अफगाणिस्तान,पाकिस्तान आणि तालिबान

अफगाणिस्तान,पाकिस्तान आणि तालिबान

भारत कधीही हल्ला करेल असं पाकिस्तानला पहिल्या दिवसापासून वाटतंय आणि बांगला देश निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानचं ते मत अधिक घट्ट झालंय. भारतानं हल्ला केला तर आश्रयाला एक जागा हवी, ती जागा अफगाणिस्तान आहे असं लष्कराला वाटतं. स्ट्रॅटेटेजिक डेप्थ असं या संकल्पनेचं वर्णन लष्कर करतं.

इम्रान खान सरकारवर अविश्वासाचा ठराव; पक्षात बंडखोरी
३७० कलम रद्द केल्याचे अंतिम साध्य काय?
पुलवामा ते बालाकोट : प्रपोगंडापलीकडे

१६ एप्रिलला अफगाणिस्तानातल्या खोस्त आणि कुनार या गावांच्या परिसरात पाकिस्तानी क्षेपणास्त्रं कोसळली. नागरी वस्तीवर. ४५ माणसं मेली. पाकिस्तानच्या लष्करानं केलेल्या या हल्ल्याची जबाबदारी मात्र पाकिस्तान लष्करानं घेतली नाही, मौन बाळगलं.
दोनच दिवस आधी, म्हणजे १४ एप्रिल रोजी, अफगाणिस्तानातून आलेल्या लोकांनी पाकिस्तानातल्या वझिरीस्तान या विभागात सात पाकिस्तानी सैनिक मारले होते. त्या हल्ल्याचा सूड म्हणून खोस्त-कुनारमधे हल्ला झाला होता.
गंमत पहा. खोस्तमधे झालेल्या हल्ल्याचा निषेध करणारे मोर्चे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अशा दोन्ही ठिकाणी निघाले.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातल्या गुंतागुंतीच्या संबंधांतलं हे एक प्रकरण आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधे पाकिस्तानी तालिबान हे एक फार दाहक आणि नाजूक दुखणं आहे. तहरीके तालिबान पाकिस्तान ही दहशतवादी पाकिस्तानी संघटना अफगाणिस्तानी तालिबाननं निर्माण केलीय, पोसलीय. ही संघटना पाकिस्तानात हिंसा माजवत असते, पाकिस्तानी पोलीस आणि लष्कराशी पंगा घेत असते.
पाकिस्तानी तालिबान पाकिस्तानात, विशेषतः वझिरीस्तान या अफगाणिस्तानच्या सरहद्दीला लागून असलेल्या प्रांतात स्वतःचं राज्य निर्माण करू पहातेय. पाकिस्तानी सरकारला न जुमानता पाकिस्तानी तालिबान तिथं स्वतःची सत्ता उभी करतंय आणि त्या खटाटोपात सैनिक आणि पोलिसांना ठार करतं आणि नंतर अफगाणिस्तानात आश्रय घेतं. खोस्त आणि कुनार हे प्रांत त्यांचं आश्रयस्थान आहे.
पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाण सरकार पाकिस्तान तालिबानला पोसतं, आश्रय देतं. अफगाण सरकार आरोपाचा इन्कार करतं आणि म्हणतं की तालिबान या विचारसरणीच्या लोकांवर पाकिस्तानचा दात असून पाकिस्तान त्यांच्या विरोधात हिंसक कारवाया करतं.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातली नाती नेहमीच फार विसविशीत राहिली आहेत, सतत बदलत राहिली आहेत.
पाकिस्तानला अफगाणिस्तान हा आपल्या परसात असलेला देश असायला हवाय. अफगाणिस्ताननं आपल्या ताटाखाली रहावं, आपल्या सांगण्याप्रमाणं वागावं असं पाकिस्तानला वाटतंय. पाकिस्तानच्या निर्मितीपासून लष्कर हा पाकिस्तानचा मुख्य आधार राहिला आहे. भारत हा देश आपल्याला कधीही गिळेल अशा स्थितीत पाकिस्तानजवळ प्रबळ लष्कर हवं आणि पाकिस्तानचा कारभार लष्करानंच चालवावा असं लष्कराला वाटत आलंय. भारत कधीही हल्ला करेल असं पाकिस्तानला पहिल्या दिवसापासून वाटतंय आणि बांगला देश निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानचं ते मत अधिक घट्ट झालंय. भारतानं हल्ला केला तर आश्रयाला एक जागा हवी, ती जागा अफगाणिस्तान आहे असं लष्कराला वाटतं. स्ट्रॅटेटेजिक डेप्थ असं या संकल्पनेचं वर्णन लष्कर करतं. त्यासाठी अफगाणिस्तान आपल्या कह्यात रहावं असं पाकिस्तानला वाटतं.
अफगाणिस्तान ते कसं मंजूर करणार?
अफगाणिस्तानचं म्हणणं असं की पाकिस्तानची निर्मिती हाच एक कृत्रीम प्रकार आहे. ड्यूरांड यांनी ब्रिटिशांच्या राजकीय सोयीसाठी दोन देशांना विभागणारी एक रेघ आखली येवढंच. पण त्यानं कुठं शेकडो वर्षं एकसंध असलेला समाज विभागता येतो असं अफगाणांचं मत आहे. त्यामुळं अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातली १६०० मैलाची सीमारेषाच अफगाण मानत नाहीत. त्यामुळं अफगाण लोक खुश्शाल पाकिस्तानात ये जा करत असतात, त्यांना पाकिस्तान, विषेषतः अफगाणिस्तानच्या निकट असलेला प्रदेश आपलाच वाटतो. पाकिस्ताननं आपल्यावर दादागिरी करण्याचं काही कारणच नाही असं त्यांना वाटतं.
त्यामुळंच अफगाणिस्तानात प्रभावी ठरलेल्या तालिबानला वाटतं की पाकिस्तानात, अफगाणिस्तानला लागून असलेल्या वझिरीस्तानात, तालिबानचीच सत्ता असली पाहिजे. अफगाण तालिबान या प्रश्नावर आक्रमक आहे, पाकिस्तान सरकारला तालिबान मोजतच नाहीत.
तालिबान हा पाक-अफगाण संबंधातला दाहक मुद्दा आहे. तालिबान हा एक स्वतंत्र पंथच म्हणायला हरकत नाही. अफगाण संस्कृतीचा देवबंदी इस्लाम.देवबंदी इस्लाम राजकीय आहे. स्टेट,सरकार, राज्य ही कल्पनाच देवबंदी इस्लामला मान्य नाही.देवबंदी विचाराला धर्माचं राज्य हवंय; लोकशाही, निवडणुका, माणसानं केलेला कायदा, तो कायदा अमलात आणणारी न्यायव्यवस्था या गोष्टी देवबंदी विचाराला मान्य नाहीत. अशा देवबंदी इस्लाममधे स्त्री, आधुनिकता या दोन्हींच्या विरोधात असलेला कर्मठ अफगाणी विचार मिसळून अफगाणिस्तानी तालिबान तयार झालेलं आहे. अशा अफगाण तालिबानच्या संपर्कात १९९० च्या दशकात पाकिस्तानी मुजाहिद आले आणि बदलले. ते पाकिस्तानी मुजाहिद न रहाता पाकिस्तानी तालिबानी झाले. अफगाण तालिबाननं पाकिस्तानी तालिबान निर्माण केलं, वाढवलं, पोसलं.
याच पाकिस्तानी तालिबाननं वझिरीस्तानात गोंधळ घातलाय. वझिरीस्तानवर आपलं राज्य चाललं पाहिजे असं पाकतालिबानला वाटतंय. वझिरीस्तानात मुलींनी शिकता कामा नये असं त्यांना वाटतंय. मलालाला शिकायचं होतं. तिनं मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला, प्रचार केला. पाक तालिबान रागावलं, मलालाच्या तोंडावर ॲसिड फेकलं, तिच्यावर गोळीबार केला.
पाक तालिबाननं पाकिस्तानी लष्कराला खुल्लं आव्हान दिलंय, हिंमत असेल तर आमच्याशी लढाई करून दाखवा असं जाहीर केलंय. पाक तालिबानला अफगाणिस्तानातून शस्त्रं आणि पाठिंबा मिळतो. पाकचे सैनिक पाठी लागले की पाक तालिबान अफगाणिस्तानात खोस्त, कुनारमधे पळतं.
पाक तालिबान पाकिस्तानच्या मुळावरच उठलंय. आणि ते अफगाण तालिबानचंच अपत्य असल्यानं अफगाण तालिबान पाक तालिबानला पोसणार.
अफगाण सरकारनं खोस्तवरील हल्ल्याचा निषेध केला. असे हल्ले पाकिस्तान करत राहिलं तर दोन देशांमधले संबंध बिघडतील, वितुष्ट निर्माण होईल, मतभेद वाटाघाटी करून मिटवले पाहिजेत, हिंसा करून नव्हे असं पत्रक अफगाण सरकारनं काढलं. येवढ्यावर सरकार थांबलं नाही. अफगाण सरकारनं पाकिस्तानी राजदूताला काबुलमधे बोलावून घेतलं, त्याच्याकडं एक निषेधाचा खलिता सोपवला, पाकिस्तान सरकारला देण्यासाठी.
पण पाकिस्तानमधली सध्याची परिस्थिती अशी आहे की तो खलिता कपाटात पडून रहाणार. पाकिस्तानात राजकीय अस्थिरता आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी शेहबाज शरीफ हंगामी पंतप्रधान आहेत. निवडणुका होतील, नवं सरकार येईल, तेव्हांच या खलित्याचा जो काही परिणाम व्हायचा तो होईल.
परिणाम तरी कोणता होईल? हा प्रश्न कसा सुटणार?
ही कोंडी कशी फुटणार? अफगाणिस्तानावर तालिबानची सत्ता स्थापन झाल्यापासून प्रश्न आणखीच चिघळत चाललाय. प्रश्न सांस्कृतीक आणि धार्मिक असल्यानं राजकीय मार्गानं तो सुटण्याची चिन्हं नाहीत.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0