पवार पॉवर !

पवार पॉवर !

सत्ताधारी पक्षाला विजयात पराभव वाटावा आणि विरोधी पक्षांना पराभवात विजय वाटावा अशा प्रकारचा अद्भुत असा हा विधानसभा निकाल आहे. असा निकाल येण्यास कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत हे पवार विरोधकांनाही मान्य करण्यास भाग पाडणारे निवडणूक निकाल आहेत. अर्थात असा निकाल लागण्यास भाजपचा अहंकारही तितकाच कारणीभूत आहे.

‘राज्य निवडणूक आयोगाचे काम भाजपच्या आयटी सेलकडे’
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर!)
आकड्या पलिकडचा विजय !

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल सत्तारूढ भारतीय जनता पार्टीसाठी अनपेक्षित आणि धक्कादायक आहेत. महाराष्ट्रात आम्हीच नंबर वन असे उसने अवसान आणून भाजप नेतृत्व त्यांच्यासाठी निराशाजनक ठरलेल्या  निवडणूक निकालावर पांघरून घालेलही पण खालपासून वरपर्यंत कार्यकर्ते आणि नेते यांना निराशा लपवणे अवघड जाणार आहे. मैदानात आमच्या समोर लढायला कोणी नाही हे काही निवडणूक मैदान गाजविणारे वाक्य नव्हते. नेतृत्वाचा तसा ठाम विश्वास होता. शिवसेना किंवा इतर मित्रपक्ष सोबत आले नाही तरी आपण एकहाती निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाला होता. हा विश्वास वाटावा असे वातावरणही निवडणुकीपूर्वी तयार झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते पराभवाच्या भीतीने म्हणा की ईडी – सीबीआयच्या भीतीने म्हणा भाजपच्या आश्रयाला गेली होती. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची धूळधाण होणार असे वातावरण तयार करण्यात भाजप नेतृत्वाला यश आले होते. भाजप विरोधकांना तर मोजत नव्हताच पण मित्रपक्षांनाही त्यांची जागा दाखविण्याची भाजपची मानसिकता पक्की झाली होती.

मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीचा अनुभव होता. लोकसभेतील यश भाजप नेतृत्वामुळे मिळाले होते. त्यामुळे विधानसभेत भाजपाला सोडून निवडणूक लढविण्याची तयारी आणि हिम्मत मित्रपक्षात नव्हती. हे हेरूनच भाजपने मनमानी करत, अपमानास्पद वागणूक देत मित्रपक्षांना सोबत घेतले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा दारुण अनुभव शिवसेनेच्या पदरी असल्याने भाजप देईल तेवढ्या जागेवर समाधान मानत शिवसेनेने तडजोड केली. बाकी मित्रपक्षांचे स्वतंत्र अस्तित्वच अमान्य करत त्यांना आपल्याच निवडणूक चिन्हावर निवडणूक लढायला भाग पाडले. भाजपचा आत्मविश्वास आणि अहंकार आकाशाला भिडल्याची ही लक्षणे निवडणुकीपूर्वी सर्वानाच स्पष्ट दिसत होती. मित्रपक्षांना सोबत घेऊन उपकार करत आहोत, सरकार तर स्वबळावर बनवू शकतो ही भाजपची निवडणुकीपूर्वीची धारणा होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाकडे पाहावे लागेल.

निवडणुक निकालाने भाजपच्या या अहंकार आणि आत्मविश्वासाला जबर धक्के बसून तडे गेले आहेत. भाजप महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष आहे आणि शिवसेनेपेक्षा भाजपने कितीतरी अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजप देईल तेवढ्या जागा निमूटपणे घेणाऱ्या शिवसेनेने भाजप स्वबळावर सरकार बनविण्यापासून मैलोगणती दूर आहे हे निवडणूक निकालातून स्पष्ट होताच सत्तेत अर्धा वाटा मागितला आहे. निवडणुकीपूर्वी फक्त उपमुख्यमंत्री पदाकडे आशाळभूत नजरेने पाहणाऱ्या शिवसेनेची निकालाचे कल बघताच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर नजर खिळली आहे. भाजपपेक्षा जवळपास ४० जागा कमी असूनही शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचे चालविलेले प्रयत्नच या निवडणुकीने भाजपची स्थिती कमकुवत केल्याचे दर्शविते. स्वबळावर सरकार बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला साधनसंपत्ती आणि विरोधी पक्षातून खेचलेले मजबूत उमेदवार याची साथ असूनही गेल्या वर्षी इतक्या जागाही मिळविता आल्या नाहीत. त्या तुलनेत कमी जागा लढूनही शिवसेनेने आपली आधीची स्थिती जवळपास कायम ठेवली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यात झालेल्या अधिक सभा आणि या सभांतून कलम ३७० चा मांडलेला मध्यवर्ती मुद्दा, विरोधकांचे पाकिस्तानशी साटेलोटे दाखविण्याचा नेहमीचा हातखंडा वापरूनही भाजपला गेल्या निवडणुकीइतकेही जनसमर्थन आणि जागा मिळविता आलेल्या नाहीत. त्यामुळे सरकार बनविण्याच्या स्थितीत असूनही पक्षाची आणि पक्ष नेतृत्वाची मानसिकता पराभव झाल्याची बनली आहे.

