नवी दिल्ली : प्रख्यात राजकीय विश्लेषक व विचारवंत प्रताप भानू मेहता यांनी हरियाणातील सोनीपतस्थित अशोक विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा रविवारी राजीनामा दिला
नवी दिल्ली : प्रख्यात राजकीय विश्लेषक व विचारवंत प्रताप भानू मेहता यांनी हरियाणातील सोनीपतस्थित अशोक विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा रविवारी राजीनामा दिला. आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा जायचे असल्याने आणि विद्यापीठ प्रशासनातील जबाबदाऱ्यांमुळे वाचन, मनन, चिंतनात अडथळे येत असल्याने आपण राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिलेले आहे. पण आपण या विद्यापीठात अध्यापन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अशोक विद्यापीठाने त्यांचा राजीनामा स्वीकारला असून इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापक मालविका सरकार यांच्याकडे कुलगुरुपद सोपवण्यात आले आहे. प्रा. मालविका सरकार या अशोक विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक सल्लागार पद सांभाळत होत्या. त्या एक ऑगस्ट रोजी आपले पद स्वीकारतील.
२०१७मध्ये प्रताप भानू मेहता यांनी अशोक विद्यापीठाचे कुलपतीपद स्वीकारले होते. त्या अगोदर ते ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी न्यू यॉर्क विद्यापीठातही अध्यापन केले आहे.
आपल्या पत्रात प्रताप भानू मेहता यांनी ‘समकालिन जगाची नवी व्यावहारिक व सैद्धांतिक आव्हाने आपल्याला जाणून घ्यायची असून काही शैक्षणिक प्रकल्प अपूर्ण आहेत ते पुरे करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात जाणे अपरिहार्य आहे. माझ्याकडे अमर्याद स्वातंत्र्य आहे पण वेळ कमी आहे. अशावेळी शैक्षणिक क्षेत्राला अधिकाधिक वेळ देणे मला गरजेचे वाटले आहे,’ असे नमूद केले आहे.
COMMENTS