देशातील तीनपैकी एक लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

देशातील तीनपैकी एक लघुउद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली : देशातील सुमारे ३३ टक्क्याहून अधिक स्वयंरोजगार, लघु व मध्यम उद्योग आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात सक्षम नसून ते जवळपास बंद पडण्याच्या मा

इम्रान खान सरकारवर अविश्वासाचा ठराव; पक्षात बंडखोरी
‘मतदानयंत्र नको मतपत्रिका हवी’
राज्याचे इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर

नवी दिल्ली : देशातील सुमारे ३३ टक्क्याहून अधिक स्वयंरोजगार, लघु व मध्यम उद्योग आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात सक्षम नसून ते जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एआयएमओ)ने प्रसिद्ध केला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लॉकडाऊनमुळे देशातले स्वयंरोजगार, लघु-मध्यम उद्योगधंदे बंद पडले होते. त्यामुळे अशा उद्योगांमध्ये काम करणारा लाखोंचा रोजगार आपापल्या गावाकडे परतला आहे. अशा वेळी लॉकडाऊन उठल्यानंतर या उद्योगांची परिस्थिती काय असेल यासाठी एआयएमओने अन्य ९ उद्योग संस्थांसोबत उद्योगजगताचे एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ४६,५२५ एमएसएमई, स्वयं रोजगार, कॉर्पोरेट सीईओ व कर्मचार्यांनी आपली मते व्यक्त केली. हा सर्व्हे २४ मे ते ३० मे दरम्यान ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर घेण्यात आला होता. त्यातून लघु व मध्यम उद्योगधंद्यांकडे स्वतःच्या पायावर उभे राहण्याइतपत आर्थिक ताकद नसल्याचे दिसून आले होते.

या सर्वेक्षणातील ३५ टक्के एमएसएमई, ३७ टक्के स्व-रोजगार व्यक्तींनी आमचा उद्योग पुन्हा उभा राहू शकणार नाही असे सांगितले. तर ३२ टक्के एमएसएमईनी उद्योग रुळावर येण्यासाठी सहा महिने लागतील असे सांगितले. १२ टक्क्यांचे मत तीन महिन्यांनंतर आमचा उद्योग सुरू होईल असे सांगितले.

या सर्वेक्षणात कॉर्पोरेट सीईओना आपला व्यापार सुरू होईल असे वाटत आहे पण त्यासाठी किमान तीन महिने लागतील असे त्यांचे मत आहे.

या सर्वेक्षणातल्या जीवनावश्यक वस्तू उत्पादन करणार्या ३ टक्के एमएसएमई, ६ टक्के कॉर्पोरेट व ११ टक्के स्वयंरोजगार व्यक्तिंनी सांगितले की ते चांगली कामगिरी करू शकतात.

तर सर्वेक्षणातल्या एकूण ३२ टक्के व्यक्तींना त्यांचा उद्योग कर्ज, मंदी व मागणीअभावातून बाहेर येईल याची खात्री वाटत नाही. २९ टक्के जणांच्या मते नव्या उमेदीने काम करण्यासाठी पुढील सहा महिने लागतील.

भारतामध्ये लघु-मध्यम उद्योगांची संख्या ६ कोटीहून अधिक असून यामध्ये ११ कोटीहून अधिक कामगार काम करतात. या उद्योगातून देशाची ४० टक्के निर्यात होते, तर राष्ट्रीय सकल उत्पादनात यांचा वाटा ३० टक्क्याहून अधिक आहे.

सध्या देशाच्या काही राज्यात लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्याने उद्योगधंदे हळूहळू सुरू केले जात आहेत. पण दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची सर्व चक्रे मंदावली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने २०१९-२०चा एकूण जीडीपी ४.१ टक्के राहिला असल्याचे जाहीर केले. हा जीडीपी गेल्या ११ वर्षांतला निचांक असल्याचेही सांगण्यात आले. आरबीआयने २०२०-२१ या आर्थिक वर्षांतला जीडीपी उणे असेल असे जाहीर केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0