वर्षभरात सरकारने काय केले?- सोनियांचा सवाल

वर्षभरात सरकारने काय केले?- सोनियांचा सवाल

नवी दिल्लीः देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. कोरोनाशी सामना करण्यासाठी सरकारकडे एक वर्षांचा कालावधी होता. या कालावधीत दुर्दैवाने गेल्या वर्षापेक्षा भयंकर परिस्थिती दिसत आहे. देशात ऑक्सिजन, रुग्णालये, खाटा व लसींची अभूतपूर्व टंचाई दिसत असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. त्यांनी लसीकरणाची वयोमर्यादा २५ असावी अशीही मागणी केली.

ज्यांना अस्थमा, मधुमेह, मूत्रपिंड व यकृतासंदर्भात आजार आहेत, त्या पीडित युवकांनाही लसीकरणात सामील करून घेतले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

कोविड-१९ची महासाथ हे राष्ट्रीय आव्हान आहे. त्यावर राजकारण करता कामा नये, कोरोनाच्या दुसर्या लाटेत संपूर्ण देश अस्वस्थ झाला आहे. ही परिस्थिती टाळता येत होती पण सरकारने गेले वर्षभर या संकटाकडे गांभीर्याने पाहिले नाही, आज दुर्दैवाने आपण सर्व यात फसलो आहोत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

देशभरात रुग्णालयातील खाटा, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची टंचाई ही चिंताजनक बाब आहे. अनेक ठिकाणी कोविड लस पोहचलेली नाही. काही ठिकाणी जीवनरक्षक समजले जाणारे रेमडिसिवियर अत्यवस्थ रुग्णांना वेळेत मिळत नाही, असे त्या म्हणाल्या.

सोनिया गांधी यांनी कोरोनासंदर्भात लागणारी शस्त्रक्रियेची उपकरणे व औषधांवरचा जीएसटीही सरकारने रद्द करावा अशी मागणी केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे, त्यासाठी कडक पावले सरकारने उचलायला हवीत. गरीब वर्गाला प्रति महिना ६ हजार रु.ची मदत दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. कोरोनाच्या संसर्गात शेकडो जणांचा मृत्यू झाला तसेच या लढाईत आरोग्य सेवकांनाही आपल्या जीवाला मुकावे लागले, त्या सर्वांप्रती त्यांनी सहवेदना प्रकट केली. कोरोनाचे आव्हान परतावून लावणारे सर्व क्षेत्रातील कर्मचारी व आरोग्य सेवकांच्या कार्याला आपला सलाम असल्याचे त्या म्हणाल्या.

राहुल गांधी यांची टीका

देशातल्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच्या उ.प्रदेश महासचिव प्रियंका गांधी यांनीही टीका केली. जो देश गेली ७० वर्षे मेहनत करून लसीचा जगातला सर्वात मोठा निर्यातदार होता त्या मेहनतीवर पाणी सोडून तो देश आयातदार झाल्याची टीका त्यांनी केली. आणीबाणीच्या परिस्थितीवेळी स्वतःची सुटका करता यावी म्हणून स्वतःच्या बोर्डिंग पासवर स्वतःचा फोटो लावणारे वैमानिक नरेंद्र मोदी आहेत, अशी टिप्पण्णी प्रियंका गांधी यांनी केली.

तर राहुल गांधी यांनी ट्विटवर मोदी सरकारवर कडक शब्दांत टीका करताना ‘मोदी मेड डिझास्टर’ असा हॅश टॅग देत ‘स्मशान व कबरस्तान दोन्ही… जे बोलले ते केलं…’ अशा शब्दांत निशाणा साधला.

मूळ बातमी

COMMENTS