‘तुम्ही जाता तेव्हा’

‘तुम्ही जाता तेव्हा’

तुम्हाला शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे व कशिदा विणणारे पदोपदी भेटतात म्हणून वाटत होते, तुमचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळेच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणेही वेगळेच होते.

काँग्रेसची सूत्रे सध्या सोनियांकडेच
मेघालयात काँग्रेसला खिंडार; १२ आमदार तृणमूलमध्ये दाखल
चिदंबरम आणखी ४ दिवस सीबीआय कोठडीत

प्रिय राजीव सातव,

अखेर तुम्ही सर्वांना सोडून गेलातच. वर्तमानाची गरज लक्षात न घेता मराठवाड्यात तीस वर्षे पत्रकारिता केली आणि तुमच्या सातव घराण्याची परत परत आठवण झाली. माझ्या कार्यक्षेत्रात आपल्या मातोश्रींचा कळमनुरी मतदार संघ व कळमनुरी तुमच्या लोकसभा मतदार संघात पत्रकार म्हणून भटकंती आली. त्या भटकंतीतून कांही राजकीय नेत्यांचा संबंध येत असे. साल १९८१ कदाचित तुम्ही  ७/८ वर्षांचे असाल तेव्हा तुम्हाला पाहिले होते. ‘लोकमत’चे संपादक बाबा दळवी व मी त्यांचा सहकारी आपल्या घरी आलो तो आपल्या मातोश्री रजनीताई यांना भेटण्यासाठी. त्या त्यावेळी काॅंग्रेसच्या आमदार होत्या. त्यांच्या कामकाज पध्दतीवर, तुमच्या मातोश्रींवर माझे पत्रकारितेतील गुरु अनंत भालेराव यांनी दै. ‘मराठवाडा’च्या संपादकीय पानावर राजकीय विश्लेषात्मक लिहिलेला लेख अजूनही आठवतो. इथून सुरु झालेले सातव घराण्याचे कामकाज पत्रकार म्हणून माझ्या समोर येतच राहिले.
सध्याच्या माणुसकीहीन राजकारणात तुमच्या मनाचे माणूसपण व मवाळपण व नीट नेटके राजकारण इतक्या ऊंचीवर गेलेले पहात असताना अचानक तुम्ही एक्झिट (Exit) घेतलीत. हे मागासभूमिच्या द्दष्टीने हानिकारक ठरणार आहे. यावेळी एक विचार मनात आला तो म्हणजे शिवाजीराव देशमुख या अभ्यासू खासदारा नंतर तूम्ही ती जागा भरुन काढली. किंबहुना त्यांच्यापेक्षा तसूभर जास्तच. त्यांचे जाणेही अकालीच ठरले. विकासाचे स्वप्न अर्धवट सोडून! हा आपल्या मातीला शाप आहे की काय ?
तुमचे जाणे सर्वांना चटका लावून गेले. मातीला भेगा पाडून व आशावादावर पाणी सोडून गेले. हे दुःख मनात मावेनासे झाले.आंतडे तुटू तुटू झाले. कारण वर्तमानातील गढूळ राजकारण आणि समाजकारण हे सर्व लक्षात घेऊन आपण कार्यरत होतात म्हणून एक प्रश्न असा पडतो की, हे दगडाच्या देवा तू आहेस की नाहीस? असतास तर सध्या लाखोंनी मरणाऱ्या माणसांना नक्कीच वाचवले असतेस.अवघ्या ४५ च्या तारुण्यात अनेक कर्तबगार तरुणांना या कोरोनाने गायब केले.
राजीवजी, तुमचे संसदिय राजकारण एका बाजूला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला एका भगव्या राजकारण्याने केलेले वक्तव्य आजच्या लोकशाहीला लागलेला कलंक वाटतो. ते म्हणतात’, कोरोनाच्या विषाणूला जगण्याचा हक्क आहे. त्यांनाही जगू द्या व तुम्हीही जगा ‘. आपण त्यावेळी दिल्लीत असता तर जाहीरपणे खरडपट्टी काढली असती.
