जॉर्ज ऑरवेलच्या श्रेष्ठत्वाचा मर्मभेद

जॉर्ज ऑरवेलच्या श्रेष्ठत्वाचा मर्मभेद

भारतासह जगभराच्या वाचकांवर जॉर्ज ऑरवेलचे गारुड आहे. ऑरवेलची सर्वांनीच स्तुती करण्याएवढे त्याचे साहित्य खरोखरीच श्रेष्ठ होते का, खुद्ध ऑरवेल खरोखरच एवढा श्रेष्ठ होता का किंवा नेमका तो काय व कसा होता याचा शोध घेणारा हा लेख.

२० व्या शतकाच्या मध्यापासून गेली ७० वर्षे कादंबरीकार- लेखक जॉर्ज ऑरवेलचा वाचकांवर खूप मोठा प्रभाव आहे आणि तो अजून टिकून आहे. काही जणांची तर शेक्सपिअरनंतर जनमानसावर प्रभाव टाकणारा ऑरवेल इतका दुसरा कोणी लेखक झाला नाही असे म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. पाश्चात्य किंबहुना जगभरचे साहित्यिक, विचारवंत आणि वाचक ऑरवेलच्या दूरदृष्टीचे, त्याच्या द्रष्टेपणाचेअमाप कौतुक करत असतात.

भारतातही रामचंद्र गुहा यांच्यासारख्या विचारवंताने गेल्या वर्षी तो काय काय वाचतो ते सांगताना जॉर्ज ऑरवेलच्या A Collection of Essays by George Orwell या ग्रंथाला प्रथम स्थान दिले आणि त्याच्या ‘अनिमल फार्म’ (Animal Farm) व ‘1984’ या कादंबऱ्यांचा ‘ग्रेट नॉवेल्स’ म्हणून उल्लेख केला. तसेच अंजन बासू या अभ्यासू लेखकाने ‘द वायर’वर Like It or Not, George Orwell Remains Relevant to the 21st Century… अशा शीर्षकाचा लेख लिहिला. यावरून भारतासह जगभराच्या वाचकांवर असलेले ऑरवेलचे गारुड लक्षात यावे.

एव्हढी स्तुती केली जात असे तसे ऑरवेल व त्याचे साहित्य खरोखरच एवढे श्रेष्ठ होते का, तो खरोखरच एवढा श्रेष्ठ होता का किंवा नेमका तो काय व कसा होता याचा आपण शोध घेणार आहोत.

खरे तर ऑरवेलचे साहित्य आपण समजतो तितके श्रेष्ठ व उच्च प्रतीचे नाही याचा आपण पुढे सविस्तर विचार करणार आहोत. पण ऑरवेलच्या साहित्याला मिळालेली प्रसिद्धी समजून घेण्यासाठी अमेरिका, पाश्चात्य राष्ट्रे आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्र म्हणून रशियाची मदत घेतल्यानंतर ते महायुद्ध संपताच लगेच रशिया विरूद्धच्या शीतयुद्धाला सुरुवात झाली. पण या शीतयुद्धात दोन्ही बाजूंनी त्यांच्या गुप्तहेर संघटनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. अमेरिकेच्या बाजूने या शीतयुद्धाच्या कारवायात अनेक नामवंत लेखक सामील झाले. विशेष म्हणजे या काळात रशिया व कम्युनिझमच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी राजकीय नेते, गुप्तहेरांपेक्षा लेखक, साहित्यिक जास्त उपयुक्त व महत्त्वाचे मानले गेले. त्यामुळे साहित्यिकांना गळाला लावण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले गेले. तसेच शीतयुद्धाच्या काळात समाजवादी तसेच माजी कम्युनिस्टांच्या एका गटासह अनेक लेखकांनी रशिया व कम्युनिझमच्या विरोधात एक मोठी आघाडी उघडली होती. विशेष म्हणजे यातले अनेक लेखक अमेरिका व ब्रिटीश गुप्तहेर संघटनांसाठी काम करत होते. या लेखकांत जॉर्ज ऑरवेलसह ऑर्थर कोसलर, स्टीफन स्पेंडर, मॅरी मॅकार्थी, अलेक्झांडर सोल्सेनित्सिन, बोरिस पास्टरनाक, रिचर्ड राइट, इसाक बाबेल अशा कितीतरी लेखकांचा समावेश होता.

जॉर्ज ऑरवेलच्या ‘अनिमल फार्म’ (१९४५) आणि ‘1984’ (१९४९) या कादंबऱ्या रशियाला व कम्युनिझमला बदनाम करण्यासाठी, त्यांच्याविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी उपयुक्त वाटल्या म्हणून या कामासाठी त्या कादंबऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून ऑरवेलच्या ‘अनिमल फार्म’ या कादंबरीला रातोरात वारेमाप प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे अमेरिकन गुप्तहेर संघटना ‘सीआयए’कडून ‘अनिमल फार्म’ या कादंबरीच्या शेकडो प्रती छापून त्या बलूनमधून पूर्व व मध्य युरोपात टाकण्यात आल्या. शीतयुद्धात लेखकांचा व त्यांच्या साहित्याचा वापर करण्याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी शेकडो उदाहरणे देता येतील.

