रस्त्यावरच्या नमाजाविरोधातही राज ठाकरे आक्रमक

रस्त्यावरच्या नमाजाविरोधातही राज ठाकरे आक्रमक

मुंबईः मशिदींवरच्या भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावर पुन्हा भर देत ४ मे नंतर राज्यात रस्त्यावरच्या नमाजावरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. रविवारी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच्या एका जंगी सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावरही कडाडून टीका केली.

आपल्या तासभराच्या भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर ४ मे नंतर बंद न झाल्यास मनसेचे कार्यकर्ते मशिदींपुढे हनुमान चालिसा दुप्पट आवाजात म्हणतील, त्यानंतरही भोंगे बंद झाले नाहीत तर त्या पुढील परिस्थितीला कोणीही जबाबदार राहणार नाही. लाऊडस्पीकर हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. तो विषय धार्मिक करणार असाल तर आम्ही धार्मिक पद्धतीनेच उत्तर देऊ, असाही इशारा दिला. सर्व मशिदींवरचे भोंगे बंद झाल्यानंतर मंदिरांवरचे भोंगे उतरवले जातील. मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छा देखील नाही. मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, असेही ठाकरे म्हणाले

शरद पवारांवर टीका

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाची उपस्थितांना आठवण करून देत शरद पवार यांच्या जातीय राजकारणावर टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांना ब्राह्मण म्हणून पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले असा आरोपही त्यांनी केला.

शरद पवार शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाहीत, हे मी सांगितल्यानंतर सगळे बोलायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी जात मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही. माझ्या टीकेनंतर शरद पवार यांचे देवाला पाया पडतानाचे फोटो समोर आले. पण सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत माझे वडील नास्तिक असल्याचे सांगितले होते. यापेक्षा आणखी काय पुरावा हवा आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS