सुशांत सिंग प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांना रस का आहे!

सुशांत सिंग प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांना रस का आहे!

पटणाः गेले काही दिवस अनेक टीव्ही न्यूज चॅनेलवर बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे दिसत आहेत. कोणत्याही विषयावर कोणत्याही पॅनेलवर ते मत मांडताना

‘बिहार मे भाजपा बा…’
बिहारमध्ये नितीश विरोधासोबत बेरोजगारीची लाट
बिहारमध्ये २ उपमुख्यमंत्री, पहिल्यांदाच महिलेला संधी

पटणाः गेले काही दिवस अनेक टीव्ही न्यूज चॅनेलवर बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे दिसत आहेत. कोणत्याही विषयावर कोणत्याही पॅनेलवर ते मत मांडताना दिसतात. मध्यंतरी उ. प्रदेशमधील गुंड विकास दुबे याच्या एन्काउंटर प्रकरणात ते सतत दिसत होते.

हिंदी भाषिक पट्ट्यात बडा पोलिस अधिकारी राष्ट्रीय न्यूज चॅनेलवर दिसणे ही घटनाच वैशिष्ट्यपूर्ण. पण गुप्तेश्वर पांडे याला अपवाद आहेत. ते सतत टीव्हीवर दिसतात म्हणून मध्यंतरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना समज दिली होती. जेव्हा एखाद्याला मीडिया हिरो बनवते तेव्हा त्याचे पतन होते, त्यामुळे प्रसिद्धीपेक्षा कामाला मी महत्त्व देतो, असे नितीश कुमार यांचे वक्तव्य होते.

गुप्तेश्वर पांडे हे सोशल मीडियावरही सतत दिसतात. त्यांचे फेसबुकवर ७.७७ लाख फॉलोअर्स आहे. गेल्या एप्रिलमध्ये त्यांनी ट्विटरवर अकाउंट उघडले आणि त्यांचे एका महिन्यात फॉलोअर ७७,८०० इतके झाले.

सध्या बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग यांच्या आत्महत्या प्रकरणात चर्चा करताना गुप्तेश्वर पांडे सतत मीडियात दिसतात. त्यांच्या विधानाच्या हेडलाइन्स होतात.

२५ जुलैला पटण्यातल्या राजीव नगर पोलिस ठाण्यात सुशांत सिंग यांचे वडील के. के. सिंग यांनी सुशांत सिंग यांची प्रेयसी रिहा चक्रवर्ती यांच्याविरोधात तक्रार केली. ही तक्रार दाखल करतातच पांडे यांनी तडक आपले काही अधिकारी मुंबईत तपासासाठी पाठवले. या पोलिसांपैकी एका पोलिस अधिकार्याला मुंबईत पोहोचताच विलगीकरण कक्षात नेले तर अन्य पोलिस मुंबई पोलिसांना चकवा देत सुशांत सिंग यांच्या कथित आत्महत्येप्रकरणाची चौकशी करत आहेत. ही परिस्थिती पाहून पांडे यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली. या टीकेनंतर बिहार सरकारने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची सूचना केंद्र सरकारला केली व केंद्राने ती लगेचच मान्य केली.

सुशांत सिंग प्रकरणात गुप्तेश्वर पांडे अधिकच चेव आल्यासारखे बोलत आहे. काही दिवसांपूर्वी ते रिपब्लिक टीव्हीवर सुमारे २० मिनिटे या विषयावर बोलत होते. सुशांत सिंग हा बिहारचा मुलगा असल्याचे ते सांगत होते. सुशांतच्या अकाली मृत्यूमुळे बिहारमधील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असे ते म्हणत होते. एक आयपीएस पोलिस अधिकारी अशी विधाने करतो हे योग्य नाही. पण पांडे राजकीय नेत्यांच्या भाषेत बोलताना दिसून आले.

सुशांत सिंग प्रकरणाचा पांडे कसा छडा लावणार यावर अनेक जण साशंक आहेत. कारण पांडे यांनी त्यांच्या हातात असलेल्या व त्यांच्याच राज्यातल्या अनेक प्रकरणांचा अद्याप छडा लावलेला नाही. उदा. मुझफ्फरपूर येथील नवरुना अपहरण प्रकरण हे पांडे यांच्याकडे होते पण आणि या प्रकरणात खुद्द सीबीआयने त्यांची चौकशी केली आहे. हे प्रकरण अजून शेवटास गेलेले नाही.

पांडे यांच्या पोलिसी कारकिर्दीत अनेक चढउतार आले आहे. कधी राजकीय नेत्यांशी असलेली त्यांची सलगी हा चर्चेचा विषय आहे. अशा वेळी गुप्तेश्वर पांडे हे व्यक्तिमत्व नेमके काय आहे का उत्सुकतेचा विषय आहे.

नवरूना अपहरण खटला

१८ सप्टेंबर २०१२मध्ये नवरुना या १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले. या मुलीचे वडील अतुल्या चक्रवर्ती यांची चौथी पीढी मुझफ्फरपूर येथे राहात असून त्यांची मुलगी अत्यंत गूढरित्या बेपत्ता झाली. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून बिहारच्या पोलिस उपमहानिरीक्षकांपर्यत गेला. त्यावेळी गुप्तेश्वर पांडे हे बिहारचे अतिरिक्त पोलिस उपमहानिरीक्षक होते. पण त्यांच्याकडून या प्रकरणात काहीच बाहेर आले नाही. त्या वर्षी ३ डिसेंबरला पांडे यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी शिफारस केली. पण नंतर हा तपास सीबीआयकडे गेला. अपहरणाच्या घटनेला ६ महिने झाल्यानंतर २६ मार्च २०१३मध्ये पांडे यांची बिहार राज्य क्रीडा प्राधिकरणावर बदली झाली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१४मध्ये सीबीआयने या प्रकरणात फिर्याद दाखल केली आणि याच काळात सीबीआयने पांडे व अन्य दोन पोलिस अधिकार्यांची चौकशी केली.

नवरुना प्रकरणासंदर्भात अतुल्य चक्रवर्ती यांनी द वायरशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले, गुप्तेश्वर पांडे यांचीच चौकशी करावी अशी मागणी आम्ही केली होती. पण सीबीआयकडून टाळाटाळ केली जात होती. पांडे हे आयपीएस अधिकारी असल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पुराव्यांची गरज आहे. ते नसल्याने त्यांची चौकशी करता येत नाही, असे सीबीआयचे म्हणणे होते. पण नंतर सीबीआयने त्यांची चौकशी केली. जर सीबीआयने त्यांची चौकशी केली याचा अर्थ पांडेच्या विरोधात पुरावे असणार असा चक्रवर्तींचा दावा आहे.

चक्रवर्तींच्या म्हणण्यानुसार त्यांचे घर व त्यांची जागा माफियांना हवी होती. आणि त्यासाठी माझ्या मुलीचे अपहरण करण्यात आले. आणि या माफियांशी गुप्तेश्वर पांडे यांचे साटेलोटे आहे. पण हा आरोप पांडे यांनी फेटाळला होता.

राजकारणाकडे ओढा

गुप्तेश्वर पांडे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांच्या कारकीर्दीत दडलेली आहे. २००९मध्ये बक्सार येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणुका लढण्याचा त्यांचा इरादा होता आणि त्यांनी १४ मार्च २००९मध्ये व्हीआरएस घेतली होती. त्यावेळी पांडे इन्स्पेक्टर जनरल (सुरक्षा) या पदावर होते. पण भाजपने ऐनवेळी बक्सारचे पूर्वी पाच वेळा खासदार असलेल्या आपल्या पक्षाच्या लालमुनी चौबे यांना तिकीट दिले. पण यावर पांडे अस्वस्थ झाले नाहीत. मी आता राजकारणात प्रवेश केलाच आहे आणि आता त्यातून माघार घेणार नाही, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट करून टाकले.

२००९च्या निवडणुकीत भाजपची बक्सारची जागा राष्ट्रीय जनता दलाकडे गेली व इकडे पांडे यांनी पुन्हा पोलिस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तशी बिहार सरकारकडे विनंतीही केली. सरकारने त्यांची विनंती लगेचच नोव्हेंबर २००९मध्ये मान्य केली. पण डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार पांडे यांची व्हीआरएस बिहार सरकारने मान्य केली पण ती केंद्राकडे पाठवली नाही. ती का पाठवली नाही, याबाबत राज्य सरकारने काही खुलासा केलेला नाही. पण यावरून चर्चा सुरू झाली की भाजप-जनता दल संयुक्त सरकारला पांडे हवे होते.

पांडे यांचे व्यक्तिमत्व पाहता ते भाजपचे भविष्यातील नेते शोभून दिसतात. बिहारचे पोलिस महासंचालक असूनही ते आपली धार्मिक प्रतिमा सतत ठेवत असतात. ते कपाळावर नाम ठेवतात, छोटी शेंडी ठेवतात. बक्सारमधील एका न्यूज पोर्टलमध्ये त्यांनी सनातन धर्माचा प्रचार करणारा लेख लिहिला आहे. २००६ पासून ते मुझफ्फरपूर येथील गरीबनाथ मंदिराच्या विश्वस्त समितीत सदस्य आहेत. तसेच सोनपूर येथील हरिहरनाथ मंदिराच्या विश्वस्त समितीतही आहेत.

५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत राम मंदिर भूमीपूजन झाले. त्या निमित्ताने रामाचा फोटो त्यांनी आपल्या फेसबुकवर ठेवला होता. त्यांनी ईद-उल-झुआच्या निमित्ताने भाईचारा ठेवण्याचा संदेश देणारा कौमी एकता नावाचा व्हीडिओही प्रसिद्ध केला होता.

पोलिस महासंचालक कसे झाले?

गेल्या जानेवारी महिन्यात पांडे यांची बिहारच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. या पदासाठी अन्य पोलिस अधिकार्यांची नावे होती. तीन अधिकार्यांचा सेवाकाल पांडे यांच्यापेक्षा अधिक होता पण या अधिकार्यांच्या ऐवजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

नितीश कुमार यांच्या दारुबंदी योजनेत पांडे यांनी चांगले काम केल्याचे सरकारचे मत आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, बिहारमध्ये दारुबंदीमुळे दारु तस्करीचा सुळसुळाट सुरू आहे. तसेच बिहारमधील गुंडगिरीही कमी झालेली नाही.

या वर्षाच्या पहिल्या ५ महिन्यात बिहारमध्ये १,१८६ खून, २,९३४ अपहरण व ५२४ बलात्काराच्या घटना घडल्या असून ९९,५५८ इतके दखलपात्र गुन्हे नोंद झाले आहेत.

गेल्या डिसेंबरमध्ये पांडे यांना एका पत्रकाराने राज्यातल्या वाढत्या गुंडगिरीसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी त्या पत्रकाराशी वाद घातला. तुम्ही प्रशिक्षणार्थी पत्रकार असून प्रश्न कसे विचारायचे असतात, त्याची कला तुमच्यामध्ये अजून विकसित झालेली नाही, असे  पांडे त्या पत्रकाराला जाहीरपणे म्हणाले.

आता बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून पांडे यात उडी घेतील असे बोलले जात आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पांडे सेवानिवृत्त होत आहे पण त्या अगोदर ते आपला राजीनामा देऊन जनता दल संयुक्त किंवा भाजपचे तिकीट मिळवतील याची शक्यता नाकारता येत नाही.

‘द वायर’ने पांडे यांना काही प्रश्न इमेलद्वारे पाठवले पण त्यांनी त्याला उत्तर दिलेले नाही. ही उत्तरे आल्यास या लेखात समाविष्ट करून घेण्यात येतील.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0