिकी आहेत. यापूर्वी १९८६ मध्ये वोले सोयिंका यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.
१९९४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पॅराडाइज या कादंबरीने गुर्नाह यांना जगभरात ओळख मिळवून दिली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात टांझानियात वाढणाऱ्या एका मुलाची कथा यात होती. ‘पॅराडाइज’ ही गुर्नाह यांची प्रसिद्ध झालेली चौथी कादंबरी. या कादंबरीला बूकर पारितोषिकाने गौरवण्यात आले होते.
अब्दुलरझाक गुर्नाह यांचे लेखन सत्याप्रती समर्पित आहे आणि अतिसुलभीकरणाबद्दल त्यांना वाटणारा तिटकारा त्यांच्या लेखनातून व्यक्त होतो, अशा शब्दांत नोबेल समितीने त्यांच्या साहित्याचा सन्मान केला आहे.
गुर्नाह यांच्या कादंबऱ्या सरधोपट वर्णनशैली मागे सारून सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण अशा पूर्व आफ्रिकेचे दर्शन जगाच्या अन्य भागांतील वाचकांना घडवतात. त्यांच्या व्यक्तिरेखा या भिन्न संस्कृती व खंडांच्या तसेच गतआयुष्याच्या व उगवत्या संधींच्या बेचक्यात अडकलेल्या असतात. या व्यक्तिरेखांची ही अत्यंत असुरिक्षित स्थिती गुर्नाह यांनी नेमकेपणाने टिपली आहे, असेही नोबेल समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नोबेल पारितोषिक प्राप्त झाल्यानंतर आपल्या साहित्याविषयी गुर्नाझ म्हणाले, “युरोपमध्ये अनेक जण निर्वासितांकडे दयेने बघत होते. आज लोक जगभरात प्रवास करतात, स्थलांतरे होतात. युरोपीय लोकांचे सर्वत्र जाणे तर कधीच नवीन नव्हते. मात्र, त्यांच्याकडे काहीतरी द्यायला आलेले ऊर्जेने सळसळणारे बुद्धिमान लोक म्हणून बघितले जात होते. आफ्रिकेतून युरोपमध्ये येणाऱ्या निर्वासितांची स्थिती याहून वेगळी होती.”
मूळ बातमी
COMMENTS