राजस्थान कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये बेबनाव झाला असून, पायलट यांनी उघड बंद केल्याने कॉँग्रेस सरकार धोक्यात आले आहे.
राजस्थानात काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पक्षामध्ये नाराज असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे.
आपल्याकडे पक्षाच्या ३० पेक्षा जास्त आमदारांचा, काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा पायलट यांनी दावा केला आहे. सोमवारी सकाळी जयपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत.
कॉँग्रेसने रणदीप सुरजेवाला आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांना तातडीने जयपूर येथे पाठवले असून, सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा अविनाश पांडे यांनी केला. सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे तसेच राजस्थानमधल्या घडामोडींची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना माहिती देण्यात आल्याचे पांडे यांनी संगितले.
रविवारी सकाळी सरकार फोडण्याच्या आरोपाखाली सरकारकडून पायलट यांना नोटिस बजावण्यात आली होती. त्यानंतर पायलट यांनी उघड बंडचा इशारा दिला. आपले घर सोडण्याचे कोणालाही दुःखच होते मात्र अपमान सहन कारणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते के.सी.वेणूगोपाल यांची भेट घेतली. सचिन पायलट यांनी अहमद पटेल यांना भेटून आपली नाराजी त्यांना सांगितल्याचे समजते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याबरोबर आपले मतभेद विकोपाला गेल्याचेही त्यांनी पटेल आणि वेणुगोपाल यांना सांगितल्याचे समजते.
२०१८ साली जेव्हा काँग्रेसने राजस्थान विधानभा निवडणुकीत २०० पैकी १०७ जागा जिंकल्या, तेव्हा मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला होता. सचिन पायलट राजस्थान कॉँग्रेसचे अध्यक्ष होते आणि ते मुख्यमंत्री पदासाठी ठाम होते. मात्र त्यावेळी तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पायलट यांची समजूत काढून उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना राजी केले होते. तेंव्हापासूनच गेहलोत आणि पायलट यांच्यामध्ये फारसे सख्य नाही.
दरम्यान भाजपतर्फे राजस्थानमध्ये कॉँग्रेस सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यात ते यशस्वी होणार नाही असे अविनाश पांडे म्हणाले.
शनिवारी कॉँग्रेस सरकार पडण्याच्या आरोपावरून दोन भाजप नेत्यांना अटक करण्यात आली होती.
रविवारी दिवसभर राजस्थानात राजकीय घडामोडी सुरू होत्या. रात्री उशिरा अशोक गेहलोत यांनी आमदारांची बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली होती. त्यावेळी सरकारला धोका नसल्याचा दावा करण्यात आला.
COMMENTS