मदरसे बंद करणे मुस्लिमांच्या हितासाठीच: हिमंता बिस्वा शर्मा

मदरसे बंद करणे मुस्लिमांच्या हितासाठीच: हिमंता बिस्वा शर्मा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या साप्ताहिक 'पांचजन्य' आणि 'ऑर्गनायझर'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले, की मदरशांमध्ये मुलांना प्रवेश देणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

स्क्रिपालचा खून आणि बेलिंगकॅट
सुवर्ण पदक विजेत्या मुलीने सरन्यायाधीशांच्या हस्ते पदक घेणे नाकारले
मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन

नवी दिल्ली: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी रविवारी एका कार्यक्रमात सांगितले, की जो कोणी मदरसे बंद करतो आणि समान नागरी संहितेची चर्चा करतो तो खरोखरच भारतीय मुस्लिमांचा मित्र आहे.

लहान मुलांच्या मदरसा शिक्षणाचा त्यांनी विरोध केला आणि ते म्हणाले, की कोणत्याही धार्मिक संस्थेत प्रवेश अशा वयात असावा ज्यामध्ये माणूस स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) साप्ताहिक ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायझर’च्या आयोजित कार्यक्रमात बोलताना शर्मा म्हणाले, की  मुले मदरशात शिकून डॉक्टर किंवा अभियंता बनणार नाहीत, असे सांगितले तर ते तिथे शिकण्यास तयार होणार नाहीत. अशा धार्मिक शाळांमध्ये मुलांना प्रवेश देणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असा दावा त्यांनी केला.

शर्मा म्हणाले, ‘मदरसा, हा शब्दच काढून टाकावा. जोपर्यंत हा मदरसा मनात डोकावत राहील तोपर्यंत मुलं डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ शकत नाहीत. मुलाला मदरशात प्रवेश देताना विचारले तर… एकही मूल तयार होणार नाही. मानवी हक्कांचे उल्लंघन करून मुलांना मदरशांमध्ये प्रवेश दिला जातो.

कार्यक्रमानंतर शर्मा यांनी त्यांचे म्हणणे स्पष्ट केले. ते म्हणाले, की मदरशांमधील शिक्षण व्यवस्था अशी असावी की ती विद्यार्थ्यांना भविष्यात काहीही करण्याचा पर्याय देऊ शकेल.

“कोणत्याही धार्मिक संस्थेत प्रवेश अशा वयात असावा की ज्या वयात ते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

शर्मा यांनी नंतर ट्विट केले, ‘मी नेहमीच अशा मदरशांना विरोध केला आहे, जेथे औपचारिक शिक्षणापेक्षा धार्मिकतेला अधिक प्राधान्य दिले जाते. प्रत्येक मुलाला विज्ञान, गणित आणि आधुनिक शिक्षणातील इतर विषयांचे ज्ञान देणे गरजेचे आहे.’

शर्मा यांनी कार्यक्रमात सांगितले, की प्रत्येक मुलाला औपचारिक शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे. आसाममध्ये राज्य सरकार अनुदानित मदरसे बंद करणारे शर्मा म्हणाले, की जर भारतीय मुस्लिमांना शिक्षणात प्रगती करायची असेल तर ‘मदरसा’ हा शब्द नामशेष झाला पाहिजे.

ते म्हणाले, ‘तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरी तासनतास कुराण शिकवू शकता, पण शाळेत मुलाला विज्ञान आणि गणित शिकवायला हवे. प्रत्येक मुलाला विज्ञान, गणित आणि आधुनिक शिक्षणातील इतर विषयांचे ज्ञान दिले जावे.”

मदरशात जाणारे विद्यार्थी हुशार असतात कारण ते कुराण तोंडी लक्षात ठेवतात, असे सांगितल्यावर शर्मा म्हणाले, “मदरशात जाणारे मूल गुणवंत असेल तर ते त्याच्या हिंदू वारशामुळे… सर्व मुस्लिम हिंदू होते. इथे कोणीही मुस्लिम म्हणून आलेले नाही, भारताच्या भूमीत सर्व हिंदू आहेत. त्यामुळे जर एखादा मुस्लिम मुलगा खूप हुशार असेल तर त्याचे श्रेय मी त्याच्या हिंदू भूतकाळाला देईन.”

शर्मा म्हणाले की आसाममध्ये ‘३६ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे, जी तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे: स्थानिक मुस्लिम, ज्यांची संस्कृती आमच्यासारखीच आहे.  मुस्लिम धर्मांतरित – आम्ही त्यांना स्थानिक मुस्लिम म्हणतो, त्यांच्या घराच्या अंगणात अजूनही तुळशीचे रोप असते. म्हणजेच त्यांच्या स्त्रिया आमच्या चालीरीती पाळतात आणि त्याशिवाय ते आहेत, की जे १९७१ च्या आधी किंवा नंतर आलेले आणि इथे स्थायिक झालेले आहेत. हे विस्थापित मुस्लिम स्वतःला मियां मुस्लिम म्हणवतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0