तत्त्वज्ञानात्मक चिंतन

तत्त्वज्ञानात्मक चिंतन

बर्ट्रंड रसेल दर्शन भाग ७ - 'तत्त्वज्ञानात्मक चिंतन' (Philosophical Contemplation) कसे केले जाते, हे स्पष्ट करणे खरे तर अतिशय अवघड असते. रसेलच्या मते, " 'तत्त्ववेत्ता काम करीत आहे' म्हणजे नेमके काय करीत आहे?" हा एक अतिशय विचित्र प्रश्न आहे. त्यासाठी "तत्त्ववेत्ते काय करीत नसतात", हे सांगावे लागते आणि ती खूप मोठी यादी आहे. आपल्या भोवतालच्या जगाचे स्वरूप समजावून घ्यायचे तर ते अगणित, अनंत गोष्टीनी भरलेले आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानाची किंवा तत्त्वचिंतनाची व्याख्या करणे हे कर्मकठीण बनते. तत्त्वज्ञानाची कोणतीही व्याख्या केली तरी ती वादग्रस्तच बनते. पण ती करण्यात एक तात्त्विक अभिवृत्ती दिसून येते, यात मात्र शंका नसते. तत्त्वचिंतन काय आहे? हे जाणून घ्यायचे तर एकच उपाय आहे, तो म्हणजे '(आपण स्वतःच) तत्त्वज्ञान निर्माण करणे."

“…..चे तत्त्वज्ञान”
तत्त्वज्ञानाचा नकाशा
बर्ट्रंड रसेलचे तत्त्वज्ञानविषयक मत

तत्त्वज्ञानात किंवा ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) प्रक्रियेत या साध्या दिसणाऱ्या संज्ञांचे अर्थ काटेकोर आणि अचूक होतात. ते अर्थ एकतर वाचक-लेखकाला माहित नसतात किंवा संज्ञांच्या तांत्रिक अंगांकडे दुर्लक्ष झालेले असते अथवा केलेले असते.  या संज्ञा जशा सामान्य चर्चाविश्वातील वापरात ज्या सहजतेने झिरपतात तसे त्यांचे काटेकोर तांत्रिक अर्थ आणि त्याविषयीची जाणिव मात्र त्याच उत्कटतेने झिरपत नाहीत. मग निर्माण होतो तो एक अर्थचकवा. या ‘अर्थचकव्या’च्या निर्मिती प्रक्रियेत कोणाचीही चूक फारशी नसते. पण जाणकाराने चकव्याची तरी जाणिव विकसित करणे, हे त्याच्या बौद्धिक व वैचारिक सुरक्षिततेसाठी आवश्यक ठरते.

‘माणूस विचारशील प्राणी आहे’ (Man is rational animal), या अतिप्रसिद्ध पण तेवढ्याच वादग्रस्त विधानातून ‘विचार करणे’ (Thinking) हे केवळ मानवाचेच वैशिष्ट्य आहे, हे अधोरेखित होते. मूलतः ‘विचार करणे’ ही प्रक्रिया मानसशास्त्रीय, तार्किक, आणि वैचारिक आहे. मेंदू हे जीव-शरीरशास्त्रीय द्रव्य; मन, आत्मा ही तत्त्वे, बुद्धि, विवेकशक्ति इत्यादी मानवी क्षमता आणि भौतिक जगापेक्षा स्वतंत्र मानले गेलेले (ज्यावर लोकांची अतिश्रद्धाळूंचा भावनिक विषय असतो) ईश्वर, केवल विचारांचेच (Absolute Ideas) स्वतंत्र विश्व अशीही तत्त्वे, या सर्वांशी ‘विचार करणे ही प्रक्रिया जोडली गेलेली आहे.

या विविध द्रव्ये, तत्त्वे, क्षमतांमधील नेमका कोणता घटक ‘विचार करतो हा तात्त्विक प्रश्न असून त्याला दिल्या गेलेल्या उत्तरांमधून वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांची आणि वेगवेगळ्या तात्त्विक परंपरांची विविध मते, सिद्धांत विकसित झाली आहेत. काही उत्तरे विज्ञानांनी दिली आहेत, त्यातून वेगवेगळ्या विज्ञानांचा जन्म व विकास झाला आहे.

विचारांचे प्रकार

शिक्षणाचा, शिक्षणक्षेत्राचा आणि व्यापार-उद्योग-धंदा-पेशा इत्यादी सामूहिक व व्यक्तिगत क्षेत्रांचा जसजसा प्रसार व प्रचार होत गेला, तसतसे गेल्या काही दशकात ‘शिक्षण’ ही देखील व्यवसाय, धंदा, व्यापार इत्यादींची विक्रीवस्तू बनली. शिक्षण ही गोष्टच विचार करणे, या मूलभूत मानवी वैशिष्ट्याशी जोडली गेलेली आहे. शिक्षण बाजारू होणे, याचाच अर्थ विचार बाजारू होणे. अर्थात शिक्षण, ज्ञान, जाणिवा यांना बाजारपेठीय मूल्ये किंवा किंमत देण्याचे प्रयोग प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानात घडून गेले. अशा तत्त्ववेत्त्यांना’ सोफिस्ट’ (Sophist) म्हंटले जाते. या तत्त्ववेत्त्यांच्या विरोधात सॉक्रेटीसने बंड केले होते.

विसाव्या शतकात शिक्षणाचे जागतिक पेव फुटले. साहजिकच ‘विचार करणे’ या कृतीचे विविध प्रकार अस्तित्वात आले. शैक्षणिक व वैचारिक बाजारपेठेत असे एकूण नऊ विचार प्रकार चलनात आले:

(१) विश्लेषक विचार (Analytical Thinking), (२) बहुआयामी विचार (Divergent Thinking), (३) अभिसरण विचार  (Convergent Thinking), (५) सर्जक विचार (Creative thinking), (५) चिकित्सक विचार (Critical thinking), (६) अमूर्त विचार (Abstract Thinking), (७) मूर्त किंवा ठोस विचार (Concrete thinking),  (८) क्रमवार विचार (Sequential Thinking), सर्वव्यापक विचार (Holistic Thinking).

यातील ‘सर्जक विचार’ (Creative thinking) आणि चिकित्सक विचार (Critical thinking) व त्यानुसार होणारे  लेखनही ‘सर्जक’ आणि ‘चिकित्सक असते. तत्त्वचिंतन या दोन्ही प्रकारात येणारे आहेच, पण खुद्द तत्त्वज्ञानात सृजन म्हणजे पूर्णपणे नवेच काहीएक आणि चिकित्सा म्हणजे प्रथम आत्मचिकित्सा किंवा आत्मपरीक्षण’ असा अर्थ होतो. साहित्य कला, संगीत इत्यादीत हे अर्थ प्रतिबिंबित होतात. सर्वव्यापक विचार (Holistic Thinking) ही स्वरूपाने तात्त्विक आहे. तत्त्वज्ञान हा समग्र जगाचे एकात्मिक दर्शन समजले जाते.

Reflective Thinking – ‘प्रतिबिंबात्मक विचार’ हा प्रकार तत्त्वज्ञानात समावेश होणारा प्रकार आहे. तथापि काही विचारवंतानी व शिक्षणतज्ज्ञांनी त्याचा समावेश बाजारपेठीय यादीत केला. तेथे त्याचा अर्थही बदलला गेला, शैक्षणिक अर्थ दिला गेला. प्राथमिक ते उच्च शिक्षण क्षेत्रात जिथे ‘घासुगिरी शिक्षण’  (Tertiary education किंवा post-secondary education) पद्धती असते, तिथे प्रतिबिंबात्मक विचारपद्धतीची आणि त्याच अनुषंगाने होणाऱ्या लेखनावर भर दिला जातो. प्रतिबिंबात्मक लेखन (Reflective writing) कसे करावे, How to Write a Reflection Paper याचाही बाजार विकसित झाला आहे.

ब्रिटानिका ज्ञानकोशातून

ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या मते, ‘विचार’ (thought, thinking, thought process) ही मुख्यतः मानसशास्त्रीय संकल्पना आहे. त्यानुसार ‘बाह्य किंवा आंतरिक प्रेरकाला गुप्त सांकेतिक स्वरुपात दिलेला प्रतिसाद म्हणजे विचार’. किंवा ‘व्यक्तिची आंतरिक कृती आणि बाह्य प्रेरक यांच्यातील माध्यम म्हणजे विचार’. ब्रिटानिकाच्या मते, तत्त्ववेत्त्यांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी विचाराचे अनेक प्रकार केले आहेत.

‘चिकित्सक विचार’ (Critical thinking) आणि ‘सर्जक विचार’ (Creative thinking) या विचार प्रकारांचे स्वरूप तत्त्वचिंतनाशी निगडीत आहेत. हे दोन्ही प्रकार स्वरूपाने तात्त्विक आहेत. तथापि या साऱ्या प्रकारांचे किंवा कोणत्याही एकदोन संकल्पनाचे स्वरूप पाहाणे, किंवा त्यांच्या व्याख्या तपासणे इत्यादींच्या खोलात जाण्यात अर्थ नाही. कारण त्या तत्त्वज्ञानाच्या दिशेने जाणाऱ्या नसून शिक्षण प्रक्रियेच्या दिशेने जाणाऱ्या आहेत. फारतर त्या ‘शिक्षणाचे तत्त्वज्ञान’ या विषयाच्या दिशेने जाणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, ‘चिकित्सक विचार’ म्हणजे अशा तऱ्हेची विचार करण्याची पद्धती की जिच्यात ‘इच्छित हेतूपूर्तीच्या दिशेने विचार करण्याच्या प्रशिक्षण मिळालेल्या प्रत्येक कौशल्याच्या पुरेपूर वापर केला जातो.’ यात व्यक्तीने किंवा विद्यार्थ्याने केवळ जे शिकवले गेले आहे, तेच उपयोगात आणावयाचे आहे. त्याने इतर कोणत्याही स्वतःच्या वैचारिक सद्गुणांचा वापर करणे अपेक्षित नाही!

त्या उलट ‘प्रतिबिंबात्मक विचार’ (Reflective Thinking) प्रक्रिया, जे काही घडले आहे त्याबाबत निर्णय व धोरणे यावर भर देते. ही प्रक्रिया व्यक्तीच्या, म्हणजे विद्यार्थ्याच्या इच्छा, धारणा, समजुती, श्रद्धा, विश्वास व ज्ञान यांना महत्व देते. या साऱ्यांचे ‘प्रतिबिंब’ अभ्यासविषयात  उमटावे, यावर भर देते.

विचार करण्यासोबतच लेखनाचेही प्रकार केले जातात. जसे की, ‘सर्जक विचार’ (Creative thinking) कृतीत उतरवला की त्याचे रुपांतर ‘सर्जक लेखन’ (Creative writing) मध्ये होते. भाषा आणि साहित्य क्षेत्रात या दोन्ही प्रकारांना अतिशय, वाजवीपेक्षा जास्तच महत्व आले आहे. साहित्यक्षेत्रात ते जास्तच फोफावल्याच्या काळजीतूनच की काय कोण जाणे, पण नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “साहित्य निर्मितीच्या कायर्शाळा: गरज की थोतांड?” या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला गेला आहे. ( आजच ०५ डिसेंबर रोजी होत आहे). गेल्या काही दशकात साहित्य निर्मिती ही जणू यांत्रिक आणि तांत्रिक पद्धती असावी, अशा पद्धतीने निर्माण केले जात आहे, त्यातील सर्जनशीलता मृत झाली आहे, असे समजून होणाऱ्या साहित्याच्या चिकित्सेसाठी हा परिसंवाद होत आहे, ही स्वागतार्ह बाब म्हंटली पाहिजे.

तीन संकल्पना

‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ प्रक्रियेशी तीन संकल्पना निगडीत आहेत.  (१) ‘तर्कमुक्त स्वैरकल्पना’ (Speculation), (२) ‘तत्त्वचिंतन’ (Contemplation) आणि (३)’विमर्श’ (Reflection). त्यांच्यातील फरक अधोरेखित करण्यातून ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ ही संकल्पना स्पष्ट करता येईल.

तर्कमुक्त स्वैरकल्पना (Speculation)

मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस

मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस

तर्कमुक्त किंवा अतार्किक स्वैरकल्पना (Speculation) हे तत्त्वज्ञानाचे किंवा तत्त्वचिंतनाचे अतिशय प्राथमिक स्वरूप होते. Wisdom of The West (१९५९) च्या प्रस्तावनेत रसेलने Speculation ही संज्ञा उपयोगात आणली आहे. त्याच्या मते, निश्चित ज्ञानाच्या सीमा ओलांडून मानवी विचार जेव्हा  मुक्त विहार करु लागतो कल्पनाशक्ती गगनाला जणू गवसणी घालू पाहाते. यावेळी विचारात वैध आणि सत्य तर्क नावाची गोष्टच नसते. ही माणसाची प्राचीन तर्कमुक्त स्वैरकल्पना करण्याची कृती आहे आणि ती एका प्रकारची साहसमोहीमच बनते. आणि तत्त्वज्ञानाचे हे अतिशय भरड, कच्चे स्वरूप होते. ते मूळ तत्त्वज्ञानच होते. पायथागोरसपासूनच्या अनेक प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी अशा स्वैरकल्पना करण्याचे साहस केले. त्यांचे विचार मूलगामी, मौलिक होते, पण ते तर्कमुक्त स्वैरकल्पना (Speculation) स्वरूपाचे होते. त्यांना तर्काचा, अनुभवाचा आधार नव्हता, ते नुसतेच स्वैर विचार होते.

तर्कमुक्ततेकडून तर्कयुक्ततेकडे

तर्कमुक्त स्वैरचिंतनाने विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञान अशा तीन प्रश्नांना जन्म दिला आहे. परंतु या प्रश्नांना जेव्हा उत्तरे मिळाली तेव्हा ते प्रश्न व उत्तरे निश्चित झाली, त्यातून विज्ञान निर्माण झाले. रसेलच्या मते, विज्ञानाच्या अनेक प्रांताची मुहूर्तमेढ याच तर्कमुक्त स्वैरचिंतनाने झाली आहे. विज्ञानाचे स्वरूप निश्चित झाले की ते तर्कमुक्ततेकडून तर्कयुक्ततेकडे जाते, मग ते तत्त्वज्ञानापासून स्वतंत्र होते. तर्कमुक्त स्वैरकल्पना सुचण्याचा दुसरा प्रांत म्हणजे  धर्म.

धर्म व धर्मसंस्थेची रचनाही तर्कमुक्त स्वैरकल्पना विहारातूनच होते. माणूस त्यातूनही मुक्त झाला की त्याचा तत्त्वचिंतनाकडे प्रवास सुरु होतो. प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ते मांडतात तसे प्राचीन ग्रीक ‘तत्त्वचिंतन’ म्हणजे निव्वळ आत्मसुखासाठी केलेले दुर्गम, अतिकठीण प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत हिंडण्याचे धाडसी काम आहे. अर्थात आजही तत्त्वज्ञान हे धाडसी काम आहे, हे खरे आहे.

मरियम-वेबस्टर शब्दकोशाने Speculation चे ३४ अर्थ दिले आहेत. Speculation चा एक अर्थ निव्वळ धंदेवाईक व व्यापारी आहे.  तो अर्थातच येथे अपेक्षित नाही.

चिंतनाचे दोन प्रकार (Contemplation    

‘चिंतन करणे’ (Contemplation) ही मात्र तत्त्वज्ञानात्मक प्रक्रिया आहे. पण तिचेही दोन प्रकार करता येतात. ‘तत्त्वज्ञानात्मक विमर्श’ (Philosophical Reflection) आणि ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation).

तत्त्वज्ञानात्मक विमर्श

Reflection या संज्ञेला संदर्भानुसार वेगवेगळा अर्थ मिळतो. भौतिकीविज्ञान, गणित किंवा साहित्य, भाषा क्षेत्रात त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. आपण चिंतनक्षेत्रातील अर्थ पाहू. मराठीत त्याचा तात्त्विक अनुवाद  ‘विमर्श’ (Reflection) असा केला जातो.

‘विमर्श’ असा सुटा शब्द फारसा प्रचलित नाही, तो ‘विचारविमर्श’ असा जोडशब्दप्रयोग उपयोगात आणला जातो. Reflection म्हणजे प्रतिबिंब.  कशाचे? कोणाचे प्रतिबिंब दिसते? आपले, व्यक्तीचे-वस्तूचे, पाहणाऱ्याचे किंवा प्रथमपुरुषी ‘माझे, ‘आपले प्रतिबिंब दिसते. कशात दिसते? तर आरशात दिसते. आरशासारख्याच चकाकणाऱ्या इतर वस्तूत-पाण्यात, धातूच्या चकचकीत पत्र्यात दिसते. ‘मी , ‘आपण “जसे आहोत तसे दिसणे” हे प्रतिबिंब.

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी” (गायक: सुधीर फडके, गीतकार: जगदीश खेबुडकर, चित्रपट: “आम्ही जातो आमुच्या गावा”) हे गीत आपली प्रतिमा दर्शविते. ऑस्कर वाईल्डची (Oscar Fingal O’Flahertie Wills Wilde  (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४, मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००) ‘डोरियन ग्रे (The Picture of Dorian Gray) कथा अशाच एका खऱ्या आत्मप्रतिमा दर्शनाची कथा आहे. उलट “तुम्हारे हुस्न की तारीफ आईना भी करे, तो मैं तुम्हारी कसम है तोड दूं उसको”  (गायक: महेंद्र कपूर-आशा भोसले, गीतकार: एस. एच. बिहारी, चित्रपट: कही दिन कही रात १९६८, कलाकार: विश्वजित, सपना) हे गीत प्रेमपत्रावरील स्वामित्वहक्क बजावते. तिसराही प्रकार म्हणजे आत्मप्रतिमेच्या प्रेमात पडणे. नार्सिसीस (Narcissus)  हा ग्रीक मिथककथेतील नायक पाण्यात प्रथम आपली प्रतिमा पाहातो. आपण इतके अमर्याद सुंदर आहोत, याची जाणिव होऊन तो त्या प्रतिमेच्या प्रेमात पडतो. (आणि मरतो!)

हाच मूलार्थ गृहीत धरून ‘विचारविमर्श’ करताना संबंधित व्यक्तिची मते तिच्या विचारात व्यक्त होताना दिसून येतात. व्यक्तीने विचार करून स्वतःची मते मांडणे म्हणजे ‘विचारविमर्श’ करणे, असे मानले जाते. काहीशा प्रौढ भाषेत मांडायचे तर ती व्यक्ति स्वतःचे तत्त्वज्ञान मांडत असते. हे तत्त्वज्ञान म्हणजे विमर्शात्मक चिंतन किंवा तत्त्वज्ञानात्मक विमर्श होय.

तत्त्वज्ञानात्मक विमर्शमध्ये व्यक्ति तिला हवा तसा बदलही करू शकते. ते तिचे ‘स्वतःचे तत्त्वज्ञान’ असते. साहजिकच ते खासगी असते. ते सर्वांसाठी असेल, सार्वत्रिक होईलच; याची शाश्वती नसते. उदाहरणार्थ, “आपलं आपण कमवायचं, जगायचं, जीवनाला येईल तसे सामोरं जायचं, तक्रार करायची नाही-शांतपणे जगायचं” किंवा “मला नाही असं जगायचं. मला माझ्या पद्धतीने जगायचंय. माझ्या पद्धतीने मी माझ्या जीवनाला आकार देणार!” हे मत म्हणजे खासगी विचारविमर्श. साधारणतः अनुभवकथन, साहित्यातील आत्मचरित्रे किंवा चरित्रे विचारविमर्शात्मक असतात. त्यात समाजोपयोगी अंश असेल तर आणि तरच ती भावतात, अन्यथा त्यांचा कालिक आणि वाचक संदर्भ कालबाह्य झाला की असे साहित्य बिनकामाचे ठरते. त्याउलट तत्त्वज्ञान नेहमीच कालोचित ठरते, कारण ते स्थलकाल, व्यक्ति, नेते, समाज इत्यादींचा संदर्भ ओलांडून चिरस्थायी विचार मांडते. तेच अस्सल तत्त्वज्ञानात्मक चिंतन या पदाला पोहोचते.

तत्त्वज्ञानात्मक चिंतन

‘चिंतन’ (Contemplation) मात्र ‘विचारविमर्श’ च्या नेमके उलट असते. किंवा ‘अधिक व्यापक व विस्तारित असते’ असे म्हणणे योग्य राहील. ‘चिंतन’ व्यक्त करण्यात व्यक्ति तिचे मत मांडतेच पण तिच्या पूर्वसुरींचे मत विचारार्थ घेते, त्यांचे खंडन-मंडन करते, मग स्वतःचे नवे मत मांडते, त्या मताच्या समर्थनार्थ पुरावे देते. ती त्या ज्ञानाच्या विकासाचा पुढील टप्पा गाठू पाहाते, किंबहुना ती व्यक्ति संपूर्णपणे नवेच ज्ञान निर्माण करते. कदाचित ते पूर्वसुरींच्या ज्ञानाशी जुळणारे असेल किंवा नसेलही; नसेल तर ते ज्ञान निखळपणे ‘नवे ज्ञान’ या अभिधानाला पात्र ठरते. हे ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) ज्ञान असते.

‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ मांडणाऱ्या व्यक्तीचे, तत्त्ववेत्त्याचे, विचारवंताचे असतेच असते, ते त्याच्या नावानिशी जगाला परिचित होते. ते त्याचे योगदान असते. पण त्याचवेळी ते ज्ञान त्या तत्त्ववेत्त्याचे खासगी मालकीचे राहात नाही, तर ते ज्ञान ‘ज्ञानाच्या ज्या कोणत्या क्षेत्राविषयी असेल त्या ज्ञानक्षेत्राच्या साठ्याचा भाग’ बनते. ते मांडणाऱ्या व्यक्तिला तिचे श्रेय (Credit) लाभते, पण ते तिच्या मालकीचे (एकस्व किंवा पॅटंट, patent) राहात नाही. ते ज्ञान मग विज्ञान बनेल अथवा तत्त्वज्ञान बनेल. एकूण ज्ञानाचा भाग होण्याचा दर्जा तिला लाभतो. ते विज्ञान बनले तरी मूलतः तत्त्वज्ञान बनते. कारण ते ‘ज्ञान’ असते, ते संबंधित विषयाची ‘तत्त्वे’ बनते. जसे की न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत, आईनस्टाईनचा सापेक्षता सिद्धांत, कणाद ऋषीचा अणुवाद इत्यादी.

ध्यान

रेने देकार्त

रेने देकार्त

‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) एका अर्थाने ‘ध्यान’ (Meditation) असते. बुद्धाने, महावीराने किंवा प्लेटोने केलेल्या तत्त्वचिंतनाला ‘ध्यान’ म्हंटले आहे. अशी तीन चिंतने तत्त्वज्ञानात प्रसिद्ध आहे.

