ते आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या शांततेसाठी जीव ओतून काम करत होते आणि आहेत, तिचीच आस त्यांना मृत्यूच्या वेळीही होती.
१८ जुलै २०१९ रोजी सकाळी, त्यांच्या ८९ व्या वाढदिवसाला नुकताच एक महिना पूर्ण झालेला असताना बी. एम. कुट्टी यांनी या जगाचा निरोप घेतला. आयुष्यभर ट्रेड युनियन कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, शांततावादी, मानवतावादी कार्यकर्ता राहिलेल्या कुट्टी यांना मी कराचीमध्ये भेटले होते. तेव्हा ते मला जसे दिसले तसेच ते माझ्या आठवणीत राहिलेले मला आवडतील – रुंद हसू, सशक्त, लयदार खर्जातला आवाज, चष्म्याआडची तीक्ष्ण नजर, बुशशर्ट आणि ट्राऊझर्समधली त्यांची टापटीप मूर्ती!
मी पहिल्यांदा बिय्याथिल मोहुद्दिन कुट्टींना ९० च्या दशकाच्या सुरुवातीला, मी नुकतीच पत्रकारिता सुरू केली होती त्याच वेळी केव्हातरी पाकिस्तानातील शांतता आणि लोकशाहीवादी चळवळींमध्ये भेटले. त्यांचा जन्म आणि पालनपोषण केरळमध्ये झाल्याने त्यांचे रूप आणि त्यांच्या भाषेतला दक्षिण भारतीय लहेजा ठळकपणे दिसून येई.
हळूहळू मला त्यांच्याबद्दल माहिती मिळत गेली. ते ‘कॉम्रेड’ होते – कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान या प्रतिबंधित पक्षाचे सदस्य होते, माझ्या वडलांचे मित्र होते. माझे वडील डॉ. सरवार हे पक्षाचे सहानुभूतीदार होते, त्यांनी १९५० मध्ये पाकिस्तानमधील पहिल्या विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केले होते. कुट्टीसाहब पक्षाचे कार्डधारक सदस्य होते.
१९५४ मध्ये पाकिस्तानने सीपीपीवर बंदी घालेपर्यंत कराचीच्या मध्य भागातील त्यांच्या पक्ष कार्यालयावर लाल झेंडा लहरत असे. आणखी एक कॉम्रेड, अर्थतज्ञ एरिक रहिम यांना आठवते, सुरुवातीच्या काळात या इमारतीमध्ये “एक मलबारी कॉम्रेड दिसत. एक बिडी कामगार, जे त्या इमारतीची देखभाल करण्याचे कामही करत” – १९२१ मध्ये मोपल्यांच्या बंडानंतर ब्रिटिशांच्या दडपशाहीपासून वाचण्यासाठी अनेक मलबारी किंवा मल्याळी लोक पळून गेले त्यांच्यापैकी कोणी असावा. या लोकांपैकी काही सिंगापूरमध्ये वसले, काही कराचीला गेले.
१९४७ पर्यंत, कराचीचे मलबारी लोक बऱ्यापैकी सुस्थापित झाले होते. पानांची दुकाने, बिड्यांचे कारखाने, रेस्टॉरंटमध्ये कामे करत होते. कुट्टी साहिबांना कालिकत मधल्या एका मलबारी माणसाच्या मालकीची एक कालिकत हॉटेल नावाची इमारतही आठवत होती.
त्यांच्या मल्याळी पार्श्वभूमीमुळे बिडी कामगारांमध्ये काम करणे त्यांना सोपे गेले, त्यांनी त्यांच्या ट्रेड युनियन बांधल्या आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या बहुविध ओळखींमध्ये त्यांना काही विरोधाभास वाटत नसे. “मी हृदयापासून मल्याळी आहे, आणि पाकिस्तानीही आहे. आणि ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांचा आवाज बनणे आणि त्यांच्या वतीने त्यांच्या समस्यांबाबत आवाज उठवणे म्हणजेच कम्युनिस्ट असणे असेल, तर मी कम्युनिस्टही आहे,” अदिती फडणीस यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते.
२०१५ मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता आणि त्यातून ते आश्चर्यकारकरित्या बचावले होते. ते त्याचे श्रेय त्यांच्या केरळी असण्याला देतात. त्यांच्या बोलण्यावर परिणाम झाला, पाच महिने ते बिछान्याला खिळून राहिले. त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी त्यांना आयुर्वेदिक उपचारांकरिता केरळमध्ये जाण्यास मदत केली. दोन महिन्यांच्या उपचारांनंतर त्यांना बोलता येऊ लागले.
“माझ्या जन्मभूमीतील आयुर्वेदाने मला बरे होण्यात मदत केली हे माझे सुदैव,” ते म्हणाले. या अनुभवामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध चांगल्या शेजाऱ्यांसारखे असले पाहिजेत ही गरज त्यांच्यासाठी आणखी अधोरेखित झाली.
त्यांचे स्वप्न
भारतीय उपखंडात शांतता नांदावी हे गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या निर्मला देशपांडे, अस्मा जहांगिर, निखिल चक्रवर्ती, रजनी कोठारी, आय. ए. रहमान, डॉ. मुबाशिर हसन, डॉ. इक्बाल अहमद आणि १९८०-९० पासून शांततावादी लोकचळवळीची बीजे रोवणाऱ्या अनेकांचे स्वप्न होते, तसे ते कुट्टी साहिबांचेही होते.
आणि ही चळवळ आजही सातत्याने वाढते आहे, या प्रदेशातील आपापल्या क्षेत्रात भरीव काम करणारे अनेक तरुण-तरुणी यामध्ये सामील होत आहेत. मात्र, युद्धखोर शासनाचे शब्द मोठे करून सांगणारी प्रसारमाध्यमे आणि व्हर्चुअल जगातल्या ट्रोल आर्मी यांच्यामुळे सार्वजनिक चर्चाविश्वात हे सत्य पुढे येत नाही.
२००८ मध्ये निर्मिला दीदींचे निधन झाले तेव्हा कुट्टी साहिब दिल्ली येथे त्यांच्या अंत्यसंस्काराकरिता गेले होते. दीदी आणि इतर कर्तृत्ववान महिलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपले पुस्तक अशाच चार महिलांना अर्पित केले – बिरिया उम्मा (आई), निर्मला देशपांडे (शांतता), बेनझीर भुट्टो (लोकशाही) आणि पत्नी बिरजिस (प्रेम), असे आय. ए. रेहमान यांनी या पुस्तकाच्या परीक्षणात म्हटले आहे.
कुट्टी साहिब स्वतःला “स्वतःस्फूर्त फरार” म्हणत. १४ ऑगस्ट १९४९ रोजी त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी खोक्रापार-मोनाबो सीमा ओलांडली होती. निर्वासित म्हणून नव्हे – त्यांना कुणीही राजकीय किंवा आर्थिक कारणाने हाकलून दिले नव्हते. सिक्स्टी इयर्स इन सेल्फ-एक्झाइल: नो रिग्रेट्स, या २०११ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या आठवणींच्या शीर्षकामध्ये हेच प्रतिबिंबित होते. २००७ मध्ये ते निर्मला दीदींना भेटले होते, तेव्हा त्यांनीच ते नाव सुचवले होते.
“मी स्वतःहून गेलो. मी स्वतःलाच हद्दपार केले. त्याच्यामागे बाकी काही विशेष अर्थ नाही… पण मला त्याचा पश्चात्ताप वाटत नाही,” कुट्टी साहिब लाईव्हमिंट शी बोलताना म्हणाले होते, “मी आयुष्याचा आनंद घेतला, एक राजकीय कार्यकर्ता आणि एक शांततावादी कार्यकर्ता म्हणून मी माझे आयुष्य संपूर्ण जगलो.”
पॉलिसी अँड प्लॅनिंग ग्रुपच्या आमंत्रणावरून पुस्तकाच्या भारतातील प्रकाशनाकरिता आलेले असताना कुट्टी साहिबांनी शांतता कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. जुलै २०११ मध्ये त्यांनी “दोन्ही देशांमध्ये शांततेचा पुरस्कार करण्यासाठीच्या त्यांच्या दौऱ्याचा भाग म्हणून” हैद्राबाद येथील भाजपचे राज्य अध्यक्ष जी. किशन रेड्डी आणि भाजपच्या इतर नेत्यांचीही भेट घेतली. त्यांनी भारत आणि पाकिस्तानातून शांततेला पाठिंबा देणाऱ्या पाच लाख लोकांच्या सह्या गोळ्या करून त्या दोन्ही सरकारांना सादर केल्या होत्या.
त्यांचा विचारधारात्मक कल कोणताही असला तरी ते पोथीवादी नव्हते. थोडे प्रोत्साहन दिले की त्यांची खेळकर, भावनिक बाजूही समोर येत असे. भूगोलाच्या प्रेमामुळे ते केरळ सोडून उत्तर-पश्चिमेला पाकिस्तानात आले. काही महिने कराचीत काढल्यानंतर ते लाहोरला गेले. त्यांना ते प्राचीन शहर, बेगम नूर जहाँ आणि नर्तिका अनारकली यांचे मकबरे पाहण्याची उत्सुकता तर होतीच.
शिवाय, ते म्हणाले, लाहोरमधल्या मुली फार सुंदर असतात असेही ऐकले होते.
“खरे तर हे मला खूप मजेशीर वाटले होते, की सगळ्या उलथापालथीच्या काळात, आणि कम्युनिस्ट पक्षाच्या गांभीर्याने चाललेल्या कामाच्या दरम्यान, या तरुण मुलांची काम आणि आनंद एकत्र असायला हरकत नव्हती,” पत्रकार हसन जैदी यांनी ट्वीट केले.
“अर्थात, मी ही कहाणी अरिफ हसन (सुप्रसिद्ध वास्तुविशारद आणि संशोधक) यांना सांगितली तेव्हा त्यांना ती आवडली, मात्र त्यांनी ती उडवून लावली. त्या काळात लाहोरमध्ये रेल्वे यार्ड होते, आणि बहुधा कुट्टी साहिबांना तिथे काम करण्यासाठी (कम्युनिस्ट) पक्षानेच पाठवले असावे असे ते म्हणाले. तसे असेल तर कुट्टी साहिब माझी फिरकी घेत होते याचीही मला गंमत वाटली. मला वाटते, त्यात या दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या होत्या. ते फार प्रेमळ, छान होते.”
खरे तर इतरांसारखेच त्यांनाही ते कायमस्वरूपीच लाहोरला जात आहेत असे वाटले नव्हते. पण ते लाहोरच्या प्रेमात पडले. “ते इतके सुंदर होते, केरळसारखेच. तिथल्या बागा, वनराई…आणि लोक इतके छान होते. मी तिथेच एका सुंदर मुलीशी लग्नही केले.” ती होती बिरगिस सिद्दिकी. त्यांचे कुटुंब भारतातील उत्तरप्रदेशातील होते. या लग्नामुळे कुट्टीसाहिब जीवनात स्थिरस्थावर झाले. त्यांना चार मुले झाली, आणि २०१० साली पत्नीच्या निधनापर्यंत ६० वर्षे त्यांनी संसार केला.
बलुचिस्तान
लाहोरमध्ये कुट्टी साहिबांनी अनेक संस्थांमध्ये काम केले. ते तिथेही कम्युनिस्ट पक्षाशी तसेच लाहोरमधील डावे राजकीय कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी जोडलेले राहिले. त्यापैकी एक होते प्रसिद्ध बलूच नेते घौस बक्ष बिझेन्जो. कुट्टी साहिब त्यांचे राजकीय सचिव बनले. बिझेन्जो यांना नंतर बलुचिस्तानचे गव्हर्नर नियुक्त करण्यात आले तेव्हाही ते या भूमिकेत कायम राहिले.
फेब्रुवारी १९७३ मध्ये, इराकी दूतावासामध्ये शस्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा सापडला तेव्हा कुट्टी साहिबांवर संशय घेतला गेला. त्याला कारण होती त्यांची वेगळी पार्श्वभूमी – बलुची माणसासाठी काम करणारा केरळमधील कम्युनिस्ट! ते पाकिस्तान-इराण सीमेपलिकडे बलूच बंडखोरांना शस्त्रास्त्रे पुरवत असावेत असा त्यांच्यावर संशय होता. भुट्टोंनी बिझेंजोचे सरकार बरखास्त केले आणि कुट्टीसाहिबांना इस्लामाबाद विमानतळावर अटक करण्यात आली. ते आणि बिझेंजो दोघांनाही तुरुंगात टाकण्यात आले.
मात्र कुट्टी साहिबांचा बलूच लोकांच्या अधिकारांना ठाम पाठिंबा असला तरीही “बलुचिस्तानाचे भविष्य पाकिस्तानातच आहे, पाकिस्तानबाहेर नाही,” असे त्यांचे स्पष्ट मत होते. तो प्रदेश संसाधनांनी समृद्ध असला – सोने, तांबे, गॅस – आणि लोकसंख्या पाकिस्तानच्या १०% ही नसली तरीही!
ते म्हणत, “या प्रांताकडे आधाशासारखे डोळे लावून बसलेल्या बाहेरच्या शक्ती ही समस्या आहे. आंतरराष्ट्रीय शक्तींना त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधांसाठी, त्यांच्या धोरणात्मक हितांसाठी ते एक प्रकारचे क्रीडांगण बनलेले आहे. बलुचिस्तान स्वतंत्र राहू शकत नाही. त्याला स्वतंत्र व्हायचे असेल तर उर्वरित पाकिस्तानशी काही करार करूनच तो तसे करू शकतो.”
मी एकदा कुट्टी साहिबांना दख्खनच्या हैद्राबादमधले सीपीपी नेते हसन नासिर यांच्याबद्दल विचारले होते. आयूब खानच्या मार्शल लॉच्या काळात त्यांना तुरुंगात टाकून, छळ करून ठार करण्यात आले होते. माझे वडील आणि कुट्टी साहिब हसन नासिर यांना व्यक्तिगतरित्या ओळखत होते आणि त्यांच्या भूमिगत काळात ते केव्हाही या दोघांचे घर अर्ध्या रात्री ठोठावू शकत होते.
कुट्टी साहिबांच्या आठवणीप्रमाणे हसन नासिर एक उंच, कुरळ्या केसांचे, “अत्यंत देखणे..आणि चिरंतन आशावादी” होते. नासिर यांना १९५२ मध्ये अटक झाली होती व कम्युनिस्ट पक्षाचे अन्य नेते सज्जाद झहीर यांच्याबरोबर त्यांना भारतात परत पाठवण्यात आले होते. परंतु १९५८ मध्ये नासिर गुपचूप पुन्हा पाकिस्तानात परतले.
त्यावेळी पाकिस्तानात पहिली लष्करी हुकूमशाही चालू होती. फील्ड मार्शल अयूब खानांचे राज्य होते. १९६० मध्ये लष्करी अधिकाऱ्यांनी हसन नासिर यांना पकडले. असे म्हणतात की त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. इतका की मृत्यूनंतर अधिकाऱ्यांनी त्यांचे मृत शरीरही परत केले नाही. यावेळी या छळातून मृत्यूनेच त्यांची सुटका केली.
“आम्ही त्यावेळी तुरुंगात होतो, बराकीबाहेर कॉरिडॉरमध्ये न्याहारी करत होतो. तेव्हा हसन नासिर यांनी तुरुंगात आत्महत्या केल्याची बातमी आली. आमच्यापैकी कुणाचाच त्यावर विश्वास बसला नाही. आत्महत्या सोडाच, तसा विचारही त्यांनी कधी केला नसेल. पण आम्ही तिथे बसून अश्रू ढाळण्याखेरीज काहीच करू शकत नव्हतो,” कुट्टी साहिबांनी मला सांगितले.
९० च्या दशकाच्या मध्यापासून ते काही वर्षांपूर्वी त्यांची तब्येत ढासळू लागेपर्यंत कुट्टीसाहब पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी मध्ये सक्रिय होते. त्यांनी पाकिस्तान पीस कोएलिशनचीही स्थापना केली होती आणि सोसायटी फॉर सेक्युलर पाकिस्तान या २०१४ साली सुरू झालेल्या संस्थेचेही ते सक्रिय सदस्य होते.
प्रादेशिक चौकट
दोन वर्षांपूर्वी ते पुन्हा एकदा उपचार घेण्यासाठी केरळला गेले आणि पुन्हा चांगले बरे होऊन पाकिस्तानला परतले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी आणखी काही काळ राहण्याचा आग्रह केला पण त्यांना फार काळ पाकिस्तानपासून – त्यांच्या दुसऱ्या घरापासून – दूर राहायला आवडत नसे.
त्यांचा लहान भाऊ मोहम्मद, ज्यांचा जन्म कुट्टी साहब पाकिस्तानला गेल्यानंतर झाला होता, यांना आठवते, कुट्टी त्यांना म्हणाले होते, “मी पाकिस्तानी म्हणूनच मरेन. असा पाकिस्तानी, ज्याला नेहमीच भारताबरोबर प्रेमाचे नाते हवे होते.”
“पाकिस्तानमध्ये जे काही होत आहे ते त्या देशापुरते मर्यादित नाही, इतर अनेक दक्षिण आशियाई देशही धार्मिक कट्टरतावाद आणि दहशतवाद यांना तोंड देत आहेत. एकमेकांना दोष देणे हा काही खरा तोडगा नव्हे. समस्या सामायिक असल्यामुळे, आपल्याला त्या सोडवण्यासाठीही सामूहिक विचार करायला हवा. आपल्याला केवळ राष्ट्रीय हितसंबंधांचाच नव्हे तर या संपूर्ण प्रदेशाच्या प्रादेशिक चौकटीमध्ये विचार करायला हवा”. २०११ मधले त्यांचे हे शब्द आता आणखी समर्पक आहेत.
बी. एम. कुट्टी आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या शांततेसाठी जीव ओतून काम करत होते आणि आहेत, तिचीच आस त्यांना मृत्यूच्या वेळीही होती. मागच्या काही वर्षांमध्ये मला प्रत्येक ईद, ख्रिसमस आणि नववर्षाला त्यांच्याकडून याच शुभेच्छांसह ईमेल मिळत असे. कुट्टी साहब आता आपल्यात नाहीत, पण या आकांक्षा अजूनही जिवंत आहेत. आणि संघर्ष चालू आहे.
बीना सरवार या वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार आहेत.
मूळ लेख
COMMENTS