बाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष

बाबरी मशीद विध्वंसः अडवाणी, जोशी, उमा भारती निर्दोष

नवी दिल्लीः १९९२च्या बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, नृत्यगोपाल दास, सतीश प्रधान यांच्यासह ३२ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशीदीचे घुमट समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनी पाडले. या नेत्यांनी गर्दीला रोखण्याचे प्रयत्न केले पण जमावाने त्यांचे ऐकले नाहीत, या घटनेवेळी रेकॉर्ड केलेले आवाज, व्हीडिओ हे पुरावे सीबीआयला न्यायालयात सिद्ध करता आले नाहीत. बाबरी विध्वंस घटना सुनियोजित नव्हती, असेही सीबीआय न्यायालयाने सांगितले.

बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, नृत्यगोपाल दास, सतीश प्रधान हे  ६ आरोपी उपस्थित नव्हते. त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे या सुनावणीत सहभाग घेतला होता. तर अन्य २६ आरोपी न्यायालयात हजर होते.

सीबीआयच्या आरोपपत्रात ४९ आरोपींची नावे होती, त्यापैकी १७ आरोपींचे निधन झाले आहेत.  

बाबरी मशीद खटल्यात ३२ आरोपी असून त्यात भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारती हे प्रमुख आरोपी होते. या सर्वांनी सीबीआय न्यायालयापुढील आपल्या जबाबात बाबरी मशीद पाडण्याच्या कटात आपला सहभाग नसल्याचा दावा केला होता. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने राजकीय हेतूने आपल्याला गोवल्याचाही दावा या नेत्यांनी केला होता.
लखनौतील विशेष सीबीआय न्यायालयाने सीआरपीसीतील ३१३ कलमानुसार सर्व ३२ आरोपींचे जबाब नोंदवून घेतले होते.

COMMENTS