प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग ३

प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग ३

‘द वायर मराठी’मध्ये १७ मे २०२० रोजी डॉ. दिलीप चव्हाण यांचा ‘मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी…’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्या लेखावर चिन्मय धारूरकर यांनी ‘शुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा संबंध काय !’, ही ३१ मे २०२० ला प्रतिक्रिया लिहिली होती. त्याचा प्रतिवाद करणाऱ्या लेखाचा हा तिसरा भाग.

प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग ४
भाषिक अंतराचे काय ?
इंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र

सुहासिनी लद्दू यांनी असे मत व्यक्त केले आहे, की व्याकरण रचण्यासाठी व्याकरणकारांचा भाषाप्रकार निवडण्याचा निर्णय हा व्याकरणाच्या प्रयोजनावर अवलंबून असतो. त्या लिहितात, की व्याकरणं ही शाळेचे विद्यार्थी, परकीय विद्यार्थी आणि त्याच भाषेच्या भाषिकांना प्रमाण भाषा शिकविण्यासाठी रचली जातात आणि अर्थातच अशी व्याकरणं ही आदेशात्मक बनतात. अशा व्याकरणांद्वारे संबंधित भाषेच्या भाषिकांचे प्रशिक्षण हे शुद्ध-अशुद्ध, योग्य-अयोग्य, स्वीकारार्ह-अस्वीकारार्ह प्रमाण-अप्रमाण अशा भाषिक द्वैती वापरामध्ये केले जाते. अलीकडच्या काळात व्याकरणाचे आकलन हे केवळ भाषेची आंतरिक व्यवस्था असे केले जात नाही; तर व्याकरणामध्ये एक सामाजिक घटकदेखील दडलेला असतो असे मानले जाते. [40]

इ.स. १९६७-मध्ये आयोजित केलेल्या ४७-व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. भि. कोलते यांनी मराठी भाषेच्या व्याकरणांवरील चर्चेला नव्याने सुरुवात केली. इ.स. १९७०-च्या सुमारास उदयास आलेल्या दलित आणि ग्रामीण साहित्याने तत्कालीन साहित्याच्या रूप व आशयाला आव्हान दिले. या बदलाला अनुसरून कोलते यांनी अशी टीका केली, की उच्चजातीय अभिजनांमध्ये कनिष्ठजातीयांच्या भाषा आणि मराठी भाषिक प्रदेशांतर्गतच्या भाषिक वैविध्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते.[41]

कोलत्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सारांशरूपाने असे आहेत:

१) भाषेत शुद्ध किंवा अशुद्ध असे काही संभवत नाही. शुद्धाशुद्धतेच्या कल्पना सुशिक्षितांनी निर्माण केल्या.

२) मराठीची प्रचलित व्याकरणे ही मराठीची केवळ एक बोली असलेल्या भाषाप्रकारावरच आधारलेली आहे. ऊर्वरित भाषाप्रकार हे रुचिहीन / ग्राम्य म्हणून संबोधले गेले.

३) मराठीच्या व्याकरणांनी भाषाविषयक शुद्धाशुद्धतेच्या संकल्पनांचे दृढीकरण केले.

४) मराठीतील भाषाशास्त्रविषयक विचार हा भाषाशास्त्रात प्राथमिक समजल्या जाणार्‍या बोली / वाचा यांवर आधारलेले नसून लेखन-रीतिवर आधारलेले आहे.

५) मराठीच्या व्याकरणांचे स्वरूप हे प्राय: ऐतिहासिक व अ-वर्णनात्मक स्वरूपाचे असून या व्याकरणांची रचना करणारे हे संस्कृत भाषेने प्रभावित झालेले होते.

६) जनतेच्या तोंडी असलेले असंख्य शब्द हे शब्दकोशात नसतात. शिक्षितांकडे असलेला शब्दसंग्रह हा मर्यादित व बंदिस्त असतो.

७) मराठीविषयक शुद्धलेखन / नियमानुसारी लेखन हे मूळ मराठीचे नसून ते संस्कृतावर आधारलेले आहे.

कोलत्यांच्या या भूमिकेला अशोक केळकर (१९२९-२०१४) यांनी प्रतिसाद देऊन भाषेच्या प्रमाणीकरणाची बाजू घेतली. काळाच्या ओघात एका विशिष्ट भूप्रदेशाच्या किंवा वर्गाच्या गरजेपोटी प्रमाण भाषा उदयाला येते, हे केळकर स्वीकारतात. परंतु, त्यांच्या मते, प्रमाण-बोली मूळची जरी एका विशिष्ट प्रदेशातील वा वर्गातील लोकांची बोली असली तरी हळूहळू ते नाते तुटते किंवा शिथिल होते. अशा वेळी प्रमाण-बोली ही विशिष्ट प्रदेशाची वा वर्गाची ‘मालमत्ता’ राहत नाही.[42] असे आकलन अशा गृहीतकावर आधारलेले आहे, की प्रमाण भाषेमध्ये स्वत:चे लोकशाहीकरण साधण्याची प्रवृत्ती ही निसर्गत:च असते. असे आकलन हे खूप भाबडेपणाचे तसेच अ-राजकीय स्वरूपाचे ठरेल. परिणामी, ते भाषाविकासाला बाधा पोहोचविणारे ठरते.

कोणत्याही समाजात प्रमाण भाषा ही प्रभुत्वशाली वर्गासोबतची तिची साथ कधीच सोडत नाही आणि तिचा विस्तार हा नेहमीच गतिशीलतेच्या सामाजिक संधींनी नियंत्रित असतो, या वास्तवाकडे केळकर डोळेझाक करतात. प्रमाण भाषा ही जरी पारंपरिक अभिजनांची मक्तेदारी राहत नसली, तरी ही भाषा ही भाषिक समूहाच्या सर्व सदस्यांकडून समान पद्धतीने वा सहजपणे स्वीकारली जात नाही. मिलरॉय आणि मिलरॉय यांनी असे मत नोंदविले आहे की, आकाशवाणी आणि दूरचित्रवाहिन्यांवरून साठ वर्षांहून अधिक प्रमाण इंग्रजी ऐकूनही इंग्लंडमधील केवळ ३ ते ५ टक्के लोकच प्रमाण इंग्रजी बोलू शकतात.[43] भारतासारख्या देशात भाषेशी भेदाभेद जुळलेले असल्याकारणाने प्रमाण समजले जाणारे उच्चार करणार्‍यांचे प्रमाण यापेक्षा कमी असणे संभव आहे. भारतासारख्या देशात विविध जातिगटांमधून नव्याने उदयास आलेल्या अभिजन वर्गाला नव्या ‘जात-वर्गीय’ संरचनेत सामावून घेतले जाते आणि या प्रक्रियेत हा नवा अभिजनांचा वर्ग प्रमाण भाषा स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. अशा पार्श्वभूमीतून उदयाला आलेल्या नव्या अभिजन वर्गाचा जुन्या मध्यम वर्गामधील सीमांती अंतर्भाव आणि या नव्या अभिजन वर्गाकडून प्रमाण भाषा शिकण्याचा प्रयत्न यांद्वारे प्रमाण भाषेला अधिमान्यता प्राप्त होते; परंतु प्रमाण भाषेची कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेला नव-शिक्षित अभिजन वर्ग हा अगदी औपचारिक प्रसंगीदेखील मोठ्या प्रयत्नानेच प्रमाण भाषा वापरण्यात यशस्वी होतो. तेव्हा अशा प्रमाण भाषेचा वापर करण्यात विद्यार्थ्यांनी प्रवीण असावे, हा आग्रह किती संयुक्तिक आहे?

प्रमाण भाषा ही भाषिकांच्या जात-वर्गीय दर्जाचा निदर्शक ठरते. औपचारिक भाषा धोरण, सार्वत्रिक शिक्षण, माध्यमे इत्यादींद्वारे प्रमाण भाषा लादण्याचा जाणीवपूर्वक आणि सुनियोजित प्रयत्न जरी आधुनिक राज्यसंस्था करीत असली, तरी समाजातील केवळ एका घटकालाच प्रमाण भाषा अनुसरण्यात यश प्राप्त होते. मार्नी हॉलबोरो यांनी असे मांडले आहे, की इंग्रजीच्या प्रमाणीकरणाच्या दीड शतकानंतरही प्रमाण इंग्रजी ही केवळ दुष्प्राप्यच राहिलेली नाही; तर इंग्रजीच्या इतर बोली आणि बोलण्याच्या स्थानिक रीती ह्या पूर्णपणे नाश पावल्या नाहीत.[44] पिटर ट्रड्जील यांनीदेखील असे दाखवून दिले आहे की, केवळ दूरदर्शन किंवा रेडिओवर प्रमाण इंग्रजी ऐकून लोकांच्या बोलण्याच्या वैविध्यपूर्ण रीतींवर परिणाम झाला नाही.[45] मिलरॉय आणि मिलरॉय यांनी असे दाखवून दिले आहे की, प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत आदेशात्मकतेचा टप्पा फारसा यशस्वी होत नाही; विशेषत:, वाचेचे प्रमाणीकरण पूर्णपणे होत नाही.[46]  जे. बॉईड आणि झेड. बॉईड या अभ्यासकांचा दाखला देऊन मिलरॉय आणि मिलरॉय यांनी असे मांडले आहे की, अप्रमाण बोल्यांमध्ये भाषिक वैविध्य आणि इतर गुण असतात; तरीही या बोलींची निवड ही प्रमाणीकरणासाठी केली जात नाही. मिलरॉय आणि मिलरॉय यांच्या मते, असे घडविण्यामागे भाषिक विकासाच्या प्रेरणांपेक्षा स्वसमूहाचे सामाजिक हित अधिक कारणीभूत असते.[47]

