एका श्रमिकांच्या सभेत मजरूह यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात शेर म्हटला. त्यावर कोमल हृदय कवीची प्रतिमा आणि प्रतिभा समजण्याची बौद्धिक क्षमता नसलेल्या सरकारने त्यांना २ वर्ष तुरुंगात डांबलं.
मजरुह सुल्तानपुरी भारतीय चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांनी लिहिलेल्या सिनेगीतांसाठी आजही भारतीयांनी आपल्या मनात जिव्हाळ्याचा एक कप्पा कायम करून ठेवलाय. आपल्या गीतांमधून मानवी भावभावना व्यक्त करत असतानाच सामाजिक जाणिवांचा एक स्पष्ट सूरही आपल्याला सापडतो. के.एल. सेहेगल यांच्यापासून आमिर खानपर्यंतच्या कलाकारांसोबत काम करणारे मजरुह सुलतानपुरी हे एकमेव गीतकार आहेत. प्रोग्रेसिव्ह रायटर्स ग्रुपचे ते महत्त्वाचे लेखक होते. कार्ल मार्क्स, लेनिन आदी साम्यवादी विचारवंतांचा पगडा त्यांच्यावर होता. विद्रोहाचं बाळकडू प्यालेल्या मजरुह यांनी सत्तेपुढे कधीही गुढघे टेकले नाहीत. सक्रिय राजकारणात रस नसला तरी तत्कालीन शासकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या त्यांनी वेळोवेळी समजावून सांगितल्या, अर्थातच आपल्या कवितांमधून!
मजरुह सुलतानपुरी यांचं खरं नाव असरार हसन खान. फिल्मी दुनियेत येण्यासाठी त्यांच्या मित्रांनी त्यांना नाव सुचवलं, ‘मजरुह’. मजरुह या उर्दू शब्दाचा अर्थ होतो, ‘घायाळ’. या घायाळ कवीच्या लेखणीतून जे जे काही शब्द निघाले त्या शब्दांनी जनमानसाला खऱ्या अर्थाने घायाळच केलं. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील धार्मिक अशा मुस्लिम कुटुंबात १ ऑक्टोबर १९१९ साली त्यांचा जन्म झाला. मजरुह यांनी मौलाना बनून विद्यार्थ्यांना धर्मोपदेश करावा अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. परंतु, मूलतः विद्रोही स्वभावाचे मजरुह मदरशात रमले नाहीत. त्यांनी हकीमीचं शिक्षण घेतलं आणि हकीम म्हणून व्यवसायाला सुरुवात केली. इथेच त्यांच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाचा नकार मिळाला आणि ते शायरीकडे वळले.
‘जिगर मुरादाबादी’ यांच्यासोबत त्यांनी मुशायऱ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायला सुरुवात केली. मुंबईत आयोजित अशाच एका कार्यक्रमात फिल्म निर्माते ए.आर.कारदार यांनी मजरुह यांना हेरलं आणि ‘शहाजहाँ’ सिनेमासाठी गीत लिहिण्याची ऑफर दिली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला परंतु आपले गुरु जिगर मुरादाबादी यांच्या सांगण्यावरून सिनेगीत लिहिण्यासाठी ते तयार झाले. ‘जब दिल हि टूट गया ‘ या गाण्यापासून मजरुह यांचा फिल्मी प्रवास सुरू झाला.
सिनेमांसाठी गीते लिहीत असताना त्यांची प्रगतिशील साहित्य संघाशी नाळ मात्र तुटली नाही. हसरत जयपुरी, शैलेंद्र, साहिर लुधियानवी, कैफी आजमी आदींसोबत त्यांच्या साहित्यिक बैठका सुरूच राहिल्या. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. यावेळी सामान्य भारतीयांच्या नव्या सरकारप्रती काय अपेक्षा आहेत हे तत्कालीन साहित्यिकांनी आपल्या लेखनातून स्पष्ट केलं. मजरुह देखील त्या साहित्यिकांत सामील होते. स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत असताना प्रगतिशील साहित्य संघाच्या लेखकांच्या उपस्थितीत बांबूपासून बनवलेल्या मोठ्या लेखणीची त्यांनी मिरवणूक काढली. त्यांचं म्हणणं होत की, स्वतंत्र भारतात साहित्यिकांच्या लेखणीलाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. इप्टाच्या कार्यक्रमातही त्यांचा वावर असायचा. श्रमिकांच्या सभेत उभं राहून ते आजादीच्या घोषणा द्यायचे, गाणी म्हणायचे, शायरी ऐकवायचे. मार्क्सवादी विचारधारा जगणाऱ्या मजरुह यांना वर्गवादी व्यवस्थेचं उच्चाटन हवं होतं. अशाच एका श्रमिकांच्या सभेत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात लिहिलेला शेर म्हटला, तो शेर होता,
मन में जहर डॉलर के बसा के
फिरती है भारत की अहिंसा
खादी की केंचुल को पहनकर
ये केंचुल लहराने न पाए
अमन का झंडा इस धरती पर
किसने कहा लहराने न पाए
ये भी कोई हिटलर का है चेला
मार लो साथी जाने न पाए
कॉमनवेल्थ का दास है नेहरू
मार लो साथी जाने न पाए
यात मजरुह यांनी सरळसरळ नेहरूंना हिटलरचा चेला म्हटलं होतं आणि त्यांच्या खादीवर प्रश्न उभे केले होते. सरकार कुठलंही असलं तरी त्यांना प्रश्न विचारणारे लोक नको असतात. ‘मार लो साथी जाने न पाये’ हे वाक्य धरून, मजरुह नेहरूंना मारण्यासाठी कामगारांना भडकावत आहेत असा आरोप त्यांच्यावर केला गेला. तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर मोरारजी देसाई यांच्या आदेशावरून त्यांना अटक करण्यात आली. नेहरूंची माफी मागितली जावी असं त्यांना सांगितलं गेलं. परंतु प्रगतिशील साहित्याच्या परंपरेतल्या या कवीने माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. कोमल हृदय कवीची प्रतिमा आणि प्रतिभा समजण्याची बौद्धिक क्षमता नसलेल्या सरकारने त्यांना २ वर्ष तुरुंगात डांबलं. मजरुह यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जनतेने रोष व्यक्त केला. आर्थर रोडच्या तुरुंगातही त्यांची लेखणी थांबली नाही. त्याच लेखणीचे पडसाद जनमानसात उमटू लागल्याचे दिसताच मजरुह यांना फार काळ कैदेत ठेवण्याचं धाडस सरकारला करता आलं नाही. कैदेतून सुटल्यावरही त्यांनी सरकारला कानपिचक्या देणं चालूच ठेवलं.
सिनेमांसाठी त्यांनी एकापेक्षा एक सरस गीते लिहिली.सुमारे ५० वर्षे भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांनी गीतलेखनातून आशय प्राप्त करून दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले ‘गीतकार’ होते. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी नमूद केलंय की, या पुरस्कारावर खरा अधिकार गीतकार शैलेंद्र यांचा आहे. सिनेसृष्टीतील आपल्या सहकाऱ्याचं उघडउघड कौतुक कुणी केलं असत का? तेही एवढा मोठा पुरस्कार स्वीकारत असताना. हे फक्त मजरुह सुलतानपुरी सारखा दिलदार काळजाचा आणि विद्रोही मनाचा कवी माणूसच करू शकतो. आजच्या दिवशी, २४ मे २००० साली फुफ्फुसांच्या आजाराने त्यांचं निधन झालं. आज त्यांची पुण्यतिथी. आजच्या काळात जेव्हा सिनेगीतांबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही. समाजमन घडवणाऱ्या गीतांची निर्मिती होत नसल्याची तक्रार कायम ऐकू येत असते. अशा काळात तळागाळातल्या जनतेला आपलं मानणारा आणि त्यांचे प्रश्न, स्वतःचे प्रश्न मानून न्याय मागणारे मजरुह खऱ्या अर्थाने जनकवी होते याची खात्री पटते. पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
COMMENTS