राणी एलिझाबेथचा मृत्यूसोहळा

राणी एलिझाबेथचा मृत्यूसोहळा

युकेच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. राणी बऱ्याच आजारी आहेत याचा सुगावा ७ सप्टेंबर रोजी लागला. तिथून राणी हा विषय

४९ मान्यवरांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : बिहारमध्ये याचिका
चेहरा झाकलेली मुलगी अभाविपची कार्यकर्ती : दिल्ली पोलिस
कोरोनाविरुद्धचे जर्मन मॉडेल आणि नेतृत्त्वाचे महत्त्व

युकेच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं.

राणी बऱ्याच आजारी आहेत याचा सुगावा ७ सप्टेंबर रोजी लागला. तिथून राणी हा विषय माध्यमात आला. १९ सप्टेंबर रोजी त्यांची शवपेटी तळघरात सुरक्षित ठेवली गेली तोपर्यंत म्हणजे जवळपास १२ दिवस जगभरच्या माध्यमांत राणी हा विषय होता. बीबीसीनं जवळजवळ चोविस तास या घटनाक्रमाचं चित्रण केलं. जर्मनी, फ्रान्स, कतार, अमेरिका इथल्या माध्यमांनीही बीबीसीइतका वेळ नसला तरी बराच वेळ या विषयाला दिला.

जगभरच्या करोडो लोकांनी राणीचा मृत्यूसोहळा पाहिला, टीव्हीवरच्या चर्चा ऐकल्या, पेपरात छापून आलेला मजकूर पाहिला. युकेच्या लोकांनी तो श्रद्धापूर्वक आणि परंपरा जपण्यासाठी पाहिला. इतर लोकांच्या डोळी तो सोहळा हे एक स्पेक्टॅकल म्हणजे देखणा उत्सव होता. सोहळ्यात भाग घेणाऱ्या लोकांचे पोषाख, त्यांची वाद्यं, सैन्याच्या कवायती, राजवाड्यांच्या कमानी, खिडक्या, टिंटेड काचा, ऑर्गन, गायकांचे कपडे, सगळं डोळ्यांना सुखावणारं होतं. खूप कष्ट आणि खर्च करून तयार केलेली ऐतिहासिक फिल्म पहावी तसा हा सोहळा होता.

युक्रेनमधे युद्ध चाललंय. इथियोपिया, सुदान, सीरियात युद्ध चाललंय. खुद्द ब्रिटनमधे लोक महागाईनं त्रस्त आहेत. युरोपात, चीनमधे, जपानमधे वादळाचा धुमाकूळ चाललाय. जगभर महागाई आणि मंदीचं सावट आहे. युक्रेन युद्धामुळं तेल मिळणार नाही, थंडीत कुडकुडून मरावं लागेल या भीतीनं युरोप हादरलंय. अशा स्थितीत राणीच्या मरणात काडीमात्र इंटरेस्ट नसलेले लोकही खूपच.

लोक असंही म्हणत होते की एका लहानशा देशाची एक नाममात्र असलेली राणी मरण पावली तर त्यावर इतका वेळ खर्च करायचं कारण काय?

राणी एक मुकूट वापरत असे. लोक म्हणतात की त्या मुकुटातले हिरे जगातल्या देशांमधून पळवलेले, चोरलेले, लुटलेले, फूस लावून मिळवलेले वगैरे होते, त्या त्या देशातल्या लोकांना नाईलाजाने नजराणा म्हणून द्यावे लागलेले होते.

भारतातल्या लोकांच्या लक्षात आहे की त्यांचा कोहिनूर हिरा राणीनं पळवलाय. जालियानवाला बाग ब्रिटिशांनीच केलं. या राणीनं नाही, पण या राणीच्या आधीच्या राजे राण्यांच्या सरकारांनीच भारताची लूट केली हेही भारतीयांना बोचत असतं.

तिकडं आफ्रिकेचं तर विचारूच नका. काळे आफ्रिकन ही माणसंच नव्हेत, ते देवाच्या शापानं तयार झालेले पापी शापित आहेत असं ब्रिटिशानी पसरवलं आणि त्यांना गुलाम करून त्यांचा व्यापार केला. त्या त्या वेळच्या ब्रिटीश राजा राण्यांचा या उद्योगांना आशिर्वाद असे.

अशा एका लुटालूट करणाऱ्या साम्राज्याच्या एका राणीचं इतकं कौतुक कशासाठी? एकेकाळच्या साम्राज्याचा एक अवशेष म्हणून उरलेल्या एका राणीचा मृत्यूसोहळा का पहायचा? असंही अनेक लोक म्हणाले.

तरीही करोडो लोकांनी मृत्यू सोहळा का पाहिला?

शेवटी शेवटी तर सोहळा हा एक विनोद झाला होता, थट्टेचा विषय झाला होता.यावेळी आलेल्या लोकांच्या रांगेचं एक टोक लंडनमधे तर दुसरं टोक फ्रान्समधे पोचलं होतं असं लोक म्हणू लागले. रांग युरोप आणि रशियापर्यंत पसरली होती असंही लोक आपसांत बोलत होते.

तरीही लोकांनी मृत्यूसोहळा का पाहिला?

पंतप्रधान मार्गारेट थॅचर वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेवर आर्थिक निर्बंध लादायला तयार नव्हत्या. लोकांचा त्यासाठी थॅचर यांच्यावर राग होता. दर आठवड्याला घडणाऱ्या भेटीत राणी एलिझाबेथनी थॅचरकडं या बाबत नाराजी व्यक्त केली.

राणीच्या भेटीनंतर द.आफ्रिकेवर ब्रिटननं निर्बंध लादले.

लंडनमधे प्रदूषण वाढलं होतं. प्रदूषण त्वरीत दूर होईल यासाठी चर्चिल पावलं उचलायला तयार नव्हते. लोकांमधे नाराजी होती. चर्चिलना विनंती-तंबी देण्यासाठी राणीनं बोलावून घेतलं. चर्चिलचं नशीब असं की राणीकडं जाण्याच्याआधी काही मिनिटंच धुकं नाहिसं होऊन सूर्य मोकळा झाल्यानं लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण चर्चिलना राणीच्या नाराजीचा अंदाज आला होता, एव्हढंही पुरेसं होतं.

हिटलरनी लंडनवर बाँबवर्षाव सुरु केला होता. ब्रिटन खलास होणार की काय अशी स्थिती होती. ब्रिटननं हिटलरशी शांतता करार करावा असा दबाव चर्चिल यांच्यावर होता. चर्चिल अजिबात तयार नव्हते. राणी एलिझाबेथचे वडील तेव्हां राजा होते. त्यांनी चर्चिलना सांगितलं की शांतता करार करू नका, हिटलरशी लढा, मी तुमच्याबरोबर आहे. राजाच्या या आश्वासनामुळं चर्चिलना बळ मिळालं.

राजा किंवा राणी ब्रिटनच्या राज्यकारभारात थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत. पण राजाचं वजन आणि धाक सरकार-पंतप्रधानाला विचार करायला लावतो.

ब्रिटीश संसदेचं उद्घाटन राजा (मोनार्क) करतो. निवडणुका झाल्यावर बहुमत मिळवलेल्या पक्षाच्या नेत्याला राजा बोलावतो आणि आपल्या वतीनं सरकार स्थापन करा असं सांगतो. तांत्रीकदृष्ट्या लोकसभा भरणं आणि सरकार तयार होणं या गोष्टी राजाच्या मंजुरीनुसार होत असतात.

एकेकाळी संसदेत राजाची माणसं एव्हवढी असत की राजा सांगेल तशीच लोकसभा चालत असे, सरकार राजाच्या म्हणण्याप्रमाणंच चालत असे. लोकशाही विकसित झाली, संसदेमधे थेट लोकांमधून खासदार निवडून जाऊ लागले. त्यामुळं लोकसभेवरचा राजाचा प्रभाव संपला. तरीही अधिकृतरीत्या राजाची मंजुरी टिकवण्यात आली.

देशाच्या कारभाराचा रिपोर्ट दररोज राजाच्या टेबलावर जात असतो. देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय घटनांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा राजाजवळ असते. राजा देश आणि जगातल्या घटनांवर भले काहीही बोलत नसेल तरी राजाचं त्यावर लक्ष असतं ही गोष्टही पुरेशी असते. राजा आपल्याला बोलावून आपली नाराजी व्यक्त करू शकतो एव्हढी शक्यताही सरकारला ताळ्यावर ठेवू शकते.

राणी एलिझाबेथनी सरकारच्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. एलिझाबेथनी कधीही पक्षपाती राजकीय उद्योग केले नाहीत. पण त्यासाठीच तर त्या होत्या.

घरात वडीलधारं माणूस असतं. ती वडीलधारी व्यक्ती पैसा, शारीरीक शक्ती इत्यादी सर्व बाबतीत वृद्ध असते, सक्रीय नसते. पण ती असते याचाच एक मोठा आधार घराला असतो. वडीलधाऱ्यांनी न वापरलेला धाक हे एक न वापरलेलं हत्यार असतं. ते वापरलं जात नाही हीच त्या हत्याराची धार असते. शहाणपणाचा सल्ला मिळणं, लक्ष आहे एव्हढं घरच्यांना कळणं हेच महत्वाचं.

परतंत्र भारतात गव्हर्नर जनरल होता, तोच देश चाळवत असे. तो राजाच असे. स्वतंत्र भारतात राष्ट्रपती आणि राज्यपाल ही पदंही राजासारखीच आहेत. धाक म्हणून. दोघांनीही राज्यकारभारात हस्तक्षेप न करणं, पक्षपाती उद्योग न करणं अपेक्षीत असतं. राज्यपाल सर्रास सत्ताधारी पक्षाच्या बाजूनं वागू लागले की त्यांचा धाक संपतो. देशात असंतोष असेल तर राष्ट्रपतीनं पंतप्रधानाशी अत्यंत हलक्या आवाजात चौकशी करणं एव्हढंच राष्ट्रपतीकडून घडायला हवं. ते न घडता राष्ट्रपती जर पंतप्रधानांच्या पाया पडताना दिसू लागले तर राष्ट्रपदीपद निरर्थक ठरतं.

राणी हा नैतिक धाक होता. राणीनं तो टिकवला.

राणीचा मृत्यूसोहळा पहाताना लोकांना घरातली एक वडीलधारी आजी आठवली. ब्रिटीश राजघराण्यात आणि समाजात खूप संकटं आली, लफडी झाली; एलिझाबेथ आजीनं ते सारं निष्ठेनं निभावून नेलं. मुलं, नातवंडं वांडपणानं वागली; आजीनं ते निभावलं. एलिझाबेथ आजीचं असणं लोकांना कंफर्ट देणारं होतं.

ते सारं लोकांना आठवलं.

म्हणून तर कुरकूर करत, थट्टा करत, लोकांनी राणी एलिझाबेथचा मृत्यूसोहळा मन लावून पाहिला.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0