मराठीचे पारंपरिक अभ्यासक आता हे स्वीकारताहेत की, कोणत्याही भाषेची बोली ही प्रमाण भाषाप्रकाराएवढीच सन्मानास पात्र आणि अभ्यासनीय आहे.[48] एकोणिसाव्या शतकात रा. भि. गुंजीकरांसारख्या अभ्यासकांनी बोलीभाषांच्या सन्मानाविषयीच्या अनुकुलतेची नोंद घेतली होती. तथापि, भाषा आणि बोली ह्या समान आहेत आणि त्यांपैकी कुणीही दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ नाही, या धारणेला आता आव्हान दिले गेलेले आहे. अशी धारणा बोलीचा रास्त दर्जा तिला प्राप्त करून देते; परंतु असे गृहीत धरताना बोलीमध्ये ओतप्रेत भरलेले ऐश्वर्य, जिवंतपणा, वैविध्य आणि लवचीकता बोलींपासून हिरावून घेतली जाते.

विल्यम लेबॉव्ह (१९२७- ) यांचा अमेरिकेतील अ-प्रमाण (non-standard) इंग्रजीचा अभ्यास असे दाखवितो की, न्यूयॉर्क शहरातील झोपडपट्टीतील कनिष्ठवर्गीय विद्यार्थी जी इंग्रजी वापरतात त्यामध्ये प्रचंड प्रमाणावर भाषिक उद्दीपन (verbal stimulation) आहे. तसेच, त्यांना असेही आढळले की, ही मुलं मध्यमवर्गीय मुलामुलींपेक्षा अधिक सुनियोजित वाक्ये ऐकतात आणि ते उच्च दर्जाच्या भाषिक संस्कृतीमध्ये सहभाग घेतात. लेबॉव्ह यांनी या अ-प्रमाण भाषाप्रकारांच्या अभिव्यक्तीक्षमतेवर प्रकाशझोत टाकला आणि तौलनिक अभ्यास करून असे मांडले की, प्रमाण अमेरिकी इंग्रजी ही शब्दबंबाळ आणि अस्पष्ट / संदिग्ध आहे.[49] लेबॉव्ह यांच्या निष्कर्षामुळे बोली आणि प्रमाण भाषेविषयीच्या पारंपरिक धारणांना प्रश्नांकित केले आहे.

युरोपीय रोमॅण्टिक (स्वच्छंदतावादी) चळवळीपासून आणि याच चळवळीने जन्मास घातलेल्या वाड्.मयविद्येच्या विज्ञानापासून (philological science) प्रभावित झालेले नव्या वासाहतिक सत्ताधिशांनी वासाहतिक व्यवहारविश्वाला पेलू शकेल, या उद्देशाने भारतीय भाषांचा विकास करण्याच्या नावे या भाषांच्या काही विशिष्ट प्रकारांचे प्रमाणीकरण करण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ, बांग्ला भाषेच्या प्रमाणीकरणाची गरज अठराव्या शतकाच्या शेवटीच जेव्हा ब्रिटिशांना भासली तेव्हा नॅथॅनिएल बी. हॅल्हेड (१७५०-१८३१) यांनी असे लिहिले की, “साम्राज्याच्या आधुनिक संकल्पना व्यक्त करेल अशी कोणतीही बांग्ला बोली नाही.”[50] बांग्ला भाषेच्या प्रमाणीकरणाचे कार्य साधण्यासाठी हॅल्हेड यांनी बांग्ला भाषेचे व्याकरण रचायला सुरुवात केली. ग्राम(र) ऑव्ह बेंगाल लँग्वेज या पुस्तकात त्यांनी अशी शिफारस केली, की बांग्ला भाषा ही परकीय शब्दसंग्रहापासून मुक्त केली पाहिजे आणि “संस्कृत या भाषेकडे कोणत्याही प्रकारच्या नवनिर्मितीसाठी ऊर्जास्त्रोत म्हणून बघितले पाहिजे.”[51] युरोपीय रोमॅण्टिक (स्वच्छंदतावादी) चळवळीच्या ओघात जेव्हा अठराव्या शतकाच्या शेवटी युरोपियनांना संस्कृतचा शोध लागला तेव्हा त्यातून तौलनिक भाषाविज्ञानाचा विकास झाला आणि संस्कृत भाषा ही पुढे चालून विकास पावू लागणार्‍या देशीभाषांसाठी मार्गदर्शनपर कायमचा संदर्भबिंदू बनून गेली.

“व्याकरण म्हणजे भाषेच्या सद्य:कालीन किंवा विशिष्टकालीन स्वरूपाचं वर्णनात्मक विवरण होय”[52], अशी व्याख्या जरी कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी केलेली असली तरी व्यवहारात व्याकरणाचे स्वरूप आणि प्रयोजन हे प्राय: आदेशात्मकच राहते. विशेषत:, आधुनिक समाजात जेव्हा शिक्षण हे सार्वत्रिक करण्यावर जेव्हा भर दिला जातो तेव्हा अभिजनवादी हितसंबंध रक्षण्यासाठी प्रमाण बोलीच्या व्याकरणाचे अध्यापन हे सक्तीचे केले जाते.

वस्तुत:, जे समूह हे कोणतीही भाषा बोलतात तेव्हा ते त्या भाषेचे व्याकरण आत्मसात करूनच बोलत असतात. यासाठी नोम चॉम्स्की यांची साक्ष जरी आपण सध्या टाळली तरी दादोबा पांडुरंगांसारखे एकोणिसाव्या शतकातील व्याकरणकार जर “भाषेत नियम नसते तर भाषाच नसती”, असे जेव्हा समजत किंवा अरविंद मंगरूळकर यांच्यासारखे व्याकरणाचे अभ्यासक “प्रत्येक भाषा ही आपापल्यापरीने आपली नियमव्यवस्था घेऊनच विद्यमान असते.”, असे जेव्हा समजतात तेव्हा त्या भाषेच्या भाषिकांनी त्यांच्या भाषेची रचना ही मनोमन आत्मसात केलेली असते. अ‍ॅण्टोनिओ ग्राम्शी (१८९१-१९३७) यांनी अशा प्रकारच्या व्याकरणाला “स्पॉण्टेनिअस ग्राम(र)” संबोधले आहे. जर एखाद्या भाषेच्या भाषिकांनी त्या भाषेचे व्याकरण आत्मसातच केलेले असेल, तर त्या भाषिकांनी स्वतंत्रपणे शालेय अभ्यासक्रमातून व्याकरण सक्तीने शिकण्याची काय आवश्यकता असते? असे घडण्याला तीन कारणे संभवतात :

  • प्रमाणीकरण ही प्रक्रिया एकंदरच भांडवलशाहीतील अत्यावश्यक प्रक्रिया असल्याने भाषेच्या प्रमाणीकरणाचे कार्य व्याकरणाच्या रचनेतून आणि अध्यापनातून साधले जाते.
  • अभिजन वर्गाची बोली आणि लिखित भाषा यांवर व्याकरण आधारलेले असल्याने अभिजनेतर वर्ग आणि भाषेच्या लिखित परंपरेबाहेरील समूह हे या प्रक्रियेत परात्मता अनुभवतात.
  • अप्रमाण भाषा बोलणार्‍या समूहांच्या भाषा ह्या व्याकरणाचा आधार न केल्यामुळे या समूहांच्या भाषिक अभिव्यक्ती ह्या अध्ययनापासून वंचित राहतात. त्यांच्या भाषांची नियमव्यवस्था ते स्वत: शिक्षित होऊनही शिकत नाहीत. परिणामी, स्वभाषेविषयी एक प्रकारची अनास्था आणि प्रसंगी घृणाही ते बाळगायला लागतात.

प्रमाण भाषेबाबतच्या काही धारणांना आव्हान देणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, प्रमाण भाषा ही लोकशाही प्रक्रियेतून विकास पावते. वस्तुत:, प्रमाण भाषा ही कोणत्याही लोकशाही प्रक्रियेतून विकास पावत नाही. यासंदर्भात पहिला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, पाठ्यपुस्तकं ही प्रमाण भाषेच्या प्रचार-प्रसाराची मुख्य साधनं असतात. पाठ्यपुस्तकनिर्मितीची प्रक्रिया ही औपचारिक अर्थाने लोकशाही प्रक्रियेच्या कक्षेबाहेर ठेवण्यात येते. पाठ्यपुस्तकातील केवळ आशयच हा अभिजनवर्गाला पूरक नसतो; तर त्यातील भाषादेखील प्रामुख्याने प्रमाण भाषा असते. प्रसिद्ध विचारवंत कांचा इलाया यांनी तेलुगु भाषेतील शालेय पाठ्यपुस्तकांबाबत असे मत मांडले की, पाठ्यपुस्तकातील प्रमाण तेलुगु ही इतकी संस्कृताधिष्ठित होती की, त्यांना  व इतर दलित विद्यार्थ्यांना ती एखाद्या विदेशी भाषेप्रमाणे परकी वाटायची.[53] संकृताधिष्ठित प्रमाण भाषेच्या अतिरेकी आग्रहामुळे भारतातील शिक्षणप्रसारावर मर्यादा आलेली आहे.

दिशाभूल

भाषाविज्ञान कशाला म्हणतात याबाबत माझे विधान दिशाभूल करणारे आहे आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना भाषावैज्ञानिक म्हणता येणार नाही, असे मत चिन्मय धारूरकर यांनी व्यक्त केले आहे. वस्तुत:, कुणाचीही दिशाभूल करण्याचा माझा मानस नाही. धारूरकर म्हणतात त्याप्रमाणे आधुनिक भाषाविज्ञानाची पायाभरणी जरी सोस्यूर यांनी केलेली असली, तरी भाषिक विचार मांडण्याला त्यापूर्वीच सुरुवात झाली होती. म. पां. सबनीसांनी दादोबांना ‘भाषाशास्त्रज्ञ’ म्हटले. “वरील मंडळी मराठीची व्याकरणकार म्हणता येतील”, या धारूरकरांच्या विधानात अर्थातच कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा उल्लेख येतो. तथापि, चिपळूणकरांनी मराठीचे व्याकरण रचले नाही. त्यांना ‘व्याकरणकार’ कसे म्हणता येईल?

प्रा. धारूरकर म्हणतात “डहाके, शेख, भावे इत्यादी लेखनकोशात तसे आहे म्हणजे ते बरोबर आणि फडके दुसरं सांगतात म्हणून ते चूक आणि म्हणून ते शुद्धिवादी असा सरळसोट निष्कर्ष ते [चव्हाण] काढून मोकळे होतात.” तर माझ्या मूळच्या लेखात मी एवढेच म्हटले आहे की, भाषा ही अनेक पध्दतींनी वापरता येते  आणि जो ‘दुर्मिळ’ शब्द अरूण फडके यांना अयोग्य वाटतो आणि त्यासाठी ते या शब्दावर फुली मारतात; तर ‘दुर्मीळ’ हा शब्द त्यांना योग्य वाटतो. मी एवढेच म्हणालो,  वा. गो. आपटे (“शब्दरत्नाकर”), वसंत आबाजी डहाके व गिरीश पतके (“शालेय मराठी शब्दकोश”), यास्मिन शेख (“मराठी लेखन मार्गदर्शिका”) आणि ह. अ. भावे (“वरदा मराठी शब्दकोश”) या शब्दकोशांमध्ये  हा शब्द “दुर्मिळ” असा लिहिलेला आहे!” याव्यतिरिक्त द. बा. महाजन यांच्या “अभिनव समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश” या शब्दकोशामध्येदेखील हा शब्द ‘दुर्मिळ’ असाच लिहिलेला आहे. हा भाषिक वैविध्याचा प्रकार म्हणून स्वीकारता येईल. उदाहरणार्थ गं. बा. सरदारांसारखे जे अभ्यासक आणि वर दिलेले कोशकार हे जेव्हा हा शब्द ‘दुर्मिळ’ असा लिहितात तेव्हा त्यांच्याकडे त्याबाबत काही कारणमीमांसा असेलच.

धारूरकर म्हणतात त्याप्रमाणे मी फडके यांची शब्दयोजना ‘चूक’ असे म्हणालो नाही. माझ्या संपूर्ण लेखात ‘चूक’ हा शब्द मी कोठेही वापरलेला नाही. माझे एवढेच मत मी व्यक्त केले आहे की, “भाषा ही वैविध्याने भारलेली आणि नटलेली असते तिच्या वापरात काहीही वैध अथवा अवैध असे नसते.” फडके मात्र ‘X’ अशी फुली मारून ‘दुर्मिळ’ शब्द नाकारतात. योग्य आणि अयोग्य या शब्दांसाठी विशिष्ट अशी चिन्हं वापरून फडके एक प्रकारची आदेशात्मकता त्यांच्या शुद्धलेखनावरील पुस्तकांमध्ये आणतात; म्हणून मला त्यांची पुस्तके लेखनासाठी मार्गदर्शनपर अथवा वाचनीय वाटत नाहीत. फडक्यांची पुस्तके मी वाचणार नाही, हे जे मी म्हणालो ते या अर्थाने! एखादा शब्दप्रयोग प्रचलित असताना आणि बहुतांश कोशकार आणि लेखक अनुसरत असलेल्या शब्दप्रयोगाला थेटपणे नाकारणे ही एक प्रकारची भाषिक हिंसा ठरते. तसेच हेदेखील मी स्पष्ट करणे आवश्यक आहे की, ज्या शब्दकोशांचे दाखले मी दिलेत त्या शब्दकोशांमध्ये ‘भैताडपणा’ या शब्दाचा अंतर्भाव नाही. ‘भैताडपणा’ हा शब्द वर्‍हाडात अगदी रोजच्या वापरातला शब्द आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे अप्रमाण समजल्या गेलेल्या मराठीचे व्याकरण रचले गेले नाही, त्याप्रमाणेच अप्रमाण समजल्या गेलेल्या शब्दांनाही शब्दकोशांमध्ये स्थान दिले गेले नाही. खरी ‘दिशाभूल’ इथे आहे.

डॉ. दिलीप चव्हाण हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत.

..

भाग १

भाग २

संदर्भ आणि टीपा

[40]Social factors not only influence the competence of individual speakers and the stuatus of functional language varieties; there is also a social component at the heart of grammar.” –  Dell Hymes

Matthew C. Grayshon, Towards a Social Grammar of Language (The Hague: Mouton Publishers, 1977) 53.

[41] वि. भि. कोलते, “अध्यक्षीय भाषण” अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील भाषणे व त्यांची चिकित्सा. रमेश धोंगडे संपा. (पुणे : दिलीपराज प्रकाशन, २००२) ६०७-३४ [51] Breckenridge 229.

[42] अशोक केळकर. “भाषेचे नियमन” महाराष्ट्र साहित्य पत्रिका. ४१:१६१ (१९६७): ४०-५४.

[43] Milroy et al 29.

[44] Marnie Holborow, The Politics of English: A Marxist View of Language. (London: Sage Publications Ltd, 1999) 154

[45] Holborow 154.

[46] Terttu nevalainen and Ingrid Tieken-Boon van Ostade, “Standardisation” Richard Hogg and David Denison, A History of the English Language. (Cambridge: Cambridge University Press, 2006) 286.

[47] Milroy et al 14-5.

[48] कृ. श्री. अर्जुनवाडकर “राजवाडे आणि पाणीणीय व्याकरण” भारत इतिहास संशोधन मंडळ त्रैमासिक. ९१६ (जुलै २००४ ते ऑगस्ट २००६): ४७.

[49] Holborow 179.

[50] N. B. Halhed, A Grammar of the Bengal Language (Hoogly: n. p. 1778) xx.

[51] Rosane Rocher. “British Orientalism in the Eighteenth Century: The Dialectics of Knowledge and Government” Orientalism and the Postcolonial Predicament: Perspectives on South Asia. Carol A. Breckenridge and Peter van der Veer. Eds. (1993; New Delhi: Oxford University Press, 1994) 229.

[52] कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, मराठी व्याकरणाचा इतिहास. (मुंबई : मुंबई विश्वविद्यालय आणि पुणे : ज्ञानमुद्रा, १९९२) ३६९.

[53] Kancha Ilaiah, “ A Lesson from African English” Deccan Chronicle Hyderabad, (3.10.2003).

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0