राजीव तुम्ही विवेक आणि विज्ञानवादी ,एक समंजस अभ्यासू व तितकेच सरळमार्गी संसदपटू होतात. दोन्ही राजकारण्यांतील फरक लक्षात आल्यानंतर असे वाटले की, लोकशाहीचे हे विवस्र रुप गंगामाई किती दिवस सहन करणार आहे. नागव्या साधूंचा थवा संसदेलाच घिरट्या घालून बसलाय. तो बंब करतोय आणि असंख्य भगव्या लुंग्या गंगेच्या पवित्र पाण्यावर तरंगत आहेत. त्यांचे शुध्दपण माध्यमातून घराघरात पोहचते आहे. अशावेळी एक समाज अभ्यासक म्हणून, कांही महिन्यांपूर्वी एकंदर वास्तवाचा अभ्यास करण्यासाठी आपण बनारसलाही जाऊन आलात.
संपूर्ण देशच भूकेने मरत असताना जटा सोडून लोकप्रतिनिधी सुसाट वावरत आहेत. त्यांना भिडण्याची निधडी छाती तुमच्याकडे होती असे राहून राहून वाटते. हे जाणकारांनी जाणले होते. प्रसिध्दी माध्यमांपासून दूर राहून काम करीत राहणे हा आई रजनीताई सातव यांच्याकडून तुमच्याकडे आलेला गुण नेहमी जाणवत आला. ‘मानवाचे आता मानवा मिळू दे,’ असे देवाला शेंदूर खरडवत खरडवत कौणीतरी सांगितले पाहिजे.
पुण्यात दै.’प्रभात’चा संपादक असतांना तुमची एकदाच भेट झाली. कांही हवे होते म्हणून नव्हे तर महाराष्ट्राचा दिल्लीतील उद्याचा आवाज म्हणून! बेगडी राजकारणाचे रंग पत्रकारांना बऱ्यापैकी लक्षात येतात. मात्र त्याच समुहातील तुम्ही नक्कीच नव्हतात हे शंभर टक्के ! अर्ध्या तासाच्या संवादात कुठेही कटुता आढळली नाही, सूड दिसला नाही किंवा स्वप्नअवस्थाही! बोलण्याला रंग नव्हता किंवा संवादी शब्दांना रेशमी पांघरुणही नव्हते. इतके वास्तववादी प्रश्न मांडत होतात तुम्ही! कदाचित त्यावेळी तुमचे वय अवघे ३२ चेच असावे. कारण चकचकीत अवास्तवाला तुम्ही तुमच्या जवळ कधी येऊ दिले नाही वा फिरकूही दिले नाही. तुम्हाला शब्द स्वच्छ धुवून वापरायची सवय होती. राजकारणात शब्दांची रांगोळी काढणारे व कशिदा विणणारे पदोपदी भेटतात म्हणून वाटत होते, तुमचा मार्गच निराळा आणि मैदानही वेगळेच. गंभीर प्रश्नांना घेऊन त्यात उतरणेही वेगळेच होते.
आजचा काळ हा गच्चीवरील आरामखुर्चित बसून जनतेच्या कल्याणाची भाषा करायची आणि प्रत्यक्षात जनतेच्या वाट्याला ऊजाड माळरान कसे येईल, हे पहायचे असे दिवस आहेट. “पिंजऱ्यात पक्षी,ओठी स्वातंत्र्याची गाणी, बोलविता धनी वेगळाची” याची जाणीव तुमच्याकडे असल्यामुळेच तुम्ही सतत असत्याशी झुंजत राहिलात. म्हणून तुमची विचार नाळ महात्मा गांधीजींच्या जीवन व्रताशी पक्की होती हे नक्की.
निवडणुकीतील कांही सभा कानावर पडल्या होत्या व असे वाटले होते की, महाराष्ट्राच्या  राजकारणाला दिशा देणारे एक समृध्द नेतृत्व ऊभरुन आले आहे, आरशासारखे स्वच्छ, निर्मळ असे मनोमन वाटत असताना, दातओठ खात कोरोना तुमच्या पाठी का कशासाठी लागला? आता अंधारी रस्त्यावर सर्व काही अबादी आहे, असे वाटणाऱ्यानांही गलबलून येते आहे हेच खरे वास्तव.
शेतकऱ्यांचा , कष्टकऱ्यांचा एक कैवारी गेला असे म्हणण्या इतपत सत्य तुम्ही पेरुनी गेला. डोळ्यात, मनात,श्वासांत किमान एवढे तरी दिसावे, अशी एक साधी सरळ इच्छा !!
पुनः एकदा तुमच्या स्मृतीला अभिवादन!
महावीर जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0