मुंबई: राज्यात काही जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीईटी प्रवेश परीक्षा
मुंबई: राज्यात काही जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
उदय सामंत म्हणाले, या नैसर्गिक आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करू शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येवून प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देवू न शकल्याची विविध कारण सीईटी कक्षाकडे नोंदविली आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोरोना झाल्यामुळे, अतिवृष्टी, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड इ. साथीचे आजार, वाहतुकीची कोंडी, रस्ते दुर्घटना इ.मुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचण, एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे, परीक्षेच्या पहिल्या सत्रात ३० मिनिटाच्या आत तांत्रिक अडचण निर्माण होणे, परीक्षेला प्रत्यक्ष हजर असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पूर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत.
या कारणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता तसेच उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पीसीएम ग्रुप करिता जवळपास २७ ते ३० हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून परीक्षा देवू शकले नाहीत अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्यासाठी अंतिम संधी देण्यात देण्यात येणार आहे.
सामंत म्हणाले, वरील कारणांचा विचार करता पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या पात्र उमेदवारांना १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वरील कारणांना अनुसरून ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्क यापूर्वी भरले असल्यामुळे त्यांची निशुल्क नोंदणी करून घेण्यात येईल. तसेच नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करून देऊन ९ व १० ऑक्टोबर २०२१ रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालक यांनी काळजी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले.
COMMENTS