पहिले, रोमन संस्कृती चा एक अनिभिषिक्त सम्राट आणि स्टोईक तत्त्ववेत्ता मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस (Marcus Aurelius किंवा Marcus Aurelius Antoninus Augustus, जन्म: २६ एप्रिल १२१, मृत्यू:१७ मार्च १८०) याचे Meditation हा ग्रंथ. त्याचे एकूण बारा भाग आहेत. दुसरे चिंतन, फ्रेंच तत्त्ववेत्ता रेने देकार्त (René Descartes जन्म : ३१ मार्च १५९६; मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०) याचा Meditations हा तत्त्वज्ञानाचा मूलभूत ग्रंथ. देकार्त ‘आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक’ (Father of Modern Philosophy) किंवा’ बुद्धिप्रामाण्यवादाचा जनक’ समजले जाते. त्याचे मराठी किंवा भारतीय भाषांमधील भाषांतर ‘चिंतने’ असे केले जाते, ते याच दृष्टिकोनातून. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि ‘आजचा सुधारक’ चे विवेकवादी विचारवंत दि. य. देशपांडे यांनी मराठीत ‘चिंतने’ हा उत्तम अनुवाद केला आहे. ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केले आहे. तिसरी Meditation म्हणजे ओशोआचार्य रजनीश (जन्म: 11 डिसेंबर १९३१, मृत्यू: १९ जानेवारी १९९०) यांचा The Orange Book The Meditation Techniques हा आधुनिक अर्थविवरण देणारा ग्रंथ.

थोडक्यात, ‘तत्त्वज्ञानात्मक विमर्श’ (Philosophical Reflection) हे व्यक्तिनिष्ठ असते, त्याचे विज्ञान-तत्त्वज्ञान होईलच असे, नाही. मात्र ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) वस्तुनिष्ठ असते, त्याचे स्वतंत्र विज्ञान-तत्त्वज्ञान होऊ शकते, किंबहुना होतेच होते, असे म्हणता येते. रसेलही त्याच्या लेखनात Philosophical Contemplation असा शब्दप्रयोग करतो, तो Philosophical Reflection असा शब्दप्रयोग करत नाही.

ओशो - आचार्य रजनीश

ओशो – आचार्य रजनीश

‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ करण्याचे आंतरिक नाते सामान्य माणसांचा इतिहास ज्या प्रेरणांनी, मानसिकतेने घडतो त्या प्रेरणांच्या मुळाशी काही तात्त्विक विचारसरणी असतात, त्याच्याशी असतो.  त्या प्रेरणा मानवी एकूणच जीवनाची दिशा ठरवितात, माणसाला त्याच्या जगण्याचे उद्दिष्ट देऊ पाहतात. या प्रेरणांचा इतिहास म्हणजे तत्त्वज्ञानाचा इतिहास असतो.

तीन प्रमुख तत्त्वज्ञान परंपरा

मानवी इतिहास तीन प्रमुख तत्त्वज्ञानांनी आकाराला आला. ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, भारतीय तत्त्वज्ञान आणि चिनी तत्त्वज्ञान. एका व्यापक प्राचीन कालखंडात या तीनही ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ प्रक्रियेची बीजे रोवली गेली. पण त्यांच्यात गतिमान, प्रवाही व कमाल मर्यादेपर्यंत समकालिन राहाण्याची क्षमता होती ती ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात. किंबहुना ती ‘क्षमता म्हणजेच ग्रीक- पाश्चात्त्य तत्त्वज्ञान’ असेही समीकरण केले गेले.

अवरुद्ध तत्त्वज्ञाने आणि अवरुद्ध देश  

भारतीय तत्त्वज्ञान आणि चिनी तत्त्वज्ञान तात्त्विक विचारसरणीच्या संदर्भात अतिशय समृद्ध आहे, पण ते त्यांच्या सांस्कृतिक अन धार्मिक दबावाच्या चौकटीत बंदिस्त राहिले. तत्त्वज्ञान म्हणजे धर्म, असेच समीकरण झाल्याने भारतीय तत्त्वज्ञानात आणि चिनी तत्त्वज्ञानात फारशी प्रगती झाली नाही. चिनी तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानातील वैदिक तत्त्वज्ञाने , विशेषतः अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञान हे जणूकाही ‘शासनव्यवस्थेची तत्त्वज्ञाने’ (State Philosophies) किंवा राजकीय तत्त्वज्ञाने बनली. ती सर्व प्रकारच्या शोषणव्यवस्था टिकवून व पोषण करणाऱ्या समाजव्यवस्था, राज्यव्यवस्थापूरक तत्त्वज्ञाने झाली. परिणामी ही दोन्ही तत्त्वज्ञाने जागतिक तात्त्विक पटलावर फारसे स्थान मिळवू शकली नव्हती. जेव्हा दोन्ही तत्त्वज्ञानांची काटेकोर चिकित्सा, परीक्षणे सुरु झाली, आणि ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरांशी तुलना सुरु झाली तेव्हा त्यांच्यात बदल होण्याची प्रक्रिया उशीराने, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर आणि विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात सुरु झाली.

अर्थात आजही एकविसावे शतक सुरु झाले असले तरी भारतासारखा देश मात्र धर्माच्या विळख्यात सापडलेला आहेच. उलट भारताची वाटचाल ‘हिंदू राष्ट्र’ होण्याकडे सुरु झाल्याने भारतीय तत्त्वज्ञान अवरुद्ध होण्याचीच लक्षणे दिसत आहेत. नेमके तेच चिनी तत्त्वज्ञानाबाबतही घडत आहे, असे दिसते. चीन फार धार्मिक नसला तरी सत्तास्पर्धेत तो बलाढ्य होऊ पाहात आहे, जे लाओ-त्झूच्या तत्त्वदर्शनाविरुद्ध आहे आणि कन्फ्युशियसच्या विचारांशी प्रतारणा करणारे, त्याच्या तत्त्वज्ञानाचा विपरीत अर्थ लावणारे आहे.

भारताच्या संदर्भात बोलायचे तर ग्रीक-पाश्चात्य परिभाषेत भारतीय विचारविश्वाची मांडणी आणि चिकित्सा सुरु झाल्यानंतर भारतीय तत्त्वज्ञान परंपरा गतिमान झाली. एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतीय दर्शने प्रारंभी भारतीयांनाच अज्ञात होती, म्हणजे केवळ विशिष्ट वर्णीय-वर्गीयांपुरती बंदिस्त होती.

बाराव्या शतकात भारतीय तत्त्वज्ञान परंपरा वारकरी, भक्ति इत्यादी संप्रदायांनी तिची लोकभाषेत मांडणी केली. ज्ञानेश्वरांपासून तुकोबांच्या बंडखोरीमार्फत गाडगेबाबा-तुकडोजी महाराजांच्या पर्यंत वैदिक दर्शने जनसामान्यांना परिचित झाली खरी, पण केवळ संताच्या मार्फत. सार्वजनिक शिक्षण पद्धती नसल्याने भारत तत्त्वचिंतनात किती समृद्ध व संपृक्त आहे, याचा शोध सामान्य भारतीय जनतेला मुदलात नव्हता, होती ती केवळ निर्घृण वर्ण-जाती-लिंगभेद व्यवस्था आणि कर्मकांडग्रस्त समाजव्यवस्था. त्यामुळेच तर  तुकोबांनी वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥ ( अभंग क्रमांक २२५६) असा बंडघोष केला होता.

(मुक्तसंवाद’, ०१ ऑक्टोबर २०२१ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि संपादित लेख.)

श्रीनिवास हेमाडे, हे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0