‘मटका किंग’ ते ‘धर्मात्मा’

‘मटका किंग’ ते ‘धर्मात्मा’

रतन खत्रीचा मटका हरणारे लोक त्याला कधीच दोष देत नसत. ते आपल्या नशीबाला दोष देत असत. मिल कामगार, कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब लोकांचा मटका हा आधार होता.

काश्मीरमधील पर्यटनाचा बोजवारा, ८६ टक्के पर्यटन घसरले
औंधमध्ये कष्टकऱ्यांचं रक्षाबंधन!
अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ‘नेट’ आवश्यक

‘इझी मनी’, ‘झटपट पैसा’ हे सगळे शब्द सतत कानावर येत असतात. पण हा इझी मनी मिळवणं खरंच तितकं सोपं असतं का? किंवा हा पैसा मिळवण्यात अजिबात धोका नसतो? तर तो असतोच. पैसे मिळतात तसे ते जाऊही शकतात. हीच खरी मटका आणि जुगाराची गोम आहे. तुम्ही जितके पैसे कमावता तितके आणि किंबहुना जास्त गमावण्याची भीती असते. पुढच्या वेळी जास्त जिंकू, आता गेले तरी परत मिळतील ही आशा माणसाला जुगार खेळायला लावते आणि माणूस त्याच्या आहारी जातो. १९६०च्या दशकापासून मुंबईत लाखो लोक मटका खेळू लागले आणि त्या दुनियेचा बेताज बादशाह होता रतन खत्री. मटक्याच्या क्षेत्रातला धर्मात्मा, रंगीला रतन नावाने ओळखला जाणारा आणि मुन्शी प्रेमचंद यांच्या लेखनाचा निस्सिम चाहता रतन खत्री.

रतन खत्रीचा जन्म १९३२ मध्ये पाकिस्तानात झाला. फाळणीच्या वेळी तो भारतात आला आणि काही काळ उल्हासनगरमध्ये राहिल्यानंतर तो मुंबईत आला. १९६० च्या काळात न्यूयॉर्क कॉटन ट्रेडिंग नावाचा एक जुगार चालायचा. त्याचे काही आकडे इंग्रजी दैनिकात यायचे. १९६१ मध्ये ते बंद पडलं. मग कल्याणजीने ‘वरळी मटका’ नावाचा मटका सुरू केला. त्याचा रतन खत्री हा मॅनेजर होता. नंतर कल्याण मटक्यातून बाहेर पडून १९६४ साली त्याने तीन पत्ती मटका सुरू केला. तो इतका फोफावला की साधारण २००० सालापर्यंत त्याने मुंबईच्या जुगाराच्या दुनियेवर राज्य केलं.

जेष्ठ पत्रकार राम पवार यांनी त्या काळच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, त्या काळी पैशाला खूप महत्त्व होतं. हातावर पोट असलेले मजूर गिरणी कामगार पैसा सुरक्षित आहे या भावनेने जुगारात लावायचे. ते हातगाडीवर दिवसभर मोलमजुरी करून पैसे मिळवायचे. रात्री हातगाडीवरच झोपायचे. भुरटे चोर त्यांच्या खिशातले पैसे चोरायचे. त्यामुळे आपल्या कष्टाचे पैसे चोरीला जाऊ नये म्हणून हे लोक मटका खेळायचे. ते मटक्याच्या दहाही आकड्यांवर एकेक आणा लावून टाकायचे आणि मटक्याच्या चिठ्ठ्या खिशात ठेवायचे. चोर या चिठ्ठ्या मात्र चोरत नव्हते कारण त्यांनी कुठल्या अड्ड्यावर आकडा लावला आहे हे माहीत नसायचं. त्यातला एकतरी आकडा लागायचाच आणि त्यांना पैसे मिळायचेच. त्यामुळे ते खूश राहायचे की आपले पैसे चोरीला जात नाहीत आणि आपल्याला जास्त पैसेही मिळतात. या गोष्टीमुळे मटका गरीबांसाठी खूप महत्त्वाचा आणि दिलासादायक ठरला होता. तेव्हा एखाद्या आकड्यावर दहा आणे लावले आणि तो आकडा आला की पन्नास किंवा शंभर आणे मिळायचे. क्रमाने आकडे लागले म्हणजे तर त्याला जास्त पैसे मिळायचे.

रतन खत्री रात्री ८ च्या दरम्यान मटक्याचा पहिला आकडा जाहीर करायचा आणि नंतर रात्री पावणेबाराला करत असे. तेव्हा पाच ते दहा हजारांत चांगल्या ठिकाणी घरं मिळायची. नवजीवन सोसायटीत त्याने दोन घरं घेऊन ठेवली होती. तो संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला घरातून बाहेर पडायचा. त्याची एक ठरलेली टॅक्सी होती. त्यातून मुंबईभर फिरायचा. ती रात्री आठ वाजता कुठेही थांबायची. त्यासाठी कुठलंही ठरलेलं ठिकाण नव्हतं. मग बाजूने जाणाऱ्या दोन-तीन लोकांना तो थांबवायचा आणि पत्त्याचा कॅट गाडीच्या बॉनेटवर ठेवून तीन आकडे काढायला सांगायचा. ते आकडे ट्रंक कॉल, लाइटनिंग कॉलवरून जगभरात जायचे. त्या काळात रात्री ८ ते ८.१५ च्या दरम्यान मुंबईतले कुठलेही फोन लागत नसत कारण या दरम्यान मटक्याचे आकडे सगळीकडे कळवले जायचे. त्यामुळे मुंबईत त्याचा प्रचंड दबदबा निर्माण झाला होता. पण त्याचे गुन्हेगारी टोळीशी संबंध नव्हते, असं पोलिस सांगतात. त्याचा धंदा काबीज करायचा अनेकदा प्रयत्न झाला. अरूण गवळी टोळीच्या मदतीने सुरेश भगतने हा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यात यश आलं नाही. नंतर खत्रीच्या धंद्याची सूत्रं पप्पू सांवला आणि पंकज गंगर या बोरिवलीतल्या आणि गिरगावातल्या प्रशांत या नावाच्या तरूणांकडे गेली. ही रतन खत्रीची खास माणसं होती, असंही राम पवार यांनी पुढे सांगितलं.

लोकांना वाटायचं की हा खत्री खूप मोठा माणूस आहे. त्याची मोठी पोहोच आहे. पण प्रत्यक्षात तो खूप साधा माणूस होता. त्याचे राजकारण्यांशी संबंध नव्हते. लोकांना आठवड्यातून एकदा जरी मटका लागला तरी त्यांचे पैसे वसूल व्हायचे. त्यामुळे लोकांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली तेव्हा त्याला अटक झाली होती. पण नंतर मटका हा काही जुगार नाही तर लोकांच्या मनोरंजनाचं साधन आहे असं सांगून न्यायालयाने त्याची सुटका केली. २००० साली गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मटका, दारूचे अड्डे, डान्स बार वगैरे बंद केले. त्या काळात मटका काही प्रमाणात बंद होता. मात्र, रतन खत्रीचा मटका ऊन, वारा, वादळ, पाऊस कधीही बंद नसायचा. त्याचं जाळं मुंबई शहरभर पसरलेलं होतं.

या मटक्यामुळे मुंबईतल्या अनेक बेकारांना पोटापाण्याला लावलं. तिथे अड्ड्यावर काम करणारी मुलं, बुकीसाठी काम करणारी अशी सगळीच मुलं या मटक्यामुळे पैसे कमावत होती. त्यात पोलिसांनाही चांगले पैसे मिळायचे. तो कधीकधी पोलिसांना आजचे आकडे कळवायचा. मग ते कुणाच्या तरी माध्यमातून पैसे लावायचे आणि कमवायचे. उल्हासनगर, कल्याणमध्ये मटक्याच्या आकड्यांचे अंदाज लावणाऱ्या डेली निघत होत्या. त्या बंद पाकिटात असायच्या. त्याची किंमत साधारण दहा रूपये होती. पण लोक घ्यायचे. त्याच्या शंभरेक डेली निघायच्या. त्यावरही अनेक लोक गब्बर झाले आहेत. त्याचा मटका सोमवार ते शुक्रवारदरम्यान चालायचा. मग शनिवारी-रविवारी इतर लोक मटका लावत असत. मटक्यामुळे एक अर्थव्यवस्थाच निर्माण झाली होती. एका मटक्याच्या आकड्यावर लाखो लोकांचं पोटपाणी चालत होतं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकदा म्हणालेही होते की, मटका बंद केला तर लाखभर मराठी मुलं बेरोजगार होतील, इतकं त्याचं महत्त्व होतं.

खत्रींच वय झाल्यावर काही लोकांनी बिझनेस चालवायला घेतला. त्याला त्याची रॉयल्टीही मिळायची. त्या काळात सोनं चाळीस- पन्नास रूपये तोळं असायचं. त्याने सोनं आणि शेअर बाजारात पैसे गुंतवले. त्याला दोन मुलं एक मुलगी होती. त्यांची लग्नंही त्याने या पैशातून केली. मटक्याच्या व्यवसायात कोट्यवधी रूपयांची उलाढाल व्हायची. दिवसाला एकेक कोटी रूपयांची उलाढालही या काळात होत होती. काहीजण गब्बर झाले. काही बरबादही झाले. तो गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव मंडळांना वर्गणी द्यायचा. क्वचित पक्षांना देणग्या द्यायचा. अनेक ठिकाणी रतन खत्रीचं नावही लावलं जायचं. पण त्याने स्वतःला कोणत्याही पक्षाचं लेबल कधी लावून घेतलं नाही.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत कर्णिक आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगतात की, माझे आजोबा न्यूयॉर्क कॉटनवर सट्टा लावत. मी दुसरी तिसरीत असतानाची ही गोष्ट. तेव्हापासून मी पुस्तकातला, वाचणारा  माणूस होतो. पेपर वाचायचो. रोजच्या पेपरमध्ये पहिल्या पानावर खाली कोपऱ्यात न्यूयॉर्क कॉटनचा भाव दिलेला असे. हे काय, का मला कळायचं नाही आणि कुणी नीट समजावून सांगायचं नाही. नंतर सुचलं, मुंबईला काय किंवा अगदी भारताला काय, काय सोनं लागलंय? अख्खं जग न्यूयॉर्क कॉटनवर जुगार खेळत असणार.

पुढे न्यूयॉर्क कॉटनचा भाव स्थिरावला आणि जुगार बंद झाला. ती पोकळी रतन खत्रीच्या मटक्याने भरून काढली. म्हणजे, तेव्हा क्लबमध्ये पत्ते खेळत. घोड्यांच्या शर्यती होत. पण ते श्रीमंतांसाठी. तेव्हा महालक्ष्मी स्टेशनला एक खास प्लॅटफॉर्म होता. रेस असली की लोकल गाडी त्या प्लॅटफॉर्मवर लागत असे. रेसला जाणाऱ्यांना जिना चढायला लागू नये म्हणून! असे लाड गरिबांचे होत नसत. गरिबांसाठी मटका होता. अगदी चार आणे, म्हणजे पंचवीस पैसेसुद्धा लावता यायचे. आकडा बरोबर आला की नऊ पट मिळत. आम्ही गोव्याला गेलो होतो, तिथे अल्डोण्याला आठ पट मिळत. म्हापश्याहून एकजण फटफटीवरून अल्डोण्याला आकडा घेऊन येई. तेव्हा अल्डोण्याला फोन नसावा.

आकडा दोन वेळा काढला जाई. ओपन आणि क्लोज, दोन्ही वेळचे आकडे बरोबर आले की नव्वद पट. एका आकड्यातले तीनही पत्ते, म्हणजे पाना सांगता आला तर १८० पट. आणि ओपन व क्लोज, अशा दोन्ही वेळच्या आकड्यांचे तीन तीन पत्ते ओळखता आले की त्या जॅकपॉटला ११००० पट मिळत! एकदा मला ओपन आणि क्लोज, दोन्ही पाने लागले होते. पण मी वेगवेगळे लावले, एकदम नाही. त्यामुळे नो जॅकपॉट. खूपच चुटपुट लागली.

काही बुकी साडेनऊ पट देत. मग त्यांच्याकडे मटका लावणाऱ्यांची जास्त गर्दी होई. बुकीकडे लावलेले पैसे ते वरच्या, मोठ्या बुकीकडे फिरवत. वरचा बुकी आणखी पुढे. प्रत्येकाला कमिशन. एखादा लोभी बुकी सगळे पैसे वर न फिरवता थोडे आपण खाई. मग न फिरवलेल्या आकड्यावर लावलेले सगळे पैसे त्याला मिळत. पण कधीकधी नशीब जोरावर असायचं. तो आकडा लागला की बुकीच्या तोंडाला फेस येत असे. कारण त्याला वरून काहीच मिळत नसे.

यात एक घटना झालेली आठवते. बेकायदा व्यवहारात शब्दाला भयंकर महत्त्व असतं. बेकायदा जुगाराचा तंटा पोलिसांकडे, कोर्टात नेता येत नाही. म्हणून उसूल पाळणे ही काळ्या दगडावरची रेघ. एका बुकीने वर न फिरवलेल्या आकड्यावर एकाचा जॅकपॉट लागला. इतके पैसे कुठून देणार? मग त्याने ते पैसे बुडवले. ज्याचे बुडवले, तो वेडा झाला. एल्फिन्स्टन रोड (आता प्रभादेवी) ते दादर, या एक स्टेशनच्या प्रवासात त्याने चार जणांना भोसकलं. मग दादरला गाडी आल्यावर पब्लिकने त्याला खाली खेचून लाथाबुक्क्यांनी ठार केलं.

कर्णिक म्हणाले की, बुकी आकडे जाहीर होण्याच्या दहा पंधरा मिनिटं आधीपर्यंत आकडे घ्यायचे. ही गोष्ट खरंतर संगणक यायच्या आधीच्या काळातली. कागदावर हे आकडे लिहून घेतले जात असत. मग ते आकडे मागे दिले जायचे. मागे बसलेली मुलं लगेचच गणित करून कुठल्या आकड्यावर किती पैसे आहेत हे काढून द्यायचे. ते तयार झालं की ताबडतोब वरच्या बुकीकडे जायचे. अगदी दहा मिनिटांत रतन खत्रीकडे ही सगळी माहिती जायची. मग लागलेला आकडा फळ्यावर लिहिला जायचा. चिठ्ठी घेऊन गेलं की पैसे मिळायचे. सोमवार ते शुक्रवारदरम्यान हा मटका चालायचा. शनिवार रविवारी कल्याणजी नावाचा मटका चालायचा.

पोलिसांची धाड आदल्या दिवशी बुकीला कळवलं जायचं की त्यांच्याकडे धाड पडणार आहे. मग बुकी आपल्या पंटरना जेलमध्ये पाठवायचे. दोन-तीन महिने हे पंटर जेलमध्ये राहायचे आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जायची. यात लाखो लोक सहभागी होते आणि मुलांना रायटर म्हणून रोजगार मिळत होता. एकावर एक कागद आणि मध्ये कार्बन पेपर ठेवून आकडे लिहिले जात असत.

ज्येष्ठ मराठी लेखक सतीश तांबे यांनी खत्रीच्या मटक्याच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, त्याचं नेटवर्किंग त्या काळात कराचीपर्यंत पोहोचलं होतं. व्यवहार इमानदारीत चालायचा. धंद्यात सचोटी होती. एकदा मी एक आकडा खेळलो. मला कॉलेजच्या खूप मुलांनी पैसे दिले. माझ्याकडून चिठ्ठी हरवली. मी सकाळी तिकडे गेलो आणि सांगितलं. तो म्हणाला की संध्याकाळपर्यंत थांब. कुणी आलं नाही तर पैसे देईन. मग मी थांबलो. मला सगळे पैसे परत मिळाले. मी अनेकदा तिथेच पैसे ठेवायचो कारण इतके पैसे सोबत नेणं धोकादायक होतं.

