रंग रंग रंगीला रे…

रंग रंग रंगीला रे…

८ सप्टेंबर १९९५ रोजी, प्रदर्शित झालेला ‘रंगीला’ हा बंधनमुक्त होऊ पाहणाऱ्या जागतिकीकरणोत्तर पिढीच्या भाव-भावनांचा सुखावह असा प्रस्फोट होता. शत्रूविरहित तसेच विद्वेषविहिन जगाचे स्वप्न प्रेक्षकांच्या मनात पेरणाऱ्या ‘रंगीला’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त निर्मिती प्रक्रियेदरम्यानच्या पत्रकार या नात्याने साठवलेल्या आठवणींचा हा कोलाज...

क्रिकेट निकालाचे गणित
गलवान खोऱ्यात चीनचे मोठ्या प्रमाणात तळ
लोकराजाची स्मृतीशताब्दी

सण-उत्सवानिमित्त भरणाऱ्या जत्रांमध्ये लांब अंतरावरून रिंग टाकून मोहक वस्तू जिंकण्याचा मजेशीर खेळ मांडलेला असतो. असे अनेकदा होते, एकाही वस्तूवर रिंग पडत नाही. पण कधी तरी असे काही योग जुळून येतात, एकापाठोपाठ आपल्याला हव्या त्या वस्तूंवर बरोब्बर रिंग पडत जाते आणि सरतेशेवटी मोठच घबाड हाती लागल्याचा आनंद एखाद्यास होतो. नेमके असेच काहीसे ‘रंगीला’च्या बाबतीत घडले होते. म्हणजे, आमिर खान, रामगोपाल वर्मा, उर्मिला मातोंडकर, मधूर भांडारकर, गीतकार महबूब, पटकथाकार नीरज व्होरा, संवादकार संजय छेल, सिनेमॅटोग्राफर डब्ल्यू. बी. राव यांच्याशी जोडले जावून सिनेमाच्या निर्मितीप्रक्रियेचा साक्षीदार होण्याचा सहज योग जुळून आला होता. आमिरच्या मुलाखतीची इच्छा धरली. जमून आले. वर्माला बोलते करण्याचा प्रयत्न केला. यशस्वी झाला.

त्या वेळी सोबतीला सिनेमावाल्यांमध्ये फारसे परिचित नसलेले ‘युनिक फीचर्स’चे बॅनर असले तरीही, हिंदी फिल्म इंडस्ट्रीतल्या बड्या बड्या स्टार्सकडे ऊठबस असलेला ‘चंदेरी-महानगर’चा राजू पटेल आणि मोजकेच पण खास काँटॅक्ट असलेला धडाडीचा दीपक लोखंडे हे दोघे इंडस्ट्रीतला मार्ग प्रशस्त करणारे सहृदयी पत्रकार मित्र मदतीला तत्पर होते. राजूची जॅकी श्रॉफ, आमिर खान आदी स्टार्सशी घसट होती आणि दीपकचा रामगोपाल वर्मा, रणजित बारोट (सितारा देवींचा मुलगा, त्यावेळच्या जाहिरातविश्वातला प्रसिद्ध संगीतकार) आदींकडे लग्गा होता.

दीपकच त्यावेळी पहिल्यांदा रामगोपाल वर्माकडे घेऊन गेला. तर राजूने आमिर खानशी सूत जुळवून दिले होते. वर ऊर्मिलाकडेही शब्द टाकला होता. दीपकने एक दिवस असेच, ‘अरे रामूच्या ‘रंगीला’चा कुणी महबूब नावाचा गीतकार आहे. बांद्र्याला स्टेशनाजवळ म्हणे, त्याचे लव्हबर्ड्स आणि फिशटँकचे दुकान आहे, जरा शोध घे..’ असा खडा टाकला होता. मग महबूबचा शोधही घेतला. मुलाखतही आणि नंतर त्याच्याशी, त्याच्या भावाशी मुन्ना कोतवालशी रोज संध्याकाळी गप्पा मारायला जाण्याइतकी दोस्तीही होत गेली. महबूबच्याच घरी, त्यावेळचा स्ट्रगलर व्हायोलिनिस्ट असलेल्या, पण नंतर संगीतकार म्हणून तुफान प्रसिद्धी मिळवलेल्या इस्माइल दरबारशी (‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’) ओळख झाली. असे एकेक करत दरवाजे उघडत गेल्याने पुढचे काम खूपच सोपे होत गेले.

या काळात आमिर, रामगोपाल वर्मा यांनी विश्वासाने काही सांगावे, इतपत चांगली ओळख तर झालीच, पण आमिरचा तेव्हाचा ड्रायव्हरकम असिस्टंट नकी, मराठमोळा मेकअपमन श्रीकांत मोरे, आमिरचा त्याच्या इतकाच देखणा सेक्रेटरी आशीष थरथरे, वर्माचा सहनिर्माता भाऊ सोमशेखर, ठसकेबाज संवाद लिहिण्याची हातोटी असलेला संजय छेल, सिनेमात आमिरच्या मित्राची भूमिका करणारा आणि सिनेमाचे यश पाहण्याआधीच अपघातात अकाली मरण पावलेला राजेश जोशी, प्रमुख सहाय्यक म्हणून वावरणारा मधुर भांडारकर, वर्मासोबत हैदराबादहून आलेला दुसरा सहाय्यक रमण्णा अशा मंडळींशीही छान मैत्री होत गेली.

यामुळे घडायचे असे, कुणाला एका सेटवर भेटायला गेलो की, बाकीचे इतरही आढेवेढे न घेता, भेटायचे. कधी मुलाखतीच्या निमित्ताने, कधी पब्लिसिटी स्टिल्स घेण्यासाठी, कधी गाण्याचे शूटिंग आहे म्हणून, कधी आपल्याला वेळ आहे आणि शूटिंग कुठेतरी जवळपास आहे म्हणून. तेव्हा ना फिल्म इंड़स्ट्री आजच्यासारखी कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात गेली होती ना, बलदंड शरीराचे बाऊंसर सेटवर दहशत निर्माण करत स्टारलोकांच्या आगेमागे फिरत होते. त्यामुळेच ‘आओ- जाओ घर तुम्हारा’ पद्धतीने ‘रंगीला’च्या सेटवर जाणे व्हायचे. वेळ कोणतीही असो, दुपारची वा रात्रीची, कुणाला ते खटकायचे नाही, कुणी हटकायचे नाही.

हा कसा काय न सांगता, न बोलवता आला म्हणून ना वर्माच्या चेहऱ्यावर नाराजी दिसायची, ना तुम्ही न बोलवता आलातच कसे, म्हणून आमिर कधी सवाल करायचा. उलट कधी गेले की, वर्मा आसपास असेल, तर खास साउथ इंडियन कॉफी मिळायची, आमिरचा शूटिंगचा दिवस असेल तर ग्लासभर कडक चहा एक-दोनदा हमखास मिळायचा. म्हणजे, तो स्वतः तर घ्यायचाच, पण तू भी ले यार… म्हणत इतरांनाही प्यायला द्यायचा.

बरे सेटवर तर सेटवर, वर्मा अनेकदा त्याच्या अंधेरी लोखंडवालामधल्या फ्लॅटवरही या म्हणायचा. कधी सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास, तर कधी संध्याकाळी सहा-साडेसहाला. कधी ए.आर. रहमानकडून नवी ट्यून आलेली असायची. कधी नवी पब्लिसिटी स्टिल्स, तर कधी मद्रासहून गाण्याची ताजीताजी टेप आलेली असायची.

दिग्दर्शक रामगोपाल वर्माचे एडिटिंगपूर्व नोटिंग.

दिग्दर्शक रामगोपाल वर्माचे एडिटिंगपूर्व नोटिंग.

आता आठवतेय, ‘मोस्ट सेन्शुअस अँड इंटेन्स’ ठरलेले ‘हाय रामा’ हे गाणे वर्माने एका सकाळी- सकाळी हायफाय स्पीकरवरून मला आणि दीपकला सगळ्या जगाआधी ऐकवले होते. काय तो ठेका, काय तो रिदम. बऱ्याच काळानंतर काहीतरी अनप्रेडिक्टेबल, काही तरी अद्भूत भासावे, असे कानावर पडत होते. एका बाजूला गाणे सुरू असताना, हे गाणे मी कसे शूट करणार आहे, याचे वर्माचे साग्रसंगीत कॅमेरा अँगलसह वर्णनही सुरु होते.

