जेएनयूतील सर्व्हरची तोडफोड मुलांनी केलीच नव्हती

जेएनयूतील सर्व्हरची तोडफोड मुलांनी केलीच नव्हती

नवी दिल्ली :  जेएनयूतील विद्यार्थ्यांनीच ३ जानेवारी रोजी विद्यापीठातील बायोमेट्रीक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरा फोडला होता असा आरोप विद्यापीठ प्रशासनाने केला होता. पण प्रशासनाचा हा दावाच खोटा असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.

विद्यापीठातील बायोमेट्रीक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोडतोड ३ जानेवारीला झाली नव्हती कारण त्या दिवशी सर्व्हर बंद होता आणि दुसऱ्या दिवशी ४ जानेवारीला तो वीज गेल्यामुळे बंदच होता. तसेच ३० डिसेंबर २०१९ ते ८ जानेवारी २०२० या दिवसांत एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वा बायोमेट्रिक प्रणालीची तोडफोड झाली नव्हती, असे उत्तर विद्यापीठ प्रशासनाने नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राइट टू इन्फॉर्मेशनचे सदस्य सौरव दास यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराला दिले आहे.

प्रशासनाने आपल्या उत्तरात, ‘५ जानेवारीला दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत जेएनयू विद्यापीठाच्या उत्तर व मुख्य प्रवेशद्वाराचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही. ४ जानेवारीला दुपारी १च्या सुमारास फायबर ऑप्टिकल केबल नष्ट झाल्याचे’ म्हटले आहे.

वाचकांना माहिती म्हणून ५ जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास चेहऱ्यावर कापड बांधून किमान १०० गुंड विद्यापीठात लाठ्या, काठ्या, हॉकी स्टीक, लोखंडी सळ्या घेऊन घुसले होते आणि त्यांनी साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन अनेक मुलांवर प्राणघातक हल्ले केले होते. या गुंडांनी प्राध्यापकांनी सोडले नाही. त्यांनी जेएनयूतल्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिचे डोकेही फोडले होते व तिला रक्तबंबाळ केले होते.

या घटनेनंतर देशभर गदारोळ उडाला होता. देशभर विद्यार्थ्यांनी अधिक तीव्र आंदोलने सुरू केली होती. जेएनयूत घुसलेल्या गुंडामध्ये काही विद्यार्थी संघपरिवाराशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते हे पुढे सिद्ध झाले, तरीही दिल्ली पोलिसांनी एकाही गुंडाला व अभाविपच्या कार्यकर्त्याला अद्याप अटक केलेली नाही. पण त्यांनी आयेषी घोष समवेत अन्य १९ मुलांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कुलगुरूंचा खोटेपणा उघड

जेएनयूत गुंडांनी घातलेल्या हैदोसाबद्दल कुलगुरू जगदीश कुमार यांची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद अशीच होती. ही घटना घडल्यानंतर ते अनेक दिवस प्रसिद्धी माध्यमांपुढे आले नव्हते. उलट विद्यापीठ प्रशासनाने ३ जानेवारी रोजी काही विद्यार्थ्यांनी चेहऱ्यावर कापड बांधून सीआयएस केंद्रात घुसून तेथील वीज घालवली होती व तेथील सर्व्हर बंद केला होता. त्यामुळे विद्यापीठातील सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक प्रणाली व इंटरनेट बंद पडल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.

कुलगुरू जगदीश कुमार यांनी ५ जानेवारीच्या दिवशी ज्या गुंडांनी विद्यापीठात गुंडगिरी केली त्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे विधान केले होते. त्यांनी हे फुटेज विद्यार्थ्यांनीच नष्ट केल्याचा आरोपही केला होता. विद्यार्थ्यांनी ३ व ४ जानेवारीला असे का केले? त्यांनी सर्व्हर का बंद केले? ५ जानेवारीला विद्यापीठात काही अघटित घडणार आहे याची माहिती या विद्यार्थ्यांना होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

मूळ बातमी

COMMENTS