प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग १

प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग १

‘द वायर मराठी’मध्ये १७ मे २०२० रोजी डॉ. दिलीप चव्हाण यांचा ‘मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी…’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्या लेखावर चिन्मय धारूरकर यांनी ‘शुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा संबंध काय !’, ही ३१ मे २०२० ला प्रतिक्रिया लिहिली होती. त्याचा प्रतिवाद करणारा हा लेख ४ भागांमध्ये प्रसिद्ध करीत आहोत.

पिगॅससः हंगेरीतल्या पत्रकाराचा सरकारवर खटला
मंदिर परिसरात मुस्लिमांच्या व्यवसायबंदीवर भाजपचे २ आमदार नाराज
शेतकऱ्यांचा रेल्वे रोकोचा इशारा

माझा “मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी…”[1] हा लेख “द वायर मराठी” या वेब पोर्टलवर प्रसिध्द झाला. या लेखाला चिन्मय धारूरकर यांनी “शुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा संबंध काय!”[2] या मथळ्याचा लेख लिहून प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रतिक्रियेचे मी स्वागत करतो. “घरात बोलली जाणारी भाषा आणि औपचारिक, कार्यालयीन, पुस्तकं, वर्तमानपत्रं यांत वापरली जाणारी भाषा यांतील तफावतीमुळे अर्थातच बहुसंख्यकांची गैरसोयच होत आली आहे. ग्रामीणक्षेत्रांतील शाळांत ही तफावत अधिकच प्रकर्षाने जाणवते. अशा वेळी भाषेचे प्रमाणीकरण – बोली आणि लेखन या दोन्ही पातळीवर तपासून पाहणं आगत्याचंच आहे.” असे साधारणपणे समकालीन लोकशाहीला सुसंगत मत धारूरकर यांनी मांडले आहे. या मताबाबत कुणीही स्वागतशीलच असले पाहिजे. परंतु, अशी मंगल प्रार्थना आपोआप फळाला येत नाही. ती वास्तवात उतरविण्यासाठी भाषाविज्ञानासह सामाजिक भाषाविज्ञानातील प्रमाणभूत धारणांनाही प्रश्नांकित करावे लागेल. धारूरकरांनी चाणाक्षपणे ते टाळलेले आहे.

शुद्धीचे प्राचीन खूळ

भारतीय समाजात जी विशिष्ट प्रकारची भेदाभेदरचना आकारास आली तिचे एक कारण आणि परिणाम हे शुद्धीच्या संकल्पनेत दिसून येते.[3] अर्वाचीन काळात मराठी व्याकरणात शुद्धीची आणि भाषाध्यापनात ‘शुद्धलेखना’ची जी चर्चा प्रकर्षाने केली जाते तिची मुळं प्राचीन काळातील व्याकरण आणि ‘व्याकरणशास्त्राभ्यास’ यांमध्ये दिसून येतात. याविषयी गं. ब. ग्रामोपाध्ये यांचे मत असे : “व्याकरण (वा व्याकरणशास्त्राभ्यास) आणि भाषेची शुद्धाशुद्धता यांची सांगड आजची नाही. ती फार जुनी आहे. उलट आजचे व्याकरणकार त्या दोघांना तारतम्यपूर्वक अलिप्त ठेवताना दिसतात; परंतु प्राचीन काळी ते शक्य नव्हते; नव्हे व्याकरणशास्त्राचा, निदान  भारतात तरी, जो जन्म झाला तोच मुळी भाषेच्या शुद्धाशुद्धाच्या कल्पनेतून. पाणिनीच्या काळी वेदमंत्रांचा अर्थ स्पष्ट करून दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली होती….[पतंजली]. त्यामुळे पतंजली आपल्या ‘व्याकरण महाभाष्या’ला ‘शब्दानुशासन’ असे नाव देतो. ‘शब्दानुशासन’ म्हणजे शब्दांचे नियम सांगणारे शास्त्र. म्हणजे अपभ्रष्ट शब्दांना व रूपांना दूर ठेवून नियमाप्रमाणे चालणार्‍या शुद्ध शब्दांचे, म्हणजेच शुद्ध भाषेचे शास्त्र.”[4]

रा. रा. भागवतांनी शुद्धी या संकल्पनेबाबत अशी मीमांसा सादर केलेली आहे :

