वृक्षः शाश्वत जीवनाचा अशाश्वत अंश

वृक्षः शाश्वत जीवनाचा अशाश्वत अंश

वृक्ष अभय देतात. ज्याला त्यांच्याशी बोलायला, त्यांचं ऐकायला जमतं, त्याला सत्य गवसतं. ते कोणताही बोध किंवा तत्वज्ञान शिकवत नाहीत. ते सांगतात जीवनाचा पुरातन नियम – कुठच्याही तपशीलांनी विचलित न होता. (साहित्याचे नोबेल (१९४६) मिळवणारे हरमन हेस् यांच्या मूळ जर्मन लेखाचा मराठी अनुवाद)

वृक्षांनी मला कायमच अत्यंत मार्मिक उपदेश केलेला आहे. कुटुंबातल्या किंवा समाजातल्या ज्येष्ठ व्यक्ती असाव्यात तसे ते राईत किंवा जंगलात उभे असतात तेव्हा मी त्यांना नमन करतोच. पण त्याहून अधिक जेव्हा ते एकटे उभे असतात तेव्हा मी जरा जास्तच नतमस्तक होतो. असे वृक्ष मला एकांडी माणसं वाटतात. अर्थात दुबळेपणाने आयुष्याला पाठ दाखवून पळून गेलेल्या संन्याशासारखे एकारलेले नव्हे तर महान बिथोवन किंवा नित्शेसारखे एकांतप्रिय. त्यांच्या सर्वात वरच्या फांद्यांवर विश्वाचे श्वास सळसळतात आणि त्यांची मुळं अभेद्य खडकाचा थांग शोधत जातात. पण ते तिथं नुसतेच थबकून उभे नसतात. आयुष्याचा सगळा जोर एकवटून त्यांचा संघर्ष चालू असतो- अंतरात उमगलेल्या नियमांनी परिपूर्ण होण्याचा, आपला बांधा आपण घडवण्याचा, जगासमोर स्वतःला मांडण्याचा.

या जगात एका मजबूत, मनोरम वृक्षाहून अधिक पवित्र, अधिक उदात्त कदाचित काहीच नसावं. असा वृक्ष तोडल्यावर त्याची ती मरण-जखम उन्हात उघडी पडते तेव्हा त्याचा सगळा भूतकाळ त्या चमकदार चकतीवर कोरलेला दिसून येतो – त्याची वर्षवलये, त्याच्या जखमा, सगळा संघर्ष, सगळं दुःख, सगळे आजार, सगळा आनंद आणि सगळी भरभराट. सगळं सगळं प्रत्यक्ष तिथं लिहिलेलं असतं – दर वर्षातली वाढ दाखवणारी काही अरुंद तर काही रुंद वलयं, सहन केलेले हल्ले आणि सोसलेली वादळे. अगदी नवथर लाकूडतोड्याला सुद्धा ठाऊक असतं की अरुंद वलयं असलेलं लाकूड जास्त कठीण आणि टिकाऊ असतं. त्याला ठाऊक असतं की डोंगराच्या माथ्यावर, सतत संकटांच्या छायेत दुर्दम्य, भारदस्त आणि आदर्श असे वृक्ष वाढतात.

वृक्ष अभय देतात. ज्याला त्यांच्याशी बोलायला, त्यांचं ऐकायला जमतं, त्याला सत्य गवसतं. ते कोणताही बोध किंवा तत्वज्ञान शिकवत नाहीत. ते सांगतात जीवनाचा पुरातन नियम – कुठच्याही तपशीलांनी विचलित न होता.

वृक्ष म्हणतात: माझ्या आत दडलंय एक सुप्त बीज, एक ठिणगी, एक विचार; मी जणू शाश्वत जीवनाचा अशाश्वत अंश. माझ्या चिरंतन मातेने माझ्यासाठी केलेले सायास आणि पत्करलेला धोका अनन्य आहे. अनन्य आहे माझी घडण आणि माझ्यात पसरलेल्या शिरांचे जाळे. अनन्य आहे माझ्या पानांत होणारी बारीकशी सळसळ. अनन्य आहे माझ्या खोडावरचा बारीकसा व्रण. माझी घडण अशीच बारीक बारीक तपशीलांनी घडवली गेलेली, जणू शाश्वताच्या प्रदर्शनासाठी.

वृक्ष म्हणतात: विश्वास हीच माझी शक्ती. माझ्या बापजाद्यांचा मला काहीच पत्ता नाही. दरवर्षी माझ्या कुशीतून निपजणाऱ्या हजारो मुलांचीसुद्धा मला खबर नाही. ज्या इवल्याशा बी मधून माझी रुजवण झाली तिच्या आत दडलेलं गुपित मी अगदी अंतापर्यंत जगणार, त्याशिवाय इतर कशाचीच मला पर्वा नाही. मला खात्री आहे ईश्वर माझ्या आतच आहे. आणि माझे श्रम हेच माझं पावित्र्य असं मला मनापासून वाटतं. या विश्वासातच माझं जगणं.

आयुष्याच्या प्रश्नांनी गांजलेले आपण जगणं असह्य होऊन मरणात निवारा शोधायला लागतो तेव्हा वृक्ष आपल्याला काही सांगू पाहतात: शांत हो ! शांत हो ! माझ्याकडे बघ ! आयुष्य सोपं नाही, तसंच कठीणही नाही. सगळे विचार अगदी पोरकट आहेत. निवारा इथे नाही, तिथेही नाही. निवारा तुझ्यातच आहे, नाहीतर कुठेच नाही.

संध्याकाळच्या वाऱ्यात वृक्षांची सळसळ ऐकून माझ्या काळजात दूरवर निघून जाण्याची ऊर्मी दाटून येते. ती सळसळ शांतपणे खूप काळ ऐकत राहिलं तर तिचं बीज, तिचा अर्थ उघड होतो. ती दुःखापासून पळ काढण्याची भावना आहे असं वाटलं तरी ती तशी नसते. खरंतर ती निवाऱ्याची आस असते, आईच्या आठवणीची असते, आयुष्याला नवीन उपमा देण्याची असते. ती घराकडे घेऊन जाते. प्रत्येक रस्ता घराकडेच जातो. प्रत्येक पाऊल जन्म, प्रत्येक पाऊल मृत्यू, प्रत्येक थडगं जणू आईच.

संध्याकाळच्या वेळी आपल्या पोरकट विचारांच्या समक्ष आपण अस्वस्थपणे उभे असताना वृक्ष सळसळतात: वृक्ष आपल्यापेक्षा दीर्घायु असतात. तसेच त्यांचे विचार दीर्घ, संथ आणि निवांत लयीत चाललेले असतात. आपण त्यांचं ऐकत नाही तोवर ते आपल्यापेक्षा बुद्धिमान असतात. पण एकदा का त्यांना ऐकण्याची विद्या गवसली की मग आपल्या विचारांचं अपुरेपण, त्यांचा वेग आणि त्यांची पोरकट घाई अतुलनीय अशा आनंदात बदलून जातात. वृक्षांना ऐकायला जमणाऱ्या कुणालाही वृक्ष व्हावं वाटत नाही. आपण जे कुणी आहोत त्यापेक्षा वेगळं काहीच व्हावं वाटत नाही. तेच आपलं घर, तोच आपला आनंद.

(आधार: जेम्स राइट (१९७२) यांचे ‘द वांडरींग: नोट्स अँड स्केचेस’) 

अनुवादः विनायक पाटील, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली इथे प्राध्यापक असून निसर्ग अभ्यासक आहेत.

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

NatureNotes

COMMENTS