नवी दिल्लीः ऑक्सिजनच्या अभावी कोरोना रुग्णाचे मृत्यू झाल्याची माहिती राज्य वा केंद्रशासित प्रदेशाकडून मिळाली नसल्याचे वादग्रस्त उत्तर केंद्रीय आरोग्य
नवी दिल्लीः ऑक्सिजनच्या अभावी कोरोना रुग्णाचे मृत्यू झाल्याची माहिती राज्य वा केंद्रशासित प्रदेशाकडून मिळाली नसल्याचे वादग्रस्त उत्तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तर काळात मंगळवारी दिले. मंत्र्यांच्या या उत्तराने विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या असंवेदनशील कारभारावर टीका केली आहे.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या या उत्तरामुळे आपण हतबुद्ध झालो असून ज्यांच्या कुटुंबातील एखादी कोरोनाबाधित व्यक्ती ऑक्सिजनअभावी मरण पावली असेल त्या कुटुंबाच्या नातेवाईकांना सरकारचे उत्तर ऐकून कसे वाटले असेल असा प्रश्न केला. या कुटुंबांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे असे ते म्हणाले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांनी केंद्र सरकार खोटे बोलत असून सरकार आपली कलंकित झालेली प्रतिमा साफ करण्याचा प्रयत्न करत असून सरकारचे धोरण विनाशकारी असल्याचा आरोप केला.
आम आदमी पार्टीने केंद्राच्या या उत्तरावर प्रतिक्रिया देताना आपल्या सरकारने ऑक्सिजनअभावी मृत झालेल्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी एक ऑडिट समिती बनवली होती. ही समिती सध्या अस्तित्वात असती तर आकडा सरकारला दिला गेला असता पण केंद्र सरकारने नायब राज्यपालांच्या मार्फत या समितीचा अहवाल सादर करण्यासही आम्हाला परवानगी दिली नाही, असे स्पष्टीकरण दिली. दिल्ली सरकारने ऑक्सिजन अभावी मृत कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना ५ लाख रु.ची मदत जाहीर केली होती. हा निर्णयही नायब राज्यपालांनी केंद्र सरकारने स्वतः यासाठी समिती नियुक्त केल्याचे सांगून विषय बाजूला ठेवला अशी टीका आपने केली.
मंत्री काय म्हणाले?
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आरोग्य हा राज्याचा विषय असून कोरोना रुग्ण व कोरोनामुळे होणार्या मृत्यूंच्या प्रकरणांची नीट माहिती राज्ये व केंद्र शासित प्रदेश केंद्राला देत असतात. पण ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत, याची माहिती केंद्राला दिली गेली नाही. आमच्या खात्याने कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती कळवण्याबाबत राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना विस्तृत दिशादर्शन केले आहे, असे उत्तर त्यांनी दिले.
डेटाबेस वेगळेच सत्य सांगतोय
द वायर ने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना बाधित असलेले २२३ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाला. या आकडेवारीपेक्षा अन्य ७० रुग्णांचे मृत्यू असे आहेत की, त्यांच्या कुटुंबियांनी वेळीच आम्हाला ऑक्सिजन मिळाला नाही असा आरोप केला आहे. या मृत्यूंविषयी प्रशासनाने कोणताही खुलासा केलेला नाही.
द वायरची आकडेवारी ही प्रसार माध्यमात आलेल्या माहितीवर आधारित असून ऑक्सिजन अभावी मृत्यूंची आकडेवारी या पेक्षा अधिक असू शकते.
गेल्या एप्रिल व मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने देशात कोरोना संक्रमणाच्या सुमारे ४ लाखाहून अधिक केस नोंद केल्या गेल्या. या काळात देशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. ऑक्सिजनच्या अभावी काही रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर मरण पावल्याचे दिसून आले होते.
मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत वाढ
सरकारने राज्यसभेत जे उत्तर दिले त्यात देशात दुसर्या कोरोना लाटेत ऑक्सिजनच्या मागणीत अभूतपूर्व वाढ झाल्याचे कबूल केले. पहिल्या लाटेत २,०९५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होती ती दुसर्या लाटेत ९ हजार मेट्रिक टन एवढी वाढल्याचे सरकारच्या लेखी उत्तरात नमूद आहे.
मूळ बातमी
COMMENTS