राजापूरमध्ये रिफायनरीच्या विरोधात मोर्चा

राजापूरमध्ये रिफायनरीच्या विरोधात मोर्चा

रत्नागिरी : नाणार येथील रद्द झालेली रिफायनरी प्रस्तावित करण्यात आलेल्या बारसू-सोलगाव या राजापूर तालुक्यातील गावांतील नागरिकांनी आज राजापूर तहसील कार्य

विद्येचे माहेर घर पुणे, झाले आहे आंदोलनांचे माहेरघर !
संसदेच्या आवारात निदर्शने, धरणे, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
लोक, राष्ट्र आणि नागरिक : निषेधाचे शास्त्रीय निदान

रत्नागिरी : नाणार येथील रद्द झालेली रिफायनरी प्रस्तावित करण्यात आलेल्या बारसू-सोलगाव या राजापूर तालुक्यातील गावांतील नागरिकांनी आज राजापूर तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढून, आपला रिफायनरीला विरोध असल्याचे पत्र दिले.

बारसू-धोपेश्वर, सोलगाव, देवाचे गोठणे परिसरामध्ये रिफायनरीसाठी जागेचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. या सर्व गावांच्या पंचक्रोशितील नागरिकांनी राजपुर तहसील कार्यालयावर सकाळी मोर्चा काढला होता. स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने करत प्रकल्पाला कडाडून विरोध केला. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग होता. युवकांचा आणि मच्छीमारांचा सहभाग होता. यावेळी वेगळे राजकीय उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान १२ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकल्पासाठी बारसू परिसरातील १३ हजार एकर जागा प्रस्तावित करत असल्याचे माध्यमांनी उघड केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

बारसू परीसारतील ९० टक्के जागा पडीक असून, तिचा प्रस्ताव रिफायनरीसाठी तयार करण्यात येत आहे. तसेच आणखी अडीच हजार एकर जागा टर्मिनससाठी परिसरामध्येच प्रस्तावित करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हंटल्याचे माध्यमांनी आपल्या वृत्तात म्हंटले आहे.

नाणारमध्ये रिफायनरीच्या विरोधात असणाऱ्या शिवसेनेकडून बारसू परिसरात रिफायनरी उभारण्यासाठी सकारात्मक वक्तव्ये येत आहेत. त्यामुळे रिफायनरीचा मुद्दा तापला आहे.

२८ आणि २९ मार्चला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता. त्यावेळी रिफायनरी समर्थकांना आमदार साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाला ठाकरे यांनी भेट दिली, मात्र रिफायनरी विरोधकांना भेट दिली नसल्याचा दावा करण्यात आल्याचे, ‘द हिंदू’ने वृत्त दिले आहे.

यावेळी पर्यावरणवादी कार्यकर्ते सत्यजित चव्हाण, साईली पलांडे दातार, अविनाश किनकर, नितीन जठार, प्रसाद गावडे यांची भाषणे झाली.यावेळी हृषीकेष पाटील, नेहा राणे, कमलाकर गुरव, प्रकाश गुरव आणि नाणार रिफायनरी विरोधी समितीचे अशोक वाल्लम उपस्थित होते.

बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी कृती समितीतर्फे गेले ८ दिवस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना माहिती देण्यात येत होती. ११ वाजता राजापूर जवाहर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. गावकऱ्यांनी स्वतः पैसे जमवून मोर्चाचे नियोजन केल्याचे प्रसाद गावडे यांनी सांगितले.

(छायाचित्रे – अविनाश किनकर )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0