काश्मीरमधील बिहारी भयभीत!

काश्मीरमधील बिहारी भयभीत!

काश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यांत तीन स्थलांतरितांची हत्या झाल्यामुळे उपजीविकेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेले हजारो बिहारी स्थलांतरित भीतीच्या छायेखाली आहेत. हत्या झालेल्या  विक्रेत्यांपैकी दोन- वीरेंद्र पासवान व अरबिंद कुमार सहा, बिहारी होते, तर तिसरा सागिर अहमद, उत्तरप्रदेशातील होता.

भीमा-कोरेगांव खटलाः तरुण महेशचा वाढदिवस तुरुंगातच!
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांचा अचानक राजीनामा
६ तास युद्ध थांबवल्याची अफवा

काश्मीरमध्ये गेल्या दोन आठवड्यांत तीन स्थलांतरितांची हत्या झाल्यामुळे उपजीविकेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झालेले हजारो बिहारी स्थलांतरित भीतीच्या छायेखाली आहेत. हत्या झालेल्या  विक्रेत्यांपैकी दोन- वीरेंद्र पासवान व अरबिंद कुमार सहा, बिहारी होते, तर तिसरा सागिर अहमद, उत्तरप्रदेशातील होता.

वीरेंद्र पासवान यांची ५ ऑक्टोबर रोजी श्रीनगर परिसरातील लाल बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्या झाली. ते या भागात दोन वर्षांपासून पाणीपुरी विकत होते. अरबिंद कुमार सहा यांची १६ ऑक्टोबर रोजी हत्या झाली. तेही श्रीनगरमधील ईदगाह भागात पाणीपुरी विकत होते. त्या दिवशी पुलावामामध्ये अहमद यांची हत्या झाली.

“हा प्रकार काश्मीरमध्ये नव्याने सुरू झाला आहे आणि आम्ही भयभीत आहोत. पहिल्या हत्येची बातमी आली तेव्हा फार भीती वाटली नव्हती पण आणखी दोघांची हत्या झाल्यामुळे आम्ही दोनेक दिवसांत बिहारला परत जाण्याच्या विचारात आहोत,” असे श्रीनगरमध्ये राहणारे बिहारी स्थलांतरित पंकज पासवान म्हणाले. ४५ वर्षीय पंकज ईदगाह परिसरातच आणखी सात बिहारी कामगारांसोबत राहतात. ते सगळेच शक्य तेवढ्या लवकर परत जाण्याची तयारी करत आहेत.

पंकज २७ वर्षांपासून काश्मीरमध्ये राहत आहेत. त्यांना शाळेत शिकणारी चार मुले आहेत. बिहारमध्ये परत जाण्याच्या तयारीत ते असले तरी तेथे रोजगाराच्या संधी नाहीत याची त्यांना कल्पना आहे. ते श्रीनगरमध्ये पाणीपुरी विकतात. वीरेंद्र पासवान यांची हत्या झाल्यानंतर, दुकानदारांनी रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडी ठेवू नयेत, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पूर्वी रात्री अकरापर्यंत चालणारे दुकान आता ते संध्याकाळीच बंद करत आहेत.

काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत बरी आहे, असेही पंकज यांनी सांगितले. “पूर्वी मी बायको-मुलांसह येथे राहत होतो. मात्र, बुरहान वानीची २०१६ मध्ये हत्या झाल्यानंतर बायको-मुलांना बिहारलाच ठेवले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

जम्मू-काश्मीरमध्ये हजारो स्थलांतरित राहतात. त्यात बिहारींचा वाटा मोठा आहे. बहुतेक जण चांगल्या उत्पन्नासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले आहेत. बिहारमध्ये रोजगाराच्या संधी फारशा नसल्याने बिहारी कामगार देशभरात पसरले आहेत. बिहारमधील ५० टक्के कुटुंबातील कोणी ना कोणी स्थलांतरित आहे, असे एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये दिसून आले आहे. काश्मीरमध्ये पाणीपुरी विकणारे फार नाहीत. त्यामुळे आपण दिवसाला १०००-१२०० रुपये कमावतो असे पंकज म्हणाले.

बिहारमध्ये रोजगाराच्या संधी नाहीत”

पंकज भूमीहिन आहेत. ते गावाकडे जातात तेव्हा माशाचा व्यवसाय करतात. मात्र, त्यात पैसा फारसा नाही. दिवसाकाठी जेमतेम चारशे रुपये मिळतात. तरीही त्यांनी बिहारमध्ये परतण्याचा निर्णय पक्का केला आहे.

भागलपूरचा रहिवासी २२ वर्षीय राहुल कुमार १५व्या वर्षी काश्मीरमध्ये आला. गेली सात वर्षे ते पाम्पोरमधील एका आईस्क्रीम फॅक्टरीत नोकरी करत आहे. “स्थलांतरितांच्या हत्यांच्या घटना तुरळक आहेत. मलाही भीती वाटत आहे पण मी काश्मीर सोडून जाणार नाही,” असे तो म्हणाला.

श्रीनगरमध्ये गेली १४ वर्षे आईस्क्रीम विकणारे विनोद माहतो म्हणाले, “काश्मीरमध्ये दगडफेक, लष्करी कर्मचाऱ्यांवर हल्ले वगैरे प्रकार कायमच सुरू असतात पण आजपर्यंत कोणत्याही बिहारी व्यक्तीची हत्या झाली नव्हती. म्हणूनच गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे चिंता वाटत आहे.” काश्मीरमधील बहुतेक आईस्क्रीम विक्रेते बिहारमधून आलेले आहेत. ते ऑक्टोबरपर्यंत काश्मीरमध्ये काम करतात. हिवाळ्यात पुन्हा बिहारला जातात व मार्च-एप्रिलमध्ये परत येतात. एरवी नोव्हेंबरच्या सुरुवातीला परत जाणारे विक्रेते या हत्यांच्या घटनांमुळे लवकरच परत जात आहेत, असे विनोद यांनी सांगितले. मार्चपर्यंत परत येण्याचा त्यांचा विचार आहे पण ते शक्य झाले नाही, तर बिहारमध्ये काय करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

“काश्मीरमध्ये आम्हाला महिन्याचे २०,०००-२५,००० रुपये सहज मिळतात. बिहारमध्ये पगार कमी आहेत. दिवसाचे २००-२५० रुपये मिळतात. बिहारमध्ये चांगला पैसा मिळाला, तर काश्मीरमध्ये कोण येईल,” असे विनोद यांनी विचारले.

बुरहान वानीच्या मृत्यूनंतर विनोदही बिहारमध्ये परत गेले होते. सहा महिने घरी काढले पण तेथे कमाई खूपच कमी असल्याने सहा महिन्यांंनंतर पुन्हा काश्मीरला आल्याचे त्यांनी सांगितले.

कठीण काळात स्थानिकांची मदत’

स्थलांतरितांच्या हत्यांमुळे भीतीचे वातावरण असले तरी काश्मीरमधील स्थानिक लोकांनी, विशेषत: मुस्लिमांनी, कायमच आम्हाला मदत केली आहे, असे पंकज पासवान यांनी आवर्जून सांगितले.

“मी राहतो त्या भागात मुस्लिमांची संख्या हिंदूंच्या तुलनेत जास्त आहे पण आम्हाला कधीच वेगळे वाटले नाही. कोणी आजारी वगैरे पडले आणि पैसे नसतील, तर स्थानिक लोक पैशाची व्यवस्था करून देतात,” असे पंकज यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळातही स्थानिकांनी खूप मदत केल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक मुस्लिमांनी चार महिने किराणा पुरवल्याने आम्ही जगू शकलो, असे ते म्हणाले.

स्थलांतरितांच्या हत्यांचा धक्का स्थानिक मुस्लिमांनाही बसला आहे, असे पंकज यांनी नमूद केले.

विनोद मेहता यांचाही अनुभव असाच आहे. “काश्मीरमधील स्थानिक लोक खूपच मदत करणारे व दयाळू आहेत. वीरेंद्रचा खून झाला तेव्हा खूप मोठ्या संख्येने स्थानिक लोक आले होते आणि असे घडायला नको होते अशी भावना व्यक्त करत होते.”

बिहारी स्थलांतरित कामगारांना कठीण परिस्थितीचा सामना यापूर्वीही करावा लागला आहे. गुजरातमध्ये एका बलात्काराच्या घटनेनंतर बिहारी स्थलांतरितांना लक्ष्य करून उसळलेल्या हिंसाचारामुळे अनेक बिहारींना गुजरात सोडून जावे लागले होते.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0