भावस्पर्शी आवाजाचा ‘थलैवा’

भावस्पर्शी आवाजाचा ‘थलैवा’

एसपी बालसुब्रमण्यम हा एका पिढीच्या ओठावर राहिलेला आवाज होता. संगीतातला साधेपणा आणि आवाजातील भाव या गोष्टीमुळे हा कलाकार कायम स्मरणात राहील.

सूर निरागस हो..
काव्य-संगीताचे आदानप्रदान
पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे निधन

प्रत्येक पिढीचे काही आवडते गायक असतात, त्यांची गाणी देखील ठरलेलीच…मग आपल्या गायकांपुढे त्यांना सध्याचे सगळेच गायक तद्दन फालतू किंवा वरवरचे वाटायला लागतात. हे काय संगीत आहे का? असं म्हणून एका वाक्यात संपूर्ण इंडस्ट्रीचा उद्धार केला जातो आणि आपल्या काळाची आठवण करून दिली जाते. हे काही आजचं नाही, जसं प्रत्येक घरातील बाप आपल्या पोराला आमच्या काळात असं नव्हतं, हे जसं सांगतो ना तसचं प्रत्येक पिढीला आपल्या काळातील गायकांच कौतुक असतं.

मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर यांसारखी काही मोजकी नावं आहेत ज्यांचे चाहते केवळ एका पिढीची नव्हते, यांची गाणी अनेक पिढ्यांनी ऐकली आणि ऐकत आहेत. गायकाचा एक काळ असतोच आणि त्याच काळात त्याला प्रतिसाद देखील मिळतो. पण काही मोजके गायक असे असतात ज्यांची गाणी एका पिढी पुरती मर्यादित राहत नाहीत. त्यांचा आवाज हा प्रत्येक श्रोत्याला आपलासा वाटतो, संगीताशी प्रामाणिक असलेले आणि स्वरांसमोर नतमस्तक होणारे हे गायक क्वचितच आढळतात.

एक गाणं हिट झाल्यानंतर डोक्यात प्रसिद्धी घुसणाऱ्यांच्या काळात, पाय जमिनीवर घट्ट असणारे गायक कुठे पाहायला मिळतील ? एस. पी. बालसुब्रहमण्यम हे त्याचं मोजक्या गायकांमधल एक नाव. २१वे शतक उजाडेपर्यंत या गायकाने हिंदी सिनेमातून विश्राम घेतला होता, म्हणून तर नव्या पिढीनं हिंदी सिनेमातील त्यांचं जे गाणं थिएटरमध्ये ऐकलं ते होतं चेन्नई एक्स्प्रेसच टायटल साँग, पण नव्वदच्या दशकातील हिंदी सिनेमाचा रोमँटिक आवाज म्हणजे एस. पी. बालसुब्रह्मण्यम… हिंदी सिनेमात फार प्रदीर्घ कारकीर्द नसताना देखील जी गाणी त्यांनी गायली ती आजही ओठांवर राहतात हेच त्यांचं वैशिष्ट्य.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत बाल सुब्रह्मण्यम आणि हिंदीत किशोर कुमार यांचा प्रवास सोबतच सुरू झाला, सिनेमातील गायकासाठी केवळ सुरेल आवाज असून चालत नाही. त्याला गाण्यातील शब्दांचे अर्थ समजून आणि भाव लक्षात घेऊन गाणं गाता यायला हवं, जे बालसुबरह्मण्यम् यांचं वैशिष्ट्य होतं. संगीताचं कुठलंही शिक्षण न घेता, केवळ प्रामाणिकपणे केलेली सुरांची आराधना हीच त्यांच्या गायनाची विशेषता, ज्या सिनेमाने त्यांची ख्याती जगभर पोहचली, अशा शंकराभरणममध्ये त्यांनी गायलेली अभिजात संगीतातील गाणी ऐकून कुणालाही यावर विश्वास बसणार नाही की, या व्यक्तीने गाण्याचं शिक्षण घेतलेलं नाही.

कॉलेजात गाणारा, स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पारितोषिकं पटकावणारा हा गायक जेव्हा इंडस्ट्रीत आला तेव्हा पहिल्यांदा गाणं गाताना काही चुका झाल्या, सत्यम गारूसारख्या मोठ्या संगीतकाराने त्याला चुकांबद्दल असं झापलं तो स्टुडिओच्या बाहेर जाऊन रडू लागला. पण त्याने गायलेलं पहिलच गाणं सुपरहिट ठरलं, ज्या संगीतकाराने त्याला झापलं होत पुढे त्याने त्याच्याशिवाय कुठल्याच गायकासोबत काम केलं नाही. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत गायकांमध्ये असलेल्या स्पर्धांपासून दूर जाऊन, बालसुब्रमण्यम यांनी प्रत्येक सिनियर गायकाला आपला गुरू मानलं आणि काम सुरू ठेवलं. कमल हसनचा आवाज असलेला हा गायक कुठल्याही कामाला छोटं मानणारा नव्हता, कमल हसनच्या तामिळ सिनेमाचं तेलुगुमध्ये डबिंगसुद्धा बालसुब्रमण्यम करायचे. ईलाइराजा या महान संगीतकाराच्या सर्वाधिक प्रसिद्ध गाण्याला बालसुब्रमण्यमयांचाच आवाज लाभला आहे.

हिंदी सिनेमात बालसुब्रमण्यम यांना सलमान खानचा आवाज म्हटलं गेलं, मैने प्यार किया, हम आपके है कौन, साजन यांसारख्या अनेक सिनेमात त्यांनी सलमान खानला आपला आवाज दिला. मैने प्यार किया वेळी तर सलमान सारख्या कोवळ्या हिरोला असा भारदस्त आवाज सूट तरी होईल का ? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण त्याच सिनेमातील गाणी ब्लॉकबस्टर झाली आणि सलमानच्या करियरसाठी तो सिनेमा माईलस्टोन ठरला. या चित्रपटाततील अनेक गाणी इंग्रजी रॉक गीतांची हुबेहूब नकल होती पण बालसुब्रमण्यम यांच्या अदाकारी, भावस्पर्शी, आवाजानं या गाण्यांना टाईमलेस बनवलं.

नवद्दीच्या पूर्वार्धात तर सलमान आणि बालसुब्रमण्यम हे समीकरण इतकं पक्क झालं होतं की सलमानच्या ‘ये रात और ये दुरी,’ ‘तुमसे जो देखतेही’ यांसारख्या कमी लोकप्रिय गाण्यांत सुद्धा त्यांचा आवाज वापरला गेला.

हिंदी सिनेमात बालसुब्रमण्यम यांची एंट्री सुद्धा कमल हसन सोबतच झाली होती, एक दुजे के लिये सिनेमातील “तेरे मेरे बीच में कैसा हैं ये बंधन” हे त्यांच्या आणि लता मंगेशकरांच्या आवाजातील गाणं आजही तितकंच पसंत केलं जातं. एक गोष्ट त्यांच्याबाबत अजून नोंदवावी अशी आहे, अनेक हिंदी गाण्यांमध्ये त्यांच्या सोबत गाणाऱ्या गायकांना जास्त लाइन्स दिल्या जायच्या, कधीकधी तर नवख्या गायकालासुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक फुटेज मिळायच पण यात त्यांनी कुठलीही कमीपणा वाटून घेतला नाही. चेन्नई एक्सप्रेस सारख्या सिनेमात जोनिता गांधी सारख्या नव्या पिढीच्या गायिकेसोबत आणि विशाल – शेखर सारख्या संगीतकारांसोबत काम करताना देखील त्यांच्यातला मोठेपणा दिसून आला. टायटल साँगमधील त्यांचा आवाज ऐकून हा व्यक्ती कुठल्याही पिढीसाठी गाऊ शकतो यावर पुन्हा विश्वास बसला होता. चेन्नई एक्सप्रेसच्या टायटल सॉंगमध्ये “तिकीट खरिद के बैठ जा सिट पे, निकल ना जाए कही चेन्नई एक्स्प्रेस” ही त्यांनी गायलेली ओळसुद्धा बरीच लोकप्रिय झाली होती.

२००० च्या सुरुवातीला हिंदी सिनेसृष्टीत जे बदल झाले त्यांच्याशी त्यांना जुळवून घेता आले नाही म्हणूनच त्यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला असं म्हणतात. हिंदी सिनेमातल्या व्यावसायिकतेपुढे त्यांच्या सारखा कलाकार टिकणं जरा अवघडच होतं. त्यांना ६ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्यांनी ४०,००० हून अधिक गाणी गायली या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या तरी एक गोष्ट नक्की, ती म्हणजे बालसुब्रमण्यम हा एका पिढीच्या ओठावर राहिलेला आवाज होता. संगीतातला साधेपणा आणि आवाजातील भाव या गोष्टीमुळे हा कलाकार कायम स्मरणात राहील.

अनिकेत दिगंबर म्हस्के, लेखक आणि चित्रपट समीक्षक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0