एका भेटीत दीपकच्या आग्रहावरून कमालीचा रिझर्व्ह स्वभावाचा जॅकी श्रॉफ आणि त्याच्याहूनही रिझर्व्ह स्वभावाच्या ए. आर. रहमानशी पहिल्यांदा कसा भेटला, याचे साभिनय प्रात्यक्षिकच त्याने करून दाखवले. एकदा समोरच्या टिपॉयवर शूटिंग स्टिल्स पसरून, त्यातल्या ऊर्मिलाच्या फोटोंकडे पाहून ‘लूक हाउ ब्युटिफूल अँड मच्युअर शी लुक्स’ म्हणत, यातले छापण्यासाठी तुला पाहिजे ते फोटो घेऊन जा, म्हटले होते.

योग असाही जबरदस्त होता, त्यावेळचे आघाडीचे छायाचित्रकार आणि ‘चंदेरी’चे संपादक-लेखक गौतम राजाध्यक्षांकडेच ‘रंगीला’च्या पोस्टर पब्लिसिटी स्टिल्सचे काम आले होते. त्यांच्याकडे तर आधीपासूनच ऊठबस होती. त्यामुळे एकदा तर वर्माला पाठवण्याआधी ताज्याताज्या एक्स्पोज झालेल्या प्रिंट्स बघायला मिळाल्या होत्या. स्पेशली, जैसलमेरमधल्या ‘हाय रामा’ या गाण्यादरम्यान शूट झालेले जॅकी आणि ऊर्मिलाचे फोटो बहुदा तेव्हा राजाध्यक्षांच्या घरी वर्माआधीच पाहायला मिळाले होते. डिझायनर मनीष मल्होत्राने ऊर्मिलाचा लूक अधिक सेन्शुअस दिसावा म्हणून स्वतः शिवलेला ड्रेस तिथल्या तिथल्या उभा फाडून वर्माला कसे चकित केले होते, हेही त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले होते.

दोन-तीन गाणी वगळता, ‘रंगीला’चे बरेचसे शूटिंग मुंबईच्या रस्त्यांवर तसेच महबूब, फिल्मालया आदी स्टुडिओंमध्ये झाले होते. त्यातही सांताक्रुझ पश्चिमेकडच्या हंसराज वाडीमध्ये तर युनिटने बराच काळ डेरा टाकलेला होता. सिनेमात दिसलेले ऊर्मिलाचे (मिली) घर, आमिरच्या (मुन्ना) उपद्व्यापांचा अड्डा या सगळ्यांची पार्श्वभूमी हीच तर हंसराज वाडी होती. स्वभावाने अंतर्मुख असल्याने एरवी शांत-गप्प राहणारा वर्मा इथे अनेकदा खुललेला दिसायचा. अमूक शॉट कसा लावलाय, डायलॉग काय आहेत, प्रसंगाला पार्श्वसंगीत कसे योजले आहे, हे विश्वासाने तपशीलवार सांगायचा.

वर्माचे हिंदी तोडके-मोडके. जे बोलायचा, तेही दाक्षिणात्य वळणाने. प्रश्न पडायचा, आमिर किंवा जॅकीशी हा कसा संवाद साधत असेल. पण सगळे सुरळीत चाललेले असायचे. ‘रंगीला’चे काही शूटिंग हैदराबादला झाले होते, पण आमिरला ते पसंत पडले नाही. त्याने स्क्रिप्ट बदलायला लावले. संवाद-पटकथा बदलायला लावली, असे काय काय आडून कानावर पडायचे, पण त्याला कुणाकडून दुजोरा मिळायचा नाही. अशा वेळी बोलघेवडा मधुरही तोडावर कुलूप लावून घ्यायचा. मधुर हा रामगोपाल वर्माचा मुंबईतला ‘मॅन फ्रायडे’. पण दोघांचेही स्वभाव एकदम टोकाचे. म्हणजे, वर्मा हा इंट्रोव्हर्ट. तर मधुर मुलुखाचा बोलबच्चन. वर्मा कडकडीत नास्तिक, तर मधुर देवदेव करणारा. जमेल तसे दर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला पायी जाणारा. ‘अबे तू भी चल साले…’म्हणत पदयात्रा घडवून आणणारा आणि ‘कैसा हिंदू है तू, यहाँ तक आता है और अंदर आके दर्शन नही करता …’ म्हणत भसाभस शिव्या घालणारा.

एकदा, वर्माची सविस्तर मुलाखत घेतली. ‘युनिक फीचर्स’च्या माध्यमातून ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये प्रकाशित व्हायची होती, ती. मुलाखत लिहून झाली. सिनेमातल्या दृश्यांचे फोटो मिळाले. मुलाखत साप्ताहिकाला पोहोचती केली गेली, पण ज्याची मुलाखत घेतली, त्या रामगोपाल वर्माने त्याचा म्हणून फोटोच तोवर दिला नाही. आज देतो, उद्या देतो, असे तंगवत ठेवले. साप्ताहिकातून निरोप आला, दिग्दर्शकाचा फोटो पाठवा, पण तो कुठे मिळायचा ? कारण, तेव्हाचा वर्मा प्रसिद्धीझोतापासून कटाक्षाने दूर राहणारा, आपल्याकडे कुणाचे लक्ष जाणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी घेणारा. त्याचे व्यक्तिमत्वही सरकारी नोकरदारासारखे, खरेखोटे माहीत नाही, पण डोळ्यांवर भल्यामोठ्या फ्रेमचा चश्मा, ढगळ शर्ट, मिसमॅच पँट या अशा सामान्य रुपामुळे एकदा म्हणे, त्याला महबूब स्टुडिओच्या गेटवरच हटकले होते. तसे घडले असेल तर अडवणाऱ्याची तरी काय चूक? ‘शिवा’, ‘रात’, ‘द्रोही’ यांसारखे इंटेन्स सिनेमे देणारा दिग्दर्शक सरकारी बाबू टाइपातला असेल, अशी कल्पना कोण करील? तर असा हा सामान्यातला सामान्य भासणारा वर्मा फोटोच देईनात.

आमिर खानच्या सेटवर घेतलेल्या मुलाखतीचे पॉइंट्स.

आमिर खानच्या सेटवर घेतलेल्या मुलाखतीचे पॉइंट्स.

एक शेवटचा उपाय म्हणून फोटो मागायला गेलो. जुहूच्या सेंटॉर हॉटेलात शूटिंग सुरू होते. पिवळा शर्ट, पिवळी धम्मक पँट आणि डोळ्यांवर काळा गॉगल (मुंबईच्या फेमस काली-पिली टॅक्सी कॉम्बिनेशनची आठवण करून देणारी रंगसंगती) अशा तडक-भडक वेशातल्या आमिरची धमाल चालली होती. तो सिनेमातला इंटरव्हलच्या आधीचा… ‘सर, एसी इज ऑन…तो मेरी तरफ घुमा ना…’ हा आयकॉनिक ठरलेला सीन शूट होत होता. मजामस्तीत हा सीन शूट झाला. म्हटले, वर्मा आता हो म्हणेल. पण नाही, अखेरपर्यंत फोटो काही त्याने दिला नाही. मुलाखत देणाऱ्याच्या फोटोविनाच ती मुलाखत छापून आली. छापून आल्यानंतर अंक वर्माकडे घेऊन गेलो, तर मंद स्मित तेवढे त्याने केले. आजचा मीडिया-सोशल मीडियावरचा हायपर अक्टिव्ह, राजकारण, सिनेमा आदी विषयांवर टेरिबली व्होकल बनलेल्या वर्माचा ज्यांना अनुभव येतोय, त्यांना त्याचे हे प्रारंभीचे रुप जराही पटायचे नाही. खरे वाटायचे नाही.

रामगोपाल वर्माच्या एकदम उलट आमिर. मुलाखतीला लगोलग तयार झाला. मुलाखतीसाठी दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. अभिनय, वैयक्तिक आयुष्य, वाचन, पुस्तक, वाट्याला आलेले बरे-वाईट अनुभव असा सविस्तर बोलला. ती मुलाखत त्या वेळच्या ‘लोकसत्ता-रंगतरंग’ पुरवणीत छापून आली. मग एक दिवस मुलाखत असलेला पेपर द्यायला गेलो, तर म्हणाला, ‘मैं मराठी पढ नही पाता, पर समझ सकता हुँ, जरा पढके सुनाना…’ सवयीप्रमाणे भुवईशी चाळा करत ऐकत राहिला. मग मध्येच तोडत म्हणाला, ‘पर मैने तो ऐसा नही कहाँ था…’ तेव्हा त्याला तो मुद्दा असा का लिहिला हे पटवून दिले, मग अच्छा sss म्हणत हसला. अंदाज आला, हा माणूस पत्रकाराला दिलेली मुलाखतसुद्धा सिरियसली घेतो.

या दरम्यान आणखी एक मुलाखत स्मरणात राहणारी ठरली, ती म्हणजे ऊर्मिला मातोंडकरची. डोक्यावर कडक ऊन तापलेले होते. ‘यारो सुनलो जरा..’.गाण्याचे शूटिंग सुरू होते. करिओग्राफर कुठे दिसत नव्हता. वर्माचा सहाय्यक दिग्दर्शक मधुर म्हणाला, ‘आज रामूजी ही कोरिओग्राफी कर रहे है…’ गाण्यातल्या शब्दांना जागून मजामस्ती चाललेली होती. सोबत राजू पटेल आणि लेखक-ग्रंथ संग्राहक मित्र असलेला, आमिरशी गप्पा मारत बुद्धिबळाचा (तेव्हा बुद्धिबळाचा पट, सोंगट्या, एक-दोन पुस्तकं, आइसबॉक्स असे काय काय आमिरच्या गाडीच्या डिकीमध्ये भरलेले असायचे. गाडी होती-मारुती 1000.) पट लावणारा शशिकांत सावंत असे आम्ही तिघे-चौघे सेटवर इथे-तिथे वावरत होतो. तेव्हा दोन शॉटच्या मधल्या वेळेत विश्रांती घेत असलेल्या ऊर्मिलाने मुलाखतीला होकार भरला होता.

तसे ठरल्या दिवशी, ठरल्या वेळेत अंधेरी चार बंगला परिसरातल्या घरी तिची मुलाखत घ्यायला गेलो. मँगो ज्यूस वगैरे आदरातिथ्य करून तिने सविस्तर मुलाखत दिली. मुलाखत संपवून माघारी परतताना, ऊर्मिलाच्या आई, सोसायटीच्या गार्डनमधल्या झुल्यावर बसून शेजारणींशी गप्पा मारताना दिसल्या. गंमत वाटली. पण पुढे जाऊन शैलीदार लिखाण कऱण्याच्या नादात थोडे उन्नीस-बीस झाल्याने ऊर्मिलाच्या धाकट्या बहिणीने ‘रंगीला’च्या ऑडिओ रिलिज फंक्शनमध्ये भेट झाल्यावर नाराजीही बोलून दाखवली होती. कमल हासनसोबत, तेव्हाचा सेन्सेशन ठरलेल्या प्रभुदेवाच्या नृत्यदिग्दर्शनाखाली एका गाण्याचे शूटिंग करून नुकतीच परतली असल्याने ऊर्मिला मात्र भलतीच खूश दिसत होती.

‘रंगीला’ कॅसेट रिलीज फंक्शन म्हणजे, तर मोठाच किस्सा होता. जुहूच्या सेंटॉर हॉटेलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. अमिताभ बच्चन आणि शेखर कपूर प्रमुख पाहुणे म्हणून यायचे होते. तामझाम खूप मोठा होता. सुभाष घईपासून इंडस्ट्रीतले बडेबडे लोक हजर होते. तेव्हाचा प्रभावी असलेला प्रिंट मीडिया झाडून हजर होता. पण या सगळ्या धूमधडाक्यात उत्सवमूर्ती असलेला रामगोपाल वर्मा मात्र एकदम अंग चोरून वावरत होता. फोटोग्राफर्सचे फ्लॅश शक्य होईल तेवढे चुकवत होता. या पार्टीतला दुसरा बुजलेला माणूस होता, तो म्हणजे, मुंबईतल्या फिल्मी पार्टीला बहुदा पहिल्यांदाच हजेरी लावणारा विशीतला संगीतकार ए. आर. रहमान. त्याचे नुकतेच लग्न झालेले होते. डोक्यावरून पदर घेतलेली त्याच्याइतकीच शांत नि बुजऱ्या स्वभावाची त्याची बायको सोबत होती. रहमानच्या ‘रोजा’ आणि ‘बॉम्बे’ सिनेमातल्या गाण्यांनी सिनेरसिक धुंदावले होते. त्यामुळे आहे कोण हा तिसमारखाँ, अशा शंकेसह मीडिया त्याची वाट पाहात होता. परंतु, दोघांनीही खूपच लाजतबुजत फोटोग्राफर्सना पोज दिली होती. कोणी प्रश्न विचारले, तर रहमानकडे तेव्हा हसण्याशिवाय दुसरे काहीही नव्हते. अगदीच व्हिडिओग्राफर्ससाठी काही एक-दोन शब्द तो बोलला असेल नसेल, पण रहमान पार्टीत आला, प्रकाशनाचा कार्यक्रम आटोपला, तसा कधी एकदा इथून बाहेर पडतो, अशा घाईघाईत निघूनही गेला. त्या दिवशी रहमान आम्हा पत्रकारांशी बोलला एक शब्द नाही, पण त्याच्या गाण्यांनी उपस्थितांना झिंग आणली होती. ‘तनहा तनहा’, ‘हाय रामा’ ही गाणी गाणी हिट होणार, असा अंदाज सुभाष घईसारख्या जाणकाराने आम्हा काही पत्रकारांकडे बोलून दाखवला. घडलेही तसेच. काहीतरी भन्नाट घडतेय, याचा अंदाज शूटिंग दरम्यान येतच होता, पण इथे दाखवलेली गाणी पाहून खात्री पटत चालली होती.

रामगोपाल वर्माच्या घेतलेल्या मुलाखतीचे पॉइंट्स.

रामगोपाल वर्माच्या घेतलेल्या मुलाखतीचे पॉइंट्स.

‘रंगीला’च्या गाण्यांनी धूमाकूळ घातला होता. एकीकडे पॅचवर्क, एडिटिंग, डबिंग असे काय काय वेगाने सुरू होते. या ना त्या निमित्ताने आमिर आणि वर्माकडे जाणे-येणे सुरूच होते. असेच एकदा वर्माने खारच्या मुक्ता आर्ट्सच्या एडिटिंग रुममध्ये बोलावले होते. एडिटरला काही सांगण्याआधी नोटिंग करण्यासाठी म्हणून कागद-पेन आहे का, विचारत माझ्याजवळच्या डायरीत स्वतःच्या अक्षरात काही नोंदी केल्या होत्या.

एकदा आम्ही बोलणे अर्धवट टाकून त्याच्या बिल्डिंगच्या लिफ्टमधून एकत्रच खाली येत होतो. सिनेमा तर पूर्ण झाला होता, पण तो डिस्ट्रिब्युटर्सना विकण्याची वर्माची धडपड सुरू झालेली होती. त्या दिवशी बहुदा त्याला अर्जंट राजश्री डिस्ट्रिब्युटर्सकडे मिटिंग होती, त्या घाईत तो बाहेर पडत होता. तेव्हा लिफ्टबाहेर पडता पडता तो जे म्हणाला ते आजही आठवतेय, ‘मेकिंग फिलिम (हा खास त्याचा उच्चार) वन थिंग, बट सेलिंग इट इज ऑलटुगेदर डिफरंट स्ट्रगल…’

पण सरतेशेवटी, सगळे फासे वर्माच्या मनासारखे पडले. ‘रंगीला’चा फायनल कट तयार झाला. आमिरने त्याच्या जवळच्या लोकांसाठी प्रिव्ह्यू अरेंज करण्याचा धडाका लावला. एक दिवस त्याचा सेक्रेटरी असलेल्या आशीषने बांद्र्याच्या गॅलेक्सी-गेईटी थिएटरातल्या प्रिव्हूय सेंटरमध्ये खास शो ठेवल्याचे कळवले. शो मुख्यतः आमिरच्या कुटुंबीय-नातेवाईकांसाठी होता. बाहेरचे आम्हीच एक-दोघे होतो. सिनेमा सुरू झाला. आमिरच्या एंट्रीला टाळ्या मिळाल्या. सिनेमा संपला, तसे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. तोवर शहरी लव्हरबॉय अशी इमेज निर्माण झालेल्या आमिरचे हे टपोरी रुप त्याच्यातल्या नटाला एक पाऊल पुढे घेऊन जाणार हे दिसत होते.

तो काळ पत्रकारांसाठी खास प्रेस-शो ठेवण्याचा होता. पण ‘रंगीला’च्या निर्मात्यांनी आम पब्लिकसोबत सिनेमा दाखवण्याची आयडिया काढली. भव्यदिव्य ‘इरॉस’ थिएटरमधल्या संध्याकाळी सहाच्या शोचे पत्रकारांना आमंत्रण दिले. आम्हाला वाटले, रुटीनप्रमाणे सिनेमा सुरू होईल. पण इथे तर स्पेशल तयारी झालेली होती. जसा सिनेमा सुरू झाला. रहमानची अपबीट थीम ट्यून सुरू झाली, तसे क्षणार्धात थिएटरमधले रंगबेरंगी दिवे उजळले. कृत्रिम धुके सोडून धूंदफुंद माहोल तयार करण्यात आला. मग, ‘या ई रे या ई रे’ गाण्यावर पिटातल्या प्रेक्षकांनी नाणी उधळली. आमिरच्या एंट्रीला शिट्या, टाळ्या पडल्या. ‘आज आपुनका बॅडलक ही खराब है..’ वगैरे चुरचुरीत डायलॉगवर एका पाठोपाठ एक हास्याचे कारंजे उडत गेले. सिनेमा विथ फेस्टिव्हिटीचा आगळा अनुभव प्रेक्षकांना आला. भाषेची, शब्दांची, संगीतातली नवता हा या सिनेमाचा युनिक सेलिंग पाइंट तर होताच, पण तंत्र-आशयाच्या अंगाने (उदा. तोवर हिंदी सिनेमांमध्ये फ्लॅशबॅक हा दोन-पाच रिळे खर्ची घालणारा नित्याचा प्रकार ठरला होता. मात्र, वर्माने ‘रंगीला’ मध्ये जॅकीचा फ्लॅशबॅक नॅरेटिव्ह बॅकग्राउंड स्कोरचे तंत्र वापरून अवघ्या दीड दोन मिनिटांत आटोपला होता आणि तो प्रभावीदेखील ठरला होता.) या सिनेमाने नव्या वाटा चोखाळल्या होत्या.

‘इरॉस’मधला दणकेबाज शो संपला. गाणी आणि डायलॉग ओळी रुळवतच प्रेक्षक थिएटरबाहेर पडले. चारही दिशांना ‘रंगीला’ची हवा पसरत गेली. आजच्या सारखा सोशल मीडियारुपी ब्रह्मराक्षस दिमतीला नसूनही माउथ पब्लिसिटीने काम साधले. ‘रंगीला’तले किस्से कर्णोपकर्णी होत गेले. ‘रंगीला’ सुपरहीट ठरला. रामगोपाल वर्मानामक एका आऊटसायडरने आपला झेंडा रोवला. ऊर्मिला मातोंडकर रातोरात स्टार बनली. आमिरचे ‘बाजी’चे अपयश साफ धुवून निघाले. सगळीकडे त्याच्या मुन्नाने धुमाकूळ घातला. त्या वर्षीचे ७ फिल्मफेअर अवॉर्ड या सिनेमाने पटकावले.

खरे तर ‘रंगीला’ ही पठडीबद्ध वाटावी अशी विनोदाची झालर असलेली प्रेमकथा होती. पण या प्रेमकथेचे वर्माने केलेले सादरीकरण कमालीचे नावीन्यपूर्ण होते. रुढ चौकटी मोडणारे होते. हा सिनेमा तरल पातळीवर प्रोग्रेसिव्ह, लिबरल जगाची भाषा बोलत होता. म्हणजे, यातला सुपरस्टार राजकमल (जॅकी श्रॉफ) पद, प्रतिष्ठेची पर्वा न करता, आपले मन कोरस डान्सर असलेल्या मिलीकडे मोकळे करत होता, तिच्यात हरवलेला आनंद शोधत होता. महत्त्वाचे म्हणजे, ‘माँ का प्यार’, ‘बाऊजी का दुलार’, ‘पुरखों के संस्कार…’ असली काहीही भानगड या सिनेमात नव्हती. त्यामुळे यातले मिलीचे कुटुंब टिपिकल मध्यमवर्गीय खरे, पण आपल्या मुलीची रस्त्यावर टपोरीगिरी करणाऱ्या मुन्नाशी असलेली मैत्री मान्य असलेले होते. मुन्ना (आमिर खान) हा या सिनेमाचा स्ट्रीटस्मार्ट पण संवेदनशील मनाचा हिरो होता. पण त्याचा काही आगापिछा नव्हता. त्याचे आई-बाप कोण, तो राहतो कुठे, त्याचा धर्म कोणता, याचे कुठलेही तपशील सिनेमात नव्हते आणि ते नाहीत म्हणून प्रेक्षकांना खटकलेही नव्हते.

एरवी, आपणही कुणाशी दोस्ती करतो, तेव्हा, कुठे तो राहतो घरी कोणकोण आहेत, आई-वडील काय करतात, काय खातात-पितात, त्यांची जात काय, धर्म काय असल्या चौकशा थोडीच करतो, त्याचप्रमाणे एकाही प्रसंगात सिनेमातली मिली मुन्नाला विचारत नाही. मुळात, हेच मुन्ना या व्यक्तिरेखेचे वेगळेपण होते आणि सौंदर्यही.

‘रंगीला’ हा सिनेमा जितका आकाशात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या नव्वदोत्तरी भारताच्या आकांक्षांचे जसे प्रतिनिधित्व करत होता, तसाच तो बहुरंगी, बहुढंगी मुंबईची व्यक्तिरेखाही ठळक करणारा सिनेमा होता. हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या दोन-तीन वर्ष आधीच बहुसांस्कृतिक, सोशिक आणि उदार मनाच्या म्हणून ख्याती असलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर आधी जातीयवादी दंगल आणि मग भीषण बॉम्बस्फोटांमुळे रक्ताचे सडे पडले होते. राम जन्मभूमी आंदोलनातून फैलावलेला धर्माचा ज्वर पुरता उतरलेलाही नव्हता. वातावरणातला संशय आणि सावधपणा पुरता गेलेला नसताना रामगोपाल वर्माच्या ‘रंगीला’ने मुंबईच्या त्याच रस्त्यांवरून स्वप्नांचा पाठलाग केला होता.

त्या अर्थाने ‘रंगीला’ हा सर्वसमावेशकतेची भाषा बोलणारा सिनेमा ठरला होता. यात हिरो दोन होते, पण व्हिलन एकही नव्हता. ‘रंगीला’च्या त्या जगात मोठी स्वप्ने पाहणे हा गुन्हा नव्हता. वैयक्तिक नातेसंबंधात, सामाजिक वावरात निष्ठूर हिशेबी वागण्या-बोलण्यापेक्षा हृदयाचा कौल सर्वोच्च होता.

आता तो काळ, ‘रंगीला’तल्या त्या व्यक्तिरेखा सर्रिअल-अतिवास्तव, भ्रांतिकासमान भासतात. पाठोपाठ प्रश्नही पडतात. आजच्या विषाक्त नि विद्वेषी होत चाललेल्या जगात मिली, मुन्ना, मुन्नाचा डेअरिंगबाज मित्र-पक्या, फॉर दॅट मॅटर मोठा स्टार असलेला राजकमल हे सगळे कुठे असतील? असले तर जगण्यातली निरागसता, उत्फुल्लता अजूनही टिकवून असतील का? त्यांना या जगात जागा असेल का? त्यांच्या इच्छा-आकांक्षांना फुटलेले पंख अजूनही शाबूत असतील का, त्यांच्यातली विजिगीषा अजूनही कायम असेल का? की आता ते उपरे ठरले असतील? जगापासून तुटून प्रवाहाबाहेर फेकले गेले असतील? त्यातही मुन्नासारखा मस्तमौला माणूस भिंतीकडे ढकलला जावून तथाकथित देशभक्तांच्या नजरेत देशद्रोही ठरला असेल का? # Seriously asking

शेखर देशमुख, पत्रकार, लेखक आणि ग्रंथसंपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0