रशियन कम्युनिस्टांवर टीका करणाऱ्या लेखकांना व साहित्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली त्याचे दुसरे कारण म्हणजे शीतयुद्धात अमेरिकेला पाठिंबा देणाऱ्या लेखकांनी एकमेकांच्या साहित्याचा प्रचार करण्याचा, एकमेकांना प्रसिद्धी देण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि त्याला अमेरिका व भांडवलधार्जिण्या पाश्चात्य नियतकालिकांनी प्रसारमाध्यमांनीही मोठ्या प्रमाणावर हातभार लावला.

जॉर्ज ऑरवेलची ‘1984’ ही कादंबरी १८ जून १९४९ रोजी प्रसिद्ध झाली आणि त्याच दिवशी व्ही. एफ. प्रिशेट आणि लॉयोनल ट्रिलिंग या अमेरिकन सीआयएला मदत करणाऱ्या लेखकांची या कादंबरीचे गोडवे गाणारी समीक्षा अनुक्रमे ‘न्यू स्टेट्समन’ आणि ‘न्यूय़ॉर्कर’ या दैनिकात प्रसिद्ध झाली.

 ऑरवेल ब्रिटीश गुप्तहेर संघटनेचा खबऱ्याः

ऑरवेलचे सर्वात हीन कृत्य म्हणजे तो ब्रिटिश गुप्तचर संघटनेचा खबऱ्या होता आणि त्याचे मित्र, सहकाऱ्यांशी दगाबाजी करणारे वर्तन त्याच्या एकूणच लौकिकास काळीमा फासणारे होते.

१९३६ ते १९३९ या काळात स्पेनमध्ये चाललेल्या स्पॅनिश सिव्हिल वॉरमध्ये फॅसिस्ट फ्रॅंको विरुद्ध लढणाऱ्या रिपब्लिकन फोर्समध्ये साधारण वर्षभर सामील होता. तेव्हापासून ते शीतयुद्धाच्या काळात जानेवारी १९५० मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत तो कम्युनिस्ट विचारसरणीचे व रशियाचे समर्थन करणारे त्याचे मित्र-सहकारी पाश्चात्य नेते, विचारवंत लेखक यांच्यात वावरून त्यांची यादी करून तो ती नावे ब्रिटीश गुप्तचर संघटनेची शाखा असलेल्या इन्फॉर्मेशन अँड रिसर्च डिपार्टमेंटमध्ये काम करणारी त्याची मैत्रिण प्रेयसी सेलिया किरवानच्या माध्यमातून पुरवित होता. ब्रिटीश गुप्तचर यंत्रणेत जॉर्ज ऑरवेलच्या नावाची क्र. Fo 111/189 या क्रमांकाची गुप्त फाइल ठेवण्यात आली होती.

ऑरवेलने ब्रिटिश गुप्तचर संघटनेला अशा ८६ जणांची नावे दिली त्यात ब्रिटिश लेबर पार्टीचा नेता मायकेल फूट, चार्ली चॅप्लिन, प्रसिद्ध लेखक जे. बी. प्रिस्टली, अभिनेता मायकेल रेड ग्रेव्ह, इतिहासकार इ. एच. कार, प्रसिद्ध पोलिश विचारवंत इसाक डेशर, तेव्हाचा ‘न्यू स्टेट्समन’ दैनिकाचा संपादक किंग्जले मार्टिन अशा अनेक जणांचा समावेश होता. अशी नावे देताना तो त्यांच्या नावापुढे कंसात त्याचे वांशिक- वंशवादी पूर्वग्रह दाखवणारी भाष्ये लिहित असे. यावरून तो वंशवादीही होता हे स्पष्ट होते.

विशेष म्हणजे जॉर्ज ऑरवेलने त्याच्या सहकाऱ्यांची विचारवंत, लेखक, कलाकारांची नावे सेलिया किरवानला केवळ तिच्या माहितीसाठीच दिली नाहीत तर तिने ही नावे तिच्या इतर सहकाऱ्यांना, मित्रांना दाखवावी असेही त्याने तिला लिहून कळविले होते. अशा कारवाया करत असल्यामुळे जॉर्ज ऑरवेल त्याच्या मित्रांना भेटताना कमालीची गुप्तता पाळत असे. तो त्याच्या मित्रांना एकत्र न भेटता वेगवेगळे भेटत असे.

अशी प्रकरण ३० वर्षे गुप्त ठेवण्याचा नियम असल्यामुळे तो कालावधी संपल्यानंतर ब्रिटिश सरकारने ऑरवेलने ब्रिटिश गुप्तचर संघटनेला दिलेली माहिती १९९६ मध्ये जाहीर केली. तसेच त्या यादीत असलेली नावेही २००३ मध्ये जाहीर केली.

ऑरवेलच्या साहित्याचा सुमार दर्जा आणि त्याचे वाड्.मयचौर्य

वर चर्चा केल्याप्रमाणे ऑरवेलचा आणि त्याच्या साहित्याचा तो जिवंत असताना आणि मरणोत्तर जो गाजावाजा झाला, जो प्रचार झाला तो बाजूला ठेवून ऑरवेलच्या साहित्याचे तटस्थपणे मूल्यमापन केले तर ऑरवेलचे साहित्य तेवढे श्रेष्ठ दर्जाचे नव्हते. ऑरवेलकडे उपजत, अस्सल अशी सृजनशीलता नव्हती असे दिसून येते. या बाबतीत नामवंत सांस्कृतिक भाष्यकार आणि ‘जॉर्ज ऑरवेल’ (१९७१) या ग्रंथाचे लेखक रेमण्ड विल्यम्सनी तीन प्रश्न उपस्थित करून ऑरवेलच्या साहित्याचे मूल्यमापन केले आहे. ते प्रश्न म्हणजे –

