‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ला शांततेचे नोबेल

‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ला शांततेचे नोबेल

साथीच्या काळात ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ने आपल्या प्रयत्नांची तीव्रता वाढवण्याची उत्तम क्षमता जगाला दाखवून दिली आहे. संस्थेने म्हटल्याप्रमाणे, “आपल्याकडे आजारावर लस येत नाही तोपर्यंत ही अनागोंदी निस्तरण्यासाठी अन्न ही सर्वोत्तम लस आहे.”

शेतकरी संघटनांकडून २६ मार्चला भारत बंद
मोदींच्या राज्यात भारतीय मुस्लिम!
अजित पवार यांना क्लीन चीट

आंतरराष्ट्रीय ऐक्य आणि बहुपक्षीय सहकार्याची आवश्यकता आजपर्यंत कधीच नव्हती एवढी स्पष्टपणे जाणवत असताना, नॉर्वेतील नोबेल समितीने २०२० सालासाठीच्या नोबेल शांतता पारितोषिकासाठी वर्ल्ड फूड प्रोग्रामची (डब्ल्यूएफपी) निवड केली आहे. उपासमारी दूर करण्याप्रती केलेल्या प्रयत्नांसाठी, संघर्षग्रस्त भागांत शांतता प्रस्थापित करण्याप्रती दिलेल्या योगदानासाठी आणि भूकेचा वापर युद्ध व संघर्षाचे शस्त्र म्हणून करण्याच्या प्रवृत्तीविरोधात दिलेल्या लढ्यासाठी डब्ल्यूएफपीचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान केला जाणार आहे.

अन्नसुरक्षेसाठी काम करणारी सर्वांत मोठी संस्था

वर्ल्ड फूड प्रोग्राम ही उपासमारी दूर करण्यासाठी तसेच अन्नसुरक्षेला बढावा देण्यासाठी काम करणारी जगातील सर्वांत मोठी मानवतावादी संस्था आहे. २०१९ मध्ये डब्ल्यूएफपीने ८८ देशांतील, अन्नाचा तुटवडा आणि उपासमारीने ग्रस्त असलेल्या सुमारे १०० दशलक्ष लोकांना, सहाय्य पुरवले. २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये उपासमार निर्मूलनाचा समावेश करण्यात आला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डब्ल्यूएफपी हे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख माध्यम आहे.

नोबेल समितीने २०२० सालच्या शांतता पारितोषिकासाठी ३१८ उमेदवारांचा विचार केला, नामांकनांपैकी २११ व्यक्तींकडून आलेली होती, तर १०८ संस्थांकडून आलेली होती.

कोरोनाच्या साथीमुळे उपासमारीत वाढ

अन्नसुरक्षाविषयक परिस्थितीने गेल्या काही वर्षांत नकारात्मक वळण घेतले आहे. २०१९ मध्ये १३५ दशलक्ष लोक गंभीर स्वरूपाच्या उपासमारीशी झगडत होते, हा गेल्या अनेक वर्षातील सर्वोच्च आकडा आहे. उपासमारीच्या प्रमाणात झालेली वाढ ही बहुतांशी युद्धे तसेच सशस्त्र संघर्षाची परिणती आहे. त्यात यंदा कोरोनाविषाणूच्या साथीमुळे जगभरातील उपासमारीच्या बळींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. येमेन, काँगो प्रजासत्ताक, नायजेरिया, दक्षिण सुदान आणि बर्किना फासो यांसारख्या देशांमध्ये हिंसक संघर्ष आणि साथीचे आजार यांमुळे उपासमारीशी झगडणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

साथीच्या काळात वर्ल्ड फूड प्रोग्रामने आपल्या प्रयत्नांची तीव्रता वाढवण्याची उत्तम क्षमता जगाला दाखवून दिली आहे. संस्थेने म्हटल्याप्रमाणे, “आपल्याकडे आजारावर लस येत नाही तोपर्यंत ही अनागोंदी निस्तरण्यासाठी अन्न ही सर्वोत्तम लस आहे.” वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि अन्नसुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या संस्थांनी विनंती केलेले आर्थिक सहाय्य त्यांना मिळाले नाही, तर संपूर्ण जगावरील उपासमारीचे संकट कोणीही कल्पना केली नसेल एवढे तीव्र स्वरूप धारण करेल, असा धोका आहे. त्यातच अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने २०१८ सालापासून वेस्ट बँक व गाझासाठी डब्ल्यूएफफीला केला जाणारा वित्तपुरवठा पूर्णपणे थांबवला आहे. त्याचप्रमाणे पॅलेस्टिनींसाठी दिला जाणारा अन्य निधीही थांबवला आहे. पॅलेस्टिनी नेतृत्वाने अमेरिकी वकिलात जेरूसलेममधून हलवण्याचा निषेध म्हणून अमेरिकेसोबतचे संबंध तोडल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने निधी थांबवला आहे.

