बिहारच्या राजकारणाचा अचूक वेध घेणारा कादंबरीकार

बिहारच्या राजकारणाचा अचूक वेध घेणारा कादंबरीकार

राजकीय प्रवाहांच्या सामाजिक आधारांचं अचूक चित्रण फणीश्वरनाथ रेणु यांनी त्यांच्या दोन महान कादंबर्‍यांमध्ये—मैला आँचल (१९५४) आणि परती परीकथा (१९५७), केलं आहे. बिहारमधील राखीव जागांचा प्रश्न सरकारी-निमसरकारी नोकर्‍यांपेक्षा जमीनीच्या फेरवाटपाशी अधिक संबंधीत आहे, ही बाब रेणुच्या वाचकाला माहीत असते. त्यामुळे रेणुचा वाचक बिहारच्या राजकारणाकडे द्विकेंद्री दृष्टीने—हिंदुत्ववाद-समाजवाद, ब्राह्मणी-अब्राह्मणी, दलित-दलितेतर, पाहाणार नाही.

महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये दारुची विक्री अधिक
बिहारः ११ जागांवर १ हजाराहून कमी मताने उमेदवार विजयी
नीतीश यांच्या लोकप्रियतेला ओहोटी?

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी विरुद्ध समाजवादी असा संघर्ष आहे. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (युनायटेड) हे दोन्ही पक्ष समाजवादी आंदोलनाचा वारसा सांगणारे प्रादेशिक पक्ष आहेत. एकेकाळी बिहारातील समाजवादी चळवळ जनसंघ आणि काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांच्या विरोधात होती. त्यानंतर समाजवादी आणि जनसंघी एकत्रितपणे काँग्रेसच्या विरोधात होते. आता काँग्रेस आणि भाजप दोघांनाही समाजवादी साथींची निवड करावी लागली आहे. राजकीय पक्षांचे सामाजिक आधार बदल्यामुळे अशी रोचक परिस्थिती निर्माण झाली आहे.

राजकीय प्रवाहांच्या सामाजिक आधारांचं अचूक चित्रण फणीश्वरनाथ रेणु यांनी त्यांच्या दोन महान कादंबर्‍यांमध्ये—मैला आँचल (१९५४) आणि परती परीकथा (१९५७), केलं आहे. बिहारमधील राखीव जागांचा प्रश्न सरकारी-निमसरकारी नोकर्‍यांपेक्षा जमीनीच्या फेरवाटपाशी अधिक संबंधीत आहे, ही बाब रेणुच्या वाचकाला माहीत असते. त्यामुळे रेणुचा वाचक बिहारच्या राजकारणाकडे द्विकेंद्री दृष्टीने—हिंदुत्ववाद-समाजवाद, ब्राह्मणी-अब्राह्मणी, दलित-दलितेतर, पाहाणार नाही.

समाज गावांमध्ये वाटला गेला आहे आणि गावं जातीपातींमध्ये हा रेणु यांच्या लेखनाचा गाभा आहे. गावामध्ये केंद्रवर्ती असते जमीन. परती परीकथा या कादंबरीची सुरुवातच होते ‘‘धूसर, वीरान, अन्तहीन प्रान्तर…पतिता भूमि, परती ज़मीन, वन्घ्या धरती…’’ या वाक्याने.  कोसना म्हणजे छळणे. कोसी म्हणजे छळवाद. एव्हरेस्ट हे जगातलं सर्वात उंच पर्वत शिखर. तिथल्या बर्फाच्या वादळांतून कोसळणारे दगड, गोटे, माती यांचा गाळ पोटात घेत कोसी नेपाळमधून धपापत खाली उतरते ती बिहारमध्ये. जवळपास १५००० चौरस किलोमीटर एवढा गाळाचा प्रदेश एकट्या कोसीचा आहे. या प्रचंड गाळामुळे कोसीचा प्रवाह वारंवार बदलतो. १७३६ कोसी जिथून वाहत होती तिथपासून पश्चिमकडे तिचा प्रवाह सरकू लागला. आणि १९४० साली ती १२० किलोमीटर पूर्वेकडे सरकली. बिहारमधील नद्यांना पूर येतात, नद्या पात्रं बदलतात, नद्यांमध्ये बेटं म्हणजे दियारे तयार होतात. त्यामुळे शेकडो हजारो लोक भूमीहीन होतात. पुन्हा त्या जमिनीवर जावं तर जमीनदारांचे लठैत हाकलून लावतात. आजही बिहारमध्ये ८० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.

यादव, कायस्थ आणि राजपूतांच्या तालेवार लोकांकडे गावातली बहुतेक सर्व शेतजमीन आहे. कायस्थांचे मुखिया आहेत विश्वनाथ प्रसाद मल्लिक. त्यांची एक हजार बिघे जमीन आहे. ते शेतकरी आहेत आणि तहसीलदारही. विश्वनाथ प्रसाद काँग्रेसी असतात. राजपूतांचे प्रमुख आहे रामकिरपाल सिंह. त्यांची साडे तीनशे बिघे जमीन आहे. यादवांचे मुखिया रामखेलावन यादव दूध-तूप विकून दीडशे बिघे जमीन बाळगून आहेत. या जमीनदारांनी पिछड्या जातींना आपली जमीन खंडाने कसायला दिली आहे. पुढे जेव्हा जमीनदारी निर्मूलन कायद्याची चाहूल लागते त्यावेळी हे सर्व जमीनदार खंडाने दिलेली जमीन आपणच कसत होतो असा दावा करतात. गावात सर्व गरीब कर्जबाजारी आहेत. कोर्‍या कागदावर अंगठ्याचा ठसा घेऊन बाबू लोग कर्ज द्यायचे. या पद्धतीला  कालीचरणने (यादव) विरोध केला तर बाबू लोकांनी कर्ज देणार नाही असं जाहीर केलं. विश्वनाथ प्रसाद धूर्त होते. कोर्‍या कागदावर नाही तर लिखापढी केलेल्या कागदावर अंगठा घेऊन कर्ज द्यायला ते पुढे आले. यावर्षी दुप्पट-तिप्पट नाही पण दीडपट नफा होईलच की, असा त्यांचा हिशेब होता. यादव आणि राजपूत यांच्यामध्ये अन्य छोट्या-मोठ्या जाती वाटल्या गेल्या आहेत. पण ब्राह्मण ही तिसरी शक्तीही आहे. राजपूतांनी आम्हाला मदत केली नाही तर यादवांना क्षत्रिय म्हणून जाहीर करू अशी धमकी ब्राह्मण एका प्रसंगात देतात.

कालीचरण समाजवादी पक्षाचा आहे. जमीनदार आणि व्यापारी यांच्या शोषणाबाबत तो लोकांचं प्रबोधन करत असे—ये पूंजीपति और जमींदार खटमलो और मच्छरों की तरह शोषक हैं. …खटमल ! इसीलिए बहुत-से मारवाडियों के नाम के साथ ‘मल’ लगा हुआ है और जमींदारों के बच्चे मिस्टर कहलाते है. मिस्टर – मच्छर. या प्रचारामुळे गावामध्ये थोडी जागृती होऊ लागली.  कालीचरण, सुंदर व वासुदेव हे यादव तरुण काँग्रेसच्या कोणत्या तरी सभेसाठी पूर्णियाला जातात आणि तिथे सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटतात. सोशलिस्ट काट कुर्ता घालू लागतात आणि बिडीऐवजी सिग्रेट ओढू लागतात. काँग्रेस आणि सोशलिस्ट पार्टी यांच्यासोबत मेरीगंजमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक क्लासही सुरू झाले. वासुदेव त्यांना ‘बुद्धू किलास’ म्हणत असे. राजपूत आणि ब्राह्मण टोलीमध्ये संघाची शाखा भरत असे.

गावामध्ये एक मठ आहे. मठाकडे ९०० बिघे जमीन आहे. महंत सेवादास आंधळा झाला आहे. लक्ष्मी लहानपणापासून त्याच्याकडेच वाढली. त्याने तिला वापरलेली आहे. लक्ष्मी मोठी झाल्यावर सेवादास तिला मठाची कोठारीन बनवतो. गावामध्ये सरकारी दवाखाना उघडणार असतो. या प्रसंगी मठाने गावाला जेवण द्यावं अशी इच्छा महंत प्रकट करतो. छोट्या-मोठ्या जातींमध्ये भांडणं सुरु होतात. ब्राह्मणांचा विरोध असतो दवाखान्याला. राजपूतांना तो यादव आणि कायस्थांचा कट वाटतो. या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मठामध्ये पंचायत बसते. कायस्थ, राजपूत, यादव, पासवान, ततमा, गहलोत इत्यादी सर्व जातींचे म्होरक्ये येतात. त्यांच्यामध्ये वाद-विवाद, भांडणं सुरू होतात त्यावेळी लक्ष्मी भाषणाला उभी राहते. पंच परमेश्वरांना वंदन करून ती भाषणाला सुरुवात करते. परमार्थ करण्यासाठी स्वार्थ बाजूला ठेवावा, सतगुरुंची हीच शिकवण आहे असं ती दोह्यांचा हवाला देऊन सांगते. छोट्या जातींमधील झगड्यांना मोठ्या जाती कारणीभूत आहेत असंही ती सुनावते.  तिच्या भाषणानंतर पंचायतीचा नूर पालटून जातो. गाव भोजनाला आणि मलेरिया सेंटरला सर्व गावाने, गावातील सर्व जातींनी सहकार्य करायचं असा निर्णय होतो. एक बार बोलो प्रेमसे, गन्ही महतमा (गांधी महात्मा) की जय, असा जयजयकार करून पंचायत विसर्जित होते.

मैला आँचल (१९५४) या कादंबरीत १९४६ ते १९४८ हा काळ चित्रित करण्यात आलाय. काँग्रेसवर जमीनदार, ब्राह्मण यांचा पगडा आहे. नेपाळी मुलींची तस्करी करणारा दुलारचंद कापरा काँग्रेसच्या स्थानिक शाखेचा सेक्रेटरी आहे. ध्येयनिष्ठ गांधीवाद्यांना राजकारणात स्थान उरलेलं नाही आणि मागासवर्गीयांचं नेतृत्व करणारा कालीचरण यादव सशस्त्र क्रांतीकडे झुकला आहे असा शोकात्म शेवट आहे या कादंबरीचा. ये आझादी झूठी हैं, देश की जनता भूखी हैं, अशी घोषणा करणारा नौजवान या कादंबरीत प्रकटतो. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात बिहारमधील राजकारणावर कायस्थ आणि ब्राह्मणांचं वर्चस्व होतं. त्यांना दलित आणि मुसलमानांची साथ होती. या राजकारणामुळे बिहारमध्ये कमाल जमीन धारणा कायद्याची अंमलबजावणी कधीही प्रामाणिकपणे झाली नाही, त्यामुळे अगडे आणि पिछडे या दोन गटांमध्ये विविध जाती वाटल्या गेल्या. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय सत्ता उच्चवर्णीयांकडून मागास जातींकडे जाणार आहे ही बाब रेणु सुस्पष्टपणे सूचित करतात.

परती परीकथा (१९५७) या कादंबरीत जमिनीचं राजकारण केंद्रस्थानी आहे.‘‘ जमीनदारी केवळ नावापुरती संपली आहे. जुने जमीनदार, राजा आणि मोठे शेतकरी यांच्याकडे एक हजार, दीड हजार बिघे जमीन आजही आहे. अशा स्थितीत सामंतशहा आणि भूमीहीन शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष होणं स्वाभाविक होतं” अशी नोंद या कांदबरीतच आहे. ग्रामीण जीवनात जमीन केंद्रस्थानी असते. ग्रामीण जीवनातील आर्थिक, सामाजिक, नैतिक सर्व प्रकारच्या समस्या जमीनीमुळेच सुटततात वा बिघडतात ही धारणा या कांदबरीत प्रतिबिंबित होते. कोसी नदीला वेसण घालण्यात आधुनिक तंत्रज्ञान यशस्वी होईल आणि सर्व भूमीहीनांना जमीन मिळू शकेल असा आशावाद या कादंबरीत आहे. जवाहरलाल नेहरूंच्या नव्या भारताच्या स्वप्नाने फणीश्वरनाथ रेणु भारावून गेले होते. या कादंबरीचा नायक आहे जितेंद्रनाथ मिश्र, एक ब्राह्मण जमीनदार. तो परदेशातून आलेला आहे. आधुनिक विचारांचा आहे. कोसीवर बंधारा घालण्याची, तिला काबूत आणण्याची योजना त्याला सुचलेली असते. चलेजाव आंदोलनात तो सहभागी होता त्यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांशी त्याचा परिचय आहे. या सुमारास गावात जमिनीच्या सर्वेक्षणाचं काम सुरु झालेलं असतं. जितेंद्र मिश्र गावाचा ‘नालायक पुत्र’ आहे त्याच्या विरोधात सारं गावं एकत्र होतं. गावामध्ये अंधश्रद्धा आणि कालबाह्य रुढी-परंपरांचा बुजबुजाट आहे. जमिनीच्या भांडणात प्रत्येक जण रात्रंदिवस व्यस्त आहे. जितेंद्रच्या जमीनीवरही अनेकांनी दावा सांगितलेला असतो. सर्व बड्या शेतकर्‍यांचे दावे तो सप्रमाण खोडून काढतो परंतु भूमीहीन शेतकर्‍यांचे दावे मान्य करतो. आपली पडीक जमीन तो ट्रॅक्टरने नांगरतो आणि तिथे गुलाबाची शेती करतो. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि ग्रामीण शहाणीव यामधूनच नवीन भारत निर्माण होईल असा या कादंबरीचा सुखांत आहे.

असं अर्थातच घडलं नाही. स्वातंत्र्योत्तर बिहारच्या राजकारणात अल्पसंख्य कायस्थ आणि ब्राह्मण सत्तास्थानी राह्यले. त्यामुळे जमीनदारी निर्मूलन कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणीच झाली नाही. मध्यम वा मागास जातींनी आपलं नेतृत्व करावं असं अन्य मागास व दलित जातींना वाटू लागलं. त्यांचं नेतृत्व समाजवादी पक्षाने केलं. बिहारमधील जमिनीच्या राजकारणाला वसाहतवाद, स्वातंत्र्य आंदोलन, रशियातील क्रांती आणि अन्य लढ्यांची पार्श्वभूमी होती हे रेणुंच्या कादंबर्‍य़ांमध्ये स्पष्टपणे दिसतं. मात्र मूळ संघर्ष होता जमिनीचा. तो अजूनही सुटलेला नाही कारण बिहारमध्ये कारखानदारी उभीच राह्यली नाही. परिणामी पिछड्या जातींमध्ये अगडे पिछडे आणि पिछडे पिछडे अशी फूट पडली, दलित आणि महादलित वेगळे झाले. प्रत्येक जातीला जमीन हुलकावणी देत राह्यली. राजकीय पक्षांचे सामाजिक आधार तुटले वा बदलले. समाजवादी आंदोलनात फूट पडली. समाजवादी ज्यांच्याशी संघर्ष करत होते त्या भाजप आणि काँग्रेस या दोन शक्तींना बिहार जिंकण्यासाठी समाजवादी साथींची गरज भासू लागली.

संघ-भाजप परिवाराला सांस्कृतिक फॅसिझम या देशात रुजवायचा आहे. त्यांना हा समाज एकजिनसी बनवायचा आहे. त्यातील विविधता मोडून काढायची आहे. म्हणून ठराविक हिंदू देव-देवतांचं गौरवीकरण केलं जातं, गोमांस भक्षण निषिध्द ठरवलं जातं. जे गोमांस भक्षण करतात ते अराष्ट्रीय ठरवले जातात. त्यांची हत्या करण्यासाठी झुंडीला चेतवलं जातं. स्वातंत्र्य आंदोलनातील मूल्यं—लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विविधता, सामाजिक न्याय आणि शेवटच्या माणसाचा विकास, यांना मोडीत काढलं जातं. संघ-भाजप परिवारातील समाजवादी साथी राजकीय सत्तेसाठी सांस्कृतिक फॅसिझम नजरेआड करतात.

फणीश्वरनाथ रेणु राजकारणात सक्रीय होते. चलेजाव आंदोलनात होते, नेपाळमधील राणाशाही विरोधातल्या सशस्त्र लढ्यातही होते. आणीबाणी विरोधी लढ्यातही त्यांनी जयप्रकाश नारायण यांना साथ दिली. १९७२ साली त्यांनी बिहार विधानसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांचा मुलगा पद्मपराग वेणु भाजपच्या तिकीटावर आमदार झाला होता. गेल्या खेपेला त्याला भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून त्याने राष्ट्रीय जनता दलाचा प्रचार केला होता आणि जनता दल (संयुक्त)चे नेते नितिश कुमार यांच्याशी त्याचे निकटचे संबंध आहेत. फणीश्वरनाथ रेणुंचं जीवन आणि साहित्य यामधून बिहारच नाही तर देशातील समाजवादी चळवळीचा आलेख पाह्यला मिळतो. धनुक या मागास शेतकरी जातीतला हा लेखक एका गावामध्ये संपूर्ण भारताची प्रतिकृती पाहात होता. महाराष्ट्राचं राजकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर या चौकटीबाहेर पाहाण्याची दृष्टी अपवादानेच मराठी लेखकांकडे आहे त्यामुळे ते देशाला सोडाच पण संपूर्ण मराठी समाजालाही कवेत घेऊ शकत नाहीत.

सुनील तांबे, हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0