टिकैतः शेतकरी आंदोलनातील दुसरी पिढी

टिकैतः शेतकरी आंदोलनातील दुसरी पिढी

२५ ऑक्टोबर १९८८ मध्ये राजधानी नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे एक अभूतपूर्व आंदोलन झाले होते. बाबा महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने त्यावेळेच्या काँग्रेसप्रणित राजीव गांधी सरकारला अक्षरशः झुकवले होते. आता टिकैत यांची दुसरी पिढी राकेशसिंह आणि नरेश याच राजधानी नवी दिल्लीत शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे. तब्बल ३४ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाचे यश हे निर्भेळ आणि लखलखीत होते. आता सुद्धा शेतकरी आंदोलन होत असून यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का..?

सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन
चालू वर्षात सोयाबीनचे (कृषी) अर्थचक्र कोलमडणार?
२०१९-२० वर्षांतील भाजपची संपत्ती ४,८४७ कोटी

२५ ऑक्टोबर १९८८ मध्ये राजधानी नवी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे एक अभूतपूर्व आंदोलन झाले होते. बाबा महेंद्र सिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने त्यावेळेच्या काँग्रेसप्रणित राजीव गांधी सरकारला अक्षरशः झुकवले होते. आता टिकैत यांची दुसरी पिढी राकेशसिंह आणि नरेश याच राजधानी नवी दिल्लीत शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे. तब्बल ३४ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाचे यश हे निर्भेळ आणि लखलखीत होते. आता सुद्धा शेतकरी आंदोलन होत असून  यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का..?

एखाद्या घराण्याचा इतिहास हा नेहमी प्रत्यवर्तीत होत जातो. याचाच प्रत्यय हा राकेश टिकैत यांच्या रूपाने नवी दिल्लीच्या सीमेवरील सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने दिसून आला. अक्षरशः मोडून काढलेले एक दीर्घकालीन आंदोलन पुन्हा नव्या दमाने उर्जितावस्थेत करताना त्यात चेतना आणि धग याची फुंकर मारण्याचे काम राकेश टिकैत यांनी केले आहे.

टिकैत या नावातच संघर्ष आणि केवळ संघर्ष सीमित झाला आहे. गतकाळचा इतिहास पाहिला तर अशाच एका शेतकरी आंदोलनाने राजधानी नवी दिल्ली हलवून सोडली होती. ३२ वर्षांपूर्वी भारतीय किसान युनियनचे संस्थापक बाबा टिकैत उर्फ चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांनी संपूर्ण दिल्ली ठप्प केली होती. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत होते आणि पंतप्रधान राजीव गांधी होते. यावेळी शेतकऱ्यांच्या पुढे राजीव गांधी यांनाही नमते घ्यावे लागले होते. आता त्याचाच वारसा राकेश पुढे चालवत आहेत.

थोडे गतकाळात डोकावले तर चौधरी टिकैत यांचे संपूर्ण आयुष्य हे संघर्ष आणि कठीण परिस्थितीत राहिले आहे. मुजफ्फरनगर येथील सिसोली गावात चौधरी महेंद्रसिंह यांचा जन्म १९३५ मध्ये झाला. सर्वप्रथम त्यांनी १९८६ मध्ये भारतीय किसान युनियनची स्थापना केली. तर १९८७ मध्ये करमुखेडा येथील वीज वितरण व्यवस्थेविरुद्ध त्यांनी केलेले आंदोलन संपून देशात चर्चेचा विषय बनला होता. महेंद्रसिंह यांनी केलेले एक आंदोलन असे होते की त्या वेळेच्या केंद्र सरकारला या आंदोलनाने अक्षरशः कापरे भरले होते.

ही घटना आहे तीन दशकांपूर्वीची. २५ ऑक्टोबर १९८८ ला नवी दिल्लीमधील बोट क्लबमध्ये मोठी किसान पंचायत भरली होती. त्याला देशातील १४ राज्यांमधून शेतकरी उपस्थित होते. सुमारे पाच लाख शेतकऱ्यांनी त्यावेळी विजय चौक ते इंडिया गेट याचा ताबा घेतला होता. सात दिवस झालेल्या या आंदोलनामुळे त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधी यांना शेतकऱ्यांच्या सर्वच्या सर्व ३५ मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या. या आंदोलनाने चौधरी महेंद्रसिंह यांनी मुख्यमंत्री तसेच दस्तुरखुद्द पंतप्रधान यांना शेतकऱ्यांपुढे झुकवले होते. असेच आंदोलन ११ ऑगस्ट १९८७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाले होते. वाढीव वीज बिल विरोधात तसेच काही मागण्यांबाबत महेंद्र सिंह टिकैत यांनी मोठे आंदोलन पुकारले होते. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या वीर बहादूर सिंह यांना टिकैत यांच्या सिसोली गावी जाऊन चर्चा करावी लागली. शेतकऱ्यांची ताकद काय असते ते या घटनेने महेंद्र सिंह यांनी जगाला दाखवून दिले होते.

आता तब्बल ३४ वर्षानंतर पुन्हा तोच इतिहास नवी दिल्लीच्या सीमेवरून लिहिला जाण्याची दाट शक्यता आहे. वडिलांचा वारसा तेवढ्याच जोमाने आणि निष्ठेने चालविताना विझत चाललेल्या आंदोलनाला अश्रूंचा निखारा देऊन ते पेटविण्याचे काम राकेश यांनी केले आहे. २५ ऑक्टोबर १९८८ मध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीच्या महत्त्वाच्या भागावर कब्जा केला होता तर आता याच शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी लाल किल्याच्या कब्जाची स्क्रिप्ट लिहिली गेली. ६५ दिवस सुरू असलेले आंदोलन काही क्षणात मोडण्याची आणि संपण्याची चिन्हे दिसत असताना टिकैत यांनी त्याला उर्जितावस्थेत नेले. आणि मग तब्बल ६५ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या वर मौन सोडावे लागले.

राकेश हे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत तर त्यांचे मोठे बंधू नरेश हे किसान युनियनचे अध्यक्ष आहेत. एकेकाळी धावपटू म्हणून परिचित होते. तसेच सर्वात मोठ्या खाप पंचायतीचे अध्यक्ष आहेत. महेंद्र सिंह यांच्या निधनानंतर २०११ मध्ये राकेश सक्रिय झाले. राजकारणापासून दूर राहून महेंद्र सिंह यांनी युनियन चालवली. पण राकेश हे राजकारणाशी जोडले गेले.

राकेश टिकैत यांनी २००७ मध्ये मुझफ्फरनगर येथून विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून तर २०१४ मध्ये चौधरी चरण सिंह यांच्या राष्ट्रीय लोक दल पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. या दोन्ही ठिकाणी ते पराभूत झाले होते. तत्पूर्वी १९८५ मध्ये राकेश हे दिल्ली पोलीस दलात हवालदार म्हणून रुजू झाले होते. त्या नंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती. त्याचवेळी महेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन पेटले होते. त्यामुळे राकेश यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते थेट आंदोलनात सहभागी झाले. राकेश सिंह यांचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे शाकाहारी आहेत. साधे आणि सकस आहार हा त्यांचा नित्यक्रम आहे. किमान ४८ ते ७२ तास ते पाणी न पिता राहू शकतात. तसेच आजही ते सातत्याने रक्तदान करतात. वयाच्या ७५ वर्षापर्यन्त रक्तदान करण्याचा संकल्प राकेश सिंह यांनी केला आहे.

खाप पंचायत आणि शेतकरी ही राकेश यांची बलस्थाने आहेत. बली खाप पंचायतमध्ये लाखो लोक एकाचवेळी सहभागी होतात. आता या शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून लाखो लोक नवी दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपुर सीमेवर जमा झाले आहेत. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यातील प्रकारानंतर एक वेळ आली होती की हे शेतकरी आंदोलन आता संपले. पण याच निर्णायक क्षणी राकेश सिंह यांनी ‘मी एकवेळ आत्महत्या करेन पण आंदोलन सोडणार नाही,’ असे म्हणताच उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा येथून एका रात्रीत लाखो शेतकरी गाझीपूर सीमेकडे निघाले.

आता आंदोलनाच्या दुसऱ्या आणि मोठा निर्णायक टप्प्यावर राकेश सिंह यांनी ‘जब तक कानून रद्द नही, घर वापसी नाही’ अशी लक्षभेदी घोषणा केली आहे. याबाबत राकेश सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी, आता आर या पार ची लढाई होईल. जोपर्यंत काळे कृषी कायदे केंद्र सरकार संपूर्ण रद्द करत नाही तो पर्यंत आता इथेच मुक्काम. अगदी सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंतही हे आंदोलन सुरू राहिले तरी आम्ही त्यास तयार आहोत, असा निर्धार व्यक्त केला.

सध्या जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. ट्विटरवर समर्थनार्थ अनेक जण सरसावले आहेत याकडे तुम्ही कसे पाहता या प्रश्नाला उत्तर देताना राकेशसिंह म्हणाले की, ही शेतकऱ्यांची अस्तित्वाची लढाई आहे. आपला देश कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो, याच देशात या काळ्या कायद्याने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. मुळात हे कायदे उद्योग धार्जिणे आहेत त्यामुळे ते रद्द झालेच पाहिजेत. आम्हाला यामध्ये स्थगिती नको तर रद्द हा शब्द हवा आहे. आणि त्यासाठी आम्ही इथे महिनोंमहिने ठाण मांडून बसू.

मोदी सरकार जर आमच्या भावना समजू शकत नसेल तर आमचा नाईलाज आहे. या प्रश्नावर सरकार सत्तेतून बाहेर जाऊ शकते, पण आम्हाला राजकारण करायचे नाही, असे राकेशसिंह यांनी स्पष्टपणे सांगितले. सीमेवर सरकारकडून रस्त्यावर खिळे ठोकण्यात येत असून काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. ही सरकारची दडपशाही असून त्याचे गंभीर परिणाम भविष्यात त्यांना भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.

प्रखर आणि सत्तेला हादरवून सोडणाऱ्या आंदोलनाचा इतिहास रचलेल्या टिकैत कुटुंबाची ही दुसरी पिढी आता रणांगणात आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? यावरच या शेतकरी आंदोलनाचे भविष्य ठरणार आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: