पिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस

पिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस

नवी दिल्लीः पिगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून विरोधी पक्षांचे नेते, न्याययंत्रणेतील न्यायाधीश व कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, सरकारी संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी यांच्यावर पाळत ठेवण्याच्या प्रकरणावर गुरुवारी विरोधी पक्ष आक्रमक झाले. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या हेरगिरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातर्फे चौकशी करावी अशी मागणी करत संसदेच्या परिसरात निदर्शने केली.

हेरगिरी बंद करा, पंतप्रधान सदनात या, अशी मागणी करणार्या घोषणा काँग्रेसच्या खासदारांनी केल्या. काही विरोधी पक्षांच्या हातात, सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी करू द्यावी, अशा मागणीचे फलक होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हे हेरगिरी प्रकरण म्हणजे देशद्रोह असल्याचा थेट आरोप सरकारवर केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी राजीनामाच द्यायला पाहिजे व या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.

पिगॅससचा उपयोग भारत देश व या देशातील संस्थांच्या विरोधात केला जात असून जनतेवर हे एक प्रकारचे आक्रमण असल्याचा आरोप त्यांनी केला. पिगॅसस दहशतवादी व गुन्हेगारांविरोधात वापरले जाते पण आपल्याकडे आपले पंतप्रधान व गृहमंत्रीच भारतातील संस्था व लोकशाहीविरोधात ते वापरत असून माझा फोन टॅप केला जात आहे. हा माझा खासगी मामला नाही पण मी विरोधी पक्षाचा एक नेता असून जनतेचा आवाज मी उठवत आहे, हे एकप्रकारे जनतेवर आक्रमण असल्याची टीका त्यांनी केली.

मूळ बातमी

COMMENTS