आनंदवनात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी  

आनंदवनात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी  

आनंदवन या प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या संस्थेत सध्या जे चालले आहे, त्याची राज्य शासनाने चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची पुण्यात चाचणी सुरू
अलिगढ विद्यापीठात पोलिसांची क्रूर मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ
मंदी उलटवण्यासाठी मोदी काय करू शकतात?

पुण्यातील नाट्य-चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रकार शेखर नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून प्रसिद्ध समजसेवाक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन प्रकल्पामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत लक्ष न दिल्यास स्वतःसह काही कार्यकर्ते आपापल्या घरी उपोषणाला बसतील, असेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

कोरोना परिस्थिति असतानाही २७ जून २०२० रोजी आनंदवन ग्रामपंचायत आणि आनंदवन व्यवस्थापन यांनी राजू आणि सारीका सौसागडे या कुटुंबास घरातून बाहेर काढण्याचा ग्राम पंचायती मध्ये ठराव केला होता. हा ठराव नाईक यांनी आपल्या पत्रासोबत जोडला असून, असा ठराव करणे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.

नाईक यांनी महारोगी सेवा समिती आणि समितीच्या सर्व विश्वस्तांना पत्र लिहिले होते. एखाद्या कुटुंबावर अन्याय करणे, उन्हाळ्यात त्यांची वीज तोडणे, संस्थेच्या आवारात संचारबंदी करणे, कुटुंबाला वाळीत टाकणे, आणि हे अधिकार संस्थेला कोणी दिले असे प्रश्न विचारले आहेत. संस्थेतील काही अधिकारी, हे प्रकार करीत असून, या सगळ्याला सर्व विश्वसतांची मान्यता आहे का, विश्वस्त गप्पा का आहेत, असे प्रश्न विचारले असून, त्यांनी हे हे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

१ एप्रिल २०२० रोजी महारोगी सेवा समितीने राजू आणि सारीका सौसागडे या आनंदवन येथे राहणाऱ्या कुटुंबाला एक पत्र दिले होते. यामध्ये सौसागडे हे संस्थेमध्ये फुट पाडत असून, सदस्यांना खोटेनाटे सांगत आहेत. तसेच विश्वस्तांवर खोटे आरोप करीत असल्याचे म्हंटले आहे. त्यांच्याविषयी कुष्ठ रुग्णांकडून तक्रारी आल्याने, त्यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलींना संचारबंदी करीत असल्याचे पत्र दिले होते. हे पत्रही नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबरोबर जोडले आहे.

यवतमाळ येथे आनंदवनचाच मूळगव्हाण या गावामध्ये एक प्रकल्प आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी हा प्रकल्प बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून उभा राहिला आहे. या ठिकाणी महेश देसाई आणि त्यांची मुलगी रचना देसाई काम करण्यासाठी गेले होते. त्यांना त्याठिकाणी आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी एका ईमेल मध्ये लिहिले आहेत. हे अनुभव आल्याने त्यांनी संस्था सोडण्याचा निर्णय घेतला. हे अनुभव मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राबरोबर जोडण्यात आले आहेत.

राजु शालीक सौसागडे, यांनीही आपल्या संदर्भात समितीने केलेला व्यवहार एका पत्रात मांडला आहे. आपण कुष्ठरुग्णाचा मुलगा असून, आपल्याला घराबाहेर काढण्यात आले. ही संविधान विरोधी कृती असल्याचे त्यांनी पत्रात म्हंटले आसून, हे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्राबरोबर जोडण्यात आले आहे.

गौरव गोपीचंद शामकुले आणि विजय शंकर जुमडे या कार्यकर्त्यांनीही पत्र लिहून सौसागडे यांना घराबाहेर काढण्याची तक्रार केली आहे.

या प्रकारांमध्ये लक्ष घालावे. संबंधीत अधिकाऱ्यांचे राजीनामे घ्यावेत आणि संस्था पूर्ववत आनंददायी करावी, असा आग्रह पत्रात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, धर्मादाय आयुक्त यांनी लक्ष न घातल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

उरूस, जय शंकर, म्हैस या चित्रपटाचे आणि तुझी आम्री या नाटकाचे नाईक दिग्दर्शक आहेत. ते अनेकवर्षे आनंदवन या संस्थेशी संबंधीत होते. त्यांनी संस्थेसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0