एकदा मी पैसे दादरला वळवून घेतले. कर्जतला चाललो होतो. गाडीत पाकीट मारलं गेलं. माझ्या भावाला कळलं की पैसे गेले. मी भावाला म्हटलं की माझ्या स्वप्नात मटका येईल. मग रात्री झोपेत ०६ हा नंबर आला. मी खेळलो नाही. पण तो नंबर लागला. लोक असंच स्वप्नात आलेल्या मटक्यांच्या आकड्यांवर खेळायचे. कुणी रस्त्यावर गाडी दिसली की त्यावर नंबर लावायचे. काही दुकानांमध्ये नोकरांना दुपारी मालक झोपायला सांगायचे. झोपला की स्वप्नात आकडा येईल आणि त्या आकड्यावर मटका लावता येईल असं मालकांना वाटायचं.

बऱ्याच लोकांना आकड्यांचा अंदाज बरोबर ठरायचा. माझाही ठरायचा. त्याला एक गणित असतं. काल आलेला आकडा म्हणजे तीन पत्ते, आणि त्यानंतर येणारा फायनल आकडा. त्याला खूप महत्त्व असायचं. आदल्या दिवशी तो फायनल आणि दोन पत्ते यांचं रेकॉर्ड असायचं. शेवटी ज्या आकड्यावर कमी पैसे खेळले गेले तो आकडाच अनेकदा निघायचा. तो वेगवेगळे पॅक जसं दुर्रीचा पॅक, तिर्रीचा पॅक असं समोर ठेवायचा. त्याला काही अर्थ नसायचा. चार आकडे आणि कालचे आकडे असं चौरंग गणित करून आकडा काढता यायचा.

ज्या लोकांना इस पार या उस पार असं खेळायचं असायचं ते लोक त्यात हरायचे. पण जे लोक आपला रोजचा विडीकाडीचा, रोजीरोटीचा खर्च काढायला बघायचे ते जिंकायचे. त्या पैशांवर कधी फ्लॅट घेता यायचा नाही. पण छोटेमोठे हातखर्च निघायचे.

मी वयाच्या २५ व्या वर्षी हे सगळं सोडून दिलं. तेव्हा नोकरीला लागलो. पैसे यायला लागले. आधी शिकवणी घ्यायचो. त्यातून ६५ रूपये मिळायचे. त्यातले ५० रूपये वडिलांना द्यायचो. १५ रूपये शिल्लक राहायचे. ते मला सिगारेटला पुरायचे नाहीत. मटका खेळून ते पैसे वाढवायचो. खिशात पैसे असायचे याचा आनंद असायचा. नंतर मटका सोडल्यावर मित्र म्हणाले की आपण खेळूया. एक आकडा पकडायचा. तो ओपन क्लोज असा असतो. समजा झिरो पकडला आणि आला तर डबल मिळायचे. नाही आला तर दोन खेळायचे. मग तीन आला तर थेट अठरा रूपये मिळायचे. असं दुप्पट करण्याची क्षमता असेल तर आणि तुमचं गणित जमत असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. तसा आम्ही झिरो पकडला. शेवटी चौसष्ट रूपये खेळलो. नऊपट रूपये आले. तेव्हा मला कळलं की जो गरीब माणूस आहे, चार आठ आणे खेळणारा, तो डबल कसा करणार… म्हणजेच आपण गरीबांना लुटतो आहोत. त्या क्षणी मी निर्णय घेतला की जुगार खेळायचा नाही. नंतर ठरवलं की कष्टाने मिळतील तेच पैसे आपले आहेत.

पण जुगाराच्या तुलनेत मटका बरा असं मला वाटायचं. कारण आकडा दिवसातून दोनदा फुटायचा. लॉटरी आली तेव्हा त्याला अंतच राहिला नाही. मटक्याने जितके संसार उद्ध्वस्त झाले नाहीत तेवढे लॉटरीने झाले. झटपट लॉटरीचा जमाना सुरू झाल्यावर मेघालय, आसाम, दिल्ली सरकारने लॉटरी सुरू केली. त्यात मटक्याची क्रेझ कमी झाली कारण लॉटरीत लोकांना ताबडतोब पैसा मिळायचा. सध्या सगळ्यावर बंदी आहे. फक्त शासनाची महाराष्ट्र लॉटरी सुरू आहे. लॉटरी हे मटक्याचं वाईट रूप आहे. लॉटरी सरकारने सुरू केली. सरकारने पैसे कमावले. पण घरं उद्ध्वस्त केली. किती पैसे घातले हे कळत नाही. दारूसारखा बायकोला वास येत नाही. पण ते सर्वांत वाईट व्यसन आहे. घरात पैसे कुठे जातात हे कळत नाही.

माझा एक मित्र या जुगाराच्या आहारी गेला होता. मग त्याने आणि त्यांच्या बायकोने गॅम्बलिंग एनॉनिमस सुरू केली. गॅम्बलिंगमुळे दारूपेक्षा जास्त नुकसान होतं पण अल्कोहोलिक अनोनिमसप्रमाणे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत नाही, असं तांबे म्हणतात.

सतीश तांबे यांना बाबा तांबे हे नाव मटक्यानेच बहाल केलेलं आहे. पूर्वी मटक्याच्या एक पानी पत्रिका यायच्या. त्याला डेली असं म्हणायचे. त्यात एक जय बाबा नावाची पत्रिका होती. ती ते वापरायचे. दर गुरूवारी ही डेली यायची. ती वाचताना त्यांना कुणीतरी बघितलं. तेव्हापासून त्यांचं नावच बाबा पडलं. शिवाय त्यांना दाढीही होती. त्यामुळे दाढी आणि बाबा जोडलं गेलं. ते म्हणाले की, मी मटका खेळायचा सोडल्यावर कुठल्याही मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन बिनधास्त बाहेर यायचो. खेळायचो तेव्हा मनात भीती असायची. पण सोडल्यावर मला माहीत होतं की मी खेळलो नाहीये. त्यामुळे ही भीती निघून गेली.

मटक्याच्या धंद्यात फसवणूक खूप कमी होते. खेळणारे लोक अत्यंत भीतीदायक असतात. त्यामुळे काय करतील याचा नेम नसतो. एकवेळ बँकेचा चेक वटणार नाही. पण मटक्याची चिठ्ठी वटते. कुणीतरी आयत्या वेळी यायचा आणि जास्त पैसे लावायचा. मग बुकी डेअरिंग करायचा आणि मधल्या मध्ये पैसे खायचा. समजा तोच आकडा आला तर बुकीकडे पैसे नसायचे. त्या परिस्थितीत मारामारी व्हायची. श्रीकांत सिनकर यांच्या ‘सैली १३ सप्टेंबर’ या पुस्तकात मटकेवाल्यावर एक लेख आलेला आहे. तोही एकूणच मटका आणि त्याच्या भोवती असलेलं वातावरण यांच्यावर आधारित आहे.

रतन खत्रीचा पेहराव अत्यंत साधा होता. साधाच पांढरा रंगाचा कुर्ता आणि विजार घालायचा, डोक्याला रूमाल बांधायचा, काळ्या चपला घालून फिरायचा. बाहेर फिरला तर कुणाच्याही लक्षात येणार नाही असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. मटका हरणारे लोक त्याला कधीच दोष देत नसत. ते आपल्या नशीबाला दोष देत असत. मिल कामगार, कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब लोकांचा मटका हा आधार होता. थोडे जास्त पैसे मिळवून आपण काहीतरी जास्तीचं करू शकतो असं त्यांना वाटायचं. त्याच्या या मटक्याच्या दुनियेचं आकर्षण वाटून फिरोझ खानने ‘धर्मात्मा’ नावाचा चित्रपट १९७५ साली आणला. त्यात मटका किंगची भूमिका प्रेमनाथने केली होती. नंतर खत्रीने ‘रंगीला रतन’ या १९७६ साली आलेल्या चित्रपटात एक छोटी भूमिका केली. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ऋषी कपूर आणि परवीन बाबी होते.

मटक्याच्या धंद्याने खत्रीला नक्कीच प्रचंड श्रीमंत बनवलं असणार. परंतु तो खूप साधा राहायचा आणि कुठल्याही गुन्हेगारीत किंवा राजकीय वर्तुळात तो नसल्यामुळे त्याचं उत्पन्न नेमकं किती आणि त्याचं आयुष्य कसं होतं याबाबत एक गूढ कायमच राहिलं आणि ते त्याच्यासोबतच संपलं आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0