जेरुसलेममध्ये चार धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. प्रार्थना स्थळे असणे हा कमजोर दुवा नसून तो पूर्ण जगाला शांतता संदेश देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जेरुसलेम शहरामध्ये जर सर्वांनी शांतता प्रस्थापित केली व सर्वांनीच सहअस्तित्व गुण्या गोविंदाने मान्य केलं तर याचा आधार घेत जगामध्ये इतर ठिकाणी शांतता स्थापित करता येईल.
कोरोना महासाथीच्या काळात पॅलेस्टाईन इस्रायल संघर्षाने जग अस्वस्थ झाले. या संघर्षात पुन्हा अगणित संपत्तीचे नुकसान व शेकडो निष्पाप ठार झाले. पॅलेस्टिनी नागरिकांना पुन्हा विस्थापितांचे आयुष्य वाट्याला आले. यातील अमानवीय दृश्य पाहून पॅलेस्टिनी नागरिकांच्या काही वर्षांपूर्वी घेतलेल्या भेटीच्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहत नाहीत.
वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक यूथ या जागतिक संघटनेच्या जनरल कौन्सिलची ३५ देशांच्या प्रतिनिधी संघटनांची बैठक २०१५मध्ये लेबनॉन देशातील राजधानी बैरुत शहरात आयोजित केली होती. या संघटनेचा उपाध्यक्ष या नात्याने मला उपस्थित राहणे गरजेचे होते. बैठक संपल्यावर दक्षिण लेबनॉनमधील सीदोन येथील ‘आईन-अल-हिलवे’ या पॅलेस्टाइन शरणार्थी कॅम्पला भेट देण्याच नियोजन होते. त्यानुसार आम्ही मोठ्या सुरक्षा कवचात शरणार्थी कॅम्पला भेटीसाठी निघालो. जगात एकूण नोंदणीकृत ५० लाख पॅलेस्टाईन शरणार्थी आहेत. त्यापैकी १५ लाख हे जॉर्डन, लेबनान रिपब्लिक, गाजा स्ट्रीप, वेस्ट बँक येथील ५८ अशा शरणार्थी कॅम्पमध्ये राहतात. शिवाय जगातील विविध देशांमध्ये विस्थापित पॅलेस्टाईन नागरिकांची संख्या अधिक आहे.
आमच्या स्वागतासाठी पॅलेस्टाईन संघटनांच्या बरोबरच आनंदी झालेली मुले आबालवृद्ध हे वरवर खूष दिसत असले तरी त्यांचे डोळे हे इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात अनेक पिढ्या होरपळल्याची कहाणी सांगत होते. शरणार्थी लोकांची अवस्था अत्यंत वाईट होती. साफसफाई नव्हती, लोकांना राहण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे गजबजलेल्या वस्तीत लोक राहत होते. एका हॉलमध्ये या ठिकाणी छोटासा भाषणाचा कार्यक्रम पार पडला. याच वेळी मनामध्ये अनेक प्रश्न घोंघावत होते. या लहान मुलांचे बालपण युद्धाने हिरावून घेतले होते. अशी लाखो बालके या युद्धाच्या हिंसेची बळी ठरलेली आहेत.
कार्यक्रम संपल्यानंतर अचानक लोकांची धावपळ व आरडाओरडा ऐकू आला. चौकशी केली असता समजले की कोणीतरी शरणार्थी कॅम्पच्या शेजारी गोळीबार केला आहे. शरणार्थीच्यापैकी काही जण सुरक्षा टीममध्ये होते त्यांच्याकडे विविध प्रकारच्या आधुनिक बंदुका होत्या. आमची भेटीची वेळ संपत आली होती. अशा आठवणी घेऊन आम्ही तेथून ४० जणांचे प्रतिनिधी मंडळ निघालो. आमचा काही तासांचा शरणार्थी कॅम्पमधील हा अनुभव होता तर मग हे लोक वर्षानुवर्षे अशा अवस्थेत कसे जगत असतील याची कल्पना करवत नाही.
कोणत्याही धर्मामध्ये एकमेकांच्या द्वेष करा असे शिकवलेले नाही. पण माणूस आपल्या सत्तेची हाव धर्माच्या, संस्कृतीच्या आडून भागवून घेतो. साम्राज्यवाद्यांनी अनेक वाद हेतुपुरस्सर तयार केले, काही तेवत ठेवले, त्या वादात तेल ओतण्याचे काम केले. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईन वाद होय.
ब्रिटिशांनी सुरू केलेला हा वाद त्यात अमेरिका आजतागायत तेल ओतण्याचे काम करत आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांनी ऑटोमन साम्राज्य कडून पॅलेस्टाईन कब्जा घेतला. आणि इस्रायलच्या अस्तित्वाला पूरक जमीन तयार केली. ज्या पद्धतीने भारताची वसाहत सोडून जाताना त्यांना भारत हे भविष्यात आव्हान होता कामा नये याकरिता त्याचे भारत-पाकिस्तान असे दोन तुकडे करणे ही रणनीती होती. तशीच काही अंशी इस्रायल व पॅलेस्टाइनबद्दल रणनीती राहिली. दुसर्या महायुद्धानंतर सत्ता समीकरणे बदलून अमेरिका ही महासत्ता म्हणून उदयास आली. अमेरिकेच्या भविष्यातील महासत्ता टिकवण्यासाठी व अरब देशांच्या साधन संपत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यूव्हरचना नुसार इस्रायलला अमेरिका खतपाणी घालत आलेली आहे व त्याची इस्रायल देखील विविध मार्गाने त्याची परतफेड करत आला आहे.
सध्याचे इस्रायलचे पंतप्रधाना बेंजमिन नेत्यान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन सामान्य लोकांनी मोठे आंदोलन उभे केले होते. काही महिन्यांपूर्वी इस्रायलमध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत नेत्यान्याहू यांच्या लिकुड पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. त्याकरिता त्यांना धार्मिक कट्टरवादी राजकारणाची गरज लागत आहे. गेल्या दोन वर्षात चार वेळा फेरनिवडणुका झाल्या आहेत. पण कोणत्याच पक्षाला या घडीला बहुमत मिळलेले नाही. देशांतर्गत राजकारणातील ही परिस्थिती पाहून आपले राजकारण अधिक कट्टरवादी व्हावे यासाठी ते पॅलेस्टाईनवर हल्ले करत आहेत.
काही विश्लषकांच्या मते, इस्रायलचा प्राचीन इतिहास हिब्रू बायबल मधून कळतो. त्यामधील मजकूरानुसार, इस्त्रायलची उत्पत्ती अब्राहम यांच्याकडून झाली, ज्यांना यहुदी धर्म (त्याचा मुलगा इसहाकद्वारे) आणि इस्लाम (त्याचा मुलगा इश्माएल मार्गे) या दोघांचा पिता मानले जाते.
अब्राहमच्या वंशजांना इजिप्शियन लोकांनी शेकडो वर्षे कनानमध्ये स्थायिक होण्यापूर्वी गुलाम म्हणून ठेवले असे मानले जात होते, जो आधुनिक काळातील इस्रायलचा भाग मानला जातो. इस्रायल हा शब्द अब्राहमचा नातू याकूब याच्याकडून आला आहे, ज्याला बायबलमध्ये हिब्रू देवाने “इस्राईल” असे नाव दिले.
इ. स. पूर्व १००० दरम्यान राजा डेव्हिडने या प्रदेशावर राज्य केले. नंतर त्याचा मुलगा सोलोमन राजा बनला व त्याने प्राचीन जेरूसलेममध्ये पहिले पवित्र मंदिर बांधले. इ. स.पूर्व ९३१मध्ये हे राज्य दोन राज्यात विभागला गेले, उत्तरेकडील इस्रायल आणि दक्षिणेस यहुदी. इ.स.पू. ७२२च्या सुमारास असिरियन लोकांनी उत्तरेकडील इस्रायल राज्यावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले. इ.स.पू. ५६८मध्ये बॅबिलोनी लोकांनी जेरूसलेम जिंकले आणि पहिले मंदिर नष्ट केले, जे पुढे इसवी सनपूर्व ५१६मध्ये दुसऱ्यांदा बांधले गेले.
पुढे कित्येक शतकांमध्ये, आधुनिक काळातील इस्त्रायलला पारसी, ग्रीक, रोमन, अरब, फाटिमिड्स, सेल्जुक तुर्क, धर्मयोद्धे, इजिप्शियन, मामेलुक्स, इस्लामी आणि इतर अशा अनेक गटांनी जिंकले आणि त्यांच्यावर राज्य केले. इ.स.१५१७ ते १९१७पर्यंत इस्रायलसहित बहुतांश मध्यपूर्व भागावर ऑटोमन साम्राज्याची सत्ता होती. १९१८ मध्ये मित्र राष्ट्रांच्या विजयाबरोबरच पहिले महायुद्ध संपुष्टात आले तेव्हा पॅलेस्टाईन (म्हणजे सध्याचे इस्रायल, पॅलेस्टाईन व जॉर्डन)वरचे नियंत्रण ऑटोमन साम्राज्याकडून ब्रिटिशांकडे आले. १९२२मध्ये “लीग ऑफ नेशन्स”ने बॉलफोर घोषणापत्र आणि पॅलेस्टाईनवरील ब्रिटिश हुकूम मंजूर केला. अरब लोकांनी बालफोरच्या घोषणेला कडाडून विरोध दर्शविला, कारण ज्यूंच्या मातृभूमीचा अर्थ अरब पॅलेस्टाईनने त्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचा होता. दुसरे महायुद्ध संपून १९४८ मध्ये इस्रायल स्वतंत्र राष्ट्र निर्मितीपर्यंत ब्रिटिशांचे पॅलेस्टाईनवर नियंत्रण होते.
पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला ज्यू लोकांची लोकसंख्या १ कोटी ६७ लाखांच्या घरात पोहोचली म्हणजे त्यावेळची लोकसंख्या पाहता ०.७ टक्के ज्यू होते. २०१८ मध्ये ही लोकसंख्या १ कोटी ४० लाख ते १ कोटी ८० लाख या दरम्यान पोहोचली आहे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात, ज्यूंमध्ये झिओनिझम ही धार्मिक आणि राजकीय चळवळ उदयास आली.
पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंना मातृभूमीची पुनर्स्थापना करण्याच्या उद्देशाने जगभरातील मोठ्या संख्येने ज्यू लोक स्थलांतरीत होऊन पॅलेस्टाईनमध्ये (सध्याचा इस्रायल) स्थायिक झाले आणि त्यांनी तेथे वस्ती बांधल्या.१८८२ ते १९०३दरम्यान सुमारे ३५ हजार ज्यू पॅलेस्टाईनमध्ये पुनर्स्थायिक झाले. पुन्हा १९०४ ते १९१४ दरम्यान आणखी ४० हजार ज्यू तिथे स्थायिक झाले. ज्यूविरोधी नाझीवादाच्या उदयानंतर छळाच्या भीतीने युरोप आणि इतरत्र राहणाऱ्या ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमध्ये आश्रय घेतला. होलोकॉस्ट व दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झिओनिस्ट चळवळीतील सदस्यांनी प्रामुख्याने स्वतंत्र ज्यू राज्य निर्माण करण्यावर भर दिला.
१९४०मध्ये भारतात २० हजार ज्यू होते. इस्रायलच्या स्थापनेनंतर ती कमी होऊन २००१च्या जनगणनेनुसार ४६५० ज्यू लोकसंख्या राहिली.
१९४७ मध्ये पॅलेस्टाईनला ज्यू आणि अरब राज्यात विभाजित करण्याच्या योजनेला संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली, पण अरबांनी ती नाकारली. मे १९४८मध्ये, पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरियन यांनी इस्रायलला अधिकृतपणे स्वतंत्र ज्यू देश म्हणून घोषित केले. त्याच वर्षी स्वतंत्र इस्त्रायलच्या घोषणेनंतर इजिप्त, जॉर्डन, इराक, सीरिया आणि लेबेनॉन या पाच अरब राष्ट्रांनी त्वरित या प्रदेशात आक्रमण केले. संपूर्ण इस्रायलमध्ये गृहयुद्ध सुरू झाले, परंतु १९४९ मध्ये युद्धबंदीचा करार झाला. तात्पुरत्या शस्त्रास्त्र संधीचा भाग म्हणून वेस्ट बँक, जॉर्डनचा भाग बनला आणि गाझा पट्टी इजिप्तचा प्रदेश बनली.
१९६७मध्ये इस्रायलने इजिप्त, जॉर्डन आणि सीरियाचा सहा दिवसांत पराभव केला. या युद्धानंतर इस्रायलने गाझा पट्टी, सिनाई द्वीप कल्प, वेस्ट बँक आणि गोलन हाइट्स ताब्यात घेतली. हे भाग इस्रायलच्या ताब्यात राहिले. गाझा आणि वेस्ट बँकच्या इस्त्रायली कब्जामुळे १९८७ मध्ये पॅलेस्टिनी उठाव झाला आणि त्यात शेकडो मृत्युमुखी पडले. ओस्लो पीस अॅकार्ड म्हणून ओळखल्या जाणार्या शांतता कराराने हा प्रयत्न संपुष्टात आला. यानंतर पॅलेस्टाईन प्राधिकरणाने इस्राईलमधील काही प्रांत ताब्यात घेतला. १९९७मध्ये, इस्त्रायली सैन्याने वेस्ट बँकच्या काही भागातून माघार घेतली. २००० मध्ये पॅलेस्टाईननी इस्त्रायलींवर आत्मघातकी बॉम्ब आणि इतर हल्ले सुरू केले. इस्रायलने २००५च्या अखेरीस गाझा पट्टीवरून सर्व सैन्य आणि ज्यू वसाहती हटवण्याची योजना जाहीर केली. २००६ मध्ये पॅलेस्टाईनची सत्ता स्थापणाऱ्या सुन्नी इस्लामी अतिरेकी गट हमासबरोबर इस्रायलच्या संघर्षात वारंवार हिंसाचार घडला. तसेच दोघांमध्ये काही मोठे संघर्ष २००८, २०१२, २०१४ मध्ये झाले.
इस्त्रायल पॅलेस्टाईनला राज्य म्हणून अधिकृतपणे मान्यता देत नाही, मात्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या १३५ हून अधिक सदस्य यांनी पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून पाठिंबा दिला आहे. आता सुरू असलेल्या संघर्षात बेंजामिन नेत्यानाहू यांनी २५ देशांचे आभार मानले आहेत याचा अर्थ केवळ २५ देशांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
जेरुसलेममध्ये मुस्लिम, ख्रिश्चन व यहुदी धर्माची चार पवित्र ठिकाण आहेत. पहिले म्हणजे ख्रिश्चनांसाठी सेप्लकर चर्च. बहुतांश ख्रिस्ती परंपरेनुसार येशूला इथेच गोल गोठा वर किंवा कॅलरी या टेकडीवर वधस्तंभला बांधण्यात आलं. येशूचे थडगं या चर्चमध्ये आहे. दुसरा म्हणजे मुस्लिमांसाठी मस्जिद. मुस्लिमांमध्ये अल-हरम-अल-शरीफ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात एका पठारावर दगडी घुमट आणि अल अक्सा मस्जिद आहे. तिसरं म्हणजे ज्यूंसाठी पवित्र भिंत. ज्यू धर्मीयांचे स्थळ हे कोटल किंवा पश्चिमी भिंत म्हणून ओळखल जात. ज्यू असं मानतात की हे स्थळ म्हणजे पायाचा दगड जिथून जगाची निर्मिती झाली होती जिथून अब्राहम यांनी मुलगा इसाकचा त्याग करण्याची तयारी केली होती. चौथा म्हणजे आर्मेनियन चर्च. हे देखील आर्मेनियन ख्रिश्चनांसाठी पवित्र स्थळ आहे.
एकाच शहरामध्ये अशा रीतीने विविध धर्माची अत्यंत महत्त्वाची पवित्र प्रार्थना स्थळे असणे हा कमजोर दुवा नसून तो पूर्ण जगाला शांतता संदेश देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जेरुसलेम शहरामध्ये जर सर्वांनी शांतता प्रस्थापित केली व सर्वांनीच सहअस्तित्व गुण्या गोविंदाने मान्य केलं तर याचा आधार घेत जगामध्ये इतर ठिकाणी शांतता स्थापित करता येईल. पण हा खेळ केवळ धर्म, श्रद्धा यांचा नसून हा खेळ साम्राज्यवादाचा, वर्चस्ववादाचा, प्रादेशिक अर्थकारणाचा व सत्तेचा आहे त्यामुळे नजीकच्या काळात तोडगा दिसत नाही.
गिरीश फोंडे, वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक यूथचे माजी जागतिक उपाध्यक्ष आहेत.
COMMENTS