पंतप्रधानांचा वारसा

पंतप्रधानांचा वारसा

त्यांचा पराकोटीचा अहंभाव !

‘लैला’ : शरणागतांची कैफियत
काँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक
काश्मीरमधील ऐतिहासिक भूसुधारणा कायदा मोडीत

आपल्या सर्व पंतप्रधानांनी स्वतःचा स्वतंत्र असा एक वारसा मागे ठेवलेला आहे. यातील बहुतेकांचा वारसा मिश्र स्वरूपाचा आहे आणि कदाचित त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप वेगळादेखील.
जवाहरलाल नेहरू ओळखले जातात ते त्यांच्या विज्ञान आणि धर्मनिरपेक्षतेवरील निष्ठेसाठी आणि काश्मीर प्रश्नासाठी. १९६२ मधील भारत-चीन युद्धातील पराभवासाठी त्यांना जबाबदार धरले जाते.
लालबहादूर शास्त्री ओळखले जातात ते  १९६५च्या भारत पाकिस्तानमधील विजयी युद्धासाठी, त्यांनी दिलेल्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेसाठी, आणि ताशकंदमध्ये झालेल्या संशयास्पद मृत्यूसाठी.
इंदिरा गांधींना त्यांच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेसाठी, गरीबांच्या बाजूने असलेल्या राजकारणासाठी, अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीसाठी, आणि अर्थातच आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लूस्टारसाठी ओळखले जाते.
भारतात संगणकाचा प्रवेश, दूरसंचार क्षेत्रातील क्रांती आणि बोफोर्स घोटाळा ही राजीव गांधींची ओळख आहे.
आर्थिक उदारीकरणाच्या काळात देशाचं नेतृत्व करणारे परंतु बाबरी मशीद विध्वंसाची घटना रोखण्यासाठी पुरेशी कार्यवाही न करणारे म्हणून पी.व्ही. नरसिंह राव ओळखले जातात.
तेरा घटक पक्षांना एकत्र घेवून चालवलेला राज्यकारभार, पोखरणच्या अणुचाचण्या आणि ‘इंडिया शायनिंग’ च्या पार्श्वभूमीवरदेखील भाजपचा झालेला पराभव या अटल बिहारी वाजपेयींची आठवणी.
भारताच्या उच्चविद्याविभूषित पंतप्रधानांपैकी एक असलेले, भारताच्या विकास दराचा दोन अंकी आकडा ज्यांच्या कारकिर्दीत गाठला गेला ते मनमोहन सिंग; युपीएच्या (संपुआ) दुसऱ्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराची लाट थोपवण्यात अपयशी ठरले.
नरेंद्र मोदी कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जातील?
पंतप्रधान म्हणून त्यांची पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण होत असताना मोदींविषयीचे मत विभागलेले आहे. ‘जगाच्या नकाशावर भारताला ओळख मिळवून दिल्याचे’ श्रेय त्यांचे चाहते त्यांना देतील. उघडपणे नसले तरी दबक्या आवाजात ‘मुस्लिमांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे आणि हिंदूंचा स्वाभिमान पुन्हा जागृत केल्याचेही’ श्रेय त्यांना दिले जाईल.
त्यांची जगभ्रमंती आणि धार्मिक भावनांचा उन्माद रोखण्यात आलेले अपयश हे त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेतील महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याशिवाय नोटबंदी आणि वस्तू व सेवा कराची अकार्यक्षम अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान, आणि लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाच्या संस्थांचे होणारे खच्चीकरण यासाठीही त्यांना जबाबदार धरले जात आहे.
नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक, आणि आपल्या सोयीनुसार तथ्यांची मांडणी करणे हेच ज्यांचे काम आहे असे पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री वगळता नरेंद्र मोदींनी सत्तेवर येताना दिलेली आश्वासने पूर्ण केली यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या बोटावर मोजावी इतकीच आहे. वर्षभरात कोट्यवधी तरुणांना रोजगार, भ्रष्टाचाराचा अंत, उत्पादनक्षम देश म्हणून भारताची ओळख निर्माण करणे, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती रोखणे आणि एकूणच  सर्वांसाठी अच्छे दिन अशी ही आश्वासने होती.
मात्र ज्याकरिता नरेंद्र मोदी सर्वाधिक लक्षात राहतील ती आहे त्यांचा अहंभाव!
२०१४ च्या निवडणूक प्रचारातच ५६ इंच छातीच्या उल्लेखातून त्यांच्या अहंभावाचे पहिले दर्शन भारतीयांना घडले. (आमच्या माहितीनुसार आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानाने सार्वजनिकरित्या आपल्या शरीराबद्दल अशी विधाने केलेली नव्हती.)
नंतर दिसून आले ते त्यांचे सेल्फीप्रेम आणि छायाचित्रप्रेम. आपली उत्तम छबी टिपली जावी यासाठी सुरक्षारक्षकच नव्हे तर साक्षात मार्क झुकरबर्कलाही बाजूला हटवणाऱ्या नरेंद्र मोदींचे व्हिडीओ सर्वदूर पसरले. एका कुशल छायाचित्रकाराने त्यांच्या दहा लाख रुपये किंमतीच्या कोटावर कोरलेले त्यांचे नाव कॅमेऱ्यात टिपले आणि पंतप्रधान स्वप्रतिमेसाठी कोणत्या टोकाला जाऊ शकतात याची आपल्याला कल्पना आली.
सरकारने सुरु केलेल्या बहुतांश योजनांच्या नावाआधी  येणाऱ्या पंतप्रधान या उल्लेखातून हेच अधोरेखित झालेले आहे. उदा. पंतप्रधान पीक विमा योजना, पंतप्रधान घरकुल योजना, पंतप्रधान कौशल्य विकास योजना, पंतप्रधान जन धन योजना, पंतप्रधान उज्वला योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना इ.
जसजशी वर्षे गेली तसतसा सर्वत्र झळकत असलेला पंतप्रधानांचा चेहरा सामान्य नागरिकांच्या दृष्टीस पडू लागला. कार्यालये, दिनदर्शिका, पेट्रोल पंप, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, अगदी सगळीकडे. आपले राजकीय वर्चस्व आणि ऐतिहासिक वारसा यांचे दर्शन घडवण्यासाठी चलन अथवा स्तंभ यांवर आपल्या प्रतिमा कोरणारे राज्यकर्ते ही बाब काही नवीन नाही. परंतु  २०१४ ते २०१९ या काळात भाजप सरकारइतका आपल्या नेत्याच्या जाहिरातींसाठी प्रचंड खर्च करणारे सरकार शोधून सापडणार नाही.
स्वतःमध्ये रममाण झालेल्या आणि इतरांबद्दल फारसे भान नसणाऱ्या व्यक्तीला मानसशास्त्रज्ञ आत्मकेंद्री (इगोटिस्ट) म्हणून संबोधतात. इथे आत्मकेंद्री म्हणजे अहंमन्यता, आत्मकेंद्रित महत्वाकांक्षा आणि स्वतःला अतिरेकी महत्व देणे या गोष्टींचा संदर्भ आहे. या आत्मकेंद्री वृत्तीची तुलना दारूच्या व्यसनाशी केली जाते. दोन्ही गोष्टींचे माणसाला व्यसन लागते आणि शेवटी हे व्यसनच त्या माणसाला वास्तवापासून तोडून टाकते.हेरॉल्ड गेनन यांनी मात्र या दोन्हीतला फरक स्पष्ट करून सांगितलेला आहे.
“आत्मकेंद्री मनुष्याचा कधीही तोल जात नाही, तो त्याच्या वस्तूंची आदळआपट करत नाही किंवा असंबद्ध बोलतही नाही. उलट तो अधिकाधिक उद्धट होत जातो. त्याच्या अशा वागण्यामागचे कारण माहित नसल्याने अनेकजण त्याच्या या वागण्याला आत्मविश्वास अथवा ताकदीची जाणीव समजण्याची चूक करतात.”
देशाच्या नेत्याची आत्मकेंद्री वृत्ती त्याच्यातल्या मुत्सद्दीपणाला घातक ठरू शकते. इतरांच्या मताला त्यांच्या दृष्टीने काहीही किंमत नसल्यामुळे त्यांना सर्वांसोबत एकत्र काम करणे कठीण जाते.  अनुभवी लोकांकडून अभिप्राय, सूचना स्वीकारणे त्यांना जड जात असल्याने असे लोक एकतर्फी निर्णय घेऊन मोकळे होतात. स्वतःमध्येच गुंतून पडल्यामुळे समोरच्या बाजूचा विचार करणे त्यांना अशक्य होऊन बसते. आपल्या विरोधकांकडे ते केवळ शत्रुत्वाच्या भावनेतूनच पाहतात.
आपल्या चुका कबूल करणे अथवा आपल्यातील कच्चे दुवे स्वीकारणे त्यांना शक्यच होत नाही. आपले अज्ञान किंवा आपला खोटेपणा उघडा पडेल या शंकेने ते पछाडलेले असतात. दुर्दैवाची गोष्ट अशी की या नेत्यांनी वेळोवेळी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम देशाला भोगावे लागतात.
नोटबंदीबाबत अनेक तज्ज्ञांनी इशारा देऊनही मोदींनी देशाला वेठीस का धरले? वस्तू आणि सेवा कर इतक्या घाईगडबडीने का अंमलात आणला गेला? समर्थक सल्लागारांच्या आपापसातल्या कंपूत स्वतःला राखणे मोदींनी का पसंत केले? एकेक घटक पक्ष त्यांना सोडचिट्ठी का देत आहे? मित्र देशांशी असलेले राजनैतिक संबंध का बिघडले? अनेकजणांकडून इशारे मिळत असूनही आपल्या अहंकारापोटी त्यांनी त्याकडे डोळेझाक केली असेल का?
सर्व समस्यांवर उत्तरे असणारा बलाढ्य नेता ही संकल्पना म्हणजे निव्वळ आभास आहे. हे गेल्या पाच वर्षात स्पष्ट झालेले आहे. एकविसावे शतक हे गुंतागुंतीचे आहे. त्यातून पुढे जाताना अहंमन्य, स्वतःमध्ये रममाण झालेल्या आणि स्वतःचेच गोडवे गाणाऱ्या नव्हे तर ऐकून घेण्याची, शिकण्याची तयारी असणाऱ्या, परस्पर सहकार्याने काम करू शकणाऱ्या, समजूतदार आणि धाडसी निर्णय घेणाऱ्या नेत्याची गरज आहे.

(रोहित कुमार, हे शिक्षक असून सकारात्मक मानसशास्त्र हा त्यांचा विषय आहे. शाळांमधील वातावरण भीतिमुक्त राहावे यासाठी ते माध्यमिक शाळांतील मुलांसोबत पौगंडावस्थेतील प्रश्नांबाबत ते काम करतात.)

हा लेख मूळ इंग्रजी लेखाचाअनुवाद आहे.

अनुवाद : ऋजुता खरे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: