क्रौर्याचा अहवाल

क्रौर्याचा अहवाल

शिव कुमार हा दलित कार्यकर्ता. शहीद भगतसिंग यांना आपला आदर्श मानणारा. कुंडली इंडस्ट्रियल असोसिएशन आणि मजदूर अधिकार संगठन यामध्ये झालेला वाद तसेच या कामगार संघटनेने शेतकरी आंदोलनास दिलेला पाठिंबा, या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीला सिंघू बॉर्डरजवळून साध्या वेशातल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

शेतकरी मागण्यांवर ठाम, आंदोलन चिघळले
‘१९८४’ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही – दिल्ली हायकोर्ट
‘ये लो आझादी’ म्हणत युवकाचा आंदोलकांवर गोळीबार

शिव कुमार हा दलित कार्यकर्ता. शहीद भगतसिंग यांना आपला आदर्श मानणारा. कुंडली इंडस्ट्रियल असोसिएशन आणि मजदूर अधिकार संगठन यामध्ये झालेला वाद तसेच या कामगार संघटनेने शेतकरी आंदोलनास दिलेला पाठिंबा, या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीला सिंघू बॉर्डरजवळून साध्या वेशातल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अज्ञात जागी नेऊन त्यास बेदम मारहाण केली. शुद्धीवर आला तेव्हा, आपण हरियाणा पोलिसांच्या ताब्यात आहोत, हे त्यास कळले. त्या नंतर म्हणजे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुटका होईपर्यंत त्याचा दररोज शारीरिकमानसिक छळ होत गेला. त्या छळाचा तपशील उघड करणारा हा वैद्यकीय अहवालबरहुकुम अनुवाद. व्यवस्था म्हणून आपण काय टोक गाठले आहे आणि समाज म्हणून आपण किती निबर झालो आहोत, याची साक्ष पटवणारा

वैद्यकीय अहवाल, पान क्रमांक ५

कुंडली पोलिस ठाण्याशी संबंधित पोलिस आले आणि त्यांनी काही लोकांना अटक केली. त्यावेळी आरोप असा आहे की, स्टेशन हाऊस ऑफिसरने (एसएचओ) त्याच्या (शिव कुमार) काही मित्रांना मारहाण केली आहे. १६ जानेवारी २०२१, या दिवशी रुग्ण (शिव कुमार) कुंडली परिसरातल्या केएफसीजवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सामील झालेला होता. तेव्हा २.३० ते ३.०० या वेळेत त्याला सी. आय. स्टाफने (सर्कल इन्स्पेक्टर) आपल्या ताब्यात घेतले. ताब्यात घेणाऱ्यांमध्ये सात जण होते आणि त्यानंतर त्यांनी त्याला सोनेपत इथल्या जुन्या कचेरीत नेले. तिथे सीआय स्टाफने त्याला मारहाण केली. त्याचे दोन्ही पाय बांधले. त्याला जमिनीवर आडवे केले. आणि मग त्याच्या पायाच्या दोन्ही तळव्यांवर दांड्याने मारहाण करत राहिले. या मारहाणीमुळे त्याच्या उजव्या पायाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या बोटांची नखे तुटली. आणि डाव्या पायाचा अंगठा आणि त्यावरील नख काळे-निळे पडले. त्यांनी त्याच्या पार्श्वभागावरही चपट्या काठीने सपकारे मारले. त्यानंतर त्यांनी त्याचे हात बांधले आणि त्याचे पाय फाकवले. त्यानंतर त्यांनी पाय सरळ ठेवून त्याला जमिनीवर आडवे होण्यास सांगितले. ते केल्यानंतर एक लोखंडी नळी त्यांच्या मांड्यांवर ठेवून दोन जणांनी दाब देऊन ती नळी मांडीवर वर-खाली फिरवली. त्यांनी त्याच्या दोन्ही हातांवर-हातांच्या तळव्यांवरही काठीने वार केले. डोक्याच्या मागील बाजूवरदेखील त्याला मार दिला गेला. त्याला तीन दिवस झोपू दिले गेले नाही. सीआय स्टाफने त्याची जबानी घेतली, त्या जबानीत त्याने काही नावे सांगावी म्हणून त्याच्यावर दबाव आणला गेला. जेव्हा त्याला ते शक्य झाले नाही, तेव्हा त्यांनी त्याला एका खुर्चीला बांधले आणि त्याच्या डोक्यावर पाणी ओतले.

त्यांनी त्याला २४ जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले आणि १० दिवसांचा रिमांड मिळवला. अशा रीतीने तो १६ जानेवारी २०२१ ते २ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत तो पोलिस कोठडीत ठेवला गेला आणि २ फेब्रुवारी २०२१नंतर सोनेपत तुरुंगात त्याची रवानगी करण्यात आली. पोलिसांच्या कोठडीत असताना, त्याच्यावर शारीरिक तसेच मानसिक अत्याचार झाले. आणि या दरम्यान त्यांनी त्याच्या पायावर गरम पाणीदेखील ओतले. त्यामुळे जे फोड त्याच्या शरीरावर आले होते, ते गरम पाण्यामुळे फुटले.

२९ जानेवारी रोजी ते त्याला हरिद्वार येथे घेऊन गेले, असा आरोप आहे, परंतु प्रत्यक्षात त्याला सांभलका पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते. ३० जानेवारी रोजी ते हरिद्वार येथे पोहोचले होते.

२ फेब्रुवारी रोजी त्यांनी त्याला न्यायालयात नेले, परंतु तिथे गेल्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा होणाऱ्या सुनावणीची ८ फेब्रुवारी २०२१ ही तारीख त्यांना मिळाली.

जनरल फिजिशियनने केलेली तपासणीः (ही तपासणी विभागाच्या मेडिको-लीगल एक्झॅमिनेशन रुममध्ये करण्यात आली.)

रुग्ण शुद्धीत होता, अभिमुख होता आणि सहकार्य करत होता. चालताना किंचित लंगडत होता.

जखमाः

१. रंगबदल झालेला भाग, बदललेला रंग काळा, इंग्रजी L सारखा दिसणारा. त्याचा आकार १० से.मी x ३ से.मी. हा व्रण डाव्या मांडीवरच्या मधल्या भागावर दिसत आहे. असाच त्वचेवरचा रंगबदल गुडघ्याच्या सांध्याच्यावर १७ से.मी. अंतरावरही आहे. आणि अंगाच्या खालच्या बाजूला असाच रंगबदल दिसतो आहे. त्याचा आकार ७x२ इतका आहे. स्पर्श केल्यानंतर हा भाग मऊ लागला नाही.

२. रंगबदल झालेला भाग, रंगाने काळा, त्याचा आकार ७ से.मी. X २ से. मी. इतका आहे. हा जखम झालेला व्रण उजव्या मांडीच्या मध्यभागी दिसतो आहे. गुडघ्याच्या सांध्याच्या १६ से.मी.वर आहे. स्पर्श केल्यानंतर हाही भाग मऊ लागलेला नाही.

३. उजव्या पायाला सूज आलेली आहे आणि स्पर्श केल्यानंतर मऊपणा जाणवतो आहे. या भागावर काळ्या रंगाचा बदल त्वचेमध्ये झालेला आहे. आकाराने हा बदल झालेला भाग ५ से.मी. X २.५ से.मी. इतका आहे. उजव्या पायाच्या दुसऱ्या बोटाच्या खाली २ से.मी. इतका भाग काळा पडलेला आहे.

४. डाव्या पायाला सूज आलेली आहे आणि त्यास स्पर्श केल्यानंतर मऊपणा जाणवतो आहे.

५. उजव्या पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटाची नखे उखडली गेली आहेत. आतली त्वचा रंगाने लालसर दिसते आहे आणि जखम भरत असल्याची लक्षणे त्यात दिसत आहेत.

६. डाव्या पायाचा अंगठा काळा झालेला दिसतो आहे.

७. डाव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी काळ्या-निळ्या रंगाची झालेली दिसते आहे. त्यात बरी होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही दिसत आहे.

८. उजव्या हाताच्या मनगटाला स्पर्श केल्यास मऊपणा जाणवतो आहे.

इन्वेस्टिगेशनः एक्स रेज

१.एक्स रे बोथ फिट, एपी अँड लॅट. व्ह्यू (एक्स रे ट्युबकडे तोंड करून- अँटेरिअर-पोस्टेरिअर अँड लॅटरल- शरीराच्या एका बाजूने)

२.एक्स रे राइट रिस्ट एपी/ लॅट. व्ह्यू

३. एक्स रे लेफ्ट हँड एपी/ लॅट. व्ह्यू

रिपोर्टः एक्स नंबर१०७०७/२०. टोटल फिल्म्सः ०५, एक्स रे लेफ्ट हँड एपी/ऑब्लिक व्ह्यू, अॅज रिपोर्टेड बाय डॉ. इरविनजित कौर, सीनिअर रेसिडेंट अँड डॉ. संदीप मोदगिल, असि. प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ रेडिओडायग्नोसिस. रिपोर्ट अँड दी एक्सरेज् आर एन्क्लोज्ड इन ओरिजिनल.

देअर इज फ्रॅक्चर डिस्टल फॅनॅक्स ऑफ दी सेकंड डिजिट ऑफ लेफ्ट हँड

(याचा अर्थ डाव्या हाताच्या दुसऱ्या बोटाच्या टोकाकडच्या भागाकडे तडा गेलेला आहे.)

फ्रॅक्चर ऑफ बेस ऑफ फिफ्थ मेटाटॉर्सल बोन ऑफ राइट फूट

(याचा अर्थ उजव्या पायाच्या पाचव्या बोटाच्या हाडाला तडा गेलेला आहे.)

वैद्यकीय अहवाल, पान क्रमांक ६

पॉसिबली फ्रॅक्चर/सेकंड बोन अॅट नाविक्युलर बोन (फूट)

(याचा अर्थः हाड तुटल्याची शक्यता/ डाव्या पायाच्या वरच्या बाजूकडील हाड)

पॉसिबल फ्रॅक्चर ऑफ दी राइट अल्ना बोन (राइट रिस्ट)

(याचा अर्थ उजव्या हाताच्या मनगटाचे हाड तुटल्याची शक्यता आहे.)

साइकियाट्रिक इव्हॅल्यूएशनः (रुग्णाचे मानिसक विश्लेषण)

वर नमूद केल्याप्रमाणे असलेल्या वयाच्या या तरुण माणसाने हवामानाला अनुरुप कपडे परिधान केले आहेत, हे कपडे तसेच डोळ्यांवर घातलेला चष्मा त्याने विश्लेषणासाठी २० फेब्रुवारी २०२१ रोजी जमा केला. तो मनाने खूप व्यथित आणि दुःखी भासला, त्याला अधूनमधून रडू येत असल्याचे जाणवले. त्याच्यावर गुदरलेल्या वर्तमानातल्या गुंत्यात तो मानसिकदृष्ट्या अडकलेला असल्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर ज्या प्रकारे निर्घृण अत्याचार झाले, त्याला ज्या प्रकाराने दुःस्वप्नसमान वास्तव अनुभवावे लागले, ज्या प्रकारे त्याच्या वाट्याला एकाकीपण आले, त्याच्या मनात ज्याप्रकारे भवितव्याबद्दल अनिश्चितता दाटून आली आणि ज्या प्रकाराने त्याला निद्रानाशाचा अनुभव आला, या सगळ्यांमुळे आपल्यात चिंताग्रस्ततेची लक्षणे असल्याचे त्याने नोंदले.

ओव्हरऑल इव्हॅल्यूएशन इज सजेस्टिव्ह ऑफ पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर लाइक सिण्ड्रोम

(याचा अर्थ एकूण मूल्यांकन आघात पश्चात तणावामुळे येणाऱ्या रुग्णाच्या मानसिक अस्थिरतेकडे निर्देश करीत आहे.)

मतः

रुग्णाच्या शरीरावरच्या बहुतेक सगळ्या जखमा दोन आठवड्यांहून जुन्या आहेत. त्या घातक वस्तुंमुळे/शस्त्रांमुळे झालेल्या आहेत.

जखम क्रमांक १,२,५ आणि ६ स्वरुपाने साधारण आहेत.

जखम क्रमांक ३ आणि ७ खोलवर आहेत.

जखम क्रमांक ४ आणि ८ बद्दल आताच अंतिम मत संभवत नाही, कारण जसे त्यांचे स्वरुप आहे, त्यानुसार त्यात हाड तुटण्याची शक्यता अधिक आहे.

रुग्णाचे मानसिक मूल्यांकन आघात पश्चात तणावामुळे येणाऱ्या रुग्णाच्या अस्थिर मनोदशेकडे निर्देश करीत आहे.)

स्वाक्षऱ्या

डॉ. अश्वनी सोनी (असि. प्रोफेसर ऑर्थोपेडिक्स, मेंबर)

डॉ. मनदीप सिंह (असि. प्रोफेसर जनरल सर्जरी, मेंबर)

डॉ. निधी चौहान (असि. प्रोफेसर सायकिअॅट्री, मेंबर)

डॉ. संदीप मोदगिल (असि. प्रोफेसर रेडिओडायग्नोसिस, मेंबर)

डॉ. दासरी हरीश (प्रोफेसर अँड एचओडी फोरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्सिकॉलॉजी, चेअरपर्सन)

वरील मत सर्व संबंधित कागदपत्रांसह सुनील, क्रमांक १६०० जिल्हा तुरुंग, सोनेपत, हरियाणा यांना बंद लिफाफ्यात सादर करण्यात आले. या अहवालाची एक प्रत या प्रकरणातले याचिकाकर्ते श्री. राजबीर यांचे वकील श्री. हरिंदर दीप सिंह बैन्स यांनाही बंद लिफाफ्यात सादर करण्यात आली. ओथ कमिशनर, सोनेपत मुकेश रानी यांनी त्यावर २३ फेब्रुवारी रोजी प्रमाणित करताना सहीशिक्का मारला.

एरवी, शिव कुमारवर झालेल्या अत्याचाराची वाच्यताही झाली नसती. परंतु वैद्यकीय अहवाल मीडियापर्यंत पोहोचल्याने यंत्रणेचा क्रूर चेहरा जनतेसमोर आला. त्याच्याच जोडीने नवदीप कौर नावाच्या दलित कार्यकर्ती तरुणीसही पोलिसांनी कोणताही आरोप सिद्ध न करता तुरुंगात डांबून ठेवले. तिने तर सरळ पोलिसांनी शारीरिक अत्याचार करताना माझ्या प्रायव्हेट पार्टवरही मारहाण केली, असे धाडसाने जगाला सांगितले. कोणी म्हणेल, हे तर काँग्रेसच्या काळातही घडत होते, कम्युनिस्टांच्या राज्यातही घडले होते. मुद्दा, व्यवस्था बदलत नाही हा आहेच, पण राज्यकर्त्यांची सोय पाहूनच ती कमी-अधिक प्रमाणात क्रूर नि निष्ठूर होत जाते आणि समाजाची या सोयीच्या क्रूरपणास मूक संमती असते, हा आहे…

गेल्या मंगळवारी शिव कुमार यांना सोनीपत पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने फरिदाबाद जिल्हा व सत्र न्यायाधीशांना दिले आहेत.

मुक्त संवाद १५ मार्च २०२१च्या अंकातून साभार.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0