पेट्रोल दरात ९.५० रु.तर डिझेलमध्ये ७ रु.ची कपात

पेट्रोल दरात ९.५० रु.तर डिझेलमध्ये ७ रु.ची कपात

नवी दिल्लीः पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरवाढीवर विरोधी पक्ष व जनतेतून मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त होत असताना शनिवारी अचानक केंद्र सरकारने पेट्रोलच्या प्रती लीटर अबकारी करात ८ रुपये व डिझेलच्या प्रती लीटर अबकारी करात ६ रुपयांची कपात केली. या निर्णयामुळे पेट्रोलची प्रती लीटर दर ९ रु.५० पैशाने तर डिझेल प्रती लीटर ७ रुपयांनी स्वस्त झाले आहे. सरकारने घरगुती सिलेंडरचेही दर कमी केले असून १२ सिलेंडरपर्यंत प्रत्येक सिलेंड़रमागे २०० रुपयाची सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन दराच्या या कपातीमुळे सरकारच्या महसूलात वार्षिक १ लाख कोटी रुपये इतकी घट अपेक्षित आहे. तर घरगुती सिलेंडरवरच्या सवलतीमुळे वार्षिक ६१०० कोटी रु. महसूलात कपात होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधन व गॅस सिलेंडर दरातील कपात करण्याची घोषणा ट्विटरवर केली.

केंद्र सरकाने अबकारी कर, आयात-निर्यात दरात कपात केली आहे. त्याच बरोबर प्लास्टिक उत्पादनाचा कच्चा माल व अबकारी कर कमी केला असल्याची घोषणा त्यांनी केली. केंद्र सरकारने इंधन दराबरोबर लोखंड, पोलाद संदर्भातील कच्चा माल व अन्य अबकारी कर यांच्यातही कपात केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा सूत्रे हाती घेतली तेव्हा गरीब कल्याणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता सरकारने गरीब व मध्यमवर्गाच्या मदतीसाठी ही पावले उचलली असून गेल्या सरकारपेक्षा या सरकारच्या काळात महागाई कमी असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला.

COMMENTS