मालदीव: बेकायदा करारांमध्ये भारतीय उद्योजकांचा सहभाग?

मालदीव: बेकायदा करारांमध्ये भारतीय उद्योजकांचा सहभाग?

मालदिवमध्ये पर्यटन विकासासाठी एक सरोवर बेकायदारित्या भाडेपट्टीने देण्याच्या प्रकरणात, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या कार्यालयातील माजी अधिकार

देवेंद्र मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री
डॉ. गेल ऑमव्हेट: नव्या युगाची दिशा
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० ने वाढ

मालदिवमध्ये पर्यटन विकासासाठी एक सरोवर बेकायदारित्या भाडेपट्टीने देण्याच्या प्रकरणात, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या कार्यालयातील माजी अधिकारी तसेच एक धनाढ्य रशियन उद्योजक गुंतलेले आहेत, असे नुकत्याच फुटलेल्या दस्तावेजातून दिसून आले आहे.

या व्हेंचरला लागणारा निधी एव्हजेनी नोवित्स्की या रशियाच्या सोल्नत्सेवो क्राइम ग्रुपच्या सदस्यांनी पुरवल्याचे दस्तावेजात दिसत आहे. हे व्हेंचर चालवण्यामध्ये पुतीन यांचे माजी सहकारी किरिल अंद्रोसोव होते, असेही यात नमूद आहे. हिंदी महासागरातील या द्विपकल्पावर रिसॉर्ट विकसित करण्याचे हक्क मिळवण्याच्या करारामागे अद्रोसोवच असावेत असा संशय आहे. यापैकी नोवित्स्की यांनी संघटित गुन्हेगारीशी कोणताही संबंध नसल्याचे सातत्याने सांगितले आहे.

ओसीसीआरपीच्या २०१८ मधील एका अन्वेषणातही मालदीव कराराची माहिती देण्यात आली होती. मालदीवमधील अतिवरिष्ठ अधिकारी (यांमध्ये माजी अध्यक्ष व उपाध्यक्षांचाही समावेश होता), कोणत्याही निविदेशिवाय, पर्यटन विकासासाठी बेटे भाडेपट्टीवर देत आहेत असे या अन्वेषणातून समोर आले होते. मात्र, त्यावेळी यात रशियन संबंध दिसून आलेला नव्हता. हा घोटाळा सुमारे ८० दशलक्ष डॉलर्सचा होता.

ओसीसीआरपीला असे दिसून आले होते की, मालदीवमधील साउथ माले बेटातील हे सरोवर डेपेझार सर्व्हिसेस लिमिटेड या ब्रिटिश कंपनीला २.५ दशलक्ष डॉलर्सना बेकायदारित्या भाड्याने देण्यात आले. या कंपनीची ५० टक्के मालकी दोन टर्किश उद्योजकांकडे आहे. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज तुफान अयटेकिन गुल्टेकिन आणि रिक्सोस हॉटेल चेनचे फेटा टॅमिन्स हे ते दोन उदयोजक. आता वेळ आली आहे ती उर्वरित ५० टक्क्यांचे मालक जाणून घेण्याची.

आता पँण्डोरा पेपर्समधील दस्तावेजांवरून असे दिसते की, डेपेझारच्या अर्ध्या हिश्श्याची मालकी लँग कॅपिटल फंड या सिंगापोरस्थित खासगी इक्विटी फंडाकडे आहे. या फंडाचे वित्तपुरवठादार नोवित्स्की आहेत व ती अंद्रोसोव चालवतात.

हा नवीन खुलासा आशियासिटी ट्रस्टच्या फाइल्समधून झाला आहे. आशियासिटी ट्रस्टसह १४ ऑफशोअर सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे फुटलेले दस्तावेज इंटरनॅशनल कंझोर्टिअल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्सला (आयसीआयजे) प्राप्त झाले आहेत. आयसीआयजेमध्ये जगभरातील ६०० पत्रकारांचा समावेश आहे. यात ओसीसीआरपीचे पत्रकारही आहेत.

आशियासिटीच्या फाइल्सनुसार, जेव्हा नोवित्स्की यांनी लँग कॅपिटला वित्तपुरवठा केला, तेव्हा त्यांनी हा पैसा अंड्रोसोव आणि आणखी एका पार्टनरने दिल्याचे आशियासिटीला सुरुवातीला सांगितले. अनेक वर्षांनंतर आशियासिटीच्या बोर्डाला असा संशय आला की, खरे लाभधारक अंद्रोसोव आणि त्यांचा पार्टनर नाहीच आहेत. नोवित्स्की खरे तर लँग कॅपिटलचे “नियंत्रक” आहेत या निष्कर्षाप्रत कंपनी एप्रिल २०१९मध्ये आली आणि या फंडाला त्यांनी क्लाएंटच्या यादीतून वगळले. नोवित्स्की संघटित गुन्हेगारीशी संबंधित आहेत असा आरोप होत असल्याची माहिती आशियासिटीला निदान २०१५ सालापासून होती पण एका माजी स्विस बँकरच्या शिफारशीमुळे त्यांनी नोवित्स्की यांच्याशी संबंध कायम ठेवले.

मालदीवच्या साउथ माले बेटावरील सरोवरात केलेली गुंतवणूक ही लँग कॅपिटलच्या अनेक गुंतवणुकींपैकी एक होती. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या यादीत हा प्रकल्प अद्याप दिसत असला, तरी या स्थळावर कोणतेही बांधकाम झाले नसल्याचे उपग्रह छायाचित्रांवरून स्पष्ट होते. ओसीसीआरपीच्या २०१८ सालातील अन्वेषणात असे आढळले होते की, या भाडेपट्टीसाठी भरण्यात आलेले २.५ दशलक्ष डॉलर्स मालदीवमधील अधिकाऱ्यांच्या खिशात गेले.

लँग कॅपिटल फंडाचे आता मालदीवमधील प्रकल्पाशी देणेघेणे नाही. २०१७मध्ये फंडाने डेपेझारमधील आपला ५० टक्के हिस्सा गुल्टेकिन यांच्या कन्स्ट्रक्शन फर्मला केवळ ४ दशलक्ष डॉलर्सना विकला. या कराराचे हमीदाता रिक्सॉसचे संस्थापक टॅमिन्स होते.

नोवित्स्की लँग कॅपिटलमागे असल्याचे अंद्रोसोव यांनी ओसीसीआरपीला पाठवलेल्या मेल्सद्वारे साफ नाकारले आहे. २०१६ सालापासून लँग कॅपिटल फंडाचा एकमेव यूबीओ/मालक व गुंतवणूकदार म्हणून आपण हे जाहीर करत असल्याचे त्यांनी नमूद आहे. त्याबरोबरच नोवित्स्की यांचा संघटित गुन्हेगारीशी असलेला संबंधही कधीच सिद्ध झालेला नाही, असेही त्यांनी मेलमध्ये म्हटले आहे.

यासंदर्भात बोलण्याची विनंती केली असता, नोवित्स्की यांनी उत्तर दिले नाही. टॅमिन्स व गुल्टेकिन यांनीही प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.

ओसीसीआरपीने विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल आशियासिटीने एक ईमेल पाठवला. यामध्ये पँडोरा पेपर स्टोरीजच्या पहिल्या फेरीनंतर वेबसाइटवर प्रसिद्ध केलेले निवेदन या मेलमध्ये होते.

“आयसीआयजे आणि त्यांच्या सहयोगींचे माध्यमांतील वार्तांकन मुख्यत: बेकायदारितीने संपादित माहितीवर आधारित आहे आणि त्यात असंख्य त्रुटी आहेत, तसेच महत्त्वाचे तपशील दिलेले नाहीत. अनेक प्रकरणांत प्रसिद्ध झालेले वृत्तांत सर्व तथ्यांचे किंवा विशिष्ट परिस्थितीचे प्रतिनिधित्व करत नाहीत.”

“याची परिणती म्हणून आशियासिटी ट्रस्टबद्दल अनेक दिशाभूल करणारे निष्कर्ष काढले गेले आहेत. आम्ही वैधानिक गोपनीयता कायद्यांना बांधील आहोत आणि त्यामुळे विशिष्ट प्रकरणांवर टिप्पणी करू शकत नाही. याची माहिती आयसीआयजे आणि सहयोगींमा आम्ही दिली आहे.”