  • ऑरवेलनी त्याच्या साहित्यातून समाज, इतिहास याबद्दलचे काही सैद्धांतिक ज्ञान निर्माण केले का?
  • ऑरवेलने प्रथमदर्जाची सर्जनशीलता, कल्पकता (जे कादंबऱ्यांचे महत्त्वाचे व मध्यवर्ती मूल्य आहे) असलेले साहित्य निर्माण केले का?
  • ऑरवेलच्या साहित्याचा ज्या कारणासाठी गाजावाजा झाला, जे त्याचे बलस्थान आहे असे मानले जाते ते वास्तवाचे चित्रण, वर्णन तरी खरे आहे का? किंवा ऑरवेलनी जे अनुभवले त्याची वास्तववादी मांडणी प्रामाणिकपणे केली का? त्याचे साहित्य नेमकेपणाचा अचूकपणाचा उत्तम दस्तावेज ठरावा असे आहे का?

या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नाही अशीच द्यावी लागतात. काही उजवे प्रतिगामी व त्याचे प्रचारक वगळले तर ऑरवेलच्या चाहत्यांनाही ऑरवेलने असे काही नवे ज्ञान निर्माण केले असे वाटत नाही. तसेच ऑरवेलच्या कादंबऱ्यांचे साहित्यिक मूल्य पाहिले तर त्या कादंबऱ्या सुमार दर्जाच्या कच्च्या व निकृष्ट आहेत. तसेज ऑरवेलची कल्पनाशक्तीही मर्यादित व उथळ आहे. ऑरवेलच्या साहित्यात प्रामाणिकपणा व वास्तवदर्शन आहे  म्हणून सांगितले जाते परंतु त्याच्या वैचारिक साहित्यात काल्पनिक चित्रणे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. महत्त्वाचे म्हणजे ऑरवेल कुठला साहित्यप्रकार हाताळतो ते वास्तव चित्रण आहे की ललित साहित्य आहे याबद्दल संभ्रम निर्माण करतो. ऑरवेल ज्याला वास्तवदर्शी लिखाण म्हणतो त्या ‘सच सच वेअर द जॉयज’ किंवा ‘डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन’ या वैचारिक पुस्तकात अनेक काल्पनिक गोष्टी आढळतात. ऑरवेल अशी काल्पनिकता आणि वास्तवाची सरमिसळ का करतो? तो हे या दोन्ही वाड्.मयप्रकारचा फायदा उठवण्यासाठी जाणूनबुजून करतो का? असेही प्रश्न पडतात. कारणे काही असली तरी त्यामुळे ऑरवेलच्या प्रामाणिकपणाचा व विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो.

दुसरे म्हणजे ऑरवेल स्वत:चे पूर्वग्रह वाचकांवर लादण्याचा सतत प्रयत्न करतो त्यासाठी तो दंडेली व थापेबाजी यासारखे मार्ग वापरताना दिसतो. त्याचे वास्तव रिपोर्टिंगचा आव आणणारे लिखाण अविश्वासार्ह आहे आणि अप्रामाणिक वाटते. ऑरवेलच्या लिखाणात मुलभूत, उपजत विचार क्वचितच होते. जवळजवळ ते नव्हतेच असे म्हटले तरी चालेल.

ऑरवेलचे वाड्.मयचौर्य (१) :

ऑरवेलवरचा अत्यंत गंभीर आरोप म्हणजे त्याने त्याच्या ‘1984’ या कादंबरीचा आशय, कथानक, पात्रे आणि प्रतिके अशा सर्व गोष्टी रशियन लेखक एव्हजेनी झाम्याटिन (Evgenii Zamyatin) याच्या ‘We’ (वुई) या कादंबरीतून जशाच्या तशा उचलल्या आहेत. प्रसिद्ध विचारवंत इसाक डेशरनी (Isaac Deutscher) ऑरवेलच्या ‘1984’  कादंबरीची समीक्षा करताना 1984 – The Mysticism of Cruelty या १९५५ साली लिहिलेल्या समीक्षा लेखात सप्रमाण हे दाखवून दिले आहे. आणि ऑरवेलचे हे वाड्.मयचौर्य काही योगायोगाने घडलेले नाही. ऑरवेलने ‘We’ कादंबरी वाचली आणि त्या कादंबरीने अत्यंत प्रभावित झाला. भारावून गेला. त्यातून त्याने त्या कादंबरीची समीक्षाही केली आणि ती समीक्षा ऑरवेल स्वत: साहित्यिक संपादक असलेल्या ‘द ट्रायब्यून’ या तेव्हाच्या नियतकालिकात ४ जानेवारी १९४६ रोजी प्रसिद्ध झाली.

इसाक डेशरचा ऑरवेलवरील हा आरोप फार गंभीर आहे. मात्र अजून तरी त्याचे कुणी खंडन केले नाही. तसेच जॉर्ज ऑरवेलच्या ‘1984’ या कादंबरीची इसाक डेशरएवढी उत्तम समीक्षा अजूनतरी कुणी केली नाही. ती मुळातून वाचणे हे अत्यंत आनंददायी आणि बोधप्रद आहे.