भूक व हिंसेचे दुष्टचक्र

भूक आणि सशस्त्र संघर्ष यांच्यात दुष्टचक्राचा संबंध आहे: एका बाजूला युद्धे आणि संघर्षामुळे अन्नसुरक्षेला धोका पोहोचतो आणि उपासमारीचे संकट येते, तर दुसरीकडे उपासमार आणि अन्नसुरक्षेचा अभावच सुप्त संघर्षांना चेतवतो, हिंसेचा उद्रेक घडवून आणतो. आपण जोपर्यंत युद्धे व सशस्त्र संघर्षांना पूर्णविराम देत नाही, तोपर्यंत आपण उपासमार शुन्यावर आणण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही.

अन्नसुरक्षा वाढीवर भर देण्याच्या कामात मदत करण्याची नॉर्वेतील नोबेल समितीची इच्छा आहे. यामुळे उपासमारीची समस्या दूर तर होईलच, शिवाय, स्थैर्य व शांततेची संभाव्यता वाढण्यासही मदत होईल, असे समितीचे मत आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामने दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशियात आद्य स्वरूपाचे प्रकल्प राबवून शांततेच्या प्रयत्नांना मानवतावादी कार्याची जोड देण्यात पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मे २०१८ मध्ये रिझोल्युझन २४१७चा सार्वमताने स्वीकार केला. यासाठी झालेल्या प्रक्रियेत वर्ल्ड फूड प्रोग्रामचा सक्रिय सहभाग होता.

या ठरावामध्ये प्रथमच संघर्ष व उपासमार यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यात आला आहे. अन्नविषयक सहाय्यता सर्व गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्याप्रती बांधिलकीची सुरक्षा परिषदेने संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आठवण करून दिली. त्याचप्रमाणे उपासमारीचा वापर युद्धासाठी करण्यावर सुरक्षा परिषदेने टीका केली. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपासमारीचा सामना करणाऱ्या किंवा तो धोका असलेल्या कोट्यवधी लोकांकडे जगाचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न नोबेल समितीला यंदाच्या नोबेल शांतता पारितोषिकाच्या माध्यमातून करायचा आहे. अन्नसुरक्षेचा उपयोग शांतता प्रस्थापित करण्याचे शस्त्र म्हणून करण्यात वर्ल्ड फूड प्रोग्रामची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय युद्ध व संघर्षाचे शस्त्र म्हणून उपासमारीच्या वापराला प्रतिबंध करण्यासाठी सदस्य राष्ट्रांना एकत्रित करण्यात डब्ल्यूएफपीने भक्कम योगदान दिले आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रात उल्लेख केेल्या बंधुभावाप्रती ही संस्था सातत्याने काम करत आहे. संयुक्त राष्ट्रांची सर्वांत मोठी विशेषीकृत एजन्सी म्हणून वर्ल्ड फूड प्रोग्राम हे पीस काँग्रेसचेच आधुनिक स्वरूप आहे आणि नोबेल शांतता पारितोषिकांनी या पीस काँग्रेसेसचे कायम समर्थन केले आहे.

वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या कामामुळे मानवजातीला झालेल्या लाभाचे जगातील सर्व राष्ट्रांनी समर्थन केले पाहिजे व त्याला पाठिंबा दिला पाहिजे, असे नोबेल समितीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

डब्ल्यूएफपीचा परिचय

डब्ल्यूएफपीची स्थापना १९६१ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ड्वाइट आयसेनहॉवर यांच्या विनंतीवरून, अन्नसहाय्य देण्याचा एक प्रयोग म्हणून, संयुक्त राष्ट्रांद्वारे करण्यात आली होती. ही संस्था ८३ देशांत कार्यरत आहे आणि जगभरातील १०० दशलक्षांहून अधिक उपाशी स्त्री-पुरुष व लहान मुलांना अन्न पुरवण्यासाठी या संस्थेचे कर्मचारी दररोज प्रयत्नांची शर्थ करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नोबेल पारितोषिकाने मान्यता दिली आहे, अशा भावना डब्ल्यूएफपीच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0