अविनाश भोसले आणि मालदीवच्या अध्यक्षांना लाच देण्याचे प्रकरण

पँडोरा पेपर्सद्वारे फुटलेल्या माहितीनुसार, एका भारतीय उद्योजकाने भारतातील एका शक्तिशाली प्रॉपर्टी डेव्हलपरशी हातमिळवणी केली आणि अशाच आणखी एका बेकायदा बेट करारामध्ये मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना लाच देण्यामागे हे दोघेच होते.

यामीन २०१८मध्ये सत्तेवरून दूर गेले आणि पुढील वर्षी त्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आले पण त्यांच्यावर आणखी काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेतच.

फुगिरी बेट सप्टेंबर २०१५मध्ये कोणतीही निविदा न काढता, १.५५ दशलक्ष डॉलर्सना, क्लासिक सिटी आयलंड होल्डिंग्ज लिमिटेड या दुबईस्थित कंपनीला, भाडेपट्टीने देण्यात आले. हा करार नंतर स्वायत्त लेखापरीक्षकांनी संशयास्पद ठरवला. वार्ताहरांनी प्राप्त केलेल्या कागदपत्रांवरून असे लक्षात आले की, क्लासिक सिटीमध्ये पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची भागीदारी आहे. याशिवाय लॉजिस्टिक्समध्ये काम करणारे आणखी एक उद्योजक अमितकुमार गांधी यांचीही यात भागीदारी आहे. भोसले यांच्याकडे ५० टक्के मालकी असून, त्यांनी या व्हेंचरमध्ये ८.५ दशलक्ष डॉलर्सहून अधिक रक्कम गुंतवली असल्याचे नोंदींमध्ये दिसत आहे.

भोसले कुटुंबाने भारतभरातील लग्झरी हॉटेल्समध्ये गुंतवणुका केलेल्या असून, व्हाइट हाउसच्या धर्तीवर बांधलेल्या भव्य प्रासादात हे कुटुंब राहते. या घराचे नाव अविनाश भोसले पॅलेस असे आहे. २०१८ मध्ये त्यांनी लंडनच्या ट्रफल्गर स्क्वेअरवर सुमारे १००  दशलक्ष पाउंड्सना (१३३ दशलक्ष डॉलर्स)  एक इमारत, पुढे तिचे रूपांतर पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्याच्या दृष्टीने, खरेदी केल्याचे वृत्त आहे.

भारतातील परकीय चलन कायद्यांच्या उल्लंघनाच्या तसेच दुबईतील गुंतवणुकांद्वारे काळा पैसा पांढरा केल्याच्या अनेक प्रकरणांत भारतीय प्राधिकरणांनी अविनाश व अमित भोसले दोहोंची चौकशी केली आहे.

यामीन यांच्या कार्यकाळात मालदीवमध्ये असंख्य बेकायदा बेट भाडेपट्टी करार झाले. त्यातील मोजक्या घोटाळ्यांमध्ये माजी अध्यक्षांचे थेट नाव आहे. फुगिरी भाडेकरार हा अशा मोजक्या घोटाळ्यांपैकी एक आहे. यामीन यांना फुगिरी भाडेकरारामध्ये १.१ दशलक्ष डॉलर्सची लाच मिळाल्याचा आरोप मालदीवमधील सरकारी वकिलांनी (प्रॉसिक्युटर्स) ठेवला आहे. ही रक्कम निनावी ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स कंपनी, एअँडए होल्डिंग्ज ग्रुप यांनी यामीन यांच्या एका माणसाला दिली असे समजते.  एअँडए होल्डिंग्ज ग्रुप हा प्रत्यक्षात अमितकुमार गांधी आणि त्यांचे भाऊ अविनाशकुमार गांधी यांचाच आहे, असे पँडोरा पेपर्स फाइल्समधून समोर आले आहे.

गांधी आणि भोसले यांच्यापैकी कोणीही मेलद्वारे पाठवलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. यामीन यांना प्रतिक्रियेसाठी विनंती केली असता, त्यांनीही उत्तर दिले नाही.

हा लेख यापूर्वी ऑर्गनाइझ्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट अर्थात ओसीसीआरपीवर प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या परवानगीने तो येथे प्रसिद्ध करत आहोत.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0