“जे शुद्ध बोलणारे होते ते देव आणि जे अशुद्ध बोलणारे होते ते असुर किंवा म्लेंच्छ – अशा अभिप्रायाची श्रुती पतंजलीच्या महाकाव्यात आरंभीच दाखल झालेली आहे. ‘म्लेंच्छ’ शब्दाचा मूळ अर्थ ‘अस्पष्ट’ (भाषा) बोलणारे असा समजतात. अर्थातच अशी देवांची भाषा होती, तशीच असुरांची ऊर्फ म्लेंच्छांची भाषा होती. इतकेच की, देवांची भाषा शुद्ध समजत असुरांची किंवा म्लेंच्छांची भाषा अशुद्ध किंवा अपभ्रंशाने भरलेली समजत. जी शुद्ध भाषा, ती संस्कृत या नावाने पुढे नावाजली. अशुद्ध भाषेचे नाव दिलेले नाही, तरी ‘हे ऽ लयो हे ऽ लय:’ या भाष्यांतल्या उदाहरणाचा (अर्थ) हे ऽ रय: हे ऽ रय: (हे शत्रुंनो) असा करतात.”[5]

‘शुद्ध’ या शब्दाभोवती किमान दोन अर्थ जुळलेले आहेत :

एक, ‘शुद्ध’ हा शब्द भारतीय वैदिक परंपरेत धार्मिक अर्थ (सोवळे-ओवळे, विटाळ याअर्थी) जुळलेला आहे. कोणत्या बाबी शौच आणि कोणत्या बाबी अशौच मानाव्या हे धर्माने निर्धारित केलेले होते.

दोन, ‘शुद्ध’ या शब्दाशी एक प्रकारची आदेशात्मकता जुळलेली आहे. ज्या बाबी अशुद्ध म्हणून निषिद्ध आहेत त्या पाळण्यासाठी एक प्रकारची दंडात्मक रचना उभी करण्यात आलेली होती. धर्माप्रमाणेच भाषा अशा सामाजिक विलगीकरणाचे साधन बनले. अभ्यासकांनी यावर पर्याप्त चर्चा केलेली आहे.

शुद्धलेखन आणि शिक्षणप्रसार

वाढत्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत शुद्धलेखनाबाबत अभ्यासक काय भूमिका घेतात, हे दुर्लक्षिण्यासारखे नसले तरी ही चर्चा एकंदरच सामान्यजनांच्या शैक्षणिक उपलब्धीच्या बाबतीत करणे अधिक संयुक्तिक ठरते. पूर्वी शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेपेक्षा शुद्धलेखनातील व्याकरण आणि परंपरा अधिक महत्त्वाचे आहे, असे मत नारायण दासो बनहट्टी यांनी व्यक्त केले होते.[6] सत्त्वशीला सामंत (१९०८-९८) यांनी व्याकरणसिद्ध अनुस्वारांचा आग्रह धरला आणि शुद्धलेखनानुसार उच्चार या तत्त्वाचा पुरस्कार केला.[7] साक्षरतेचे महत्त्व हे शाळा आणि नोकरशाही या दोन क्षेत्रांमध्ये अधिक असून शुद्धलेखन अथवा नियमानुसारी लेखनाची चर्चा ही शैक्षणिक उपलब्धीच्या संदर्भात केली जाते.[8] ही करताना नेहमी पाठ्यपुस्तकातील प्रमाण मराठीचा प्रतिकूल परिणाम हा सामान्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपलब्धीवर होत असतो. यासंदर्भात वि. भि. कोलते यांनी दोन लेखकांची मतं उद्धृत केली होती. ही मतं इथं देत आहे :

डॉ. शं. दा. पेंडसे : “शिक्षणाचा प्रसार ज्या समाजांत होत आहे त्यांच्या बोलीभाषा आणि ग्रांथिक भाषा यांत फार अंतर आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी ग्रांथिक भाषेचे शुद्धलेखन विद्यार्थ्यांना येत नाही. म्हणून आतापर्यंतचा अनुभव जमेस धरून दोष विद्यार्थ्यांवर न लादता प्रचलित शुद्धलेखन पद्धतीचा पुनर्विचार करणे अगत्याचे झाले आहे.”[9]

कृ. पा. कुलकर्णी : “अध्यापन क्षेत्रांत महाराष्ट्र साहित्य परिषदेकडेही एक काम आहे. ते परिषदेकडून झाले पाहिजे. अनावश्यक अनुस्वारांची गर्दी लेखनातून हटविली पाहिजे. पुष्कळसे अनुस्वार शास्त्रांचा आधार नसलेले लेखनात येतात, ते टाळले पाहिजेत, शिक्षण सक्तीचे झाले पाहिजे अशी एकीकडे मागणी करावयाची आणि दुसरीकडे शुद्धलेखनाच्या कडक नियमांचा अध्ययनात अवलंब करून एकप्रकारचा मोठा अडथळा उभा करायचा हे ठीक नाही.”[10]

यांव्यतिरिक्त ना. गो. कालेलकरांनीदेखील ही व्यथा अशी व्यक्त केली: “या मनोवृत्तीच्या परिणामांची फळे जर कुठे विशेष अनुभवाला येत असतील तर ती शिक्षणक्षेत्रात होत. ज्या शाळेत ब्राह्मण शिक्षकाच्या वर्गात अब्राह्मण मुले आहेत किंवा ज्या ठिकाणी अब्राह्मण शिक्षकाच्या वर्गात ब्राह्मण मुले आहेत, तिथे पोटभाषांचा लढा तीव्रपणे दिसून येतो. शेतकर्‍याच्या मुलाच्या भाषेची टवाळी करून, तो जी भाषा बोलतो ते काही तरी भयंकर पाप आहे, अशी त्याचे उच्चवर्णीय शिक्षक त्याची समजूत करून देतात आणि ज्या आईबापांच्या तोंडून ही भाषा आपण शिकलो ते अडाणी आहेत, अशी समजूत होऊन मुलाच्या मनात लाज व तिरस्कार उत्पन्न होतात. खालच्या थरातून वर सरकत शिक्षकाच्या दर्जाला पोचलेल्या व्यक्तीबद्दल त्यांच्या उच्चवर्णीय विद्यार्थ्यांना या भाषिक भेदामुळे अनादर वाटू लागतो. आणि कित्येक पालकांनी अशा शिक्षकांना काढून टाकावे अशी मागणीही केलेली आहे.”[11]

ही मतं काहीशी जुनी झालेली असली तरी शालेय अभ्यासक्रमातून ज्या आदेशात्मक व्याकरणाची अंमलबजावणी केली जाते, त्यातून अनेक समस्या आजही निर्माण होत आहेतच. व्याकरण जेव्हा शालेय स्तरावरील अभ्यासक्रमाचा सक्तीचा भाग केले जाते तेव्हा वर्णनात्मक व्याकरण आणि आदेशात्मक व्याकरण यांमधील सीमारेषा पुसट होते. असे व्याकरण हे विद्यार्थ्यांवर लादले जाते आणि ते आपोआपच आदेशात्मक बनते. सुहासिनी लद्दू यांनी याची दखल अशी घेतली: “शाळा खात्याच्या उपयोगासाठी, परभाषिकांना शिकविण्यासाठी व स्वभाषिकांना प्रमाण भाषेचे स्वरूप दाखविण्यासाठी व्याकरणे लिहिली जातात. अशी व्याकरणे आदेशात्मक असतात.”[12]

इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या शेवटच्या काळात भाषेचे अभ्यासक प्रमाणीकृत भाषेच्या निर्मितीमध्ये व्यस्त राहिले आणि त्यांनी ‘अशिष्ट’ (vulgar) आणि ‘शिष्टसंमत’ (polite) भाषाप्रयोगांमध्ये स्पष्ट भेद केला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भाषेविषयीच्या कल्पना या  अधिकाधिक अभिजनवादी होत गेल्या. ऑलिव्हिया स्मिथ यांनी असे दाखविले आहे, की जेंव्हा भाषेविषयीच्या अभिजनवादी संकल्पनांना लोकशाही चळवळींनी आव्हान दिले तेव्हा भाषेविषयीचे सिद्धांतन अधिक काटेकोरपणे आणि जोरकसपणे केले गेले. या काळात अभिजनेतर लेखकांचा वर्ग ‘संस्कृती’च्या प्रांतात स्वत:चा अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता तेंव्हा भाषा, कोश, व्याकरण यांमधील विविध संकल्पनांना उत्साहात पुढे आणले गेले.[13] यातून नवे शिक्षण घेण्याची आकांक्षा बाळगणार्‍या अभिजनेतर वर्गाच्या अशा आकांक्षेवर अंकुश ठेवला गेला. शुद्ध मराठीच्या घडवणुकीतही अशाच प्रेरणा कार्यरत असताना दिसतात.

शुद्ध शब्द, कोशनिर्मितीचा इतिहास आणि प्रभुत्वाचे राजकारण

डॉ. सॅम्युअल जॉन्सन (१७०९-८४) यांनी तयार केलेला शब्दकोश आणि अठराव्या शतकातील इंग्लंड आणि व इतर देशांमध्ये विकास पावलेला भाषिक अधिकारवादाचा प्रभाव हा वसाहतींमधील शब्दकोशनिर्मितीवर झालेला होताच. भारतासारख्या देशामध्ये जी शब्दकोशनिर्मिती आकारास आली, तीत युरोपीय वर्गसमाजातील वर्गीय आपपरभावाच्या विचाराला जातिसमाजातील संस्थात्मक समाजविन्मुखतेची आणि द्वेषपरंपरेची जोड मिळाली. यातून विशिष्ट अशा शब्दनिवडीचे आणि वगळवणुकीचे सांस्कृतिक-भाषिक राजकारण आकारास आले.

वसाहतकालीन भारतीय पौर्वात्यवाद हा एक प्रकारचा संयुक्त प्रकल्प होता. यामध्ये एका बाजूला ब्रिटिश सत्ताधीश आणि त्यांचे बुद्धिजीवी आणि दुसर्‍या बाजूला एतद्देशीय वरिष्ठ जातवर्ग आणि अभिजन सामील झालेले होते. ज्याप्रमाणे वॉरन हेस्टिंग्ज यांनी हिंदू आणि मुस्लिम धार्मिक कायदे तयार करताना अनुक्रमे हिंदू पंडित आणि मुस्लिम मौलवींची मदत घेतली होती त्याचप्रमाणे वासाहतिक भाषा अभ्यासकांनी भारतीय भाषांविषयीचे व्यवहारविश्व उभे करताना देशी पंडितांची मदत घेतली.

एकोणिसाव्या शतकाच्या मधोमध जेव्हा जेम्स थॉमस मोल्सवर्थ (१७९५-१८७२) यांनी शब्दकोशनिर्मितीचा महाकाय प्रकल्प हाती घेतला तेव्हा त्यांनी पुणे परिसरातल्या ब्राह्मणांची मदत घेतली. मोल्सवर्थ यांनी कोशनिर्मितीत पंडितांची जी मदत घेतली, तिचा परिणाम हा शब्दकोशाच्या आशयावर झालाच.[14] या शब्दकोशासाठी विविध प्रदेशांमधून शब्द गोळा करण्यासाठी जरी या पंडितांना विविध प्रदेशांमध्ये धाडले असले तरी पुण्यातील देशस्थ ब्राह्मणांना असे वाटे, की ते वापरत असलेली मराठी भाषा हीच खरी मराठी भाषा आहे. पंडितांच्या या संकुचित वृत्तीविषयी कृ. भि. कुळकर्णी यांनी नापसंती व्यक्त केली आहे.

मोल्सवर्थ यांनी ब्राह्मणांची मदत जरी घेतली असली तरी त्यांच्या दिमतीला असलेल्या या ब्राह्मणांशी जुळवून घेणे हे त्यांना अवघड होते. हे ब्राह्मण विशिष्ट अशा शब्दांबाबत दुजाभाव बाळगित आणि संस्कृत शब्दांना प्राधान्य देत.[15] शब्दकोशाच्या निर्मितीत गुंतलेल्या सूक्ष्म अशा प्रक्रियांचे वर्णन मोल्सवर्थ यांनी करून ठेवले. शब्दनिवडीचे हे महाकाय काम तीन पातळ्यांवर केले जात असे. या कामाच्या प्रत्येक पातळीवर मोल्सवर्थ यांच्या मदतीला ब्राह्मण नेमण्यात आले होते.[16] शब्दकोशनिर्मितीमुळे विशिष्ट असा आशय हा लिखित / प्रमाण मराठीला प्राप्त झाला.

केवळ ब्रिटिशांचा स्वार्थ की भारतीय अभिजनांचादेखील

चिन्मय धारूरकर यांनी असे मांडले आहे: “वसाहतकाळात वसाहतकार त्यांच्या धोरणांची दृष्टी घेऊन येऊन वसाहती चालवू पाहात होते. ती दृष्टी अर्थातच निर्मळ आणि न्याय्य नव्हती.” वसाहतवाद्यांची दृष्टी निर्मळ आणि न्याय्य नव्हती हे खरे! साधारणपणे राष्ट्रवादी आणि उत्तरवसाहतवादी विचारप्रवाहानेही असे मत प्रसृत केलेले आहे. उत्तरवसाहतवादी आकलनाला आता प्रश्नांकित करण्यात आलेले आहे. एदवर्ड सैद (१९३५-२००३) यांच्या वसाहतवादी धोरणाची थॉमस ट्रॉटमन यांनी कठोरपणे चिकित्सा केलेली आहे. ट्रॉटमन यांच्या मते, पौर्वात्यवादी धोरण ही केवळ लादवणूक नव्हती आणि हे धोरण केवळ एकट्या ब्रिटिशांच्या हितसंबंधांतून तयार झालेले नव्हते; तर भारतीय अभिजनांनी वासाहतिक सत्तेत भागीदारी केलेली होती.[17] रोजेन रोचर[18], अल्स्टेअ(र) पेनीकुक[19] आणि निकोलस डर्क्स[20] यांनीदेखील वासाहतिक पौर्वात्यवाद हा संयुक्त प्रकल्प कसा होता आणि या प्रकल्पात भारतीय अभिजनांनी कशी भागीदारी केली होती, हे सांगितले. तर, वासाहतिक सत्ताकारणात केवळ “वसाहतकार त्यांच्या धोरणांची दृष्टी घेऊन” वसाहत चालवीत नव्हते; तर ती दृष्टी घडविण्यात भारतीय अभिजन स्वत:चा वाटा उचलीत होते. वासाहतिक सत्तेच्या रचनेत वसाहतवादी हा बाह्यतम घटक होता, तर जात हा आंतरिक घटक होता, हे गेल ऑमवेट यांचे मत दुर्लक्षिण्यासारखे नाही.

मराठीचे पहिले व्याकरण हे विल्यम केरी (१७६१-१८३४) यांनी रचले. या कामात केरीला वैजनाथ शर्मा या ब्राह्मण पंडिताने मदत केली होती.[21] मराठीप्रमाणेच तेलुगु भाषेची व्याकरणे रचणारे विल्यम ब्रॉऊन (१७९८-१८८४) याला मामीदी वेंकय्या व गुंडामुल्ला पुरुषोत्तमन् यांनी मदत केली, तर एलेक्झांडर डी. कॅम्पबेल (१७८९-१८५७) यांना फोर्ट सेंट जॉर्ज महाविद्यालयाच्या संस्कृत व तेलुगु विभागाचे प्रमुख पंडित राम शास्त्री यांनी मदत केली.[22]

ज्याकाळी संस्कृत ही पंडितांची भाषा होती, त्याकाळी ‘मराठी भाषा’ हा अभ्यासाचा विषय आहे, असे कोणा महाराष्ट्रीय पंडिताला वाटत नव्हते.[23] तसेच, तेलुगुसारख्या भाषेचे व्याकरण लिहितेवेळी सी. पी. ब्राऊनसारख्या ब्रिटिश व्याकरणकारांना त्यांच्या माहितगार पंडितांनी जनतेच्या भाषांविषयी सांगण्यास नकार दिला होता. या व्याकरणकारांना तेलुगु भाषेविषयी माहिती सांगण्याऐवजी रामायणमहाभारत यांसारख्या ग्रंथांविषयीच हे माहितगार पंडित अधिक माहिती सांगत असत.[24] जेम्स स्टिव्हनसन्स (१७९८-१८५८) यांनी १८६८ मध्ये जेव्हा इंग्रजीमध्ये मराठीचे व्याकरण रचण्यापूर्वी परशुरामपंत गोडबोले आणि दा[25] जी शास्त्री शुक्ला यांच्याकडून व्याकरणात योजावयाच्या शब्दांची छाननी करून घेतली होती.[26] एकंदरच, वासाहतिक काळातील ज्ञाननिर्मिती आणि ज्ञाननिर्मितीस आवश्यक असलेल्या भाषिक संसाधने उभी करण्यात वासाहतिक सत्ताधिशांसोबत एतद्देशीय अभिजनांनी भागीदारी केली होती.

संस्कृतचा प्रभाव

मला “फडक्यांची नाही, तर मराठी भाषेतील कोणतीच लेखनव्यवस्था आपल्याला मान्य नाही असे म्हणतात.”, असे चिन्मय धारूरकर यांनी म्हटले आहे. वस्तुत:, मी माझ्या लेखात असं कुठेही म्हटले नाही. मी जे म्हणालो नाही ते माझे मत आहे असे भासवायचे, असा प्रयत्न धारूरकर करताहेत. हे क्लेशदायक आहे. पर्यायी लेखनपद्धती सुचविणे, हे त्या अथवा या लेखाचे प्रयोजन नाही; तर शुद्धलेखन किंवा लेखनपद्धतीचा एकंदरच शैक्षणिक उपलब्धी, सत्तेची वीण आणि प्रभुत्व यांच्याशी काय संबंध असतो, हे दाखविणे हा माझा हेतू होता. याचा अर्थ पर्यायाची मांडणी केलीच जाऊ नये किंवा ती यापूर्वी केली गेलेली नाही असे नाही. ही चर्चा तशी नवी नाही. अगदी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून ही चर्चा सुरू आहे. मी ती केली नाही म्हणजे ती अगदी झालेलीच नाही, असे गृहीत धरता येणार नाही. परंतु, यासंबंधी सुधारणा करण्यासाठी जो दीर्घकाळ प्रयत्न होत आलेला आहे त्याला भाषिक धोरणांच्या निश्चितीकरणात कळीची भूमिका बजावणार्‍या अभिजन वर्गाने आणि त्यांच्या संस्थांनी प्रतिक्रिया देताना केवढी असंवेदनशीलता दाखविली, हा खरा प्रश्न आहे.

मराठीबाबत समाजसन्मुख सुधारणेची जी चर्चा झाली त्यामध्ये संस्कृत भाषेविषयीच्या धारणांचे पुनर्मूल्यांकन आवश्यक मानले गेले. परंतु, एक तर ही बाब लक्षात घेतली पाहिजे की, आधुनिक भाषाविचार मांडताना भाषेच्या पारंपरिक भारतीय अभ्यासकांनी संस्कृत या भाषेला एक स्थायी संदर्भबिंदू मानले. मराठी भाषेसह इतर अनेक भाषांवर संस्कृतचा प्रभाव निर्माण होण्याची प्रकिया जरी एकोणिसाव्या शतकात स्पष्टपणे आढळत असली; तरी ही प्रक्रिया प्राचीन काळापासून सुरू आहे. या प्रक्रियेत संस्कृत भाषेला परिपूर्ण आणि शुद्ध मानले गेले आणि इतर प्राकृत भाषांना अपूर्ण आणि अशुद्ध![27]

धारूरकर यांनी असं मत मांडलंय : “संस्कृतपरंपरेला आधुनिकतेच्या न्यायालयात आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करून तिला कॉन्ज़र्वेटिव म्हणून हिणवणं सोपं असलं तरी तोही कालविपर्यासच आहे.” धारूरकर म्हणतात त्याप्रमाणे संस्कृतचा प्रभाव पूर्णपणे कमी होण्याचा हा काळ नाही. ज्या वर्णव्यवस्थेची भलावण संस्कृतने केली त्या वर्णव्यवस्थेमध्ये आदर्श भारताचे चित्र बघणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय आघाडीचे सरकार सध्या केंद्रात स्थानापन्न आहे. सध्याच्या भारताच्या केंद्र सरकारने संस्कृत भाषेविषयी एक विशिष्ट असे धोरण आखले आहे. हे धोरण केवळ संस्कृत भाषेसंबंधी कोणताही सप्ताह किंवा एखादे वर्ष संस्कृत वर्ष साजरे करण्यासारख्या प्रतीकात्मकतेपर्यंत सीमित नाही. या सरकारने संस्कृत अध्ययनाचे संस्थीकरण करण्याची मोठी तयारी सुरू केली आहे. सर्व केंद्रीय विद्यालयांमधून जर्मन या भाषेचे अध्यापन बंद करून त्याऐवजी संस्कृत भाषेचे अध्यापन सुरू करण्यात आलेले आहे. तसेच पदवीस्तरावरील सर्वच अभ्यासक्रमांमध्ये संस्कृत हा विषय ऐच्छिक विषय म्हणून सुरू करण्याचा प्रस्ताव मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. तसेच, एन. गोपालस्वामी यांनी या मंत्रालयाला सादर केलेला संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठीचा ३२ पानांचा अहवाल या मंत्रालयाच्या विचाराधीन आहेच.

सरकारच्या अशा भाषा धोरणाचा परिणाम भाषिक विकासावर होतोच. मराठीतील संस्कृत शब्द वापरण्यावर बरीच मर्यादा आलेली आहे, असे चिन्मय धारूरकर यांचे मत आहे. असे होत असेल तर भाषाशुद्धीविरोधी जो विचार केला जात आहे त्याला हे श्रेय द्यावे लागेल. संस्कृतचा प्रभाव कमी होणे, हे आपोआप घडलेले नाही. फ्रँकलीन साऊथवर्थ (१९२९-) यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे : “It is the fashion nowadays to replace many of these words, even those in common use, by the Sanskrit derived words (many of them newly coined for the purpose. Of course, if new technical terms are being introduced, the source is immaterial since in any case, they are new words, but words in general use are replaced, the result is to make the language less accessible to those who have no formal education.”[28]

डॉ. दिलीप चव्हाण हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत.

..

संदर्भ आणि टीपा

[1] https:m.marathi/thewire.in/article/marathi-language-and-grammar/10686

[2]  https:m.marathi/thewire.in/ article/what-is-connection-between-untouchability-and-pure-writing/10956

[3] शुद्धीचा संबंध उदाहरणार्थ पितृसत्तेशी कसा राहिलेला यासंबंधीच्या चर्चेसाठी पहा: सुप्रिया गायकवाड, दिलीप चव्हाण, “खोले प्रकरण : जातिशुद्धी आणि स्त्रीमुक्तीचा प्रश्न (पूर्वार्ध)” परिवर्तनाचा वाटसरु १७: १३  (१-१५ नोव्हेंबर २०१७): ३०-४१ आणि “खोले प्रकरण  जातिशुदधी आणि स्त्रीमुक्तीचा प्रश्न (उत्तरार्ध)” परिवर्तनाचा वाटसरु १७ : १४ (१६-३० नोव्हेंबर २०१७): २८-३७.

[4] गं. ब. ग्रामोपाध्ये, भाषा-विचार आणि मराठी भाषा. (१९३४; पुणे : व्हीनस प्रकाशन, १९७९) १३७.

[5] रा. रा. भागवत, संस्कृत भाषेची विचिकित्सा. (प्रकाशन स्थळ व वर्ष उपलब्ध नाही.) २.

[6] Prachi Deshpande, “Shuddhalekhan: Orthography, Community and the Marathi Public Sphere” Economic and Political Weekly LI: 6 (6 February 2006) 73.

[7] Deshpande 80; प्रकाश परब, “मराठी भाषा आणि मराठी शुद्धलेखन” (हा लेख या संकेतस्थळावर उपलब्ध: https://prakashparab.wordpress.com/)

[8] Deshpande 73.

[9] वि. भि. कोलते, “मराठी साहित्य महामंडळाचे शुध्दलेखन”  इये मराठीचिये नगरी. (नागपूर : कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, १९९६) १३७.

[10] कोलते १९९६, १३३.

[11] ना. गो. कालेलकर, भाषा आणि संस्कृती. (१९६२; मुंबई: मौज प्रकाशन गृह, २०१२) ५६.

[12] सुनील रामटेके, मराठी व्याकरणातील वादस्थळे. मुंबई : ग्रंथाली, २०१६, ६२.

[13] Olivia Smith, The Politics of Language 1791-1819 (Oxford: Oxford University Press, [henceforth, Oxford U P] 1984) vii.

[14] “By arranging alphabetically all the words, they use – all, of whatever origin, of whatever application, – all of which the Brahmins of Poona acknowledge the fitness and currency in Marhata.”

श्रीनिवास मधुसुदन पिंगे, युरोपियनांचा मराठीचा अभ्यास व सेवा. (मुंबई : मराठी संशोधन मंडळ, १९६०) १५७; अ. का. प्रियोळकर, “मेजर मोल्सवर्थ व त्यांचा मराठी इंग्रजी कोश” हिंदुस्तानचे दोन दरवाजे. (मुंबई : द गोवा हिंदू असोसिएशन, १९७४) १५९.

[15] “For so backward are the Brahmins in adopting the principle I have prescribed, that to this moment, they would reject words expressive of ideas and corresponding to terms, which though abstract and learned, are to us familiar and of which the occurrence will be constant in translations from English; whilst they would receive readily high Sanskrit names for sun and moon, wood, water and stone….”  पिंगे १६०.

[16] “We employed Brahmuns, in several quarters of the Muratha territory to collect words, phrases and proverbs. We collected, after all rejections under the heads repetition, corruption, unsuitableness (from being too learned, too low, of too obvious signification, of too recent or too confined adoption & c. & c.) above 25,000 words. With a paper of these words in his hands, one of us sat daily among eight, seven or six Brahmuns….In another, a private and quiet room, another of us, together with a Brahmun, sat to cull out of books, and letters, and petitions, and dictionaries every useful word, every new meaning, every fresh idiom, every remarkable application, every requisite authority. This was another department of our work. In the most retired part of the house sat the third of the three with the most learned Brahmun :- to weigh, condense, arrange and write off the materials prepared and delivered by the assembly.”

  1. T. Molsworth, A Dictionary of Marathi and English Compiled by J. T. Molsworth. (1831; Poona: Shubhada-Saraswat, 1986) xxi.

[17] Thomas R Trautmann, Aryans and British India. (New Delhi: Yoda Press, 2004) 17-23.

[18] Rosane Rochar, “British Orientalism in the Eighteenth Century: The Dialectics of Knowledge and Government” Carol A. Breckenridge and Peter van der Veer. Eds. Orientalism and the Postcolonial Predicament: Perspectives on South Asia. (1993; New Delhi: Oxford U P, 1994) 215.

[19] Alstair Pennycook, English and the Discourses of Colonialism (London: Routledge, 1998) 78.

[20] Nicholas Dirks, Castes of Mind: Colonialism and the Making of Modern India. (2002; Delhi: Permanent Black, 2006) 100-1.

[21] केरीच्या व्याकरणाविषयी अधिक माहितीसाठी पहा: शं. ग़ो. तुळपुळे, मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल (पुणे: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे) ३९-७; कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, मराठी व्याकरणाचा इतिहास. (मुंबई: मुंबई विश्वविद्यालय-मराठी विभाग, मुंबई आणि पुणे : ज्ञानमुद्रा) १२-३; कृष्णाजी भिकाजी कुळकर्णी, आधुनिक मराठी गद्याची उत्क्रांति (मुंबई: मराठी संशोधन मंडळ, १९५६) ७४-६.

[22] P. Sudhir. “Colonialism and the Vocabularies of Dominance.” Tejaswini Niranjana. (Ed.) Interrogating Modernity. (Calcutta: Seagull Books, 1993) 339.

[23] कृष्ण श्री. अर्जुनवाडकर वेंकट्माधवकृत महाराष्ट्रप्रयोगचंद्रिका (पुणे : देशमुख अॅण्ड कंपनी, १९७०) ६.

[24] सी. पी. ब्राऊन यांनी अशी तक्रार नोंदविली: “They are willing to aid our studies either in Telugu poetry or in Sanscrit; they are reluctant to teach us the language of common business: but unless we first surmount this, the lowest step…how can we climb to the highest?….Instead of ordinary dialogues, tales, trials, letters, and histories, Telugu assistants counsel us to read the venerated Sri Bhagwadgita (as a pious act), and the prose Telugu Ramayana, one or two books of the Mahabharat, the Sanscrit vocabulary of Amara, the versified set of Telugu synonyms called Andhra-Bhasha-Bhushanam or the treatises on grammar written by Nannai Bhatta and Appa Cavi.”

—Charles Philip Brown, The Grammar of the Telugu Language, n. p.,  u. d.,  n. pag.

[25] The Rev. James Stevenson, The Priciples of Maratee Grammar (1854) Bombay: Education Society Press, 1868, iv.

[26] Christopher R. King, One Language Two Scripts: The Hindi Movement in Nineteenth Century North India. (New Delhi: Oxford U P, 1994) 182.

[27] Franklin Southworth, “The Social Context of Language Standardisation” S Imtiaz Hasnain (Ed.) Standardization and Modernization: Dynamics of Language Planning. (New Delhi: r Publication, 1995) 51.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0