जॉर्ज ऑरवेलच्या ‘अनिमल फार्म’ आणि ‘1984’ या कादंबऱ्या त्यातील प्रतिकात्मकतेसाठी जास्त गाजल्या. मात्र या कादंबऱ्यातील प्रतिकात्मकता अत्यंत बाळबोध आहे. त्यांच्यात फारसा सखोलपणा व सघनता नाही. दुसरे म्हणजे ऑरवेल त्याच्या काही लेखातील विशेषत: ‘अनिमल फार्म’ व ‘1984’ या कादंबऱ्यातील विनोदासाठी प्रसिद्ध आहे. पण या कादंबऱ्यातील त्याचा विनोद उथळ व वरवरचा असून उत्तम विनोद निर्मितीसाठी जी एक प्रकारची दार्शनिक तटस्थता (Philosophical Detachment) असावी लागते ती ऑरवेलच्या साहित्यात नाही.

ऑरवेलच्या साहित्याचा सोयीचा, संकुचित अन्वयार्थ :

आज ऑरवेलचे गाजलेले साहित्य म्हणजे त्याच्या ‘अनिमल फार्म’ आणि ‘1984’ या जवळपास सारखेच कथानक असलेल्या कादंबऱ्या हे रशियावरचे, कम्युनिझमविरुद्धचे मार्मिक भाष्य आहे असे जगभर मानले जाते. मात्र या कादंबऱ्यांतील भाष्य खरे तर रशियाला फार कमी लागू पडले आणि अमेरिका व ब्रिटनसारख्या सरकारांना मोठ्या प्रमाणावर लागू पडले. पण ऑरवेलच्या या कादंबऱ्या कम्युनिस्ट रशियाचा विरोधात वापरायचे ठरल्यामुळे त्या अमेरिका, ब्रिटनलाही लागू पडतात हे कुणी सांगत नाही. उलट त्या केवळ रशिया, कम्युनिस्ट राजवटीवर बेतलेल्या आहेत, असे मात्र सातत्याने बिंबवले जाते.

ऑरवेलच्या ‘1984’ कादंबरीत वर्णिलेले ‘ओशनिया’ राज्य हे तांत्रिकदृष्ट्या इतके विकसित झाले आहे की त्याआधारे हे राज्य समाजाच्या सर्व गरजा पूर्ण करू शकते. तसेच समताही प्रस्थापित करू शकते. तरीपण कादंबरीत ‘बिग ब्रदर’ला सत्तेत ठेवण्यासाठी विषमता आणि दारिद्र्य टिकवून ठेवले जाते. ऑरवेलने कादंबरीत म्हटल्या प्रमाणे पूर्वी हुकुमशहांनी विषमता टिकविली. आता विषमता हुकुमशाही टिकवायला मदत करते. हे वर्णन काही रशियाला लागू पडत नाही. कारण कादंबरीच्या लेखन काळात रशिया तांत्रिकदृष्ट्या तेवढा प्रगत झालेला नव्हता. तसेच अशा तांत्रिकदृष्ट्या विकसित झालेल्या राज्याचे रशियाशी फारसे साम्य नाही असे स्वतः ऑरवेलने म्हटले आहे.

दुसरे म्हणजे ‘1984’ कादंबरीतला विनोद रशियाला उद्देशून असल्याचे म्हटले जाते पण ऑरवेलने ओशनिया राज्याची जी अनेक वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत ती त्या काळातील अमेरिकन व ब्रिटिश सरकारमध्ये आढळत होती. ऑरवेलच्या ‘1984’ या कादंबरीत जाणवणारा कंटाळेपणा, नीरसपणा, उदासी, घाण, दुर्गंधी आणि कुरुपता हे रशियन शहरांचे नाही तर ब्रिटिश औद्योगिक उपनगरांचे वर्णन आहे. या कादंबरीत येणारे अन्नधान्याचे रेशनिंग, सरकारी नियंत्रण हे ऑरवेलने अनुभवलेले युद्धकालिन ब्रिटनची वैशिष्ट्ये आहेत. तसेच केवळ खेळ, गुन्हेगारी आणि राशी भविष्य छापणारी या कादंबरीत वर्णिलेली कचरापट्टी वृत्तपत्रे आणि लैंगिकता ओसंडून वाहणारे चित्रपट ही सगळी वर्णने अमेरिकन व ब्रिटिश-वृत्तपत्रे व चित्रपटात चपखलपणे लागू पडते. कारण अशी वृत्तपत्रे रशियात नाहीत हे ऑरवेलला माहिती होते.

‘1984’ कादंबरीतले ‘न्यूजस्पीक’मधील भाष्य हे स्टॅलिनच्या रशियावरचे भाष्य नसून ते अमेरिका-इंग्लंडमधील पत्रकारितेशी साम्य दर्शवणारे आहे. ऑरवेल स्वतः पत्रकार असल्यामुळे ब्रिटनमध्ये हे चित्र त्याने पार जवळून पाहिले होते. ऑरवेल ‘1984’मध्ये इंग्लंडच्या लेबर पार्टीवर विनोदातून टीकाटिपण्णी करतो हे सहज लक्षात घेता येईल. पण रशिया आणि कम्युनिस्ट द्वेषाने आंधळे झालेल्या पाश्चात्य आणि जगभराच्या समीक्षकांना, उदारमतवाद्यांना हे दिसत नाही. किंवा त्यांना ते पाहायचे नाही.

ऑरवेलचा राजकीय विचार आणि दृष्टिकोनः

ऑरवेल हा फार मोठा राजकीय विचारसरणी बाळगणारा विचारवंत लेखक होता, अशीही त्याची ख्याती आहे. ऑरवेलचा स्वतःचा असा दावा होता की, त्याने लिहिलेल्या प्रत्येक शब्द त्याच्या लोकशाही समाजवादावर असलेल्या श्रद्धेतून प्रेरणेतून लिहिलेला आहे. पण त्याचे सगळे लिखाण समाजवादात, मार्क्सवादाला विरोध कऱणारे होते.

आपण सुरवातीलाच हे लक्षात घेतले पाहिजे की ऑरवेल हा एक उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेला आणि वसाहतवादी, साम्राज्यवादी वातावरणात वाढलेला होता. जवळपास ६ वर्षे ब्रिटिश इम्पिरियल पोलिस सेवेत नोकरी केल्यानंतर वयाच्या २५ व्या वर्षी राजीनामा देवून तो लंडनला परत आला. तेव्हा त्याच्यावर त्या उच्चवर्गाचे, साम्राज्यवादी, वसाहतवादी, ब्रिटिश नोकरशाहीचे संस्कार होते.

लंडनला आल्यानंतर तो सर्वसामान्य, उपेक्षित, व असुरक्षित माणसांचे जीवन समजून घेण्यासाठी त्यांच्यात वावरायला लागला. कार्य करायला लागला. तसेच समाजवादी विचारसरणीने प्रभावीत होऊन तो समाजवादी बनला. त्याने ब्रिटिश इंडिपेडंट लेबर पक्षाचे सदस्यत्वही स्वीकारले.

लंडनमध्ये अशा कार्यात उणीपुरी ७-८ वर्षे घालवल्यानंतर तो १९३६मध्ये सुरू झालेल्या स्पेनच्या फॅसिस्ट फ्रँको विरुद्धच्या स्पॅनिश सिव्हील वॉरमध्ये सामील झाला. या लढ्याला ऑरवेलबरोबर ऑर्थर कोसलर, अर्नेस्ट हेमिंग्वे, स्टेफन स्पेंडरसारखे अनेक लेखक सामील होते. तिथे ऑरवेल आणि त्याच्या सहकार्यांचा गट स्वतःला ‘अनार्किस्ट’ म्हणवून घेत असे. ऑरवेल स्पॅनिश सिव्हील वॉरमध्ये जवळपास एक वर्षे राहिला.

स्पॅनिश सिव्हिल वॉरचे एक वैशिष्ट होते ते म्हणजे स्पेनच्या फॅसिस्ट फ्रँको विरुद्धचा एक लढा अत्यंत महत्त्वाचा व गौरवशाली असला तरी त्यात सामील असणारे क्रांतीकारक लेखक विचारवंत यांच्यात कम्युनिस्ट-बिगर कम्युनिस्ट, रशियावादी-रशिया विरोधक समाजवादी, रशियावादी ‘इंटरनॅशनल ब्रिगेड’ तसेच रशिया, स्टॅलिनच्या विरोधातील ट्रॉटस्की, बुखारिस्ट, पॉप्युलर फ्रंट असे अनेक गट कार्य करत होते. ऑरवेल हा रशियाविरोधी दुसऱ्या गटात कार्य करत होता. या गटांचे आपापसात सख्य तर नव्हतेच उलटे ते एकमेकांना पाण्यात पाहात असत. म्हणजे स्पॅनिश युद्धाच्या रणधुमाळीतही ‘समाजवादी’ ऑरवेलच्या रशिया व कम्युनिझमविरोधी कारवाया चालू होत्या.

ऑरवेलचा भ्रमनिरास आणि प्रतिगामी वळणः

स्पॅनिश सिव्हील वॉरमधून इंग्लंडला १९३७साली परत आल्यानंतर ऑरवेल अचानक प्रतिगामी बनला. तो इंग्लंडमध्ये संकुचित राष्ट्रभक्तीच्या विचारसरणीचा पुरस्कार करायला लागला. तसे पाहिले तर ऑरवेलचे एकूणच लिखाण खूप प्रतिगामी होते.

या अचानक केलेल्या ‘घुमजाव’चे समर्थन करताना ऑरवेल व त्याचे सहकारी सांगतात ते कारण म्हणजे स्पॅनिश सिव्हील वॉरमध्ये रशियाच्या बाजूने नसलेल्या अनेक बिगर कम्युनिस्टांवर केलेली टेहळणी आणि रशियावादी कम्युनिस्टांकडून झालेला छळ यामुळे ऑरवेलचा भ्रमनिरास झाला, तो वैफल्यग्रस्त बनला त्यामुळे समाजवाद, परिवर्तनवादी विचार सोडून देऊन तो प्रतिगामी, कम्युनिझम व समाजविरोधी बनला असे सांगितले जाते. ही ऑरवेलची बाजू झाली.

पण याची दुसरी बाजू आहे ती म्हणजे स्पॅनिश युद्धाच्या धुमश्र्चक्रीतही फ्रँकोविरुद्ध लढायचे सोडून देऊन ऑरवेल आणि त्याचे सहकारी, त्यांचे कम्युनिस्ट सहकारी आणि रशियाविरुद्ध ज्या अनेक कारवाया करत होते त्याची स्टॅलिन आणि रशियाला माहिती होती. स्पॅनिश सिव्हील वॉरच्या काळात स्पेनमध्ये पत्रकारिता करणारा आणि नंतर ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेसाठी व रशियासाठीही ‘डबल एजंट’ म्हणून काम करणारा डोनाल्ड किम फिलबी याला रशियाने गुप्त बातम्या पुरवण्यासाठी स्पॅनिश युद्धापूर्वी १९३४सालीच भरती केले होते. म्हणजे तो स्पॅनिश सिव्हिल वॉर चालू असताना रशियासाठी काम करत होता आणि रशियाला सगळी माहिती पुरवत होता.

दुसरे म्हणजे सुरवातीला ‘बीबीसी’साठी काम करणारा आणि नंतर ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेत उच्च पदावर काम करणारा पण रशियासाठीही गुप्तहेर काम करणारा ‘डबल एजंट’ गाय बर्जेस हाही स्पॅनिश सिव्हील वॉर सुरू होण्याच्या एक वर्ष अगोदरपासून रशियन गुप्तचर यंत्रणेसाठीही काम करत होता आणि रशियाला माहिती पुरवत होता. हा गाय बर्जेस वर उल्लेखलेला किम फिलबीचा अत्यंत घनिष्ठ मित्र होता. किम फिलबीनेच गाय बर्जेसची ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेत भरती केली होती. यावरून ऑरवेल आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या स्पॅनिश युद्धाच्या काळातील कम्युनिस्ट विरोधी व रशिया विरोधी सगळ्या कारवाया रशियाला आणि स्टॅलिनला माहिती होत्या असे निश्चित म्हणता येते.

विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात १९४९ साली वर उल्लेख केल्याप्रमाणे ऑरवेलने रशियाधार्जिण्या कम्युनिस्टांची यादी ज्या सेलिया किरवानला दिली त्या सेलिया किरवानचे ऑफिस वर उल्लेखलेल्या ‘डबल एजंट’ गाय बर्जेसच्या ऑफिसला लागूनच होते.

असेही म्हणता येईल की, ऑरवेलने सेलिया किरवानला १९४९मध्ये जी यादी दिली होती ती काही ऑरवेलला अचानक उपरती झाली म्हणून नव्हे तर तो स्पॅनिश युद्धापासून अशी यादी तयार करत होता, ठेवत होता. त्यामुळे ऑरवेलच्या बिगर कम्युनिस्ट समाजवादी विचारामुळे रशियाने, स्टॅलिनने ऑरवेलचा विनाकारण छळ केला असे म्हणता येणार नाही. कुणी दगाबाजी, धोकाबाजी करत असेल तर त्यावर टेहळणी करणे, लक्ष ठेवणे स्वाभाविक म्हणावे लागेल. त्यामुळे ऑरवेल रशिया-स्टॅनिलच्या छळामुळे अचानक प्रतिगामी बनला हेही न पटणारे आहे.

काहीही असले तरी स्पेनमधील स्पॅनिश सिव्हील वॉरवरून लंडनला आल्यानंतर वैचारिकदृष्ट्या ऑरवेलमध्ये एवढा बदल झाला की त्या नंतर तो समाजवाद वगैरे सोडून देऊन समाजवादाचा विरोधक व टोकाचा कम्युनिस्टद्वेष्टा बनला. आणि आयुष्याच्या शेवटी तर तो साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारच्यावतीने उघड हेरगिरी करणारा ‘एजंट’ बनला. ऑरवेलचा चरित्रकार डी. जे. टेलरच्या म्हणण्यांनुसार ऑरवेलसह जे अनेक ‘ट्रॉटस्कीस्ट’ प्रतिगामी बनले त्या लांबलचक यादीत ऑरवेलचा क्रमांक पहिला लागतो.

आता सुद्धा सर्व उजवे, प्रतिगाम्यांच्या हातात ऑरवेलचे कोलित मिळाल्यामळे ते त्यांच्या उद्दिष्ठासाठी, मार्क्सवाद-समाजविरोधी कारवायांसाठी ऑरवेलचा उघड उघड वापर करतात. इतकेच काय स्पॅनिश सिव्हील वॉरच्या युद्धभूमीवर बॅनेट लावलेली बंदूक घेऊन फॅसिस्टांचा पाठलाग करणारा ऑरवेल नंतर फॅसिस्ट विरोधी चळवळीचा टीकाकार बनला असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

ऑरवेलची अपरिपक्वताः

ऑरवेलला राजकीय जीवन काय असते, राजकीय शक्ती कशा काम करतात, घडणाऱ्या घटनांची सामाजिक पार्श्वभूमी काय असते याचे आकलन नव्हते, जाणीव नव्हती. तसेच माणसांचे हेतू, त्यांचा हिशोबीपणा, त्यांच्यात असणारी भीती आणि केलेल्या कृत्यांमागे असणारा परिस्थितीचा रेटा समजून घेणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते.

त्याचे दुसरे स्वभाववैशिष्ट्य म्हणजे ऑरवेल संशयी व दुराग्रही होता. आणि त्यातही त्याला फ्रॉईडच्या विश्लेषणातील बळी भावनेने (Persecution Complex) पछाडल्यामुळे त्याला सतत आपण कटकारस्थानाचा बळी असल्याचा भास होत असे. तसेच ऑरवेलचा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे किंबहुना एकूणच जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराशावादी आणि पराभूत मनोवृत्तीचा होता.

