कोरोना नावाची दुष्ट चेटकीण!

कोरोना नावाची दुष्ट चेटकीण!

रत्नाकर मतकरींनी बालनाट्याचा हा सुगंध केवळ नाट्यगृहाच्या चार भिंतीत न ठेवता शाळांमध्ये, रस्त्यावर, गरीब वस्त्यांमध्ये, ट्रकच्या मोकळ्या जागेत, अगदी औषधांचा उग्र वास असलेल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेला. आपल्या लेखणीतून मुलांच्या संपर्कात शेवटपर्यंत राहिले.

तपशीलावर मेहनत, परफेक्शनचा ध्यास असलेला लेखक
माझं काय चुकलं
रत्नाकर मतकरी यांची गूढकथा

चेटकिणीच्या गळ्यातील ताईत राजकुमार चंद्रानन मोठ्या शिताफीने हस्तगत करतो आणि चेटकीण एका सेकंदात फुग्यातली हवा गेल्यासारखी फुssस होते.. मधुमंजिरी शापातून मुक्त होते, पाषाणाचा यक्ष होतो, मधुमंजिरीचे आईबाबा रुसुजी आणि आनंदी मधुमंजिरीला भेटतात.. दुष्टशक्ती हरते आणि चांगल्या लोकांचा विजय होतो..
आनंदाने, जोशात टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह  दणाणून जातं..
नाटक संपले तरी त्यातील जादुई शक्ती आमच्या बरोबर घेऊन बागडत, उडत्या पायाने आम्ही घरी आल्यावर, पुढील कित्येक दिवस एका मंत्रमुग्ध जगात तरंगत असू.. त्यानंतरचं प्रत्येक नाटक आमच्या जुन्या जादुई शक्तीला अजून अपग्रेड करायचं..
अगदी बालपणाला निरोप दिला असला तरी ती शक्ती अजून आमच्या जवळ कायम राहिली.
न जाणो कधी चेटकीण, राक्षस आला तर….
ही शक्ती आम्हांला, आमच्या आधीच्या व नंतरच्या पिढीला दिली, रत्नाकर मतकरी या बालकांच्या जादूगार मित्राने!
या जादूगाराच्या पोतडीतून नेहमी अफलातून, वेगवेगळ्या पद्धतीचे बालनाट्य निघत असे.
त्या पोतडीचं नाव ही ‘बालनाट्य’ संस्था..
मतकरी सर आणि प्रतिभाताई या दोघांनी या पोतडीतल्या मनोरंजनाच्या खाऊने बालकांचे भावविश्व समृद्ध केले. थोडेथोडके नव्हे ३५ वर्ष हा खाऊ वाटण्याचा काम सुरू होत.. आमच्या  बालपणातील ठेव्याचा एक मोठा भाग बालनाट्याने व्यापलेला.. एका निखळ आनंदाच्या झऱ्याचे पाणी पिऊन आम्ही मोठं झालो. आमच्या रम्य बालपणात ‘सुंदर ती दुसरी दुनियेत’ निर्माण करणारे रत्नाकर मतकरी सर हे बालरंगभूमीबद्दल विशेष आस्था बाळगणारे कुटुंबप्रमुख..

अगदी स्वतःच्या जवळचे पैसे घालून त्यांनी बालनाट्य चळवळीला जिवंत ठेवलं.

मोठ्यांच्या जगात आपल्या लिखाणाला मिळत असलेला मान, आदर, सन्मानांपेक्षा मुलांच्या मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादाचं, आनंदाचे जास्त अप्रूप रत्नाकर मतकरींना असे. वयाच्या सतरा-अठराव्या वर्षीचं मतकरी नभोनाट्य लेखक म्हणून प्रसिद्ध झाले होते. सुधा करमरकर या अमेरिकेतून नुकत्याच आल्या होत्या. तेथील बालनाट्य प्रकार त्यांना भावला त्यामुळे तस छानसं नाटक मुलांसाठी करण्याचं डोक्यात होत. त्यांनी रत्नाकर मतकरीनां बालनाट्य लिहायला सांगितले आणि तिथेच बालनाट्य चळवळीची नांदी झाली.

बालनाट्य लेखन मतकरींसाठी जराही नवीन नव्हते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी एक बाल नाटिका लिहिली होती. तसेच त्यांना चित्र काढण्याचा नाद असल्याने, नाटकातील दृश्य, नेपथ्य, वेषभूषा असं एकत्रित विचार त्यांनी बालरंगभूमी समृद्ध करण्यासाठी केला.
‘मधुमंजिरी’, ‘कळलाव्या कांदा’ ही बालनाटक प्रचंड यशस्वी झाली. पण मतकरींच्या आतील प्रयोगशील रंगकर्मी अस्वस्थ होता. ‘बालनाट्य’ ही स्वतःची संस्था काढून त्यांनी आपल्या आतल्या सर्जनशीलतेला मोकळी वाट दिली. मतकरींनां मुलांच्या खेळासारखा मोकळेपणा रंगमंचावर आणायचा होता. ते विषयाबरोबर नेपथ्य, भाषेतील सुटसुटीतपणा, अभिनयाचे विकसित तंत्र असे वेगवेगळे रंगमंचीय शोध घेत नवीन वाट तयार करत होते. आधी बालनाटकांत मोठ्या माणसांच्या भूमिका पण लहान मुलंच करीत असे. मतकरींनी ‘मधुमंजिरी’ पासून प्रौढभूमिका मोठ्या वयाच्या कलाकारांना दिल्या. राजकुमार

‘चंद्रानान’ ही भूमिका चक्क काशिनाथ घाणेकर यांनी केली होती तर ‘अलबत्या गलबत्या’मधली ‘चिंची’ चेटकीणचं काम दिलीप प्रभावळकरांनी केलं होतं . (सध्या ती भूमिका वैभव मांगले करत आहेत .) दिलीप प्रभावळकर यांनी मतकरीची सहा बालनाट्य केली. त्या अनुभवाबद्दल दिलीप प्रभावळकर म्हणतात, “मी हे नेहमी सांगतो की स्वतःला शोधण्याच्या, स्वतःतली वैशिष्ट्यं सापडण्याच्या, सतत नवं काही करून पाहण्याच्या प्रक्रियेची सुरवात मतकरींच्या इथे झाली. दरवेळी मतकरीच्या नव्या नाटकात, नवं काय करायला मिळेल, नवी भूमिका कशी असेल याची उत्सुकतेने वाट बघायचो. बालरंगभूमी एक प्रयोगशाळा होती. आवाजातले बदल, प्रोजेक्शन, प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे कसब हे बालरंगभूमीमुळे सहज साध्य झाले.
‘चिंची’ चेटकीणचं काम एक पुरुष करतोय हे लोकांना समजायला कित्येक दिवस गेले. त्यांच्या एंट्रीला मुलं घाबरायची, रडायची, अगदी घरी जाण्याचा हट्ट आईकडे करायची..मग रुळायची..चेटकिणीच्या फजितीला खदाखदा हसायची..टाळ्या पिटायची..

मुलांच्या अभिरुचीची जाण मतकरीं अचूक होती. प्रत्येक वेळी वेगळ्या प्रयोगतंत्राचा वापर करणाऱ्या मतकरींच्या अफाट कल्पकतेचा आवाका थक्क करणारा. त्यांच्या कल्पकतेची गंमत बघा ‘इंद्राचे आसन आणि नारदाची शेंडी’ या नाटकात नारदाच्या गळ्यात असलेली विणा तो कानाजवळ नेऊन पृथ्वीवरील लोकांशी संपर्क साधत असे, म्हणजे आताच्या मोबाईल प्रमाणे! त्यावेळी ही भन्नाट कल्पना होती. आणि अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमाची गोष्ट आम्हांला आधीच मतकरींच्या ‘अदृश्य माणूस’ या नाटकामुळे माहिती होती. ‘गाणारी मैना’, ‘राजकन्येची सावली हरवली’, ‘गोल्डन गॅंग’, ‘अचाट गावची अफाट मावशी’ त्यांनी केलेल्या अशा अजून बालनाटकांची लांबलचक यादी बघून आपल्या लक्षात येईल, तो काळ बालरंगभूमीचा सुवर्णकाळ होता.

मतकरींना मुलांना काय द्यायचे याचं पुरेपूर ज्ञान होते. मुलं एका जागी किती वेळ बसतील, त्यांच्या शारीरिक, मानसिक क्षमता लक्षात घेऊन ते आपल्या कथानकाचे तीन भाग करत. एक अंक ३५-४० मिनिटांचा (शाळेतील तासासारखा) त्यात दोन मध्यंतरे असायची. मुलं पुरती गुंतलेली राहातील, अशा उत्कंठा वाढवणाऱ्या प्रसंगाची रेलचेल. मुलांना नाटकात सहभागी झाल्यासारखे वाटावे, यासाठी दरवेळी नवीन क्लृप्त्या..

‘निम्मा शिम्मा राक्षस’ नाटकात शहजादी अब्दुल्लाला प्रश्न विचारते.
शहजादी : आग्र्याला शहाजहाननं कोणती इमारत बांधली?
अब्दुल्ला : कुठली? कुठली बरं?

(डोकं खाजवतो) काहीच सुचत नाही बुबा! (प्रेक्षकांकडे वळून) तुम्ही सांगा ना माहिती असेल तर..
बाल प्रेक्षक : ताजमहाल..
(मग ऐटीत अब्दुल्ला शहजादीला उत्तर देत असे.)
पुढील प्रश्नांची उत्तरे अब्दुल्ला प्रेक्षकांच्या साह्याने देत जाणार..
मग शहजादी शादीसाठी तयार होते. इकडे आपण उत्तरे दिली म्हणून अब्दुल्लाला शहजादी मिळाली, यांचा आनंद बालमनात मावत नसे..
तशीच गोष्ट नेपथ्याबाबत केली. कथानक घरी आजी, आई सांगते इतकं सहज वाटलं पाहिजे, गोष्टी सारखं एका ठिकाणावरून झटकन दुसऱ्या ठिकाणी जाणं रंगमंचावर शक्य करण्यासाठी, सोपी नेपथ्य रचना करून त्यात मुलांना विश्वासात घेण्याची ट्रिक त्यांनी वापरली. आता हेच उदाहरण बघा.
रंगमंचाचा पडदा वर जातो..

अरेच्या ! रंगमंच मोकळा..त्यावर काहीच नेपथ्य नाही.
नाटक म्हटल की काही रंगीबेरंगी डोळ्यांना सुखावणारे काय, काय असत!

इथे तर काहीच नाही.. बालप्रेक्षक चक्रावलेले.

अब्दुल्ला येतो. आणि तो म्हणतो, “इथे नदीच नाही, तर मी मासे मारणार कसा? आणि नाटक पुढे जाणार कसे?”
अब्दुल्ला बरोबर बालप्रेक्षक विचारात पडतात. तितक्यात एक यडपट ध्यान येत आणि म्हणतो, “आज मॅनेजर सुट्टीवर आहे. आज मदतीला मी आहे ..
आता हा काय दिवे लावणार?
मुलं आणि अब्दुल्ला यांना एकाच वेळी पडलेला प्रश्न.
तो यडपट मुलगा एक निळा कापडा उलगडतो आणि म्हणतो, “हीच आजच्यापुरती नदी”.
मुलं सुटकेचा निश्वास टाकतात. एकदम खुश होतात. जोरात टाळ्या वाजवता…
“रिकाम्या नदीत मासे कसे मारू “? अब्दुल्ला विचारतो..
अरे खरंच की? परत प्रेक्षकवर्ग चिंतेत..
आता?
तो यडू मुलगा निळे कापड उलटे करतो तर काय त्यावर मासे रंगवलेले..

प्रेक्षकगृहात टाळ्यांचा कडकडाट..
पुढे असच घर बनतं, जंगल तयार होतं, ते ही मुलाच्या साक्षीने. मुलांच्या नकळत ते नाटकांशी जोडले जात, नाटक बघत असतांना त्याच्या तांत्रिक गोष्टीची बाजू ही समजत असे. या दोन- अडीच तासाच्या बालजगात काय काय असायचं! बोलणारे, गाणारे प्राणी-पक्षी, झाडे, राजा-राणी, पऱ्या, अदृश्य माणूस….
प्राणी-पक्षांची मानवाला होणारी मदत,
मैत्रीला जागणारे जग.. प्रेम, दया, विश्वास याची प्रचिती, दृष्टाचा नाश, सत्याचा विजय..योग्य गोष्टीसाठी केलेले धाडस..गोड गुंगी आणणारा शेवट…यात आपोआप जपत गेलेला आशावाद..कष्टाचे, सचोटीचे मिळणारे फळ…

नकळत मूल्यांचे बी पेरले जावं असं कसदार कथानक.
बालनाट्याला त्यांनी उमलवलं, फुलवलं..

‘जिथे, जिथे मुलं तिथे, तिथे नाटक नेऊ ‘ हे त्यांचं ब्रीदवाक्य. त्यांनी बालनाट्याचा हा आनंद केवळ एका विशिष्ट स्तरातील मुलांसाठी सीमित ठेवला नाही. बालनाट्याचा हा सुगंध केवळ नाट्यगृहाच्या चार भिंतीत न ठेवता शाळांमध्ये, रस्त्यावर, गरीब वस्त्यांमध्ये, ट्रकच्या मोकळ्या जागेत, अगदी औषधांचा उग्र वास असलेल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेला. आपल्या लेखणीतून मुलांच्या संपर्कात शेवटपर्यंत राहिले.

एक तर मुलांशी जोडलं जाणं हे एक कौशल्य आहे. मुलांसाठी काही लिहिण्यापूर्वी ते एक महिना मोठ्यांच जग तात्पुरतं बंद करून घेत, प्रत्येक गोष्टीकडे मुलं कसं बघतील तसे बघत असे. अगदी कॉमिक्स, इतर बालसाहित्य वाचत असे, कारण मुलांना आवडेल, रुचेल असं लिहिणं, त्याच्या दुनियेत शिरून त्यांना खिळवून ठेवणं, ही सोपी गोष्ट नाही.
बालनाट्याला उर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या मतकरींची दखल खूप उशिराने घेतली गेली. त्यांना २०१८ ला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित केले. त्यावेळी त्यांनी एकंदरीतच बालसाहित्य आणि बालनाट्याबाबत असणाऱ्या उदासीनतेबाबत खंत व्यक्त केली होती.
प्रश्न पडतो की जे पालक, शिक्षक मतकरींची बालनाट्य बघून वाढली, पुढे जाऊन ते बालनाट्याबाबत इतके उदासीन का राहिले? जो आनंद आपण घेतला, तो पुढील पिढीला द्यायला कमी का पडले?
बहुदा बालपणाला निरोप देताना आलेल्या अक्कलदाढेबरोबर जगातील बाकीच्या गोष्टींचे वाढते आकर्षण हे पांडवांच्या मयसभेसारखं आहे, हे माहिती असून चकत गेलो, स्वतःची फजिती झाकत गेलो. आणि जगत गेलो..इतकंच नाही तर मुलांना घेऊन अशा मयसभांच्या ठिकाणी गर्दी करत राहिलो.. मुलाचं बालपण कुपोषित करत राहिलो. सरांनी मनोरंजनातील वास्तवता किती हळुवारपणे आपल्याला विश्वासात घेऊन नेपथ्यातून समजावली होती.. पण मयसभांचे झकपक सेट्स आपल्याला भुलवत गेले. जपलेली निरागस जादुई शक्ती वापरायचे तंत्र विसरलो…
मधुमंजिरी आणि राजकुमाराला आशीर्वाद देताना यक्ष म्हणतो, “जगातील दुःख कमी करा व आनंद वाढवा”. असे लिहिल्याप्रमाणे मतकरी दांपत्याने ‘बालनाट्या’द्वारा आनंद पसरवला..
पण १७ मे रोजी कोरोना नावाच्या महाचेटकिणीने घात केला..आणि आमच्या जादूगारला ती घेऊन गेली.. कोणताच मंत्र उपयोगी पडला नाही…
उंच मनोऱ्यातून मधुमंजिरीचे उदास बोल ऐकू येत आहेत..

“निळ्या आभाळा, विहंगवृंदा, तुम्हा अखेरचा प्रणाम
मंद उषेच्या विशुद्ध हास्या, घ्या अखेरचा प्रणाम
हसरी पुष्पे, उंच तरु हे पुन्हा न कधी मजला दिसणार
जल लहरींनो, पवन सख्यांनो, तुम्हा अखेरचा प्रणाम”..

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0