टोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा

टोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा

जगाला हादरवणार्या विषाणूविरुद्ध लढण्याची ईर्षा, जिद्द, विश्वास देणारी ही क्रीडाज्योत या पुढील १७ दिवस टोकियो शहरात सतत धगधगत राहणार आहे. दोनशेहून अधिक देशांच्या क्रीडापटूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठीचा आत्मविश्वास देणार आहे.

मंत्र्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश द्यावेतः हायकोर्टात मागणी
भारतात कोरोनाचे २ रुग्ण, जगभरात ८८ हजारांना लागण
‘गोदी मीडिया’ची ‘हायपोडेर्मिक नीडल थेरपी’

खरंच, दाद जपानला, टोकियोला द्यायला हवी. संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात असताना ‘टोकियो-2021’ ऑलिम्पिकने नवा विश्वास, हुरुप, उत्साह दिला. ऑलिम्पिया ग्रीसमधून निघालेली क्रीडाज्योत पंचखंडांचा विश्वास घेऊन आता टोकियोमध्ये अवतरली आहे. त्या छोट्या क्रीडाज्योतीचे रुपांतर नव्याने उभारण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्टेडियममधील महाकाय अशा क्रीडाज्योतीत झाले. जगभरातील प्रवास करून आलेला आशेचा किरण प्रज्वलित झाला. जगाला हादरवणार्या विषाणूविरुद्ध लढण्याची ईर्षा, जिद्द, विश्वास देणारी ही क्रीडाज्योत या पुढील १७ दिवस टोकियो शहरात सतत धगधगत राहणार आहे. दोनशेहून अधिक देशांच्या क्रीडापटूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठीचा आत्मविश्वास देणार आहे.

प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत उतरणार्या जगातील सुमारे दीडशे देशांना एकही पदक मिळत नाही. मात्र शुक्रवारच्या उद्घाटन सोहोळ्यातील प्रत्येकाचा आवेश आणि आविर्भाव पाहिला की ते येथून पदके लुटून नेणार आहेत असे वाटायला लागते. स्वप्नपूर्ती न होणारा तो विश्वास त्या सर्वांना तमाम विश्व एकत्र येण्याच्या भावनेने मिळवून दिला. जवळ जवळ गेली दोन वर्षे आपल्या विश्वाचेच आरोग्य बिघडले आहे. त्या वातावरणातही सराव करण्याची चिकाटी या २०० पेक्षा अधिक देशांच्या खेळाडूंनी दाखवलेली आहे. त्या पैकी बहुतांशी खेळाडूंना आपल्या हाती पदक लागणार नाही हे ठाऊक आहे. तरीही त्यांच्या सरावाला, मेहनतीला प्रयत्नांना दाद दिलीच पाहिजे.

ऑलिम्पिक चळवळीचे तेच तर बोधचिन्ह आहे. वेगवान, बलवान आणि अधिकाधिक उंचीवर क्रीडाक्षेत्र नेणार्या ऑलिम्पिक चळवळीच्या या ब्रीदवाक्यात आज ‘टुगेदर’ हा एकत्र येण्याचा नवा विचारही सामील झाला.

कोरोना महासाथीमुळे एक वर्षांसाठी क्रीडास्पर्धांपुढे ढकलल्यानंतरही जपानच्या टोकियो शहराच्या पाठचे दुष्टचक्र काही थांबले नाही. अलिकडच्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन करण्यासाठी ४-५ देशांमध्ये स्पर्धा, चढाओढ लागते. ऑलिम्पिक आयोजनामुळे होणारा प्रचंड आर्थिक लाभ, देशाची उंचावणारी अर्थव्यवस्था, विविध उद्योगांना मिळणारे बळ हे प्रमुख कारण होते. कोरोनामुळे यावेळी फायदा नाहीच पण झालाच तर तोटा होणार आहे. रोग पसरवण्याची भीती आहेच. अशा वातावरणातही जपानने, टोकियोने वर्षाने पुढे ढकलण्यात आलेल्या स्पर्धा भरवण्याचे धाडस दाखवले. अतिशय भित्र्या स्वभावाच्या जपानी लोकांनी विरोध करूनही टोकियोने संपूर्ण जगाला, निमंत्रित केले. त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या स्पर्धा भरवल्या. विषाणू पसरवण्याचा धोका पत्करला. भाषेची मर्यादा, तज्ज्ञ स्वयंसेवकांचा तुटवडा असूनही स्पर्धा भरवली.

सर्वच आघाड्यांवर आव्हाने आहेत. घरचे आहेर दररोज मिळताहेत. जपानच्या राजघराण्याने, राणीनेही जनता घरात असताना मी कशाला येऊ म्हणत, उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. सहभागी खेळाडू, अधिकारी, पत्रकारांच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तरीही टोकियोने हे शिवधनुष्य उचललेले आहे.

या आधीच्या ऑलिम्पिकपेक्षा ३२ वे ऑलिम्पिक वेगळे असेल. शास्त्रज्ञांना, तज्ज्ञांनाही न गवसलेल्या शत्रूविरुद्धचा लढा हे ऑलिम्पिक लढतंय. कुणाला किती पदके मिळाली याची गणती जगाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही. दोन वर्षांत २०० देशांच्या हजारो व्यक्तींना एकत्र आणण्याचे निमित्त ठरलेल्या या चळवळीचे यावेळचे यशापयश जगाला आजमावयचे आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान, निग्रह, शिस्तीपुढे मानवाची इच्छाशक्ती जिंकते का ते पाहायचे आहे. प्राचीन-अर्वाचीन ऑलिम्पिकने मानवामध्ये वेग, शक्ती, सामर्थ्याच्या परिसीमा उंचावण्याचे आमिष, लालला उत्पन्न केली होती. टोकियो ऑलिम्पिक हे तमाम विश्वाने गुडघे टेकलेल्या शक्तीविरुद्धची लढाई लढतंय.

८ ऑगस्टनंतर मानवी सामर्थ्याचा, एकीचा, जिद्दीचा झालेला विजय यापुढील विश्वाचे भवितव्य बदलवणारा असेल.

विनायक दळवी, ज्येष्ठ क्रीडापत्रकार असून त्यांनी अनेक ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0