शुजात बुखारी हत्या : वेदना कायम, प्रश्नही अनुत्तरीत

शुजात बुखारी हत्या : वेदना कायम, प्रश्नही अनुत्तरीत

जर शुजातसारख्या माणसाला जगण्याचा हक्क नाही तर मग या जगात कोणाला आहे? : डॉ. तहमिना बुखारी

‘मै भी अण्णा’
युघुर प्रश्न : चीनच्या महत्वाकांक्षेतून निर्माण झालेली समस्या
महापूर येणार आहे हे माहिती होतं !

गेल्या वर्षी याच महिन्यात रमजान सुरू होता व केंद्र सरकारने या काळात जम्मू व काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय घेतला. सरकारचा हेतू चांगला होता. दहशतवादी व सुरक्षा दलांमधील रोज होणाऱ्या चकमकी, निदर्शकांची आंदोलने व पाकिस्तानकडून सीमापार होणारा गोळीबार याने काश्मीर खोऱ्यातले दैनंदिन जीवन तणावपूर्ण असताना मुस्लिमांना पवित्र वाटणाऱ्या रमजान सणाच्या काळात संपूर्ण खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी, ही केंद्र सरकार व राज्य सरकारची अपेक्षा चुकीची नव्हती. पण १३ जून २०१८रोजी ‘रायझिंग काश्मीर’ या वर्तमानपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या झाली आणि खळबळ उडाली.

शुजात बुखारी हे काश्मीर खोऱ्यातले साहसी व निडर पत्रकार म्हणून ओळखले जात होते. पाकिस्तानशी चर्चा करणाऱ्या ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’चा, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणाऱ्या उदारमतवादाचा तो एक आधारस्तंभ होता. बुखारी यांची हत्या होण्याच्या आठवडाअगोदर ६ जून रोजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काही दहशतवादी गट शस्त्रसंधी उधळण्याचा कट करत असल्याचा आरोप केला होता. हा आरोप बुखारी यांच्या हत्येमुळे खरा ठरला. बुखारी यांची हत्या करून दहशतवाद्यांनी शस्त्रसंधीचा मुख्य हेतूच उडवून लावला होता. दहशतवाद्यांना शांततेचे कोणतेच प्रयत्न नको आहेत, हे त्यातून स्पष्ट झाले होते; शिवाय बुखारींसारख्या पत्रकाराची हत्या करून दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये उमटणारा लोकशाहीचा आवाजही बंद करायचा होता, हेही दिसून आले.

हत्येला एक वर्ष

काल १४ जून रोजी बुखारी यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले. आजही त्यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना, जम्मू व काश्मीर पोलिसांना यश आलेले नाही. बुखारी यांची हत्या लष्कर-ए-तयब्बा या दहशतवादी संघटनेने केल्याचे सांगितले जात होते. त्यासाठी विशेष तपास पथकही तयार केले होते पण हा तपास आजही कोणत्या दिशेला सुरू आहे याबद्दल कोणालाच माहिती नाही.

बुखारी यांची हत्या झाल्यानंतर पाचच दिवसांत १९ जून रोजी भाजपने मेहबुबा मुफ्ती सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागे त्यांनी जम्मू व काश्मीरमधील ढासळती राजकीय परिस्थिती व कायदा-सुव्यवस्थेचे वाजलेले तीनतेरा ही कारणे सांगितली होती. भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जम्मू व काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट आणण्यात आली व थेट केंद्राच्या अखत्यारित कायदा व सुव्यवस्था विषय आला. या रचनेमुळे बुखारी यांच्या मारेकऱ्यांना पकडले जाईल, अशी आशा होती पण तसे काही झाले नाही. बुखारी यांचे मारेकरी तर सापडले नाहीत पण त्यांच्या हत्येमागचा नेमका हेतू काय हे आजही कोडे आहे?

पोलिसांना बुखारी यांच्या हत्येमागे कोणताही हेतू नव्हता असे वाटते. पण काश्मीर खोऱ्यात बुखारी यांच्याविरोधात प्रचंड प्रमाणात विखारी व विषारयुक्त प्रचार सुरू होता. हा प्रचार करणारे आजही काश्मीरच्या मीडियात, सोशल मीडियात लेखन करताना दिसतात, त्यांच्यापर्यंत पोलिस तपास यंत्रणा का पोहचू शकली नाही हा प्रश्न आहे. बुखारी यांच्या हत्येच्या कटात ही मंडळी सामील असतील असा दावा नाही पण त्यांचे हात बुखारींच्या रक्ताने नक्कीच बरबटलेले आहेत. ही मंडळी कोण आहेत हे इंटरनेटवर जाऊन त्यांनी बुखारीविरोधात केलेले लेखन वाचल्यास लक्षात येते. पोलिसांना या मंडळींचे आयपी अड्रेस मिळू शकतात, इंटरपोल किंवा भारताच्या तपास यंत्रणांशी समन्वय साधून बुखारी यांच्या हत्येमागचा नेमका हेतू काय होता, इथपर्यंत जाणे सहज शक्य आहे.

