आतिश तासीर यांचे ओसीआय कार्ड रद्द

आतिश तासीर यांचे ओसीआय कार्ड रद्द

पाकिस्तानी राजकीय नेते स्व.सलमान तासीर हे आतिश तासीर यांचे वडील असल्याचे सर्वश्रुत आहे.

ना विद्वत्ता, ना धोरण!
परदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण
शेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप

पत्रकार आणि लेखक आतिश तासीर यांचे भारताचे परदेशी नागरिक (OCI) कार्ड नरेंद्र मोदी सरकारने रद्द केले आहे. टाईम मासिकामध्ये पंतप्रधानांवर निवडणुकांच्या वेळी त्यांनी केलेल्या कव्हरस्टोरीमुळे हा निर्णय  घेतला गेला असण्याची शक्यता आहे.

याचा अर्थ तासीर यांना भविष्यात भारतामध्ये येण्यास बंदी घातली जाऊ शकते, असे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे.

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गुरुवारी संध्याकाळी याबाबत तीनवेळा ट्वीट करण्यात आले. “नागरिकता कायदा १९५५ अंतर्गत OCI कार्ड धारण करण्यास आतिश अली तासीर हे अपात्र ठरले आहेत. त्यांनी अगदी मूलभूत आवश्यकतांचे पालन केलेले नाही आणि माहिती दडवून ठेवली आहे,” असा या ट्वीट्सचा अर्थ होता.

ही “अगदी मूलभूत” आवश्यकता म्हणजे तासीरचे वडील पाकिस्तानी होते हे तथ्य त्यांनी दडवले असेही गृहमंत्रालयाने ट्वीट केले आहे. तासीर हे भारतीय पत्रकार तवलीन सिंग आणि पाकिस्तानी राजकीय नेते सलमान तासीर यांचा मुलगा आहेत.

तासीर यांनी ताबडतोब ट्विटरवरून आपल्यावरील हा आरोप फेटाळला. त्यांच्या इतक्या वर्षांतील लिखाणामधून त्यांचे पिता पाकिस्तानी होते ही बाब लपवण्याचा तासीर यांनी कधीच प्रयत्न केलेला नाही. एक पाकिस्तानी उदारमतवादी राजकारणी असलेल्या त्यांच्या वडिलांबद्दल तासीर यांनी आपल्या लेखांमधून व कादंबऱ्यांमदून वारंवार लिहिले आहे. त्यांची आई तवलीन यांनीही त्याबद्दल लिहिले आहे. तवलीन या भारतीय पत्रकार असून त्यांनी अनेकदा मोदी यांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे.

टाईम मासिकामध्ये तासीर यांनी मोदी यांच्याबाबत कव्हरस्टोरी केल्यानंतर गृहमंत्रालय तासीर यांचे OCI कार्ड रद्द करण्याचा विचार करत आहे असे ७ नोव्हेंबर रोजी द प्रिंटने लिहिले होते.

OCI हा एक स्थलांतरित भारतीयांसाठीचा दर्जा आहे ज्यामुळे धारकाला भारतामध्ये राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार बहाल केला जातो. खालील अटी पूर्ण करणाऱ्या कोणताही परदेशी नागरिक OCI कार्डहोल्डर म्हणून नावनोंदणी करण्यास पात्र आहे असे सरकारच्या OCI सेवेच्या अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर लिहिले आहे.

(i) २६ जानेवारी, १९५० रोजी किंवा त्यानंतर केव्हाही भारताची नागरिक असलेली व्यक्ती; किंवा

(ii) २६ जानेवारी १९५० रोजी भारताची नागरिक होण्यास पात्र होती अशी कोणतीही व्यक्ती; किंवा

(iii) १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारताचा भाग बनलेल्या प्रदेशातील व्यक्ती; किंवा

(iv) अशा नागरिकाचा मुलगा-मुलगी किंवा नातू-नात किंवा पणतू-पणती असलेली व्यक्ती; किंवा

(v) वर नमूद केलेल्या व्यक्तींचे अल्पवयीन मूल; किंवा

(vi) जी व्यक्ती अल्पवयीन मूल आहे आणि जिचे आईवडील दोघेही भारताचे नागरिक आहेत किंवा आई किंवा वडील भारताचे नागरिक आहेत ती व्यक्ती OCI कार्डधारक म्हणून नावनोंदणी करण्यासाठी पात्र आहे.

तासीर यांची आई भारतीय असल्यामुळे मुद्दा (iv) नुसार ते OCI म्हणून नावनोंदणीस पात्र आहेत. मात्र या अटींनंतर वेबसाईटवर असेही नमूद केले आहे की:

“मात्र, ज्या व्यक्तीचे आईवडील किंवा आजी आजोबा किंवा पणजी पणजोबा हे पाकिस्तान, बांगलादेश किंवा केंद्रसरकारने अधिकृत राजपत्रात सूचना दिल्यानुसार अशा अन्य देशाचे नागरिक असतील ती व्यक्ती OCI कार्डधारक म्हणून नावनोंदणी करण्यास पात्र नसेल.”

एक तांत्रिक बाब म्हणून हे तासीर यांच्या विरोधात जाऊ शकते, मात्र ही कारवाई केली जाण्याची वेळ संशय उत्पन्न करणारी आहे.

देश लोकसभेच्या निवडणुकांच्या टप्प्यात असताना ‘डिव्हायडर-इन-चीफ’ नावाच्या आपल्या टाईममधील कव्हरस्टोरीनंतर तासीर हे उजव्या गोटातील, भाजप समर्थक ट्विटर वापरकर्त्यांचे लक्ष्य बनले होते. आणि त्यांच्या विरोधातला सर्वात मोठा मुद्दा त्यांचे वडील पाकिस्तानी होते हाच होता. सलमान तासीर हे २००८ पासून २०११ पर्यंत पंजाबचे गव्हर्नर होते. २०११ मध्ये त्यांची हत्या झाली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या पेन अमेरिका या संस्थेने म्हटले आहे, “तासीर यांच्या विरोधातील कारवाई ही भारतीय सरकारवर टीका करणाऱ्या टाईम मासिकातील लेखाचा सूड म्हणून केलेली वाटते.” एका निवेदनामध्ये, पेन अमेरिकाने म्हटले आहे, एखाद्या पत्रकाराला पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे अशा प्रकारे शिक्षा केली जाणे हे चिंताजनक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0