ऑरवेल युद्धाची खुमखुमी बाळगणारा व अतिरेकी प्रवृत्तीचाही होता. शिवाय त्याला हिंसेबद्दल एक सुप्त आकर्षण होते. ऑरवेलने हिंसेबद्दल किती तरी अनावश्यक व अनाठायी असे भरभरून लिखाण केले आहे. त्याचा एक नमुना म्हणजेः “तुम्हाला भविष्याचे चित्र पाहायचे असेल तर मानवी चेहऱ्यावर लष्कराचा बूट रगडला  जातोय अशी कल्पना करा” अशी निराशाजनक व हिंसक कल्पनाशक्ती तो चालवत असे.

ऑरवेलच्या युद्धखोरीबद्दल बोलायचे तर दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा ऑरवेलने ब्रिटिश इंडिपेडंट लेबर पार्टीचा राजीनामा देऊन दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला अपयश आल्यानंतर त्याने शेवटी होमगार्डमध्ये काम मिळवले. ऑरवेलला पहिल्या महायुद्धातही सामील व्हायचे होते. त्याला पहिल्या महायुद्धात सामील होता आले नाही याची कायम खंत होती. त्यामुळे त्याचे पुरुषत्व अपूर्ण असल्याचे तो म्हणत असे.

ऑरवेलचे दुभंगलेले व्यक्तिमत्वः  

ऑरवेल असा का वागला याचा विचार करता असे दिसून येते की, त्याचे व्यक्तिमत्व दुभंगलेले होते तसेच तो दुटप्पी जीवन जगत होता आणि अस्थिर मनाचा माणूस होता. ऑरवेलचे एकूण विचार व कृती पाहता तो कुठल्याही विषयाशी एकनिष्ठ, नव्हता शिवाय दुट्टपीवृत्ती बाळगणारा होता हे खालील उदाहरणावरून दिसून येईल.

१ ऑरवेल स्पॅनिश सिव्हिल वॉरच्या संघटित लढ्यात सामील झाला खरा पण त्याच्याकडे ‘कॉम्रेडयरशीप’चा अभाव होता. हे त्याने त्याच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी केलेल्या दगाबाजीतून दिसून येते.

२ तो आयुष्यभर समाजवादी असल्याचा दावा करायचा पण त्याचे सगळे लिखाण वर्तन समाजवादाच्या विरोधात होते.

३ ऑरवेल रशिया, कम्युनिझमच्या विरोधात लिहितो पण अमेरिकन जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात ‘माझे लिखाण रशिया, कम्युनिझमच्या विरोधात नाही,’ असेही सांगतो. तसेच त्याच्या ‘1984’ कादंबरीचा कम्युनिझमच्या विरोधात वापर केला जाई अशी तो भीती व्यक्त करतो.

४ ऑरवेल आतून ‘ज्यू’विरोधक, ‘ज्यू’ द्वेष्टा होता हे त्याच्या नोंदवहीत त्याने केलेला ज्यू विरोधी टिप्पण्णीवरून दिसून येते. तो ब्रिटिश सरकारला दिलेल्या यादीतील नावांपुढे ‘इंग्लिश ज्यू’, ‘पोलिश ज्यू’, ‘ज्यूवेस’ असे त्याचे वांशिक पूर्वग्रह दर्शवणारे लेबल्स लावतो. तसेच ऑरवेल वेळोवेळी ज्यूंच्या जिव्हारी लागणारे अपमानकारक विनोद करत असे. पण त्याचवेळी ऑरवेल ज्यूंचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केले पाहिजे या विषयावर एक चांगला लेखही लिहितो. ऑरवेल ज्यूविरुद्ध केलेला विनोदाबद्दल दिलगिरी व्यक्त करून तो ते विनोद सहज जाता जाता केलेले विनोद होते अशी सफाई देतो.

पण मनोवैज्ञानिक फ्रॉईडच्या म्हणण्यानुसार अशा सहज विनोदाचे, टिप्पणीचे मूळ त्या व्यक्तिच्या निश्चित, ठाम विचारात असते. माणूस विनोद, जोक का करतो- हे सांगतॉना फ्रॉईड म्हणतो, “जोक, विनोद कुणी सहजासहजी करत नाही. त्याच्या पाठीमागे एक निश्चित उद्देश असतो. तो म्हणजे आलेल्या अडथळ्यांवर मात करून मनात दडलेली सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून आनंद व सुख घेण्यासाठी माणूस ‘जोक’ करतो.”

५ ब्रिटिश साम्राज्यवादाच्या बाबतीतही आपल्याला दोन प्रकारचे ऑरवेल दिसतात, एकीकडे ऑरवेल त्याचा राजकीय दृष्टिकोन मांडतांना ब्रिटिश साम्राज्यवादाला विरोध करताना दिसतो तर दुसरीकडे त्याच्या ‘बर्मिज डेज’ या कादंबरीत दिसते तसे तो ब्रिटिश साम्राज्य उभे करणाऱ्या जगाला सुधारण्याचे ओझे वाहणाऱ्या (White Man’s Burden) गोऱ्या साम्राज्यवाद्यांबद्दल नितांत अभिमान व आदर बाळगताना दिसतो.

इथे एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपणच शोधले पाहिजे ते म्हणजे ज्यामुळे ऑरवेल स्पॅनिश सिव्हिल वॉरमध्ये सामील झाला असे सांगण्यात येते त्या ऑरेवलच्या समाजवादी, फॅसिस्टविरोधी प्रेरणा तरी खऱ्या होत्या काय? की ऑरवेल सुरुवातीपासूनच म्हणजे ब्रिटिश पोलिसातील नोकरीचा राजीनामा दिल्यापासूनच ब्रिटिश गुप्तचर संघटनेसाठी काम करत होता? मला तरी ऑरवेल सुरुवातीपासूनच ब्रिटिश गुप्तहेर संघटनेसाठीच काम करत होता असे वाटते. वरील सर्व चर्चा सगळे पुरावे खाणाखुणा पाहता ऑरवेल स्पॅनिश सिव्हिल वॉरमध्ये समाजवादी, फॅसिझमविरोधी प्रेरणेने सामील नव्हता. तो तिथे केवळ काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी, त्याची माहिती घेण्यासाठी कुतुहलापोटी सामील होता असे ‘कोल्ड वॉरियर्स’ या ग्रंथाचा लेखक डंकन व्हाइट याच्यासह अनेकांना वाटते.

शेवटी ऑरवेल असा का वागला या प्रश्नाचे उत्तर शोधताना, त्याच्यावर असलेले ब्रिटिश साम्राज्यवादी संस्कार व प्रभाव, ऑरवेलच्या स्पॅनिश युद्धातील कारवाया, अनुभव व राग, त्याला झालेला ट्युबर कॅलॉसिसचा गंभीर आजार, त्याची पत्नी एलिनचा मार्च १९४५मध्ये झालेला मृत्यू व त्याचे वैयक्तिक दुःखी जीवन यातून तो हताश व वैफल्यग्रस्त बनला. तसेच चर्चा केलेल्या सगळ्या गोष्टी बरोबरच, त्याचा संकुचित, दुराग्रही व संशयी स्वभाव या ही गोष्टी त्याच्या उच्च प्रतीची सर्जनशील आणि दार्शनिक साहित्यनिर्मिती करण्याच्या मार्गातील अडसर बनल्या. तसेच रशियाला, कम्युनिझमला विरोध करण्याच्या नादात ऑरवेलचे साहित्य एकसुरी व प्रचारकी थाटाचे बनले. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका, पाश्चात्य राष्ट्रे, उजवे, उदारमतवादी विचारवंत, मीडिया यांची अशा साहित्याची गरज होती, मागणी होती. त्यासाठी ऑरवेलच्या साहित्याचा पुरेपुर वापर करून घेण्यात आला.

दीर्घकालीन विचार करता ऑरवेलने त्याच्या साहित्यात साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेला संयतपणा, तारतम्य न बाळगल्यामुळे त्याच्या साहित्याचे फार दूरगामी दुष्परिणाम झाले. त्यामुळे खूप मोठी सांस्कृतिक हानी व नुकसान झाले. तसेच प्रतिगामी भांडवली उजव्या शक्तींना समाजवाद व कम्युनिझमच्या विरोधात वातावरण तयार करण्यात खूप मोठे यश मिळाले. तेव्हा ऑरवेलचा गौरव करताना त्याचे, त्याच्या साहित्याचे उदात्तीकरण करताना वर चर्चा केलेल्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.

इथे ऑरवेलचा विचार केला त्याचे एक कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे ऑरवेलच्या साहित्याचे झालेले दुष्परिणाम. दुसरे म्हणजे हा केवळ एकट्या ऑरवेलचा प्रश्न नाही. ऑरवेल येथे प्रातिनिधीक आहे. अशा अनेक साहित्यिकांची बांधिलकी, त्यांचे उदारमतवादाच्या आडून प्रस्थापित व्यवस्थेकडे झुकलेले वर्तन यामुळे साहित्यिकांच्या एकूणच भूमिकेचा व बांधिलकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो आपण लक्षात घ्यावा म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रपंच.

उद्धव कांबळे, हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत.

या लेखासाठी वापरलेली संदर्भ सूची

Like It or Not, George Orwell Remains Relevant to the 21st Century – Anjan Basu

 ReadInstead litfest | What historian Ramachandra Guha is reading during the coronavirus lockdown – Scroll.in

The Cultural Cold War: The CIA and the World of Arts and Letters by Frances Stonor Saunders

Finks: How the C.I.A. Tricked the World’s Best Writers (Telord 1403) Hardcover – 10 January 2017 by Joel Whitney 

Cold Warriors: Writers Who Waged the Literary Cold War by Duncan White  (Author)

Was George Orwell secretly a reactionary snitch? How the author became an internet meme and target of the hard left – Adam Lusher Independunt (UK) 24 June,2018

Cold Warriors: Writers Who Waged the Literary Cold War – Reviewed by: Francis P. Sempa in New York Journal of books

Corruptions of Empire (Haymarket Series) Paperback – October 17, 1988

by Alexander Cockburn  (Author)   

Orwell for our time – Timothy Garton Ash, The Guardian, 5 May 2001 

Richard Crick ‘Orwell and biography’ Biography, vol 10, no.4, Fall 1987 

Politics and Letters: Interviews with New Left Review Paperback – by Raymond William 

Heretics and Renegades – by Isaac Deutscher

FRANCIS MULHERN – FOREVER ORWELL   

Jokes and Their Relation to the Unconscious  by Sigmund Freud

‘Burmese Days’ by George Orwell – Sudipta Datta, The Hindu, 20 June2020

‘Burmese Days’ by George Orwell with a New US Introduction By Malcolm Muggeridge  

Cold Warriors’ Review: The War of Words – By Thomas Mallon, The Wall Street Journal, 23 August 2019.

COMMENTS