देशाला काश्मीर समजवणारा सच्चा पत्रकार

९०च्या दशकापासून बुखारी यांची पत्रकारिता काश्मीरच्या खोऱ्यात बहरत गेली होती. खोऱ्यातील प्रत्येक गाव, खेडे, शहरांचे प्रश्न, सामान्य काश्मिरी जनतेच्या जगण्याच्या व्यथा, दहशतवादी गट व लष्कर यांच्या कात्रीत सापडलेला सामान्य काश्मिरी माणूस यांना केंद्रस्थानी धरून त्यांची पत्रकारिता होती. काश्मीर खोऱ्याचा अभ्यास करणारे भारतातले जे काही पत्रकार, अभ्यासक तेथे जात त्यांच्यासाठी बुखारी माहितीचा एक महत्त्वपूर्ण स्रोत होता. ‘द हिंदू’ या चेन्नईमधल्या इंग्रजी वर्तमानपत्रासाठी त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ प्रमुख वार्ताहराचे काम केले होते. त्या वेळी इंटरनेट, मोबाइलसारखी संपर्काची साधने नव्हती. पण भारतातील माध्यमे ज्या पद्धतीचा काश्मीर रंगवत असत त्याच्यापेक्षा भिन्न काश्मीर, बुखारी आपल्या बातम्या, वृत्तांकनातून वाचकांपर्यंत आणत होते.

दहशतवादाच्या छायेत पत्रकारिता करणे हे पत्रकारापुढचे खरे आव्हान असते. काश्मीर खोरे हा असा अशांत भाग आहे की जेथे भारत, पाकिस्तानचे लष्कर-राजकीय नेते, काश्मीरची जनता व दहशतवादी गट यांच्या दबावाखाली पत्रकारिता करावी लागते. हे दबाव गट खरी बातमीदारी करणाऱ्या पत्रकाराला दूषणे देत असतात. त्यात आजचा काळ असा आहे की देशातील काही मीडिया हाउसेस काश्मीर खोऱ्यात जिवाची बाजी लावून तटस्थ पत्रकारिता करणाऱ्यांना, काश्मीरच्या हिताची भूमिका निर्भीडपणे मांडणाऱ्यांवर देशद्रोही असा शिक्का मारताना दिसतात. पण बुखारी यांची पत्रकारिता इतकी सच्ची होती की दहशतवादी गट त्यांना ‘गद्दार’, ‘भारताचे एजंट’ म्हणून संबोधत होते. तर काही जण ‘रायझिंग काश्मीर’ हे ‘आयएसआयचे स्क्रीप्ट’ आहे असा आरोप करत. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियात त्यांच्या प्रतिमेचे प्रचंड प्रमाणात हनन करण्यात आले होते. अत्यंत संघटित अशी ही मोहीम होती. तरीही बुखारी काम करत होते. त्यांच्यावर २००६मध्ये दहशतवाद्यांनी हल्लाही केला होता.

पण अशा हल्ल्याला घाबरून त्यांनी पत्रकारिता करणे सोडून दिले नाही. उलट त्यांनी ‘द हिंदू’चा राजीनामा देऊन स्वत:चे ‘रायझिंग काश्मीर’ हे वर्तमानपत्र सुरू केले. ते पत्रकारिता करत खोऱ्यात शांततावादी, लोकशाहीवादी व उदारमतवादी समूह-गटांना एकत्र आणण्याचा सतत प्रयत्न करत होते. काश्मीर प्रश्न चर्चा-वाटाघाटी व शांततेच्या मार्गातूनच सुटू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्याचबरोबर खोऱ्यातील मुसलमान व हिंदू पंडित यांच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील होते. काश्मिरी तरुणांना पत्रकारितेकडे वळवण्यामागे त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे होते. काश्मीर खोऱ्यातला हिंसाचार हा आजच्या काळात देशातल्या मीडियामधून प्रमुखपणे मांडला जातो.

पण त्याच्या पलीकडे सामान्य काश्मिरी माणसाचे प्रश्न आहेत. राष्ट्रीय स्तरावरच्या प्रसारमाध्यमांनी ते समजून घ्यायला पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. काश्मिरी पत्रकार फक्त काश्मिरी हिताचेच बोलतात, हा आरोप त्यांना अमान्य होता. दहशतवादाच्या छायेत साहस व बेडरपणा दाखवत आमचे पत्रकार पत्रकारिता करत असतात, ते समजून घ्या, असे ते निक्षून सांगत. काही उजव्या विचारसरणीच्या इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी काश्मीरची जी प्रतिमा निर्माण केली आहे ती विषारी, विखारी आणि सत्याचा अपलाप करणारी आहे, अशी भूमिका ते त्या वृत्तवाहिन्यांवर थेट मांडत. अशी निडर भूमिका मांडणेच अनेकांना खटकले होते.

काश्मीरला साहसी पत्रकारांचा इतिहास

९०च्या दशकात जेव्हा काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आक्रमक झाले, तेव्हा खोऱ्यातील मोजकेच पत्रकार येणारा काळ किती भयंकर आहे हे समजून घेऊन पत्रकारिता करू लागले. हे पत्रकार दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आले. १९९१ साली ‘अल-सफा’चे संपादक मोहम्मद शबान वकील यांची काही दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या हत्या केली. सध्या ‘एनडीटीव्ही’त कार्यरत असलेले झफर इक्बाल यांच्यावर दहा वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. बंदुकीतून सुटलेली एक गोळी त्यांच्या नाकात घुसली. सुदैवाने ते वाचले. २००३मध्ये परवेज सुल्तान या पत्रकाराची त्याच्या कार्यालयात जाऊन हत्या करण्यात आली. काश्मीरच्या पत्रकारितेचा आधारस्तंभ ओळखले जाणारे युसूफ जमील त्यांच्या कार्यालयात असताना एका बुरखा घातलेल्या महिलेने एक बॉक्स पोहोचवला. युसूफ जमील यांचे सहकारी व छायाचित्रकार मुश्ताक अली यांनी हा बॉक्स उघडतात त्यात ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला आणि मुश्ताक अली जागीच ठार झाले. या सर्व पत्रकारांच्या हत्यांच्या फायली टेबलावर धुळ खात पडल्या आहेत. एकाही हल्लेखोराला पोलिस पकडू शकलेले नाहीत. पोलिसांचे हे अपयश काश्मीरमधल्या पत्रकारितेपुढचे खरे आव्हान आहे.

बुखारी यांच्या पत्नीची श्रद्धांजली

काल आपल्या साहसी पतीच्या हत्येला एक वर्ष झाल्यानंतर अत्यंत धीराने जगणाऱ्या डॉ. तहमिना बुखारी म्हणतात, ‘शुजातच्या जाण्याने जगणं अवघड झालंय. आसपासच जगच बदललय असं वाटतंय. जेव्हा गरज असायची तेव्हा हा माणूस सोबत असायचा आता तो नसल्याने मन सैरभैर होतं. ते असते तर माझ्या मुलांना एक दिशा मिळाली असती ती कमतरता जाणवतेय. लोक मला विचारतात शुजातला का मारलं? मी ही हा प्रश्न मला सतत विचारते की शुजातला का मारलं? मग वाटून जातं की, जर शुजातसारख्या माणसाला जगण्याचा हक्क नाही तर मग या जगात कोणाला आहे? माझे पती गेलेत, ते परत येणार नाहीत. पण त्यांना न्याय मिळेल असे वाटते. शुजातचे काश्मीरमधील कार्यच इतके मोठे आहे की, ते पुढे नेणे हेच माझ्यापुढचे ध्येय्य आहे. हा माणूस कसा होता हे सांगण्यासाठी मी लवकरच पुस्तक लिहिणार आहे. शुजातची ‘रायझिंग काश्मीर’ प्रकाशन संस्था त्यांच्या जाण्याने कोलमडेल असे अनेकांना वाटत होते. पण तसे झाले नाही. उलट माझ्या सहकाऱ्यांनी निर्धाराने ही संस्था पुन्हा उभी केलेली आहे. शुजात यांचे ‘Kashmir’s Thin Red Lines’ हा लेखांचा संग्रह लवकरच प्रसिद्ध करणार आहोत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: