राजीव गांधी हत्याप्रकरणातील दोषी पेरारिवलन यांची सुटका

राजीव गांधी हत्याप्रकरणातील दोषी पेरारिवलन यांची सुटका

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील एक दोषी ए.जी. पेरारिवलन यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी

एनएसओमधून गुंतवणूकदारांचा काढता पाय; पिगॅससला नवीन बुकिंग्ज नाहीत
प्रज्ञा ठाकूर आता संसदेत म्हणाल्या…गोडसे देशभक्त
कमल हसनचा पक्ष १५४ जागा लढवणार

नवी दिल्लीः माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील एक दोषी ए.जी. पेरारिवलन यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. पेरारिवलन गेली ३२ वर्षे तुरुंगात आहेत. त्यांना ९ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने जामीनही मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने राज्यघटनेतील कलम १४२ अंतर्गत आपले विशेषाधिकाराचा वापर करत पेरारिवलन यांच्या सुटकेचे आदेश दिले. या पीठामध्ये न्या. बी. आर. गवई हेही आहेत.

२०१८मध्ये तत्कालिन अण्णाद्रमुक सरकारने प्रासंगिक परिस्थितीचा विचार करून पेरारिवलन यांची राज्य घटनेतील कलम १४२ अंतर्गत सुटका करावी असा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. राज्यघटनेतील कलम १४२ हे सर्वोच्च न्यायालयाला विशेषाधिकार देते. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेले पेरारिवलन गेली ३२ वर्षे तुरुंगात आहेत. या काळात त्यांना तीन वेळा पॅरोलवर सोडण्यात आले होते. या एकूण कालखंडात त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार आली नाही, त्यांचे शिक्षा भोगण्यादरम्यानचे वर्तन चांगले होते, त्यामुळे आम्ही विशेषाधिकार वापरत त्यांची सुटका करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

राजीव गांधी खटल्याची पार्श्वभूमी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील एक दोषी ए. जी. पेरारिवलान गेली ३२ वर्षे तुरुंगात होते. त्यांना या पूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण नंतर ती बदलून आजन्म कारावास अशी करण्यात होती. २०१६मध्ये पेरारिवलान यांनी आपल्या शिक्षेत सूट द्यावी अशी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. पेरारिवलान याच्या शिक्षेत सूट देऊ नये अशी भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली होती. पेरारिवलान याच्या शिक्षेवर राष्ट्रपती निर्णय घेऊ शकतात असा युक्तिवाद केंद्र सरकारचा होता. त्यामुळे गेली ५ वर्षे हे प्रकरण प्रलंबित होते.

गेल्या मार्च महिन्यात पेरारिवलान यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्यायोगे असल्याचे मत व्यक्त केले होते. गेल्या ३० वर्षाच्या तुरुंगवासात आजारी प्रकृती असूनही पेरारिवलान याने चांगली शैक्षणिक पात्रता मिळवली असून कौशल्याचे कामही त्यांनी आत्मसात केले आहे. त्यामुळे त्यांना जामीन देणे योग्य ठरेल असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. पेरारिवलान यांना या पूर्वी तीनवेळा जामीन देण्यात आला होता, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी पेरारिवलान यांना १९९१मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वय १९ वर्षे होते. २१ मे १९९१साली तामिळनाडूतील श्रीपेरूमबुदूर प्रचारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या धानू नावाच्या एका महिलेने मानवी बॉम्बद्वारे केली होती. धानूने आपल्या कंबरेला स्फोटकांचा एक पट्टा लावला होता. या पट्ट्यासाठी लागणाऱ्या ९ व्होल्ट क्षमतेच्या बॅटऱ्या पेरारिवलान याने खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी यांच्यासह धानू व अन्य १४ जण ठार झाले होते.

या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मे १९९९ पेरारिवलान, मुरुगन, संथम व नलिनी या अन्य चौघांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

१८ फेब्रुवारी २०१४मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलान, मुरुगन व संथान यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: