प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग २

प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग २

‘द वायर मराठी’मध्ये १७ मे २०२० रोजी डॉ. दिलीप चव्हाण यांचा ‘मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी…’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्या लेखावर चिन्मय धारूरकर यांनी ‘शुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा संबंध काय !’, ही ३१ मे २०२० ला प्रतिक्रिया लिहिली होती. त्याचा प्रतिवाद करणाऱ्या लेखाचा हा दूसरा भाग.

वि. भि. कोलते यांनीदेखील भोपाळ येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात ‘मराठी भाषेवरील संस्कृतचे दडपण’ यावर असे मांडले होते: “…मराठीच्या लेखनपद्धतीतही परिवर्तन होणे आवश्यक आहे. या सर्वांचा मूळ पाया मराठी असला पाहिजे आणि त्यासाठी ज्या संस्कृत भाषेचे दडपण तिच्यावर पडले आहे त्यातून मराठी मोकळी झाली पाहिजे. मराठी ही स्वतंत्र भाषा आहे. तिचे व्याकरण, लेखनपद्धती स्वतंत्रच असली पाहिजे. संस्कृत भाषेच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष बंधनातून तिला मोकळे केले पाहिजे. आज अशा प्रकारची अनेक बंधने तिच्यावर पडलेली आहेत हे नाकारून चालणार नाही आणि त्यामुळेच आमच्या शुद्धाशुद्धतेच्या कल्पना निर्माण होऊन सर्वसामान्य मराठी मन न्यूनगंडाने पछाडले आहे. मराठी ही स्वतंत्र भाषा आहे ना? या भाषेतील शब्दांची छाननी करताना आजही आम्ही तत्सम, तद्भव आणि देशी अशी विभागणी करतो. ऐतिहासिक भाषाशास्त्रापुरते हे योग्यही असेल आणि केवळ भाषाशास्त्रीय विचारांपुरतीच ही विभागणी मर्यादित ठेवली तर तिला हरकत घेण्याचे कारण नाही. पण या विभागणीमागील संस्कृतनिष्ठतेचे तत्त्व वर्तमान मराठी भाषेवर आक्रमण करीत असल्यामुळे अनेक गुंतागुंती निर्माण होऊन त्या मराठी भाषेच्या स्वतंत्र जीवनप्रवाहाला अडथळे निर्माण करण्याला कारणीभूत झालेल्या आहेत.” [28]

साऊथवर्थ आणि कोलते यांसारख्या अभ्यासकांच्या मतांकडे दुर्लक्ष करून राज्यसंस्थेकडून अधिकाधिक संस्कृत वापराविषयी आग्रह सुरूच आहे. उदाहरणार्थ, शालेय पुस्तकांमध्ये ‘पाऊस’ हा एवढा रुळलेला शब्द वापरण्याऐवजी ‘पर्जन्य’ (‘आरोह पर्जन्य’, ‘प्रतिरोध पर्जन्य’, ‘आवर्त पर्जन्य’, ‘पर्जन्य वितरण’) या शब्दाचा अतिरेकी वापर काय दर्शवितो? तसेच, राष्ट्रीय लोकशाही सरकार सत्तेत आल्यापासून ‘स्वयम’, ‘सक्षम’, ‘ग्यान’, ‘सम्वय’, ‘उडान’, ‘वनाज’, ‘मंथन’ अशी शब्दयोजना विविध योजनांसाठी केलेली आहे.[29] मराठी आणि कन्नड शालेय पाठ्यपुस्तकांत वापरण्यात आलेल्या भाषेच्या अभ्यासात असे आढळून आले, की संस्कृतप्रचुर मराठीचा वापर हा अधिक करण्यात आलेला असून पहिल्या इयत्तेसाठी तयार करण्यात आलेल्या भाषेच्या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या भागात जवळपास ७७ टक्के शब्द हे विद्यार्थ्यांना अपरिचित होते.[30] इयत्ता सहावीच्या पुस्तकात ‘सपुष्प’, ‘अपुष्प’ वनस्पती, ‘पर्णांध्र’, ‘पर्णाग्र’ असे संस्कृतप्रचुर  शब्दप्रयोग विज्ञान शिकण्यात अडथळा कसे निर्माण करतात हे श्रीकांत काळोखे यांनी मांडले आहे.[31] तसेच गणिताच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भूमिती मधील/साठी/च्या’ ऐवजी ‘भौमितिक आकृत्या’, ‘उभी रेष’ ऐवजी ‘स्तंभ’, ‘शरीराच्या आतील इंद्रिये’  ऐवजी ‘आंतरंद्रिये’ असे अनेक शब्द बालकांच्या आकलनात अडथळा उभा करतात, असे मत प्रकाश बुरटे यांनी व्यक्त केले आहे. त्यांचे याबाबत मत असे आहे: “व्यवहारात उच्च वर्गीय, उच्चवर्णीय, शहरी आणि शिक्षणाची परंपरा असणार्‍या या समाज स्तरांची बोली हीच प्रामुख्याने प्रमाण मराठी आहे. किमान, प्रमाण मराठीशी जास्त जवळिक साधणारी आहे. ही मराठी जास्त संस्कृतप्रचुर  आहे. तिला उच्चभ्रू समाजघटकांची प्रमाण भाषा म्हणून मान्यता लाभली आहे. परिणामी, इतर बोली भाषा आणि ओघानेच त्या बोलणार्‍या समाज घटकांची संस्कृती याकडे साधारणत: थोड्या तुच्छ्तेने पाहिले जाते.[32]

कृष्ण कुमार यांनी हिंदी भाषेतील पाठ्यपुस्तकांतील भाषेवर संस्कृतच्या प्रभावाची चर्चा केलेली आहे. राष्ट्रीय  शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) या संस्थेने प्रकाशिक केलेली हिंदी पाठ्यपुस्तकेदेखील विद्यार्थी वापरतात त्या हिंदीपासून दूर असलेल्या संस्कृतप्रभावित अशा यांत्रिक आणि अनाकलनीय अशा संकल्पनांनी युक्त अशी आहेत. [33]

थोडक्यात, संस्कृतचा संदर्भ हा कालबाह्य आहे असे अगदी नाही. संस्कृतच्या प्रभावाची चिकित्सा करणे म्हणजे धारूरकर म्हणतात त्याप्रमाणे “संस्कृतपरंपरेला आधुनिकतेच्या न्यायालयात आरोपीच्या पिंजर्‍यात” उभे करणे असं नव्हे. रॉबर्ट डी. किंग म्हणतात की, संस्कृत ही केवळ भाषा नाही; तर ती ब्राह्मणी विचारप्रणालीची वाहकही राहिलेली आहे.[34] भेदाभेद आणि वंचितीकरणाचा अट्टहास या विचारसरणीच्या मुळाशी आहे. भाषेच्या रूप आणि आशयावर याचा परिणाम होत नाही, असे आपण म्हणू शकत नाही.

व्याकरणाचे प्रयोजन आणि शुद्धाशुद्धविवेक

इंग्रजी भाषेतील ‘व्याकरण’ या शब्दाचा अर्थ शुद्धतेशी संबंधित नाही. मराठी व्याकरणकारांनी युरोपीय वर्गसमाजातील व्याकरणाचा हा अधार्मिक अर्थ स्वीकारण्याचे टाळले आणि त्यांनी व्याकरण या संकल्पनेला संस्कृत भाषेतील जो शुद्धाशुद्धविवेक जोडला गेलेला आहे, तो स्वीकारला.

विविधज्ञानविस्तार या नियतकालिकात व्याकरणाची जी चर्चा सुरू करण्यात आली तीत व्याकरण शब्दाचा एक अर्थ असा दिला गेला होता : “व्युत्पाद्यन्ते प्रकृतिप्रत्ययादिभि: प्रदर्श्यन्ते शब्दा अनेन इति व्याकरणम्” अर्थ : भाषेमध्ये जे शब्द, अर्थात शुद्ध ठरलेले शब्द आहेत, त्यांची व्युत्पत्ती कशी म्हणजे त्यांची प्रकृति काय, त्यांना प्रत्यय कोणते झाले, आगम आदेश इत्यादि विकार काय, काय झाले, हें ज्या शास्त्राच्या अभ्यासानें समजतें, तें व्याकरण, हा मूळ अर्थ … सारांश “भाषेतील शब्दांची व्युत्पत्ति आणि योजना यांचे ज्ञान ज्या शास्त्राकडून होते, ते व्याकरण.”

पतंजलींचे ते मत हे संस्कृतव्याकरणाच्या बाबतीतलं आहे, त्याचा मराठी व्याकरणाशी काही संबंध नाही, असे मत चिन्मय धारूरकर यांनी व्यक्त केलय. मराठी व्याकरणाच्या रचनेत संस्कृत व्याकरणाचा काही संबंध नव्हता, असं धारूरकरांना सुचवायचे आहे.  एकतर, मराठी व्याकरणात शुद्धाशुद्धीचा विचार हा संस्कृतमधून आलेला आहे. संस्कृत व्याकरणाचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव हा आधुनिक मराठीच्या अगदी उगमापासून राहिलेला आहे.

मराठीच्या व्याकरणाचे प्रयोजनच शुद्धाशुद्धतेशी कसे संबंधित होते, हे प्रत्यक्षपणे एकोणिसाव्या शतकातील व्याकरणकारांनी दिलेल्या ग्वाहीवरून दिसून येते:

दादोबा : “व्याकरण म्हणून एक शास्त्र आहे, जेणेंकरून भाषेचें मर्मज्ञान होते, म्हणजे तिचे आतील नियम कळतात. तेणेंकरून शुद्ध कोणतें आणि अशुद्ध कोणतें हे यथायोग्य समजतें.”

बालव्याकरण : “व्याकरण  म्हणजे शुद्ध रीतीने बोलणें किंवा लिहिणे यांची विद्या आहे.”

गोडबोले : “व्याकरणांत विद्वान लोक कसे बोलतात किंवा लिहितात याचे पध्दतवार निरूपण केले असतें.”

“व्याकरण शिकल्यानें अमुक शब्द किंवा वाक्य शुद्ध कां व अशुद्ध कां हे समजतें (कोणत्याही भाषेचे अनेक प्रकार असतात. त्यांत विद्वान लोकांच्या बोलण्यांत  व विशेषेंकरून लिहिण्यांत जो प्रकार आढळतो तो शुद्ध म्हणजे ग्राह्य व इतर प्रकार अशुद्ध म्हणजे अग्राह्य असे समजतात.)

व्याकरणकारांनी आधुनिक मराठीचे हे जे लग्न ‘शुद्धी’शी लावले, ते अजूनही टिकून आहे. यासंबंधीची पहिली महत्त्वाची टीका रा. भि. गुंजीकरांनी केली होती. तरीही व्याकरणाच्या आधारे विशिष्ट असा ‘शुद्धाशुद्धविवेक’ जोपासला गेलाच. आजच्या शुद्धलेखनाचे एक मूळ यात आहे.

व्याकरणाची एक समस्या अशी आहे, की ते भाषेच्या एका प्रकारावर आधारलेले असते. उदाहरणार्थ, दादोबांचे व्याकरण “पुण्यातील सुशिक्षित पांढरपेशा वर्गातील लोकांच्या बोलण्यालिहिण्यातील मराठी भाषेचे व्याकरण” होते.

इंग्रजीसारख्या भाषेबाबतही असेच घडले. मराठीबाबतही असेच घडले. पण भारतीय भाषांची व्याकरणं रचली जात असताना केवळ भाषाप्रकाराच्या निवडीचा प्रश्न नव्हता; तर निवडलेल्या भाषाप्रकाराशी शुद्धता जोडणे आणि इतर भाषाप्रकारांबाबत अशुद्धता जोडणं हे घडत गेले.  वि. भि. कोलते यांनी ही तक्रार अशी केलेली आहे : “एका विशिष्ट प्रदेशातील बोली तेवढी शुद्ध आणि दुसर्‍या प्रदेशातील अशुद्ध, असे आपल्याला कसे म्हणता येईल? सध्या अस्तित्वात असलेली सुशिक्षितांच्या तोंडी रुळलेली मराठी भाषा ही तरी एक प्रादेशिक  बोलीच आहे. ती बोलणार्‍या लोकांनी आधुनिक मराठी वाड्.मय प्रथम विपुल निर्माण केले आणि म्हणून त्यांच्या बोलीला मराठी वाड्.मयीन बोलीची प्रतिष्ठा प्राप्त झाली. या बोली भाषेला साहित्यात स्थान मिळाल्यामुळे तिचेच व्याकरण तयार करण्यात आले. वस्तुत: ते एका बोलीचे व्याकरण होय, संपूर्ण मराठीचे व्याकरण नव्हे. कारण त्यात मराठीच्या इतर बोलींचा विचार झालेला नाही. या तथाकथित मराठी व्याकरणाच्या अनुषंगाने शुद्धाशुद्धतेचे मानदंड तयार झाले आणि म्हणून बोलींतील ध्वनीसमूहांवर अशुद्धतेची लांछनमुद्रा लावण्यात आली.”[35]

“शुद्ध आणि अशुद्ध यांत एक मूल्यनिश्चिती असते तिच्यापलीकडे प्रमाण आणि अप्रमाण किंवा प्रमाणेतर यांत एक तटस्थ आकलन असतं”, अशी तक्रार धारूरकर यांनी केली आहे. माझा त्या लेखात प्रमाण भाषेवर भाष्य करण्याचा उद्देश नव्हता. याविषयी मी स्वतंत्रपणे लिहिलेले आहे.[36] इथे पुनरावृत्ती टाळतो. फक्त या विधानात अंतर्भूत असलेल्या दोन गृहीतकांची नोंद घेणे आणि त्याला प्रतिक्रिया देणे आवश्यक वाटते.

एक : प्रमाण आणि अप्रमाण किंवा प्रमाणेतर यांच्यामध्ये मूल्यनिश्चती नसते. फर्डिनाण्ड डी. सोस्यूर (१८५७-१९१३) यांच्या भाषिक विचारांना प्रतिक्रिया देताना व्ही. एन. व्होलोशिनोव्ह (१८९५-१९३६) यांनी असे मांडले की, भाषा ही केवळ अमूर्त अशी रचना नसते. व्होलिशिनोव्ह यांच्या मते, भाषा ही विशिष्ट अशा चिन्हांची व्यवस्था असते आणि चिन्हांना सामाजिक संदर्भात अर्थप्राप्ती होत असते. तसेच त्यांच्या मते, चिन्हे हे विशिष्ट अशा विचारप्रणालीने भारित असतात. म्हणजेच, भाषा ही केवळ यांत्रिक अशा स्वरूपाची रचना नसते; तर तिचा संबंध हा विचारप्रणालीशी आणि परत्वे प्रभुत्वाशी असतो.

दोन : प्रमाण आणि अप्रमाण किंवा प्रमाणेतर यांविषयी तटस्थ आकलन काय असू शकतं? प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही नैसर्गिकपणे घडत नाही. या प्रक्रियेचा परिणाम हा संपूर्ण समाजावर एकसंध असा पडत नाही. तर, समाजातील अभिजन वर्ग हा या प्रक्रियेचा मुख्य लाभार्थी असतो. त्यामुळे याविषयी तटस्थ असे आकलन करून घेता येत नाही. कोणत्याही भाषेच्या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत दडलेले हे वर्गवर्चस्वाचे सांस्कृतिक राजकारण दुर्लक्षिता येत नाही.

भाषेसंदर्भातील इतिहासातील धोरणांचा वर्तमानाशी काय संबंध असतो, हा जो प्रश्न धारूरकरांनी विचारलाय यात केवळ भाबडेपणा नाही; तर एक चलाखी आहे. इतिहासात ज्या समूहांनी गुन्हेगारी स्वरूपाचे सांस्कृतिक राजकारण केले आहे त्यांना आता त्यांच्या खलत्वापासून मुक्त करण्याचा हा प्रकार आहे. तसेच, वर्तमानातील सांस्कृतिक राजकारणाचा भूतकाळाशी संबंध नसतो, असे सांगून इतिहासाच्या सम्यक आकलनापासून पलायनाचीही सोय आहे. वि. दा. सावरकर (१८३३-१९६६) वगैरेंनी जे उर्दुद्वेषाचे राजकारण केले त्याचा परिणाम आज दिसून येत नाही काय? उर्दू ही एक भारतीय भाषा असूनही बीड नगरपालिकेवर एमआयएम व काकू-नाना आघाडीने लावलेला उर्दू फलक शिवसेनेने फाडून टाकला होता.[37] परभणी महानगरपालिकेत मुस्लिम नगरसेवकांनी उर्दूतून शपथ घेतली म्हणून हिंदुत्ववादी नगरसेवकांनी महानगरपालिकेत गोंधळ घातला होता.

 प्रमाणीकरण आणि व्याकरण

धारूरकर म्हणतात: “समितीपुढे वेगवेगळ्या बोली भाषांना, भाषेच्या अभ्यासकांना, भाषाविषयक भूमिका असणाऱ्यांना आपली मतं मांडता येतात.” प्रमाण भाषा विकसित करण्यासाठी कोणती समिती कार्यरत असते? आणि ती लोकशाहीवर आधारलेली असते, हे आपण कसे म्हणू शकतो? एखादी समिती ही लोकशाहीद्वारे निवडून आलेल्या सरकारने स्थापन केलेली असते म्हणजे ती समिती लोकशाहीवर आधारलेली समिती असते का? युरोपसारख्या वर्गसमाजात प्रमाण भाषा ही वर्गवर्चस्वाचा एक मुख्य आधार राहिली, अशा स्वरूपाची मांडणी पिअरी बॉर्डिऊ (१९३०-२००२), ऑलिव्हिया स्मिथ, जेम्स मिलरॉय व लेस्ली मिलरॉय आणि टोनी क्राऊले यांसारख्या अभ्यासकांनी केलेली आहे. भारतासारख्या जातिसमाजात तर भाषेच्या माध्यमातून विशिष्ट अशा प्रकारची भेदरचना दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवण्यात आलेली आहे.

“प्रमाणलेखन एक लोकव्यवहारार्थ उपयोगी बाब आहे हे आधी स्वीकारलं पाहिजे”, असे मत धारूरकरांनी मांडलेले आहे. वस्तुत:, प्रमाणलेखनाचे प्रयोजन हे लोकहित हे नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. मुळात समकालीन समाजात प्रचलित असलेले ‘प्रमाण’ हे तत्त्व भांडवली उत्पादन आणि अर्थकारणातून निपजलेले आहे. त्यामागे विशिष्ट असे वर्गहितही दडलेले असते. “प्रमाणीकरणात सगळ्याच बोलींचं प्रतिनिधित्व होणं अवघड असतं.”, हे धारूरकर मान्य करतात. भाषेच्या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत एक बोली जाणीवपूर्वक निवडली जाते आणि अशावेळी इतर अनेक बोलींना वगळले जाते. याला जेम्स मिलरॉय आणि लेस्ली मिलरॉय यांनी ‘दमन’ (suppression of optional variability of language) म्हटलेले आहे आणि अशा प्रमाणीकरणाची गरज ही “लोकव्यवहारार्थ उपयोगी बाब” म्हणून मांडली जात नाही; तर अशी प्रक्रिया समाजातील प्रभावी वर्गाची गरज भागवीत असते, हे मिलरॉय आणि मिलरॉय यांचे मत दुर्लक्षिण्यासारखे नाही.[38] आर. के. अग्निहोत्री यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, भाषिक प्रमाणीकरणाद्वारे ज्या समूहाच्या भाषेला प्रमाणीकरणासाठी निवडले जाते त्या समूहाला अधिक सत्ता बहाल केली जाते.[39]

डॉ. दिलीप चव्हाण हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत.

..

भाग १

संदर्भ आणि टीपा

[28] वि. भि. कोलते, “मर्‍हाटा बोलू आणि बहुजन समाजनिष्ठा” वि. भि. कोलते मराठीच्या अस्मितेचा शोध. (पुणे : श्रीविद्या प्रकाशन, १९९२) ३७.

[29] Anita Joshua, “A yen for Sanskritised Hindi” The Hindu (22 June 2016).
[34] Robert D. King, Nehru and the Language Politics in India. (New Delhi: Oxford U P, 1998) 10-1.

[30] Menon, S., Krishnamurthy, R., Sajitha, S., Apte, N., Basargekar, A., Subramanian, S., Nalakamani, M. and Modugala M. Literacy Research in Indian Language, (LiRiL): Report of a Three-Year Longitudian Study on Early Reading and Writing in Marathi and Kannada. (Bangalore: Azim Premji University and New Delhi: Tata Trusts, 2017) 45.

[31] Shrikant Kalokhe, “Socio-linguistic Analysis of Science Textbook in Maharashtra” (हा लेख https://clix.tiss.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)

[32] प्रकाश बुरटे, महाराष्ट्रातील मराठी माध्यमाची शालेय पाठ्यपुस्तके : एक मूल्यात्मक अभ्यास. (भोपाळ : एकलव्य, २००१) १४१.

[33] “The textbooks produced by the National Council for Educational Research and Training (NCERT) for these subjects in Hindi are, without exception, translations from the English original. For translation, a highly Sanskritised technical vocabulary, devised by state committees, is used. This vocabulary is quite unrelated to the everyday Hindi that children use, and it poses a major block for comprehension.  Teachers of government schools, where textbooks of this kind are used, often take recourse to the English variant of a technical term in order to explain it in the classroom. By the time Hindi-medium school children enter the higher secondary classes, they realise that textbooks available in Hindi are not as good as the ones available in English. This realisation is consistent with their broader socialization into a mindset which recognizes the subservient socio-economic status of Hindi.”

Krishna Kumar, “Literacy, Socialisation and the Social Order” Terezinha Nunes and Peter Bryant (Eds.) Handbook of Children’s Literacy. (Kluwer: Academic Publishers, 2004) 718.

[34] Robert D. King, Nehru and the Language Politics in India. (New Delhi: Oxford University Press, 1998) 10-1.

[35] कोलते १९९२ ३६.

[36] Dilip Chavan, Language Politics under Colonialism : Caste, Class and Language Pedagogy in Western India. (New Castleupon Tyne : Cambridge Scholars Publishing, 2013) 136-86.

[37] सकाळ (नांदेड आवृत्ती) (४.८.२०१७): ५.

[38] “…the various stages that are usually involved in the development of a standard language may be described as the consequence of a need for uniformity that is felt by influential portions of society at a given time…”

James Milroy and Leslie Milroy, Authority in Language: Investigating Language Prescription and Standardisation. (London and New York : Routledge, 1991) 27.

[39] “Language standardization is also a process of differential power distribution to different speech varieties and their speakers. As one variety gets celebrated several others are stigmatised, demoralizing their speakers to the extent that they begin to view their own language and all else that is associated with it as inferior.”

  1. K. Agnihotri, Half the Battle And A Quarter. (Mysore: Indian Institute of Indian Languages, 2002) 18.

COMMENTS