सत्ताधारी पक्षाला विजयात पराभव वाटावा आणि विरोधी पक्षांना पराभवात विजय वाटावा अशा प्रकारचा अद्भुत असा हा विधानसभा निकाल आहे. असा निकाल येण्यास कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत हे पवार विरोधकांनाही मान्य करण्यास भाग पाडणारे निवडणूक निकाल आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सत्ताधारी आघाडीने काँग्रेस पेक्षाही अधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे लचके तोडून त्या पक्षाला मरणासन्न अवस्थेत सोडले होते. या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसून हा पक्ष संपणार याची चर्चा सत्ताधारी आघाडीने राज्यभर निवडणूक सभांतून केली होती. अशा निराशाजनक आणि विपरीत परिस्थितीत शरद पवारांनी निवडणुकीचे सूत्र आपल्या हाती घेतले. सत्ताधारी आघाडीला आव्हान देणारा नेता म्हणून पुढे येण्यास शरद पवारांचे पूर्वीचे वलय उपयोगी पडले. काँग्रेस सत्ताधारी आघाडीला विरोध करण्याच्या अवस्थेत दिसत नसल्याने साहजिकच सत्ताधारी आघाडीला आव्हान देणारा एकमेव नेता म्हणून शरद पवार समोर आले आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभले. शरद पवारांच्या आव्हानाने निवडणुकीच्या आधीचे वातावरण निवडणूक प्रचारादरम्यान बदलले आणि त्याचा परिणाम निवडणूक निकालातून स्पष्टपणे दिसून आला आहे.

शरद पवारांची लढत एकाकी होती. निवडणूक निकाल बघता शरद पवारांना इतर विरोधी नेत्यांची विशेषतः काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रचारात सक्रिय साथ मिळाली असती तर हे चित्र आणखी बदलले असते असा निष्कर्ष काढण्यासारखी परिस्थिती आहे. काँग्रेसचे राज्य नेतृत्व स्वत:ची जागा कशी राखता येईल या विवंचनेत असताना आणि  जीवावर आल्या सारखा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने या निवडणुकीत केलेला प्रचार या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मिळालेल्या जागा खूप जास्त आहेत. विजयाचे सोडा पण निवडणूक लढविण्याचे कोणतेही नियोजन राज्य आणि केंद्र पातळीवर काँग्रेसने केलेले नव्हते. न लढता पराभव स्वीकारण्याची काँग्रेस नेतृत्वाची मानसिकता स्पष्ट दिसत असतांनाही काँग्रेसला राज्यात मिळालेले समर्थन तोंडात बोट घालावे असेच आहे. याचे एक कारण शरद पवारांनी लढाऊ बाणा दाखवून निर्माण केलेले वातावरण हे आहेच. पण नेतृत्व कचखाऊ असले तरी काँग्रेसचा मतदार अजूनही काँग्रेसच्या बाजूने उभा राहायला तयार आहे आणि आपलाच पक्ष भाजपचा मुकाबला करू शकतो हा त्याचा विश्वास अजूनही कायम आहे हे या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. म्हटले तर काँग्रेस नेतृत्वाला ही चपराक आहे आणि म्हटले तर नेतृत्वात आशा आणि विश्वास निर्माण करणारी ही  निवडणूक आहे.

एकमात्र खरे काँग्रेसच्या कचखाऊ नेतृत्वाने महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलण्याची संधी गमावली. वंचित आघाडी महाआघाडीत सामील असती तर महाराष्ट्राचे राजकीय चित्र काय राहिले असते याची आगामी काही काळ चर्चा रंगेल. वंचित आघाडीला दोषही दिला जाईल. पण त्यात फारसे तथ्य नाही. प्रत्येकाला आपल्या पक्षाची रणनीती  आणि त्याप्रमाणे कार्य करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. एकमात्र खरे विरोधीपक्ष वेगळे आणि विस्कळीत असण्याचा लाभ महाराष्ट्रात सत्ताधारी युतीला मिळाला आहे..

सत्ताधारी युतीला सत्ता पुन्हा मिळाली तरी सत्ता एककल्ली पद्धतीने भाजपला राबविता येणार  नाही हे निवडणुकीनंतरचे चित्र बदलविण्याचा प्रयत्न आगामी काळात भाजपकडून होईल हे पक्षाने इतर ठिकाणी काय केले यावरून अनुमान काढता येईल. शिवसेनेने सत्तेत मागितलेला अर्धा वाटा देण्याची भाजपची तयारी नाही. शिवसेनेची सौदा शक्ती कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मोठ्या संख्येने निवडून आलेले अपक्ष आमदार  साम, दाम, दंड, भेद वापरून आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. अशा प्रकारच्या नीतीचा या निवडणुकीत फटका बसला हे विसरून भाजप नव्याने हा खेळ महाराष्ट्रात करणार आणि त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण आगामी काळात आणखी कलुषित होऊ शकते.

मात्र या निवडणुकीतील सर्वात विधायक बाब म्हणजे संधीसाधू आयाराम गयारामाना मतदारांनी शिकविलेला धडा. निवडणूक लढण्यासाठी ऐनवेळी पक्ष बदलणाऱ्या अर्ध्यापेक्षा अधिक पक्षबदलूंना मतदारांनी पराभूत केले आहे. आगामी काही काळ तरी याचा प्रभाव राजकीय नेत्यांवर असणार आहे. पक्ष बदलताना त्यांना आजच्या इतका निर्लज्जपणा भविष्यात दाखविता येणार नाही हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीने सुनिश्चित केले आहे. जय-पराजयापेक्षा ही बाब जास्त मोलाची आणि महत्वाची आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0